आजी

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
12 Apr 2013 - 5:32 am

"लिव्ह योर बेस्ट लाइफ" या "ओ - द ऑपराह मॅगझिन" च्या अंकामधील एका लेखाचे भाषांतर. हा लेख त्यातील लहान लहान वाक्यशैली व मसुद्यामुळे मला खूप आवडला.
_______________________________________

बालपणी, उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली रे झाली की मी व माझी बहीण आजोळी चक्कर मारत असू. कॅलिफोर्नियामधील "पॅरडाइज" नावाच्या गावात माझी आजी रहात असे.गाव नावाप्रमाणेच देखणे, वनश्रीने नटलेले खेडे होते.आमच्या सुटीमधील वास्तव्यात आमच्या आजीने आम्हाला काय शिकविले नाही?शिवणकाम म्हणा, विणकाम म्हणा की घरगुती डोनट बनविणे म्हणा सर्व काही शिकविले. आमच्या आजोळी बेसिनच्या सिंकखाली टर्पेंटाइनचा बॉक्स, बरेचसे ब्रश व ३ डझन एनॅमल पेंटच्या बाटल्या होत्या.माझी बहीण व मी शास्ता तलावाकाठून शोधून शोधून आणलेल्या चपटोळक्या दगडांवर बेडूक व बदके रंगविण्यात दुपार व्यतित करत असू. आजीने ही कला आम्हास शिकवली होती. मला नाही वाटत तिच्याइतकी प्रेमळ व दक्ष आजी अन्य कोणास लाभली असेल.ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असे. आम्ही तिला टी व्ही पाहताना कधीच पाहीले नाही.तिच्याकडे एक पाळीव कुत्रासुद्धा असल्याचे मला स्मरते.माझ्या स्टॅम्प गोळा करण्याच्या व देवाण घेवाण करण्याच्या छंदास ती मदत करत असे. रात्री मी सिंकसमोर स्टूल घेऊन उभी रहात असे व आजी माझे लांबे केस हलकेसे लिंबू पिळलेल्या ऊन ऊन पाण्याने स्वच्छ धुवून देत असे.

जसजसा काळ गेला तसतशा आमच्या दोघींच्या भूमिकांची अदलाबदल होत गेली.पूर्वी आजी मला रपेटीला नेत असे , आता मी तिला चक्कर मारवून आणते.पूर्वी आम्ही वाचलेल्या पुस्तकांवर भरभरुन चर्चा करत असू, अजूनही करतो फरक एवढाच की पूर्वी ती मला पुस्तके वाचून दाखवित असे आता तिची नजर अधू झाल्याने, मी तिला मी लिहीलेली पुस्तके वाचून दाखविते.पूर्वी आम्ही एकत्र, नाटकांना जात असू. पण तेव्हाही नाटक सिनेमात तिला रस म्हणावा असा कमीच होता. कोणते पात्र कोणती भूमिका करत आहे याची गल्लत अन गोंधळ उडून ती तेव्हाही चिडचिडेपणा करत असे.

१६ वर्षे आजी माझ्या आईबरोबर होती.त्या काळात तिच्या डोळ्यांसमोर तिने तिच्या मैत्रिणी, ८ भावंडे व तिच्या पतीचा मृत्यू पाहीला.ती कशी तगली तिचे तिलाच ठाऊक.तिच्यासाठी आयुष्याचे रहाटगाडगे खूप चेंगटपणे व वेदनामय रीतीने त्या काळात सरकत होते आणि त्याचा निषेध म्हणून ती खाण्यावर राग काढत असे.अगदी कृश, १०३ पौंडांची अशी ती झाली तेव्हा मात्र आम्ही नाइलाजाने तिला वृद्धाश्रमात दाखल केली.

