ये कहां आ गये हम

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
27 Feb 2013 - 9:46 pm

मराठी भाषा दिनानिमीत्त आणि या प्रतिसादासाठीन्माझी काही टिपणे गविच्या चरणी अर्पण
पैसाआजी, आय डिसअग्री बरं का.. अधुनमधून केले यूज इंग्लिश वर्ड्स तर काय इश्यू आहे. मराठी भाषेनेच नव्हे तर कोणत्याही लँग्वेजने नेहमी अडाप्टेबल राहिलं पाहिजे, तरच सर्व्हायवल आहे. इंग्लिश वर्ड्स रोजच्या भाषेत मिंगल झाले आहेतच तेव्हा प्रत्येकवेळी डिक्शनरी घेऊन त्याचं ट्रान्स्लेशन करावं असं मी नाही इन्सिस्ट करणार बुवा.

हे माझे रीसेंट थॉट्स आहेत. माझी रीक्वेस्ट सगळ्यांनी व्होल्हार्टेडली काँट्रीब्युट करावे मी मराठीतून ईम्ङ्रजी शिकतो आहे ते अप्रीशिएट करावे

मराठी भाषा दिवसाच्या निमीताने थोडा आढावा घ्यावा म्हणतो आपल्या आयुष्याचा भाषेच्या माध्यमातून. भाषेचे रुप दर पिढीगणीक बदलते हा अस्वस्थतेचा मुद्दा नाही. भाषा नदीसारखी वाहती असते. नविन शब्द येतात -वाहून जातात किंवा तळाशी जातात. नवनवे अविष्कार चाकोरीपलीकडे जातात आणि भाषा समृध्द करतात पण काळजी वाटते ती सध्याच्या वापरात असलेल्या मराठीतून व्यक्त होणार्‍या समाज जीवनाची. भाषा असते संवादासाठी. संवादासाठी वेगवेगळी माध्यमे उपलब्ध होउनही संवाद त्रोटक झाले आहेत. लघुरुप वापरण्याची - त्यातल्या त्यात इंग्रजी लघुरुपांचा वापर-पध्दत मराठी संभाषणात वाढत जात आहे.पूर्वि तार पाठवण्यासाठी किंवा छोट्या जाहीराती लिहीताना जो शब्दांचा आटोपशीर वापर होत होता तो रोजच्या वापरात आला आहे. जे आधी हास्यास्पद होतं ते आता लोल झालं आहे.एकीकडे संवादाच्या अभावानी माणसे दूर होताना दिसत आहेत त्याच वेळी संवादाची शक्यता लघुरुप् वापरून कमी होताना दिसते आहे.असे परस्पर विरोधी चित्र एकाच वेळी दिसते आहे तेव्हा बरेच प्रश्न मनात उभे राहतात.कदाचीत ह्या अभावाने भाषेचा वापर कमी होऊन काही दिवसांनी व्यक्त होण्यासाठी फक्त स्मायलींचाच वापर तर होणार नाही ना ?

आणखी एक अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे साध्यासोपे मराठी शब्द हळूहळू हद्दपार होताना दिसत आहेत. उदाहरणार्थ पतली गली हा शब्द आला आणि बोळ हा शब्द दिसेनासा झाला. ग्लास टेबलावर आले ,त्याची गिलासं झाली आणि फुलपात्र हा शब्द अडगळीत किंवा मोडीत गेला. अ‍ॅलर्जी आली आणिइ वावडं गेलं.पूर्वी मी कामासाठी शिपायाला पाठवत होतो आता तेच काम बंदा किंवा बंदी करते आहे. सुयोग्य शब्दांचा वापर आता लोकांना अनावश्यक वाटयला लागला आही की काय असे वाटायला लागले आहे. त्या त्या क्षेत्राची जर्गन आता राजमान्य भाषा झाली आहे.काही बदल संगणकाच्या भाषेनी आणले आहेत तर काही नवीन विक्रीकलेनी आणले आहेत. एखाद्या कार्यक्रमाची घडण मराठीत सांगीतली तर समोरून उत्तर येते की प्लीज हा अल्गोरीदम समजत नाही.

केवळ शब्दांच्या रुपाने मराठी बदलते आहे असे नाही तर व्यक्त होण्यासाठी वापरली जाणारी ढब आणि उदगाराचे स्वरुप पण बदलते आहे. लैंगीक क्रिया किंवा लैगीक छटा असणारे वाकप्रचार किंवा शब्दांची नवनविन रुपे अतिशय स्पष्ट शब्दात येते आहे. परवा बोलता बोलता एक मुलगी म्हणाली ते सर तर वर्गात सगळ्यांवर चढायलाच येतात. त्याच संभाषणात पुढे ती म्हणाली प्रेसेंटेशन देताना माझी तर फाटलीच होती. चढणे म्हणजे माउंटींग फॉर कॉप्युलेशन किंवा फाटणे ह्या शब्दाचा उगम ** फाटणे हा संदर्भ न समजता जेव्हा संभाषणाचा वापर होताना दिसतो तेव्हा या पिढीला आम्ही सांस्कृतीक वारसा म्हणून काय दिले असा प्रश्न पडून मन उद्वीग्न होते.

संस्कृती

प्रतिक्रिया

तर्री's picture

27 Feb 2013 - 9:58 pm | तर्री

चढणे आणि फाटणे बरोबर कपाळात जाणे हा प्रयोग एक मुलगी व्यासपीठावर "डोक्यात जाणे" हया अर्थाने करत होती. सगळी सभा कासनुशी हसत होती - तिला तो भाषणाचा प्रतिसाद वाटत होता आणि तिला चेव चाडत होता.
मोठा अवघड विनोदी प्रसंग होता.
बाकी सगळ्याशी शब्दशः सहमत.

दादा कोंडके's picture

27 Feb 2013 - 10:36 pm | दादा कोंडके

परवाच एक बाई नव्या कारला ओरखडा (स्क्र्याच) पडल्यामुळे हजार रुपयांचा बांबू बसला असं म्हणाली ते आठवलं.

बाकी लेख विचार करायला लावणारा.

आजानुकर्ण's picture

27 Feb 2013 - 11:06 pm | आजानुकर्ण

आपणही 'अजागळ' वगैरे शब्द त्यांचा मूळ अर्थ लक्षात न घेता वापरतोच की. बांबू बसणे मधील बांबू आता घासूनघासून गुळगुळीत झाला असावा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Feb 2013 - 10:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

खरे काका, आजच एक लघुरुप वाटले चेपु वर अर्थ लागाला १०-१५ सेकंद लागली पण लागला तेव्हा थंड झालो.
vry ry nys!!!
मला कळेना हे नक्की काय आहे, थोड्या वेळाने लक्षात आले ते
very very nice
असं आहे!!!
बाकी शेवटच्या परिच्छेदात व्यक्त झालेली चिंता तर खरचं भयंकर अवस्थेला पोहचले आहे.
आपल्या चालत्या फिरत्या कट्ट्यावरुन परत येतांना मला निदे ने एक किस्सा सांगितला होता, इथे देण्यासारखा नाही, पण खरचं या सगळ्यापासून आपल्या मुलांना कसे दूर ठेवावे, हि एक समस्या आहे.

राही's picture

28 Feb 2013 - 12:28 am | राही

आपल्या स्वाक्षरीतला 'झटलो' शब्द कसा वाटतो?

मलाही आपल्या कट्ट्याच्या वेळी झालेल्या गप्पा आणि तुम्ही दिलेली उदाहरणं आठवली.

उपाय म्हणावा, तर खाली संजय क्षीरसागर म्हणतात त्याप्रमाणे आपली भाषा सौंदर्यपूर्ण करायची, ज्यांना ती ऐकून, वाचून मोह पडेल त्यांच्या भाषेत आपसूक सुधारणा होईल. ती सहज सोपी असली, आणि कानाला-मनाला गोड वाटली तर ऐकणार्‍याला नक्कीच आपलीशी वाटेल.

विकास's picture

27 Feb 2013 - 10:01 pm | विकास

संदर्भ न समजता जेव्हा संभाषणाचा वापर होताना दिसतो तेव्हा या पिढीला आम्ही सांस्कृतीक वारसा म्हणून काय दिले असा प्रश्न पडून मन उद्वीग्न होते.

विचार करायला लावणारे स्फूट!

विसुनाना's picture

27 Feb 2013 - 10:10 pm | विसुनाना

लेखात व्यक्त झालेल्या मतांशी सहमत आहे.

चांगल्या भाषेचं कोणाला काय पडलं आहे? फेसबुकवरचे वाचून आणि त्या एसेमेस मुळे शुद्ध इंग्रजी सुद्धा फार कमी मुले वापरतात, आमची मायमराठी तर कुठच्या कोपर्‍यात अंग चोरून उभी रहाते बिचारी कशीबशी. हिंदी शब्द मराठीत मिसळले तर एकवेळ ठीक म्हणेन मी. निदान तीही संस्कृतोद्भव, प्राकृतोद्भव भाषांच्या कुळातली आहे. पण ते धेडगुजरी इंग्लिश बघितलं की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते.

भाषा प्रवाही असली पाहिजे, तर ती टिकून राहील हे बरोबर. संपूर्ण नियमबद्ध संस्कृत हळूहळू कमी कमी लोक वापरत आहेत. हे समोर सहज दिसणारे उदाहरण. पण गरज नसताना इंग्रजी शब्द वापरण्यामागे बरेचदा मी कित्ती कित्ती "स्मार्ट" आहे (हुषार नव्हे) हे दाखवण्याचा सोस असतो आणखी काही नाही. तुम्ही जी लैंगिक क्रियांसारखे शब्द न समजता वापरण्याची भयानक प्रकारची उदाहरणे दिली आहेत, ती मराठीशी नीट ओळख नसल्यामुळे घडत असावीत. वाचन नाही हे एक कारण त्यामागे असणारच.