कधी माझी आई तिच्याकडे चक्कर मारत असे तर कधी मी. आम्ही काळाची अशी वाटणीच जणू केली. मी गेले की बरेचदा आजीला माझ्या घरी घेऊनच येत असे व सिंकजवळ वाकायला आवून तिचे आता विरळ झालेले शुभ्र केस धुवून देत असे.आमची एक चाकोरीच (रुटीन) ठरुन गेली होती म्हणा ना.मी तेव्हाही कधी दगड पेंट करत असे व आजीला सोबत देत असे तर कधी काकवीची गरमा गरम ताजी बिस्कीटे बनवून तिला भरवत असे. कधी खरेदीला तिला घेऊन जात असे तर कधी वाणीसामान आणवयास आम्ही एकत्रच जात असू. तिच्या वेणीफणीबद्दल, आवरण्या बद्दल बोलायचे झाले तर माझे रुपांतर जणू त्या इवल्या इवल्या दक्ष इजिप्शिअन पक्षांतच झाले होते, जे मगरीच्या पाठीवर ऊभे राहून मगरीचे खवले चोचीने साफ करुन देत. मी तिला शांपू करत असे , नंतर कंडीशनर ने मसाज करुन ऊबदार टॉवेल तिच्या केसांना, डोक्याला बांधून शेक देत असे, नंतर ड्रायरने केस कोरडे करुन सुंदरशी वेणी निगुतीने घालून देत असे. मग हनुवटीवरची लव काढण्याची पाळी. आजीला स्वयंपाकघराच्या खिडकीसमोर सोनेरी कवडशात बसवून मी ट्वीझरने तिच्या हनुवटीवरची लव काढून देत असे. आजीही हे सर्व हक्काने करवून घेइ, मध्येच हनुवटीवरुन हात फिरवत ती एखादा चुकार केस माझ्या लक्षात आणून देई "हा बघ हा राहीला." नंतर तिची नखे कापून , तासून (फाईल करुन) व तिचा मूड बघून मी रंगवूनही देत असे. नंतरची पावलांची मालीश हा माझ्या आजीचा आवडीचा कार्यक्रम असे. माझ्यकडे नीळा मोठ्ठा असा चीनी मातीचा सूपचा बोल होता. त्यात कोमट पाणी घेऊन, किंचित सुगंधी सफरचंदाचे सायडर व्हिनेगर घालून मी आजीची पावले त्यात १५ मिनीटे वा तत्सम वेळ बुडवून ठेवत असे. तिच्या पावलांची नखे नरम पडली की पाय बाहेर काढून कोमट टॉवेलने पुसून मग मी लव्हेंडर तेलाने त्याची मालीश करुन देई.

या संदर्भात बायबलमधील एक वाक्य मला पक्के स्मरते - दुसर्‍याची पावले मालीश आदि करुन सेवा करणे हे सर्वात मोठ्या विनम्रतेचे व साधेपणाचे लक्षण वा खूणगाठ आहे असे काहीसे ते वाक्य आहे. अजूनही मला जेव्हा लोकं म्हणतात की किती ग्लॅमरस आयुष्य तू जगतेस तेव्हा मनातल्या मनात आजीच्या पवलांची केलेली ही सेवा आठवून मी हसते. मला आठवते क्वचित मी नखे कापू लागण्याआधीच, दुखेल या भीतीने आधीच आजी लहान मुलीसारखी आरडाओरडा करते. मध्यंतरी मला कोणीतरी सांगीतले की वृद्धाश्रमातच "फॅन्सी पेडीक्युअर" ची सुविधा उपलब्ध आहे. मी खूप आनंदाने आजीला घेऊन तेथे गेले. सगळे सोपस्कार होईपर्यंत मी आजीजवळच होते. सगळे पार पडल्यावर निघताना आजी कुरकुरली "मला अनोळखी लोकांच्या हाती माझी पाय सोपवायला कसेसेच वाटते. तुला होत नसेल तर मला सांग, मी पाहते काय करायचे ते." आता आजीला स्वहस्ते पायाची काळजी घेणे हे तिच्या वयोमानानुसार तिला शक्य नाही हे ती देखील जाणून होती. त्यामुळे परत ये रे माझ्या मागल्या.

पूर्वी जेव्हा आजीच्या बटव्यात पैसे असत व आम्ही एकत्र खरेदीला जात असू तेव्हा मी तिला सुटी नाणी नीट मोजून देत असे. आजीला त्याचे मोठे कौतुक होते. अगदी ठेल्यावरच्या (काऊंटर) अनोळखी मुलीला ती मोठ्या कौतुकाने सांगे, "गुणाची हो माझी नात.ती नसती मी काय केले असते बरे?" पण मग माझ्याकडे वळून काळजीने ती विचारत असे "माझं सगळं तू करतेस ग माझी बाय पण माझ्या वयाची तू होशील तेव्हा तुझं कोण करेल गो?" आणि ते खरंही होतं. मला ना मूल ना नवरा. पण मला ते नकोही वाटते.खरच मी म्हातारी झाले की माझी नखे कोण कापणार, कानातला मळ कोण काढणार अन हनुवटीवरची लव कोण काढून देणार हा प्रश्नच आहे. पण माझी काळजी कोणीतरी घ्यावी या हेतूपोटी मी मुलांना जन्म देणार नाही हे नक्की. आणि तसेही पाहता आता मी ३९ वर्षाची आहे पण मी ९४ वे वर्ष पाहीन याचा काय भरोसा? आयुष्याच्या धुमश्चक्रीत कारचे अपघात आहेत, कर्करोगासारखे रोग आहेत , अनेक संकटे आहेत. ९४ वर्षे पूर्ण व्हायच्या आत माझा घास घेतला जाऊ शकतोच.

पण तिच्या या प्रश्नावर मी तिचा हात हातात घेउन तिला विश्वास देत असे की "का गं काळजी करतेस? तुझी नात रग्गड पैसा बाळगून आहे बघ.मी किनई म्हातारपणी माझ्या दिमतीला एक नात भाड्याने घेणार आहे. ती जगातील सर्वात गुणी नात असेल. मी तुझी जितकी काळजी घेते तिच्या १० पट जास्त ती नात माझी काळजी घेईल. मी मरतेवेळी माझी संपत्ती तिच्यासाठी सोडून जाईन. आता कळला तुला माझा बॅक अप प्लॅन?" हे माझी बोलणे तिला पटून जात असे आणि हायसे होऊन, माझा हात दाबत ती उद्गारे "मोठी शहाणी आहेस गो तू. नकोच अडकूस मुलाबाळांच्या पसार्‍यात." पण तिच्या या शब्दांमागला अर्थ मला कळत असे. तिला म्हणायचे असे "मी तुझी एकमेव लेक...मला कुण्णी कुण्णी वाटेकरी नको."

पण एक गोष्ट मात्र चांगली झाली, वृद्धाश्रमाच्या वातावरणात आजीने खाण्यापीण्याशी परत दोस्ती केली. एक दीड वर्षात तिने चांगले बाळसे धरले. आम्ही जेव्हा रुटीन चेक अपला डॉक्टरांकडे गेलो तेव्हा ती १८० पौंड भरली. त्या आकड्यावर तिचा विश्वासच बसेना. "काय! अगं मला स्वेटर काढून परत वजन करु देत." यावर मी मिष्कीलपणे हसत म्हणाले "७५ पौंडाचा स्वेटर की काय तुझा?" त्यावर लटक्या रागाने ती म्हणाली "लोकरीचा आहे. असूही शकतो." असो. डॉक्टर मात्र तिने धरलेल्या बाळशावर खूष दिसले. तिचा मधून मधून जाणवणारा स्म्रुतीभ्रंश व अधू नजर सोडता तिची तब्येत टुणटुणीत आहे व ती नक्की शंभरी पार करेल याची मला खात्री आहे.