अमेरिकेत राहणार्‍यांना मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधे मुलांना घालण्यावाचून पर्याय नसतो. पण भारतात मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध असताना जे पालक इंग्रजी माध्यमात मुलांना दाखल करतात त्यांची दया येते. ही मुले ना धड मराठी रहातात, ना धड इंग्रजी होतात. माध्यम इंग्रजी असल्याने त्यांची विचार प्रक्रिया इंग्रजीतून होते. त्यामुळे अनावश्यक वाटणारे इंग्रजी शब्द ती सहज वापरतात. कारण साधे सरळ मराठी शब्द त्यांना सुचतच नाहीत. धेडगुजरी भाषा बोलणार्‍यांचा हा आणखी एक प्रकार. पण त्यांची बिचार्‍यांची त्यात फार चूक म्हणता येणार नाही.

मातृभाषेत मुलांना न शिकवण्याचा अत्यंत वाईट परिणाम गोव्यात दिसतो आहे. गोव्यातले बहुसंख्य हिंदू मराठी माध्यमाच्या शाळांना पसंती देतात. त्यांच्या घरांतून कोंकणी बोलत असले तरी ती मुलं कुठेही अडखळत नाहीत, उलट पुणे मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा आरामात सामावून जातात. पण ख्रिश्चनांची मुले इंग्रजी माध्यमातून शिकतात. नवीन पिढीतल्या एखाद्या ख्रिश्चन मुलाशी संवाद साधायला गेले तर ती जेमतेम अर्धं वाक्य कोंकणीत बोलतात आणि इंग्रजीकडे वळतात. कारण त्यांच्या घरातही कोंकणी बोलली जात नाही. कोंकणी भाषासुद्धा हळूहळू अस्तंगत होण्याचा धोका आहे, जो या लोकांना कळत नही.

मराठी अस्तंगत होणार नाही. कारण फार मोठा ग्रामीण महाराष्ट्राचा भाग आहे, की जो अजून इंग्रजीपासून दूर आहे. देव करो आणि ती ग्रामीण मराठी अशीच जिवंत राहो.

प्यारे१'s picture

27 Feb 2013 - 10:28 pm | प्यारे१

समयोचित लेख!

पोरांना काय दोष द्यायचा काका?
१५-२० हजार पगारावर पेन्शनला येऊन टेकलेले आई बाप पोरांच्या पहिल्या पगाराबरोबर येणारी ४०-५० ची मोठ्ठी रक्कम बघूनच त्याचे सग्गळे गुन्हे माफ करत होते... त्या 'गुणी' पोरांची पुढची नवी पिढी आता येऊ घातली आहे!

ह्या 'गुणी' पोरांनी त्यांच्या पोरांना चुक नि बरोबर शिकवायला मुळात आडात काही हवं ना? आधीच्या पालकांनी घुसमट सहन केली. सुखसोई नव्हत्या, पोरांना शिक वण्यात आयुष्य गेलेलं, शेवटाकडं पेन्शनीत जाताना असं आर्थिक सुख लाभल्यावर बोटचेपेपण आलं ही त्यांची चूक.

पालकांची ही गत नि तिकडं शाळेत पिऊन, गुटखा खाऊन येणारे मास्तर किंवा काहीच्च करता न आले म्हणून मिस्स म्हणून लागलेली १२ वी फेल हिरॉईन (शाळांसाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणीचा आहे मी.त्यामुळे तिथल्या शाळा काय काय करतात त्याची चांगली माहिती आहे)

चित्रपट पाहताना कुठला चित्रपट सहकुटुंब बघावा ह्याचा आचपेच नाही, पोरांसमोर 'औषध' घेऊन बसताना त्यांनाही घोट पाजण्यात आम्हाला मजा वाटते, शेजारी बसलेल्या नवर्‍याच्या समोर अमिताभला आय लव्ह यु म्हणणार्‍या टीव्हीतल्या बायका आम्हाला कौतुकाच्या वाटतात... !

भाषा समृद्ध कधी होईल? समाज तसा असला तर!
आमचे आदर्श संपलेत.
भाषा फार नंतर येते, आधी माणूस सुधारायला हवाय. पण ते होईलसं वाटत नाही.

फक्त आणि फक्त कुत्र्याच्या जाती (अल्सेशिअन, पामेरीअन आदि) आणि कारस ची मॉडेल्स या विषयांवर गप्पा मारणार्‍या भवान्या जवळून बघितल्या आहेत.
मेक अप करता येत नाही याची लाज वाटली पाहीजे आत किती का ढ गोळे असाना अशा विचारांची लोकं पाहीली आहेत.

किळस येत यांच्या मठ्ठ संवेदनाहीनतेची!!!!

मेक अप करता येत नाही याची लाज वाटली पाहीजे
अगदी असेच नाही पण अश्या अर्थाचे वाक्य एकजण मला म्हणाली होती.
"अय्याऽऽऽ! तुला मेकअप करता येत नाही?" म्हटलं नाही बुवा करता येत. त्यावाचून फारसं काही अडलंही नाही. ;)

पण ते होईलसं वाटत नाही.

हे खरयं! पण त्यासाठी आपल्याला फक्त एकच करता येईल. आपली भाषा सौंदर्यपूर्ण करायची! ज्यांना ती ऐकून, वाचून मोह पडेल त्यांच्या भाषेत आपसूक सुधारणा होईल.

आणि दुसरीही एक गोष्ट आहे. नादमय आणि सोपे शब्द टिकतात. केवळ मराठी टिकवायची म्हणून इतर भाषेतल्या शब्दांना मज्जाव करणं भाषाविकासाला मारक आहे. भाषेत नवे प्रयोग व्हायला हवे, नवे शब्द आणायला हवे. ती बोलायला, उच्चारायला सोपी आणि सहज व्हावी असा प्रयत्न करायला हवा.

चौकटराजा's picture

28 Feb 2013 - 7:13 am | चौकटराजा

प्रतिसाद लय आवाल्डा. मला सुद्धा आपण मुलींचे ( माझ्या) मित्र झालो हे चुकले असे काही वेळेस वाटते. " बाप" होउन राहिलो असतो तर बरे झाले असते अशी चुटपुट मनाला लागून रहाते. तरी आमच्या आवृत्या बर्‍या आहेत.
बाकी मराठी शिकायचे असेल तर सचिन तेंडूलकर सर, डॅम इट फेम महेश कोठारे सर , माधुरी दीक्षित बाई , अश्विनी भावे बाई यांच्याकडे शिकवणी लावीन म्हणतो.

लेखन आवडले. आणखी लिहायला हवे होते असे म्हटले असते पण तुम्ही आणखी उदाहरणे देण्याची शक्यता होती म्हणून या लेखावर समाधान मानले आहे.:) जेंव्हा शुद्ध मराठी बोलली जात असे त्यावेळी नावं ठेवणारे किती होते याचाही विचार व्हायला हवा. मराठी किती ठिकाणी काम करवून घेण्यास उपयोगी पडली? हिंदी आणि इंग्रजीचे शिक्षण योग्यप्रकारे शाळेत देऊन हा प्रश्न सुटला असता का? आपल्याकडे अनेक देशांची यादी तयार असते की त्यांच्या देशात त्याच भाषेत सगळे व्यवहार चालतात. त्यांना जागतिकीकरणाच्या काळात कितपत बदल करावे लागले हेही पहावे लागेल.

आजानुकर्ण's picture

27 Feb 2013 - 11:03 pm | आजानुकर्ण

तुम्ही तुमच्या लेखाचे शीर्षक हिंदीमध्ये दिले आहे. तुमच्यासारख्या शब्दप्रभूलाही हिंदीच्या वळचणीला जाऊन उभे राहावे वाटत असेल तर आमच्यासारख्या सामान्यांनी काय करायचे? मला असे वाटते की आजकाल आपल्या मनाचे कंडिशनिंग इतके जोरदार झालेले असते की कोणतीही अभिव्यक्ती ही जोरकसपणे व्हावी असे वाटत असेल तर हिंदी किंवा इंग्लिश शीर्षक असावे असे सर्वांना वाटते. कोणत्याही मराठी चित्रपट किंवा नाटकांची नावे पाहा. ऑल द बेस्ट पासून हम तो तेरे आशिक है वगैरे प्रकारच दिसतात.

दुसरे असे की तुमच्या लेखात शुद्धलेखनाच्या काही चुका आहेत (निमीत्त, लैंगीक किंवा नविन वगैरे). मिसळपाववर मराठी भाषादिनाच्या गौरवाबाबत प्रकाशित झालेल्या बॅनरमध्ये करणाया हा शब्द चुकीचा आहे.

बॅनर

शुद्धलेखन किंवा प्रमाणभाषेचा विषय काढला की तिथे लगेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य किंवा ब्राम्हण वगैरे जातीयवादही उपस्थित होतो. इंग्लिशमधील औपचारिक लेखनात कुठेही बोलीभाषा वापरली जात नाही. मात्र मराठीत हे सर्रास दिसते. आजकाल प्रमाण मराठी लेखनात नपुंसकलिंगी एकारांत शब्द हेही अनुस्वारान्त्य वापरले जातात असे दिसते. इंग्लिशमधील लेखनाची आपण जेवढी काळजी करतो तितकी मराठीतील लेखनाची करत नाही हे सत्य आहे.

अशा गोष्टींचा मला आधी फार त्रास व्हायचा. मात्र त्यातून एखादी सायकॉलॉजिकल डिसऑर्डर वगैरे होऊ नये म्हणून आजकाल मी त्याकडे दुर्लक्ष करतो. पुढच्या पिढीला जे काय द्यायचे आहे त्याची जबाबदारी माझी आहे असे वाटत नाही. टीवी, इंटरनेट, आजूबाजूचा समाज हे सर्व आपापले वाटे उचलत आहेतच.

असो. चर्चा वाचत आहे.

अभ्या..'s picture

28 Feb 2013 - 12:47 am | अभ्या..

प्रकाशित झालेल्या बॅनरमध्ये करणाया हा शब्द चुकीचा आहे.

या चुकीबद्दल मी स्वतः माफी मागतो. गडबडीत केलेले काम, थोडासा फॉन्टसचा प्रॉब्लेम आणि दिलेल्या मजकुरात चुका करायची आम्हा पेंटरलोकांची जुनी खोड यामुळे ही चूक झाली आहे. यापुढे अशा प्रकारची चूक (माझ्याकडून तरी) होणार नाही याची काळजी घेईन.

रामदास's picture

28 Feb 2013 - 10:49 am | रामदास

तुमच्या लेखात शुद्धलेखनाच्या काही चुका आहेत .होय .सहमत आहे. बर्‍याच प्रयत्नानंतरही शुध्द लेखनाच्या चुका टाळू शकत नाही याचा खेद आहे.
हिंदी शिर्षक जाणीवपूर्वक वापरले आहे. ते वापरताना क्लेष झाला आहेच.
लैंगीक छटा असलेले शब्द उदाहरणार्थ कुतरओढ वगैरे वापरून गुळ्गुळीत झाले आहेत हे मान्य. मला म्हणायचे होते ते असे की हे शब्द संभाषणात सहज येता जाता ज्या प्रमाणात वापरले जातात त्याबद्दल वाईट वाटते.
धन्यवाद

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Mar 2013 - 1:43 am | विश्वनाथ मेहेंदळे

लैंगीक छटा असलेले शब्द उदाहरणार्थ कुतरओढ वगैरे वापरून गुळ्गुळीत झाले आहेत हे मान्य.

आयला, हे माहित नव्हते :-)
लेखातले विचार पटले हे सांगणे न लगे.

नाना चेंगट's picture

27 Feb 2013 - 11:05 pm | नाना चेंगट

>>>सुयोग्य शब्दांचा वापर आता लोकांना अनावश्यक वाटयला लागला आही की काय असे वाटायला लागले आहे.

हं. तुमच्या समोर बोलायची लायकी नाही पण संवाद परिपूर्ण करणारा शब्द हा सुयोग्यच असतो. आपल्या पूर्वीच्या कल्पना आणि आपण मनात धरलेले अर्थ अमुक शब्द योग्य अयोग्य अशी आपण विभागणी करतो. अन्यथा लहान बाळाच्या आणि त्याच्या आईच्या संवादात अर्थहीन शब्दांचाच अथवा त्या अर्थाने सुयोग्य न मानल्या गेलेल्या शब्दांचाच भरणा असतो तरीही त्यांचा संवाद पूर्ण होतो. अनाकलनीय भाषेत मूल बोलते ते त्याच्या आईला बरोबर कळते. भाषा बदलत असते. वर उल्लेखलेले लैगिक संबंधातील वाक्ये अथवा शब्द स्त्रिया पूर्वी वापरत नव्हत्या आणि आता वापरतात असे समजणे चूक असावे, पूर्वी सुद्धा स्त्रिया आपापसात अशा अर्थाचे शब्द वापरत असणारच फक्त त्यांचा परिघ मर्यादीत आणि स्त्रिया काय बोलतात हे पुरुषांना समजून घेण्याची आवश्यकता भासली नसल्याने त्याचा विचार झाला नसावा. पुरुष मात्र त्याचवेळी काय बोलत असत हे विविध प्रकारच्या शिव्या आणि असभ्य म्हणींचा अभ्यास केल्यास कळू शकेल. बाकी लैगिक क्रिया आणि वर्णने भाषेत फार वाढली आहेत आणि पूर्वी मात्र खुप सज्जन भाषा होती असे समजणार्‍यांनी केवळ कालिदासाचे मेघदूत वाचावे. असो.

राही's picture

28 Feb 2013 - 12:09 am | राही

स्त्रिया काय बोलतात हे पुरुषांना समजून घेण्याची आवश्यकता भासली नसल्याने त्याचा विचार झाला नसावा. प्रचंड सहमत.
काही इतर मुद्दे : आजची मराठी भाषा, काही ऐतिहासिक आणि सामाजिक कारणांमुळे एक ठराविक परिघात अडकून पडून व्यापक जीवनव्यवहार व्यक्त करण्यास अपुरी ठरत आहे.खूप मोठे अनुभवविश्व समर्थपणे व्यक्त होण्याची वाट पहात (गावकूस शब्द वापरीत नाहीय्) रांगेत उभे आहे, ते अनुभव नेमकेपणाने मांडता येण्याजोगे सर्वमान्य अथवा प्रमाण शब्द मराठीत कधी अवतरतील याची वाट पहात. कित्येक शब्द जातीयतेच्या आणि प्रांतीयतेच्या उच्चनीच प्रतवारीत बाजूला फेकले गेले आहेत. नौकानयन,तेल-उत्खनन,फॅशन डिझाइनिन्ग,पर्यटन आणि आतिथ्यासारखी नवनवीन क्षेत्रे रोजगार देण्यासाठी हात जोडून उभी आहेत.त्यांत वावरणारे लोक नवनवीन अनुभवांना सामोरे जाताहेत,पण त्याचे प्रतिबिंब मराठी साहित्यात समर्थपणे पडत नाहीय कारण इथे चालणारी भाषा अभिजनांना मान्य नाही्य्.ज्या भाशेत ते व्यक्त होऊ शकते ती भाषा आपल्याला परिचित नाहीय म्हणून आपलीशी वाटत नाहीय. हेच इतर उद्योगधंद्यांविषयी म्हणता येईल. गुजरातीशी तुलना करता अनेक हुनर/कसबवाचक शब्द,सुतारकाम,लोहारकाम,शेअरबाजार यातले जार्गन जसे तिथे मान्यता पावले आहे, तसे इथे नाही. ऊंधो बदलो म्हटले की सामान्य गुजराती माणूस गोंधळून जात नाही,मराठी माणूस जाईल. शब्दांना अर्थ तेव्हा प्राप्त होतो, जेव्हा त्यामागे काही कृती असते. समाज कृतीशील असतो तेव्हा कृतीअनुरूप शब्द तो आपोआपच शोधून काढतो, आणि भाषा समृद्ध होते. जगणे व्यापक असते तेव्हा भाषाही व्यापक होते. उलटे कधी घडत नाही. मराठी साहित्य थिटे आहे काय हा माधव मनोहरांनी कधीच्या काळी उपस्थित केलेला प्रश्न आजही संदर्भहीन झालेला नाही.

रामदास's picture

28 Feb 2013 - 10:53 am | रामदास

स्त्रिया काय बोलतात हे पुरुषांना समजून घेण्याची आवश्यकता भासली नसल्याने त्याचा विचार झाला नसावा.
सहमत आहे. मध्यंतरी ग्रंथालीने मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार हे पुस्तक प्रकाशित केले होते त्याचा उल्लेख करणे अनावधानाने राहून गेले.त्या पुस्तकावरही चर्चा व्हावी असे वातते.

आज मराठी दिन असताना ; मराठी "दीन" झालेली आहे. असा लेखाचा सूर दिसला.
फार जुना अरुण मनोहर ह्यांचा धागा आठवला. http://www.misalpav.com/node/1865
तिथल्याच काही प्रतिक्रिया इथे पुन्हा देणार आहे.

मन१'s picture

27 Feb 2013 - 11:19 pm | मन१

फ्रेश सब्जेक्ट आणि सिम्पल प्रेझेंटेशन बद्दल आणखी काय कमेंट देणार?
केवळ आयडियाशीर स्टाइलने केलेले रायटिंग फंटास्टिक म्याच झालय.
ही वरची दोन सेंटंन्स इंटरप्रीट करीत बसल्याने तुमच्या ब्रेनचे भुसभुशीत बर्गर बनल्यास प्रस्तुत रायटर (म्हंजे मी)
कलप्रिट नसुन वाचणारे रीडर्सच स्टुपिडिटी प्रदर्शन करताहेत असे प्रूव होते.

ह.घ्या् हे.वे.सां . न.ल.

युवर्सचाच,
माइंडोबा
(मनोबा)

मन१'s picture

27 Feb 2013 - 11:22 pm | मन१

अ‍ॅक्चुअली रूटला हँड घालुन थिंक केलं तर माइंडमध्ये येइल की आपल्या लँग्वेजमधुन कम्युनिकेट करण्यासाठी एखाद्या अदर लँग्वेजचा
सपोर्ट घेणं किती शेमास्पद आहे ते.

अरे तुम्हाला काय आयडेंटिटी आहे का नाय?

तुम्हा ऑलचा थ्री वार
प्रोस्टेट
प्रोटेस्ट
प्रोटेस्ट

यसवायजी's picture

27 Feb 2013 - 11:30 pm | यसवायजी

भावना समजु शकतात. पण असं कितीही आणी कुठल्याही काळी लिहीलं गेलं तरी काही फायदा झालेला दिसत नाही.
google किंवा xerox हि क्रियापदं नाहीत असं घसा फाडुन सांगीतलं तरी शेवटी 'फेमस' शब्दकोशात या शब्दांना जागा मिळतेच ना.. (हो, oxford मध्ये सुद्धा)
जे चाल्लय ते चालु द्यावं.. भावना समजल्या की बस..

आज ज्ञानेश्वर असते तर काय म्हणाले असते, माझी (किंवा आपली) ही 'असली' भाषा बघुन?? ;)
so just chill maadi. (अय्य्यो स्वारी की ओ.. गलतीसे मिष्टेक होगया म्हंतो मि.. हे कन्नडा मधी मधी कुटनं येतय कुनाला म्हैत.. भऊशा सीमाभागाचं पर्णाम असल..)

रामपुरी's picture

28 Feb 2013 - 12:01 am | रामपुरी

हिंदी आणि इंग्रजीचे मराठीवर प्रचंड आक्रमण होत आहे. शब्द स्वीकारण्याला आक्षेप नाही पण जेव्हा भाषेचा मूळ ढाचाच जेव्हां बदलला जातो किंवा एखादा शब्द दुसर्‍या भाषेतल्या अर्थाने वापरला जातो तेव्हा राग येतो. सर्वच माध्यमातून असल्या मराठीचा मारा चालू आहे. यावर उपाय काय हे मात्र काही कळत नाही. शेवटी 'जे जे होईल ते ते पहावे' म्हणून गप्प बसावे लागते.