माझ्या लहानपणी आजी बाथटबमध्ये माझी पाठ स्क्रबरने घासून देत असे.आणि पाठ घासता घासता चिंता करत पुटपुटत असे "मी पुढची १० वर्षे तरी बघेनसे वाटत नाही." आता ९४ व्या वर्षी ती बाथटबमध्ये असते आणि मी तिची गोरी गुलाबी पाठ घासून देते. हो मला माहीत आहे की वृद्धाश्रमात आजीच्या ऊन ऊन स्नानाची सुव्यवस्था आहे पण पाण्याचा शेक देत तिच्या नातीने तिला मायेने स्नान घालणे यातील प्रेमाची सर त्या व्यवस्थेला थोडीच येईल? माझे तिच्यावर अतोनात प्रेम आहे, ती माझी आहे, माझाच एक हिस्सा आहे.

मला आठवते एक वेळ होती जेव्हा माझा समज होता की प्रेम म्हणजे उष्ण श्वास, दीर्घ चुंबन आणि आसक्तीपूर्ण मीठी. पण आयुष्याच्या या टप्प्यावर मला कळले आहे की प्रेम म्हणजे वाट सरता सरत नसताना एकाने दुसर्‍याला दिलेली दूरवरची साथ, आधार, विश्वास.

मी आजीला टबमधून बाहेर येण्यास मदत करते. माझे हात व झगा पाण्याने भीजला आहे पण आजीला थंडी लागू नये म्हणून मी कोरडा टॉवेल तिच्यासमोर धरते. मी हातावर गुलाबाच्या मंद सुगंधाचे लोशन घेऊन तिच्या पाया - पाठीवर चोळू लागते व आजी विचारते "काय आहे ग ते? कसला वास येतो आहे इतका छान?" मी तिला लोशनचे नाव सांगते. ती म्हणते "कधी ऐकलं नाही पण बरं वाटतय." आणि मी समाधानाने मनाशी म्हणते "लोशन आवडणं हेच तिच्यातील जीवनावरच्या प्रेमाचे लक्षण आहे."

रेखाटनआस्वाद

प्रतिक्रिया

बर्‍याच चूका झाल्यात :( .... घाई!!! :(

किसन शिंदे's picture

12 Apr 2013 - 6:00 am | किसन शिंदे

अजुन टंकायच होतं का?

सुधारीत अर्थात चूका सुधारलेली आवृत्ती परत टाकल्याबद्दल अनेक धन्यवाद.

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2013 - 6:36 am | श्रीरंग_जोशी

हॄदयस्पर्शी!!

नेहमीप्रमाणे तुमची वाचनाची रुची आवडली अन अनुवाद करून इथे लिहिल्याबद्दल खूप खूप आभार!!

अगदी गोड लेख आहे. भाषांतर चांगले झाले आहे.
माझ्या जुन्या लेखाची आठवण झाली.

पक पक पक's picture

12 Apr 2013 - 8:26 am | पक पक पक

मस्त लेख .............
खुप खुप आवडला.. :)

सुबोध खरे's picture

12 Apr 2013 - 9:20 am | सुबोध खरे

प्रेम म्हणजे वाट सरता सरत नसताना एकाने दुसर्‍याला दिलेली दूरवरची साथ, आधार, विश्वास.
फारच छान लेख

यशोधरा's picture

12 Apr 2013 - 9:28 am | यशोधरा

खूप सुरेख.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Apr 2013 - 10:18 am | ज्ञानोबाचे पैजार

छान फारच छान, मनापासुन आवडले.

स्पंदना's picture

12 Apr 2013 - 10:20 am | स्पंदना

आयुष्यात अशी अनेक वर्तुळे पुरी होत असतात. अगदी आपल्या नकळत.
शुची सुरेख लेखन. आवडल.
अन रेवतीची आज्जीही आवडली होतीच तेंव्हा.

चावटमेला's picture

12 Apr 2013 - 10:57 am | चावटमेला

मला आठवते एक वेळ होती जेव्हा माझा समज होता की प्रेम म्हणजे उष्ण श्वास, दीर्घ चुंबन आणि आसक्तीपूर्ण मीठी.

पण आयुष्याच्या या टप्प्यावर मला कळले आहे की प्रेम म्हणजे वाट सरता सरत नसताना एकाने दुसर्‍याला दिलेली दूरवरची साथ, आधार, विश्वास.