बदलू दे की मूळ ढांचा.(ढांचा तरी शुध मराठी शब्द आहे का?) गाथासप्तशतीतली,ज्ञानेश्वरीतली,लीळाचरितातली,बखरीतली,कृष्ण/विष्णुशास्त्रींची मराठी आज चालेल काय? समजेल काय? आणि ही बदललेली/बदलणारी भाषा मराठीच असेल ना? की तिचे नाव फारसी किंवा अरबी होईल? फार तर एकविसाव्या शतकाची मराठी म्हणतील.म्हणू देत की.

शशिकांत ओक's picture

28 Feb 2013 - 12:20 am | शशिकांत ओक

आम्ही सांस्कृतिक वारसा म्हणून काय दिले असा प्रश्न

भाषा जर सरिता असेल तर विविध काळात व भौगोलिक घाटावरील मानवी शब्दांचे बंधन सरितेला पाडून सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे असे म्हणून चालणार नाही, असे वाटते ...
'जो हो रहा था, है, होगा' ते योग्य असे भगवत गीतेचे सार नाही काय?

ढब आणि उदगाराचे स्वरुप पण बदलते आहे... पण काळजी वाटते...मन उद्वीग्न होते....

पुर्वी पुरुषांना धोतरातून पॅंटमधे यायला व बायकांना नऊवारीतून पाचवारीत यायला फार क्लेश झाल्याचे ऐकत होत. आता त्याचे काही वाटत नाही. तसे काही काळाने याबाबत ही नाही वाटणार...
एके काळी सहगल सिनेप्रेमींना रफी व मुकेश, मन्नाडे उथळ वाटत. नंतर रफी, लताचे चाहते किशोर कुमारला आचरट चाळे करणारा भंगड गायक म्हणून नाके मुरडत. पंचमदा ना एस डींचा मुलगा मानायला काही सिनेसंगीत प्रेमींना ऑकवर्ड वाटे. तोच पंचम दा व किशोर नंतरच्या पुढील पिढीला कुठे तो किशोरचा विविध छटांचा गंभीर आवाज व आताचे कान फोडू सुफी कोकलणे असे वाटते ... काळाचा महिमा आहे. नक्की चांगले कोणते ते संदर्भाने ठरते व नंतर संदर्भहीन झाले की बंडल वाटते.

मराठी किती वाईट तर्‍हेने बोललं जाऊ शकतं याची उदाहरणं द्यावी तेवढी कमीच !!
'आखीर कार पोचलो', 'काश असं झालं असतं' असलं मराठी ऐकलं की तिडीक जाते डोक्यात. त्यादिवशीच कुठलीशी जाहिरात पाह्यली त्यात म्हणत होते 'अमुकतमुक चॉकलेटच्या लालसेने आईची ममता मरली'. मुळात त्या जाहिरातींचं मराठीतलं भाषांतरच इतकं वाईट असतं की काय सांगावं. आपल्याला नीट बोलता येतं तर आपण तरी नीट बोलावं, येवढं करण्यापलिकडे आपल्या हातात काहीही नाही.

धनंजय's picture

28 Feb 2013 - 1:26 am | धनंजय

काही शब्द काळाआड झाल्याबाबत मलासुद्धा हुरहुर वाटते. सहमत.

लैंगिक अनुरोध असलेले शब्द बिगरलैंगिक संदर्भात वापरून-वापरून गुळगुळीत होतात, त्याबाबत फारसे वाईट वाटत नाही. आणि गुळगुळीत प्रयोगाला जुना लैंगिक अर्थ लावून मी विसंगती बोचवून घेत नाही. आजानुकर्ण यांच्याशी सहमत.

पिवळा डांबिस's picture

28 Feb 2013 - 2:16 am | पिवळा डांबिस

स्वामी, लेख आवडला. तुमच्या भावना पोहोचल्या. पण आता तुम्ही सिद्धहस्त लोकांनीच धीर सोडलांत तर कसं व्हायचं हो? :)
बाकी तुमची फुलपात्र आणि ग्लास यांवी तुलना नाही पटली. माझ्या माहितीनुसार फुलपात्र आणि ग्लास हे समानार्थी शब्द नाहीत. फुलपात्र (किंवा पेला, धातूचा) आणि ग्लास (मुख्यतः काचेचा, तशी धातूचेही ग्लास मिळतात म्हणा!)या दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत. त्यांचा आकार आणि प्रयोजन हे वेगवेगळं आहे. म्हणजे आमरस किंवा आटीव दूध प्यायला फुलपात्र आणि उसाचा रस, चहा (किंवा अन्यही काही!!) प्यायला ग्लास!
आता ग्लास हा इंग्रजी शब्द सुशिक्षित मराठीने उच्चारी तसाच्या तसा स्वीकारला, तर ग्रामीण मराठीने त्याचा गलास केला. हिन्दीने तो गिलास असा स्वीकारला. तेंव्हा ग्लास ही इंग्रजीतून मराठीत झालेली आयात आहे.
आणि ग्लास या शब्दाने फुलपात्र या शब्दाचं उच्चाटन केलेलं नाहीये तर एकूणच ग्लास या वस्तूने फुलपात्र या वस्तूचं उच्चाटन केलंय. आज किती आधुनिक घरांमध्ये तांब्या, ताम्हन, फुलपात्र, पळी या वस्तू सापडतील? तेंव्हा हे स्थित्यंतर (मराठीत ट्रान्झिशन म्हणायचंय मला!) हे फक्त भाषेचंच नाहिये तर जगण्याच्या पद्धतीचंही आहे, होय की नाही?

रामदास's picture

28 Feb 2013 - 10:55 am | रामदास

भाषेतून परीवर्तीत होते याबद्दल सहमत आहे.
(डांबीसाचा ग्लासमेट) रामदास

पिवळा डांबिस's picture

28 Feb 2013 - 2:38 am | पिवळा डांबिस

मागे दोनेक वर्षापुर्वी महाराष्ट्रात (गावाचं नांव घेत नाहीये; पण चाणाक्ष मिपाकर ओळखतीलच!!) आलो असतांना एका खूप जुन्या मित्राला त्याच्या घरी भेटायचा योग आला होता. मित्र आणि त्याची बायको दोघेही मराठी माध्यमातून शिकलेले आणि बोलायला अतिशय चांगले. त्यांना एक मुलगा, सहावी-सातवीत असेल, तो प्रथमपासूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारा...
बर्‍याच दिवसांनी भेट झाल्यामुळे रात्री जेवणं झाल्यानंतर ते दोघं आणि आम्ही दोघं खूप उशीरापर्यंत गप्पा मारत बसलो होतो. हास्यविनोद चालू होता. मुलगाही तिथे बसून ऐकत होता. कदाचित आपल्या पप्पाची इतकी थट्टा होत असलेली पाहून एंजॉय करत होता...
तितक्यात त्याच्या आईने त्याला सांगितलं, "राजू तू आता झोपायला जा बघू, तुला उद्या सकाळी लवकर शाळा आहे ना?"
मुलगा अनिच्छेनेच जागचा उठला. तितक्यात माझ्या पत्नीने त्याला विचारलं, "तुमचा शाळेचा गणवेष काय आहे?"
मुलगा क्षणभर गोंधळला. त्याला हे गणवेष प्रकरण कळलं नाही हे आमच्या ध्यानात आलं...
तितक्यात तो म्हणतो कसा, "यलो सारी!!"
आता आमच्याबरोबरच त्याचे आईबापही आश्चर्यचकित झाले...
"यलो सारी?" बापाने विचारलं
"ते नाही का, ते आपण गणपती आणतो त्याला यलो सारीच (पीतांबर) असते की!!!" चिरंजीव लॉर्ड फाकडे वदले!!!
आमचा हास्याचा स्फोट शमल्यावर मी त्याला विचारलं, "तुमच्याकडे गणपती बसवतात? किती दिवसांचा?"
उत्तर त्याच्याऐवजी मित्राने दिलं,
"फक्त दीड दिवसांचा! असल्या वातावरणात गणपती फक्त दीड दिवसांतच पार गुदमरून जातो हो!!!"
:)

नितिन थत्ते's picture

28 Feb 2013 - 7:33 am | नितिन थत्ते

भाषा बदलत असते हे खरे आहे.

नानांशी सहमत आहे.

नितिन थत्ते's picture

28 Feb 2013 - 7:36 am | नितिन थत्ते

वर प्रतिसादांत बांबू लागला, चढायला येतात वगैरे शब्दप्रयोग लैंगिक संदर्भाचे आहेत हे बरोबर.

तसेच साल्या आणि लेका हेही तसेच आहेत. पण ते पूर्वीच (मुलींच्यात/स्त्रियांच्यात) रुळले आहेत.

नगरीनिरंजन's picture

28 Feb 2013 - 8:21 am | नगरीनिरंजन

लैंगिक संदर्भ/अनुरोध असलेले शब्द वापरायला कोणाचा आक्षेप असायचे कारण नाही, पण लेखकाने मांडलेला मुद्दा मला पटतो की त्याचा अर्थ कळत नसताना ते वापरू नये. विशेषतः आजकाल 'पोलिटिकल करेक्टनेस' नामक साजूकपणाकडे सगळ्यांची वाटचाल चालू असताना असे शब्द तोंडातून निघताना ऐकणे जास्तच विचित्र वाटते.
अजागळ, धसास लावणे, साल्या, लेका, भिकारचोट, फाट्यावर मारणे, कूच करणे इत्यादी शब्द सर्रास वापरले जात असताना त्याचे दोन्ही (म्हणजे लाक्षणिक आणि शब्दशः) अर्थ ते वापरणार्‍या माणसाला माहित असण्याची अपेक्षा करणे चुकीचे नाही.

नितिन थत्ते's picture

28 Feb 2013 - 9:04 am | नितिन थत्ते

गलथान हा सुद्धा असाच शब्द आहे.

नगरीनिरंजन's picture

28 Feb 2013 - 11:20 am | नगरीनिरंजन

हो. जुगाड हा शब्दही सगळे वापरतात. तसे बरेच आहेत.
आणि ते गुळगुळीत झाले म्हणून नवे शब्दही व्हायला आक्षेप नको हे पटत असलं तरी ज्याला फक्त लाक्षणिक अर्थ आहे आणि शब्दशः काहीच अर्थ नाही अशी भलतीच वाक्यरचना तयार व्हायला लागली आहे.
इंजिनिअरिंगचा एक पेपर देऊन आमची एक वर्गभगिनी बाहेर येताना हाताची मूठ वळून पुढेमागे हलवत म्हणाली,"कसला फाडू पेपर होता यार! माझी तर फुल लागली!"
इतके दिवस हुशार आणि अभ्यासू म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुलीने असे बोलावे हे पाहून आम्ही बुचकळ्यात पडलो. तिला नंतर विचारल्यावर ती म्हणे की फाडू म्हणजे अवघड हे तिला माहित आहे आणि माझी लागली म्हणजे माझी वाट लागली असंच सगळे म्हणतात. मुठीचं काही आम्ही विचारलं नाही.

टवाळ कार्टा's picture

28 Feb 2013 - 11:05 pm | टवाळ कार्टा

मुठीचं काही आम्ही विचारलं नाही.

=))

बाळ सप्रे's picture

28 Feb 2013 - 9:51 am | बाळ सप्रे

अजागळ, धसास लावणे, कूच करणे .. हे शब्द या यादित पाहून थोडा विचारात पडलोय!!
विचारांना थोडी दिशा देउ शकाल का? :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2013 - 8:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाषेचे रुप दर पिढीगणीक बदलते हा अस्वस्थतेचा मुद्दा नाही. भाषा नदीसारखी वाहती असते. नविन शब्द येतात -वाहून जातात किंवा तळाशी जातात. नवनवे अविष्कार चाकोरीपलीकडे जातात आणि भाषा समृध्द करतात

बस्स, हेच महत्त्वाचं आहे. मराठी भाषेतील शब्दांच लघूरुप इंग्रजी इतकं पाहण्यात नाही, तेव्हा आपली वाटचाल त्या मानाने बरी आहे. माय मराठीच्या गौरवाच्या धाग्यात मी म्हणालो की बलुतेदारांनी दिलेले शब्द आजच्या पिढीला किती माहिती आहेत ? आणि जर त्यांना असे शब्द देण्यात आजची पन्नास ते सत्तरीला पोहचलेली पिढी शब्दांचे हस्तांतरण करु शकली नसेल तर दोष कोणाचा ? आजच्या पिढीचा की मागच्या पिढीचा ? तर हा दोष मागच्या पिढीचा. आजच्या पिढीने अनेक नवे शब्द मराठी भाषेला दिले आता ते कोणत्या भाषेतून आले, कसे आले, ते वापरायचे का वगैरे हा दुसरा मुद्दा पण शब्दातून आशय पोहचतो तेव्हा ते महत्त्वाचे. आज संगणकावर लिहिणार्‍याकडून 'प्रमाण लेखनाची' अपेक्षा केली जाते. आशय पोहचतो ते प्रमाण लेखन. भाषेचं, शब्दाचं स्वरुप भिन्न व्यक्ती, प्रदेश, घटना, वस्तू, रुप ध्वनी आदी घटकांवर अवलंबून असते दोन व्यक्तीची बोली समान असू शकत नाही. प्रा.र.बा.मंचरकरांनी आपल्या विवेचनात म्हटलं होतं की
''एकाच वंशातील एकाच वातावरणातील व एकाच सामाजिक स्तरामधील एक भाषीय व्यक्तीच्या भाषिक सवयही पूर्णतः कधी सारख्या असत नाहीत. शब्दांची निवड, वाक्यांची बांधणी, वारंवार वापरले जाणारे शद्ब, उच्चाराची विशिष्टता,गती, आघात कमी अधिक तीव्रता या सार्‍यांनी त्यांच्या भाषेला पृथगात्मता येत असते'' एक भाषा अनेक व्यक्ती बोलतात तेव्हा त्यांच्यात व्यक्तीपरत्त्वे,वयपरत्त्वे, व्यवहार परत्त्वे अंतर हे पडतच जाणार आहे.

रामदास काका, तुमच्या एकाद्या शहरातील मित्राला (आपल्या सारखा भाषाप्रभु नै हं) भेटलात तर आपल्या बलुतेदारांनी दिलेले कोणकोणते शब्द आठवतात विचारा. घण, भाता,,पोहरा, काखा, गुण्या, रुमणे, वाकस, शिवळ,पाचर,भेंडे,बोळके,सुगडं, पाचुंदा, दुरडी, पायली, आधली (आधूली) अशा शब्दांचे अर्थ विचारा आणि मग आजच्या पिढीच्या तोंडाकडे बघा. :)

आजच्या संगणकीय युगात जेव्हा जालावर अनेकवर्षांच्या वावराने पाहतो. मराठी लिहिणार्‍यांनी खूप चांगले शब्द दिले आहेत. भाषा समृद्ध होते ती अशीच. माझे म्हणाल तर माझी तरी आजच्या भाषेबद्दल माझी फारशी तक्रार नाही.

'

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

28 Feb 2013 - 9:11 am | नाखु

शुद्धलेखन किंवा प्रमाणभाषेचा विषय काढला की तिथे लगेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य किंवा ब्राम्हण वगैरे जातीयवादही उपस्थित होतो.
याच्याशी पुर्ण सहमत.
बाकी हिंदी/ईंग्रजी जाहिराती/लेख वाक्प्रचार यांचा मराठी अनुवाद हाही मोठा गंभीर मामला आहे.
यामुळेच लहान मुलांना अर्थ न कळताच शब्द वापरण्याची सवय लागली आहे.
बाकी जेष्ठांनी वर लिहिले आहेच.

ऋषिकेश's picture

28 Feb 2013 - 9:17 am | ऋषिकेश

बाकी भावनेशी सहमत.. फक्त ग्लास आणि फुलपात्र वेगळेच आहे.
एका ठराविक (बसका, काढ असलेला) घाट असलेल्या पात्रालाच फुलपात्र म्हणावे.. बाकी काचेचा ग्लास, स्टीलचा ग्लास (उभट स्टीलचे पाणी प्यायचे भांडे) वगैरे आहेतच. वाटी, सॉसर, बशी, बाऊल्स ही सारी वेगवेगळी भांडी आहेत.

बाऊल्सचे, ग्लासेसचे किंवा सॉसर्सचे घाट आपल्याकडे नव्हतेच. ते आल्यावर त्याला नवे विशेषनाम का बरे शोधावे?

पैसा's picture

28 Feb 2013 - 9:24 am | पैसा

बाउल याला कुंड्या तर ग्लास याला पेला. यात खरे तर ग्लास म्हणजे काच. मग काचेच्या पेल्याचे नाव त्या आकाराच्या कोणत्याही भांड्याला कसे पडले देव जाणे! स्टीलचा ग्लास हे सर्रास ऐकायला मिळतं.

नितिन थत्ते's picture

28 Feb 2013 - 9:27 am | नितिन थत्ते

>>बाउल याला कुंड्या

वाडगा सुद्धा म्हणतात.

ऋषिकेश's picture

28 Feb 2013 - 2:34 pm | ऋषिकेश

मी कुड्या म्हणून जो बघितला त्याला काठावर कड असे (काहि कुंठ्यांवर ठोकाची माफक नक्षीही असते). शिवाय ते धातुचे असत -अजूनही असावेत. बाऊल्स हे चीनीमातीचे किंवा प्लॅस्टिकचे असतात आणि त्याला कड नसते.

बाकी पेला ह शब्द विसरलो होतो. स्टीलचा ग्लास (या विनोदी, प्रचलित) शब्दापेक्षा पेला योग्यच!

मन१'s picture

28 Feb 2013 - 5:10 pm | मन१

(बेणेवाडी बुद्रुक येथील हातभट्टीवगैरे विरोधातील शासकीय जाहिराती )उत्स्फूर्त काव्य :-
तो स्साला
पाहुनि (दारुचा) ठेला
भरला पेला
घोटभर पिउन
झटकन मेला
कचर्‍यात नेला
संपला झमेला

नितिन थत्ते's picture

28 Feb 2013 - 9:19 am | नितिन थत्ते

ग्लास हा इंग्रजी शब्द गिलास या हिंदी शब्दावरून घेतलेला आहे हे नम्रपणे नमूद करू इच्छितो.

पु. ना. थत्ते

नाना चेंगट's picture

28 Feb 2013 - 9:31 am | नाना चेंगट

सहमत आहे.

मास्टर हा शब्द मास्तर, ट्रेझरी हा शब्द तिजोरी , मेसनरी हा शब्द मिस्त्री या शब्दापासून घेतला आहे.

झोडून गुत्ते

मृत्युन्जय's picture

28 Feb 2013 - 11:10 am | मृत्युन्जय

संपुर्ण मराठी माध्यमातुन शिकलेला माझा मित्र जेव्हा "सॅन्ड्विच करण्यापुर्वी नाइफने ब्रेडचे त्रँग्युलर पिसेस करुन घेतो आणि साइड्स कट करुन घेतो " असे म्हणाला होता तेव्हाच मी निष्प्राण झालो होतो.

आपण लै " यो " असे दाखवण्यासाठी काही लोक कसोशीने मराठीचा वापर टाळतात. " पट्टीच्या सहाय्याने कागदाचे तुकडे कर" असे म्हटल्यावर माझी मैत्रीण आश्चर्याने " किती हेवी मराठी बोलतोस तु " असे म्हणाली होती. ते ही आठवते. वरील दोघेही लोक शुद्ध महाराष्ट्रीयन कुटुंबातले मराठी माध्यमातुन शिकलेले. त्यांची ही अवस्था तर इंग्रजीतुन शिकलेले आणि त्याच वातावरणात मोठे झालेले लोक याहुन चांगले मराठी बोलतील अशी अपेक्षा करणेच चुकीचे.