सुंदर.

सविता००१'s picture

12 Apr 2013 - 11:00 am | सविता००१

खूप सुंदर अनुवाद केला आहेस. फार आवडला. आणि एकदम माझी आजी आठवली. ती पण माझ्याकडून अशीच सगळं हक्काने आणि मायेने करून घ्यायची आणि मस्त दंगापण करायची. आता नाही ती पण हे वाचून आता दिवसभर तीच आठवेल. :(

पिलीयन रायडर's picture

12 Apr 2013 - 11:50 am | पिलीयन रायडर

किती सुंदर...!!!
फार फार आवडलं...

Mrunalini's picture

12 Apr 2013 - 12:11 pm | Mrunalini

खुप सुंदर लेख.. आवडेश :)

एकदम मस्त अनुवाद जमला आहे…. आवडेश ….

जेव्हा लोकं म्हणतात की किती ग्लॅमरस आयुष्य तू जगतेस तेव्हा मनातल्या मनात आजीच्या पवलांची केलेली ही सेवा आठवून मी हसते

एकदम सत्य......

प्रेम म्हणजे वाट सरता सरत नसताना एकाने दुसर्‍याला दिलेली दूरवरची साथ, आधार, विश्वास.

+१११११११११११

परिकथेतील राजकुमार's picture

12 Apr 2013 - 1:18 pm | परिकथेतील राजकुमार

अगदीच भाषांतरीय वाटत आहे.

लेखाला थोडा भारतीय टच, धक्का न लावता वातावरण निर्मीती असती तर लेख नक्की आवडला असता. हे वाचताना अक्षरश: इंग्रजी वाक्याचे कट टू कट भाषांतर केल्या सरखे वाटत आहे. वाक्ये देखील खूपच छोटी बनल्याने वाचताना मजा सतत तुटक वाटते आहे.

पण, मूळ ट्वायलाइट किंवा फाऊंटने हेडचे सध्या जे मराठी भाषांतर उपलब्ध आहे, त्याच्या समोर हे भाषांतर म्हणजे 'अप्रतिम' असेच आहे.

दादा कोंडके's picture

12 Apr 2013 - 5:05 pm | दादा कोंडके

अनुवाद 'आजी'बात जमला नाही.

हे म्हणजे, 'आठवडी बाजाराला जाउन आल्यावर दगडूला भिमाक्कानं मायेनं गरम गरम बदकाचं तळलेलं मास आणि लाल दारू दिली' असं झालंय. ;)

यावेळी प्रतिसादात डायरी न दिल्यामुळे पराचा निषेढ! :)

सानिकास्वप्निल's picture

12 Apr 2013 - 1:36 pm | सानिकास्वप्निल

तितकीची सुंदर कथा
आत्ताच रेवतीच्या आजीची गोष्ट वाचली
दोन्ही कथा हृद्यस्पर्शी

मैत्र's picture

12 Apr 2013 - 4:59 pm | मैत्र

मूळ कथा आणि भाषांतर. छानच आहे. धन्यवाद.
बर्‍याच काही गोष्टी विचार करायला लावून हलकेच सोडून दिल्या आहेत.
"पण आयुष्याच्या या टप्प्यावर मला कळले आहे की प्रेम म्हणजे वाट सरता सरत नसताना एकाने दुसर्‍याला दिलेली दूरवरची साथ, आधार, विश्वास."

पैसा's picture

12 Apr 2013 - 6:46 pm | पैसा

अमेरिकन असो की मराठी, आजी आणि नातीचे भावबंध तेच! लिखाण आवडले.

कवितानागेश's picture

12 Apr 2013 - 11:49 pm | कवितानागेश

छान अनुभव. भाषांतर अजून चांगले जमू शकेल पुढच्या वेळेस.

अजितजी's picture

13 Apr 2013 - 4:25 am | अजितजी

अतिशय सुरेख भावानुवाद !....मनाला अमेरिकन आज्जीची गोष्ट भिडली !....अंजली गद्रे !