अर्थात हे बोली भाषेबद्दल झाले. जसे बोलतो तसेच लोक लिहितात तेव्हा मात्र खुप त्रास होतो.

jaypal's picture

28 Feb 2013 - 11:21 am | jaypal

काय बोलणार ?

अक्षया's picture

28 Feb 2013 - 11:33 am | अक्षया

रामदास काका सहमत आहे.
आमच्या घरातील सगळेच मराठीचा सार्थ अभिमान असलेले. सगळ्यांचे शिक्षण मराठी माध्यमातुन झाले.
परवाचीच गोष्ट. माझा भाऊ त्याचा ३ वर्षाचा मुलाला गोष्ट सांगत होता. 'सिंहाचे प्रतिबिंब त्यालाच पाण्यात दिसते आणि तो विहिरीत उडी मारतो वगैरे..खुप प्रयत्न केले पण त्या मुलाला प्रतिबिंब शब्दाचा अर्थ कसा सांगायचा असा प्रयत्न चालु होता. शेवटी भावाने एक पाण्याची बादली भरुन आणली त्यात वाकुन दाखवले, यात मी दिसतोय त्याला प्रतिबिंब म्हणतात असे सांगीतले त्यावर तो ३ वर्षाचा मुलगा शांतपणे म्हणाला बाबा म्हणजे तुला रिफ्लेक्शन म्हणायचे आहे का?
माझा भाऊ निरुत्तर होऊन त्याचाकडे पहात राहीला..

सुहास..'s picture

28 Feb 2013 - 11:41 am | सुहास..

हम्म , छान चर्चा !

माझ शिक्षण ईग्रंजीतून झाले आहे , माझा लिहीताना वाचताना महाप्रचंड घोळ होतोच. पण एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली आहे की ..जितके सोप्प ईग्रंजाळलेले शब्द वापरून मराठी बोलता येते तितकेच अवघड मराठी शब्द वापरताना होते, अर्थात त्यात मजा ही खुप आहे . हेच पहा ना ,

त्याला दहा दिवसांपासुन व्हेन्टिलेटर वर ठेवले आहे.

कस बोलायचे हे व्हेन्टिलेटर ?

लाईफ सपोर्टवर ठेवले आहे.. असं म्हणता येईल.. ;)

नितिन थत्ते's picture

28 Feb 2013 - 12:17 pm | नितिन थत्ते

काही वेळा ओळखीचे शब्द वेगळ्या संदर्भात वापरले की चकित व्हायला होते.

स्क्रू मध्ये वॉशर (शुद्ध मराठीत- वायसर) ओवून घे असं एका मराठी कामगाराला सांगितल्यावर तोही बेशुद्ध व्हायचाच तेवढा राहिला होता.

आपल्यासाठी भाषा आहे. भाषेसाठी आपण नाही.

"श्री चामुन्डराये करवियले श्रीगंगराये सुत्ताले करवियले" किंवा "जैसे भडबुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात होतो तसा एक धडाका जाहला" (चूभूदेघे)

अशा मराठीकडून बदलत बदलत आपण बर्‍याच वेगळ्या मराठीकडे आलो आहोत. पुलंनी तीसचाळीस वर्षापूर्वी लिहीतानाही "उमाठा" आणि तत्सम शब्द गायब होत असल्याचं लिहीलं आहे. हे सतत वाटत असतं. आता जागतिकीकरण होत असल्याने ही प्रक्रिया आणखी तीव्र झाली आहे.

सुहासने दिलेलं उदाहरणच पुढे घेतो. बहुतांश लोक जर "व्हेंटिलेटरवर ठेवला" म्हणायला लागले तर "व्हेंटिलेटरवर ठेवला" हीच "भाषा".

माणसं एकमेकांशी बोलण्यासाठी / भापोसाठी जे माध्यम वापरतात ते भाषा. सर्वात सहज आणि सर्वात चपखल इकडचा भाव तिकडे ट्रान्स्फर होईल ते माध्यम उत्तम. मराठी हे आपापतः आपण शिकत आल्यामुळे सहज वाटणारं माध्यम आहे. भाषा सोडा..कोणी नृत्य करतो तर कोणी चित्र काढतो. उद्देश व्यक्त होण्याचा असतो. पण दैनंदिन व्यवहारात चित्रं, नाच अशा माध्यमातून व्यक्त होणं सोपं नाही. म्हणून शब्दयुक्त भाषा. आता फेसबुकच्या सानिध्यात असणार्‍या असंख्य व्यक्तींना लोल किंवा ओएमजी किंवा स्माईली ही भाषा परस्पर संवादात अपील होत असेल तर त्यांची जन्मभाषा आपापतः प्रमाण मराठी होती म्हणून त्यांनी प्रवाहाच्या उलट जाऊन ती मूळ स्वरुपात जतन करणारे शब्द हुडकत किंवा जपत रहावं? मुख्य उद्देश काय? संवाद की भाषा जपणं?

मूकबधिर सुद्धा एकमेकांत आणि इतरांशी आपल्या खास भाषेत व्यक्त होतात. प्रमाण मूकबधिर भाषा ही सोयीची असली तरी ती वापरताना अनेक बदल तिथेही केले जातात तर बोलीभाषेची काय कथा?

इंग्रजीतून किंवा अरबी-फारसीतून शब्द आले म्हणून बर्‍याचदा वाईट वाटून घेतलं जातं. त्यातही काही अर्थ नाही. स्वतः इंग्रजीतच मूळ लॅटिन आणि लॅटिनोद्भव भाषांतून अगणित शब्द आले आहेत. जागतिक भाषा म्हणून इंग्रजी पसरत असताना मराठीत तिची भेसळ झाली तर काय होईल? : आपण आपल्या लहानपणी जी भाषा बोलत होतो त्यातले "ते" आपले शब्द नाहीसे होतील आणि त्याजागी एकेका शब्दाच्या अंतराने पेरलेले अन्यभाषिक शब्द येतील. त्याउपर जाऊन पूर्ण भाषाच रिप्लेस होईल. हलगीवादन, वासुदेव, भुत्या, कल्हई, शिकलगारी, जात्यावर दळण या परंपरा शहरातून नाहीश्या झाल्या. लहान शहरांत आणि गावात त्या अजून आहेत. पण त्याही कमी होतील. म्हणून त्या टिकवत ठेवण्याचं काय कारण? त्याला पर्याय आले आणि लोकांनी ते घेतले.

जर नवीन पिढी, शहरी समाज अशा रितीने भाषेत बदल करत असतील तर त्यात वाईट वाटणं साहजिक आहे, पण ते वाईट वाटणं कोणत्याही "संरक्षक" चळवळीकडे वळू नये.
ते वाईट वाटणं फक्त "आपलं ते पूर्वीचं आता राहिलं नाही" अशा अनेक इतर बाबतीत येणार्‍या नॉस्टाल्जियाइतकंच मर्यादित असावं.

मराठी पुस्तकांतून साठवलेलं ज्ञान आणि मनोरंजक साहित्य मागे पडण्याची काळजी वाटणं हेही खरंच आहे, पण या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक धरुन ठेवू शकत नाही. दोन हजार वर्षापूर्वीचे किती ग्रंथ आज टिकून आहेत? ते जाऊ दे. पन्नास वर्षात किती पुस्तकं निघाली आणि किती सामान्य लोकवाचनात टिकून आहेत?
संस्कृत ग्रंथांमधे असलेलं सारं ज्ञान फक्त अभ्यासकांसाठी मर्यादित झालं तसं पुढे मराठीचंही होऊ शकेल आणि तसं होऊ नये म्हणून आटापिटा करण्याची आवश्यकता नाही.

टिकायचं ते टिकतंच आणि काळाच्या ओघात चारदोन खास ग्रंथ वगळता जवळजवळ सर्व साहित्य मुख्यप्रवाहातून बाजूला फेकलं जातंच आणि अस्तंगत होतंच.

भाषा आणि तिचं परिवर्तन ही फारच संवेदनशीलरित्या घेतली जाणारी गोष्ट आहे. पण कोणत्याही गोष्टीची अस्मिता ही वाईटच हे म्हणावंसं वाटतं. इतर भाषा (जपान, जर्मनी, तामिळनाडू इ इ) कसे आपापल्या भाषेला धरुन असतात आणि अन्य भाषांना शिरकाव करु देत नाहीत आणि सर्व कामकाज आपल्या स्वतःच्या भाषेत करवतात इत्यादि कडवेपणा ऐकून माझी मराठी भाषा तशी नाही याचा मला आनंद होतो. माझी भाषा इतरांचा विटाळ न मानता अमर्यादितरित्या मिसळण्यास तयार होत असेल तर मला अभिमान आहे.. टिकण्यात मजा नाही, इतरांशी मिसळण्यात आहे..

हे निराशाजनक नाही हे फक्त काल्पनिक काळजी टाळणं आहे.

भाषेच्या प्रवाहीपणाबद्दल सहमती दर्शवून एका काहीशा अवांतर मुद्याबद्दल बोलतो.

मराठी पुस्तकांतून साठवलेलं ज्ञान आणि मनोरंजक साहित्य मागे पडण्याची काळजी वाटणं हेही खरंच आहे, पण या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक धरुन ठेवू शकत नाही. दोन हजार वर्षापूर्वीचे किती ग्रंथ आज टिकून आहेत? ते जाऊ दे. पन्नास वर्षात किती पुस्तकं निघाली आणि किती सामान्य लोकवाचनात टिकून आहेत?

बाकी भाषांचं माहीत नाही, पण अशी इतकी उत्तमोत्तम पुस्तके आज लुप्तप्राय आहेत की सांगता पुरवत नाही.

संस्कृत ग्रंथांमधे असलेलं सारं ज्ञान फक्त अभ्यासकांसाठी मर्यादित झालं तसं पुढे मराठीचंही होऊ शकेल आणि तसं होऊ नये म्हणून आटापिटा करण्याची आवश्यकता नाही.

टिकायचं ते टिकतंच आणि काळाच्या ओघात चारदोन खास ग्रंथ वगळता जवळजवळ सर्व साहित्य मुख्यप्रवाहातून बाजूला फेकलं जातंच आणि अस्तंगत होतंच.

हा काहीसा पूर्वानुभवाचे जास्तच सामान्यीकरण करण्याचा प्रकार आहे. ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील इतके नवनवे ग्रंथ उजेडात आले आणि पुढे क्लासिक होऊन बसले, की वरील वाक्य मान्य करवत नाही. जे टिकलं, ते भारीच असतं असं काही नाही. तमिळमधील सर्वात फेमस शिलप्पधिकारम आणि मणिमेगलाई ही महाकाव्येसुद्धा स्वामिनाथन अय्यर यांच्यामुळे १९ व्या शतकातच जण्रल पब्लिकला कळाली, नैतर कुणाला माहिती नव्हती. तीच गोष्ट महानुभाव ग्रंथांची.

माझा मुद्दा इतकाच आहे, की उत्तमोत्तम पुस्तके मराठीत वेगवेगळ्या वेळी पब्लिश झालीत-त्यांच्या दर्जाबद्दल वाद होऊच शकणार नाही इतकी भारी. पण समहौ ती विस्मृतीत गेली, उदा. "मुंबै शहराचे वर्णन" हे एक अप्रतिम पुस्तक आज किती जणांना माहिती आहे? अजबने जर ५० रु. मध्ये ते छापले नसते तर घंटा कळाले नसते कुणालाही-असे प्रयत्न होताहेत, पण खूप कमी प्रमाणात. तीच गोष्ट नासदीयसूक्तभाष्यासारख्या कामशास्त्रविषयक माहितीने खच्चून भरलेल्या आणि १९४० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाची. अशी अजून कितीतरी उदाहरणे सांगता येतील. १९४०-५० च्या आधीचीच कशाला, नंतरच्या काळातलीसुद्धा काही उत्तम पुस्तके आज दुर्मिळ आहेत. माझा आक्षेप आहे तो या उत्तम पुस्तकांच्या अनुपलब्धीवर. हे सुधारले नाही तर मराठी वाङ्मयाबद्दल वृथा आक्रोश करत बसतील लोक. जरा शोधाशोध केली तरी खूप भारी पुस्तके सापडतील.

बाकी भाषांचं माहीत नाही, पण अशी इतकी उत्तमोत्तम पुस्तके आज लुप्तप्राय आहेत की सांगता पुरवत नाही.

म्हणजेच ही लुप्त होण्याची प्रक्रिया सतत चालू आहे आणि "हल्ली"च्या "वाढत्या मराठी विद्रूपीकरणाच्या" बर्‍याच आधीच्या, म्हणजे तुलनेत भाषासंवर्धक वातावरण असलेल्या काळातही चालूच होती. भाषेचे मूळ रूप टिकण्याचा आणि त्यातले उत्तम ग्रंथ लुप्त न होण्याचा परस्परसंबंध नाही.

हा काहीसा पूर्वानुभवाचे जास्तच सामान्यीकरण करण्याचा प्रकार आहे. ब्रिटिश काळापासून वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील इतके नवनवे ग्रंथ उजेडात आले आणि पुढे क्लासिक होऊन बसले, की वरील वाक्य मान्य करवत नाही. जे टिकलं, ते भारीच असतं असं काही नाही. तमिळमधील सर्वात फेमस शिलप्पधिकारम आणि मणिमेगलाई ही महाकाव्येसुद्धा स्वामिनाथन अय्यर यांच्यामुळे १९ व्या शतकातच जण्रल पब्लिकला कळाली, नैतर कुणाला माहिती नव्हती. तीच गोष्ट महानुभाव ग्रंथांची.

यातलं "जे टिकलं ते भारी असतंच असं नाही" या भागाविषयी:

अगदी अगदी.. जे टिकलं ते भारी असतंच असं अजिबातच नाही. बरंच (त्या त्या वेळी चांगलं, दर्जेदार असलेलं आणि कधीकधी गाजलेलं देखील) पुढे काळाच्या ओघात लुप्त होतं आणि शतकांनंतर कुठेतरी उघड होऊन पुन्हा प्रसिद्ध होतं. तरीही जे बदलत राहिलं तेच टिकून राहिलं हा उलट विचारही करुन पहावा. आणि म्हणूनच भाषा बदलत बदलत सध्या आहे त्या तथाकथित "धेडगुजरी" रुपात टिकत आली. आणि तशीच बदलली तर टिकेल. रोजच्या व्यवहारात जित्या-श्वास घेत्या रुपात जगेल. अशी "उत्तम" पुस्तकं मात्र पुढे "अपघाताने" सापडून पुनर्जीवित व्हावी लागतील.

माझा मुद्दा इतकाच आहे, की उत्तमोत्तम पुस्तके मराठीत वेगवेगळ्या वेळी पब्लिश झालीत-त्यांच्या दर्जाबद्दल वाद होऊच शकणार नाही इतकी भारी. पण समहौ ती विस्मृतीत गेली, उदा. "मुंबै शहराचे वर्णन" हे एक अप्रतिम पुस्तक आज किती जणांना माहिती आहे? अजबने जर ५० रु. मध्ये ते छापले नसते तर घंटा कळाले नसते कुणालाही-असे प्रयत्न होताहेत, पण खूप कमी प्रमाणात. तीच गोष्ट नासदीयसूक्तभाष्यासारख्या कामशास्त्रविषयक माहितीने खच्चून भरलेल्या आणि १९४० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाची. अशी अजून कितीतरी उदाहरणे सांगता येतील. १९४०-५० च्या आधीचीच कशाला, नंतरच्या काळातलीसुद्धा काही उत्तम पुस्तके आज दुर्मिळ आहेत. माझा आक्षेप आहे तो या उत्तम पुस्तकांच्या अनुपलब्धीवर. हे सुधारले नाही तर मराठी वाङ्मयाबद्दल वृथा आक्रोश करत बसतील लोक. जरा शोधाशोध केली तरी खूप भारी पुस्तके सापडतील.

हे सुधारले नाही तर म्हणजे? काय सुधारायचं? ही पुस्तकं शोधून पुनर्मुद्रित करायची? केवळ पन्नासला बाजारात आलं म्हणून जे वाचलं जातं ते पुस्तक म्हणजेच वाङ्मय? तरीही ठीक आहे. करावीत अशी चांगली पुस्तकं शोधून पुनर्मुद्रित, एक समाजकार्य म्हणून.. आणि ती सर्व भाषांतली करावीत.. अनुवादित करावीत..

या सर्वाचा रोजच्या चालू मराठी भाषेच्या "शुद्धता" किंवा "मूळरुप टिकबण्या"शी संबंध नाही. (आणि तू तसं म्हणतो आहेस असंही नव्हे :) )

गविशेठ, मी आधीच म्हणालो होतो की माझा प्रतिसाद एका अवांतर मुद्द्याशी निगडित आहे म्हणून...भाषेच्या प्रवाहीपणाबद्दल आणि तुमच्या या प्रतिसादातील अन्य मुद्द्यांशी अर्थातच सहमत आहे हे मी प्रतिसादाच्या सुरुवातीसच नमूद केले होते.

हे सुधारले नाही तर म्हणजे? काय सुधारायचं? ही पुस्तकं शोधून पुनर्मुद्रित करायची? केवळ पन्नासला बाजारात आलं म्हणून जे वाचलं जातं ते पुस्तक म्हणजेच वाङ्मय?

अंमळ डिसमिसिव्ह सूर आहे का हो इथे? उत्तम पुस्तके या ना त्या स्वरूपाने आपल्यासमोर यावीत इतकाच मुद्दा आहे. वाङ्मयाची व्याख्या इथे करतच नाहीये. पण विविध कारणांमुळे लै भारी पुस्तके नष्ट होतात, ते प्रमाण कमीतकमी असावे. सुधारणा म्हणजे हीच. एक पिढी अगोदरचेही बरेच उत्तम ग्रंथ आज औट ऑफ प्रिंट आहेत, उदा. मराठी लावणी बाय म वा धोंड. शंभरदीडशे वर्षे सोडा, ४०-५० वर्षांअगोदरची पुस्तकेसुद्धा बर्‍याचदा धड मिळत नाहीत इथे. न र फाटक, विट्ठलराव घाटे, इ. किती उदाहरणे सांगावीत.

तरीही ठीक आहे. करावीत अशी चांगली पुस्तकं शोधून पुनर्मुद्रित, एक समाजकार्य म्हणून.. आणि ती सर्व भाषांतली करावीत.. अनुवादित करावीत..

अर्थातच. आणि खरोखरच उत्तम पुस्तके असतील तर ते होपफुली समाजकार्यसुद्धा राहणार नाही, फायदेशीर धंदा होईल तो :)

शेवटी हे जरा कौतुकाचे रडणे आहे हे मान्य-विशेषतः मूळ चर्चाविषयासंदर्भात-पण माझा नाइलाज झाला ;)

यशोधरा's picture

28 Feb 2013 - 7:18 pm | यशोधरा

मराठी लावणी बाय म वा धोंड - हे पुस्तक कधी कधी रसिक मध्ये उपलब्ध असते. मला एकदा अवचित मिळून गेले.

नशीब चांगले तुमचे :) मला लैवेळा विचारूनपण नै मिळाले. असो. परत एकदा पाहतो ट्राय करून :)

अगदीच हवे असल्यास कधी दिसले तर मी घेऊन ठेवू शकते, माझ्या फेर्‍या होत असतात रसिकला.

धन्यवाद पण मीही तसा फिरत असतो तिथे, तेव्हा नेक्ष्ट टैम बघतोच :)

मन१'s picture

28 Feb 2013 - 1:45 pm | मन१

विजय तेंडुलकर ह्यांचे विचार शेम टू शेम असेच आहेत. मटामधील मुलाखतीत "आजची मराठी मृतप्राय असेल तर तिला मरु देत. उद्या मराठी लोक बोलतील ती मराठी ठरेल. कै हरकत नाही" अशा आशयाचं ते बोलले होते.

गवि's picture

28 Feb 2013 - 1:49 pm | गवि

कमी शब्दांत आणि थेट मांडण्याची ताकद होती म्हणून ते "तें" होते.. आम्ही प्यारे भरुन लिहीत बसतो. ;) (प्यारे१ या सन्मित्राशी याचा संबंध नाही.)

आपल्यासाठी भाषा आहे. भाषेसाठी आपण नाही.
हे भाषेपुरतेच नाही तर या वाक्याची व्याप्ती फार मोठी आहे. अमेरिकेत तीन पिढ्या राहिलेल्या कोकणस्थाला आपण रत्नांग्रीचा
अभिमान शिकवायला गेलो तर कसे वाटेल ? . देशाभिमान जात्याभिमान, धर्माभिमान राष्ट्राभिमान सारे मानसिक खेळ आहेत. त्याला मर्यादित महत्व ही आहे पण गविंचे वरचे वाक्य फार काही सांगून जाते. मी जन्माने हिंदू आहे पण माझ्या धर्मात " फतवा काढण्याची प्रथा सुरू झाली तर मी या धर्माला राम राम करेन.माझ्या भाषेचे तेच .माझ्या भाषेत अपरिहार्यपणे इतर भाषातील शब्द आले तर काय फार विटाळ झाला असे मी मानणार नाही पण सचिन तेंडूलकर जशी मराठी बोलतो तशीच मी म्हणायला पाहिजे असा ठराव साहित्य संमेलनात झाला तर मी मराठीला रामराम करेन. थीडक्यात 'त्याला व्हेंटीलेटर ठेवला आहे " हे वाक्य मला चालेल पण 'विकेट फार डोसाईल होती त्यामुळे मी लॉट ओफ रन्स मारू शकलो' हे मराठी मला आवडणार नाही.

इरसाल's picture

28 Feb 2013 - 12:21 pm | इरसाल

भेंडी हा शब्द एका शब्दाच्या* बदल्यात वापरला जातो त्याच्या भावना पोहचतात आणी अश्लिलही वाटत नाही.
**इथे लिहीण्यासारखा नाहीए.

सस्नेह's picture

28 Feb 2013 - 1:37 pm | सस्नेह

भाषा-सतर्कता (कॉन्शसनेस -मराठी शब्द ?) असणारी पिढी शाबूत आहे तोपर्यंत उद्विग्नता राहणारच !

बाळ सप्रे's picture

28 Feb 2013 - 1:45 pm | बाळ सप्रे

कॉन्शसनेस - जाणीवपूर्वकता ??

भान..भाषाभान.. नुसता जाणीव शब्दही चालेल.

"कॉन्शसनेस" हा शब्द नि:संदिग्ध वाटत असताना आणि कोणालाही न समजण्याची शक्यता नसताना कशाला शोधताय आल्टर्नेट बादवे? ;)

अधिराज's picture

28 Feb 2013 - 2:34 pm | अधिराज

असेच एका सुट्टित घरी चुलत वगैरे भावंड जमली अस्ताना चुलत बहिणीचा व भावाचा टिवीवर कोणते चॅनल लावायचे यावरुन वाद सुरु झाला. हा वाद शेवटी भावाने जिंकला, त्याच्या हातात रिंमोट आदळत बहिण एकदम बोलुन गेली "घे, बघ तुला पाहिजे ते. तुझीच लाल. बस." तिच्या तोंडून "तुझीच लाल" हा शब्द ऐकून तिथेच असलेले काका खूप भडकले व तिला फैलावर घेतले. पण त्या बिचारीला ह्यातून नेमका काय अर्थ निघतो तेच माहित नव्हते. ती म्हणाली मी तो शब्द "घे , तुझंच म्हणणं खरं" ह्या अर्थाने वापरला होता.

मनीषा's picture

28 Feb 2013 - 3:04 pm | मनीषा

लेखातील विचारांशी सहमत.

भाषा ही प्रवाही असावी. तिचे बदलते स्वरूप हेच तर तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सतत बदलणार्‍या जगात ते बदल व्यक्त करताना भाषा बदलणे देखिल स्वाभाविकच आहे असे वाटते. नदीचा प्रवाह जसा अडथळा आला तर वळण घेऊन पुढे वाहू लागतो तसेच भाषेचे आहे.
माझा मुलगा प्राथमिक शाळेत असताना त्याला 'सुंदर' या शब्दाचा विरूद्ध अर्थी शब्द लिहायला सांगितले तर त्याने 'घाण' असे लिहिले. त्यांच्या टीचर ने ते चूक दिले. आणि ते का चूक आहे हे मला त्याला सांगता आले नाही. तसेच सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप त्याने सम्राटीण असे लिहीले होते. पण यात मला त्याची चूक आहे असे म्हणता येणार नाही. कारण रोजच्या अनुभवातील नियम त्याने तेथे वापरला. मुलांना भाषेचे बारकावे जाणिवपूर्वक समजाऊन सांगणे, ही त्यांच्या आईवडिलांचीच जबाबदारी आहे. (त्या साठी त्यांना चांगली मराठी अवगत असायला हवी.)
पण भाषेतील भेसळीचा प्रश्न फक्त मराठीलाच भेडसावत नसावा. माय फेअर लेडी या चित्रपटातील इंग्रजी भाषेचा आभ्यासक असलेला प्रोफेसर हिगिन्स सुद्धा वैतागून म्हणतोच, "व्हाय कान्ट इंग्लीशमन स्पीक इंग्लीश?"

अर्थात भाषेची अतिरेकी भेसळ नक्कीच टाळायला पाहिजे. भाषाशुद्धी, आणि भाषेचे सौंदर्य या खूप पुढच्या गोष्टी आहेत. पण निदान आपण जी भाषा बोलतो ती ऐकताना कानाला आणि ऐकल्यानंतर मनाला ओंगळवाणी वाटू नये.
माझी मराठी देखील म्हणावी तितकी शुद्ध नाही याची जाणीव आहे, पण मी जास्तीतजास्त शुद्ध मराठी बोलण्याचा आणि लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करते.

मायमराठी आणि My मराठी यात संघर्ष न होता सलोखा असावा. आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा ही मनापासून इच्छा.

मन१'s picture

28 Feb 2013 - 5:13 pm | मन१

भाषायुद्धाबद्दल अभिजन विरुद्ध सामान्यजन असा झगडा मांडलेलं पुलंचं "ती फुलराणी" कुणी पाहिलय का?

चौकटराजा's picture

28 Feb 2013 - 6:44 pm | चौकटराजा

मनोबा, या तुझ्या प्रतिसादावरून एक आठवले. मागे मराठवाड्याकडील एक साहित्यिक म्हणाला होता ते पुण्याचे " पाणी " हा शब्द चुकीचा आहे " पानी" हा शब्दच बरोबर आहे. संस्कृत मधे पानीयं असेच म्हणतात ना ? " आता बोला कोणती भाषा
" प्रमाण भाषा " ?

पानीयं वरून पाणी हे मराठीच्या अभिजन बोलीत केले गेलेले रूप आहे, सबब ते शुद्ध म्हणून रूढ झालेय. संस्कृतमध्ये जिथे मूळ न, ल, इ. असेल, तिथे ण, ळ लावायची मराठीची खोड सर्वश्रुत आहे, त्याप्रमाणेच हे झालेय.

शुद्ध आणि अशुद्ध हा वाद व्याकरणाबद्दल बोलताना थोडा तरी अर्थपूर्ण राहतो, बाकी शब्दरूपांबद्दल बोलायचे झाले तर तो आर्बिट्ररी असतो बर्‍याचदा. असो.

पन हल्ली 'प्रश्ण' म्हनायची लय वंगाळ पद्द्त आल्याली हाय!

फिरंगी's picture

28 Feb 2013 - 7:40 pm | फिरंगी

"पाचर मारली" हा असाच वाक्प्रचार ........ कधीही वापरला जातो ....

उपास's picture

28 Feb 2013 - 9:46 pm | उपास

रामदासजी, अगदी समयोचित चर्चा घडवून आणलित, वरचे बरेच प्रतिसाद आवडले.
पण, एकूणात लेखात थोडं अरण्यरोदन वाटलं, लेखाच्या नावासहित.
भाषा प्रवाही, वापरायला सोप्पी असावी.. पु.लं, तें ह्यांनी आपल्या कलाकृतींतून / विचारातून वारंवार सांगितलय आणि ते पटलही. पुढच्या पिढीला जेवढं देता येईल तेवढं द्यायचं, घ्यायला तिला तयार करायचं, ह्यापलिकडल्या सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर आपला अंकुश नाही हे समजून/ मान्य करुन समाजाबरोबर चालत राहवं असं वाटतं.

आता अपशब्द (स्लँग) विषयी, मुलं काय आणि मुली काय, त्यातला अर्थ समजावून घेऊन तो वापरलात जातो असं नाहीच. ती अपेक्षाच का ठेवायची, शब्दावर जोर यावा, राग/ लोभ भावनावेग व्यक्त करता यावा ह्यासाठी हे शब्द जोरकस रीत्या उच्चारले जातात... हे वारंवार होत राहिलं की ते बोथट/ गुळगुळीत बनतात, त्यांच्या अर्थात न शिरलेलंच बरं.. नुसता उच्चारण्यातच आस्वाद(!) घ्यायचा ;)

जाता जाता, मराठी मध्ये हिंदी/ इंग्रजी शब्द आलेले जसे अप्राप्य वाटतात तितकेच संस्कृत शब्द वाटत नाहीत, ते सुद्धा परकेच की! विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

NAKSHATRA's picture

23 Jan 2021 - 8:18 am | NAKSHATRA

काका ,
सध्या मराठी भाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष्य होते आहे
आणि आता तर काय सगळेस लघु रूप झाले आहे