जीवनाचा अनादि, अनंत प्रवाह, त्यातून तुमच्या आमच्या ओंजळीत येणारे काही क्षण. कधी रेशीमलडींसारख्या उलगडणार्या तर कधी धारदार पात्यासारख्या लखलखणार्या जाणिवा. अवतीभवतीच्या जगातले आपणच लोक आपापल्या परीनं एकमेकांची सुखदु:खं वाटून घेत असतो, साथसंगत करत असतो, नातीगोती जपायचा मनापासून प्रयत्न करत असतो. कधी रीत तसं करायला भाग पाडते म्हणून तर कधी अंतरंगात दाटणारी प्रीत, म्हणून.
अख्ख्या जगाबरोबरीने जुळवून घेताना, कधी वाट्याला आलेली, तर कधी असोशीने आपलीशी केलेली नाती जपत असताना, कधी ह्याचं मन, तर कधी तिचं मन जपताना आणि अशाच तर्हेने आणखी कोणाकोणाची मनं जपत जगू पाहताना, एखाद्या लख्ख क्षणी स्वतःलाच उलगडू पाहतं स्वतःचं मन. नजरेला नजर भिडवत, आपल्याला त्याच्या अस्तित्त्वाची ओळख पटवू पाहतं.
मनातले सारे उत्कट भाव पुरासारखे
थांबतात मनाच्या उंबरठ्याशी येऊन
आपल्याच मनाशी नातं जुळतानाचा हा प्रवास इतकाही काही सोपा नसतो. मृदूमुलायम पायघड्या घातलेल्या नसतात. सारं काही स्पष्ट दिसासमजायला आणि आहे तसं उमजायला, कित्येक दरवाजे अजून धडका मारून उघडायचे असतात. पलिकडे जे काही असेल, त्याच्याशी डोळा भिडवायची आहे का हिंम्म्मत? का खात्री नाही, म्हणून बंदच दरवाजे?
मग पटापट मिटूनच गेले दरवाजे
नंतर शिवलेले ओठ, गिळलेली आणभाक
अणि एका बंद दाराशी उभी मी
माझेच घर होते ते, पण दरवाजा उघडलाच नाही..
जगापासून लाख जपाल, जगापासून लाख लपाल. मनापासून कसं जपाल? मनाला फसवून, मनाला नाकारत कुठे लपाल? जगाच्या कोलाहलात हरवाल? की दूर दूर कोणता तरी सांदीकोपरा शोधाल? पण मनाला काहीच वर्ज्य नाही, मनाला कुठेच अटकाव नाही. ते शोधतं तुम्हांला अचूक. फार काही प्रश्न वगैरे विचारत नाही. फक्त नजर देतं तुमच्या नजरेला. अनेक प्रश्न असतात त्या नजरेत. अजून बरंच काही. आव्हानं असतात, पर्याय असतात. आवडती तर कधी नावडती उत्तरंही. पेलू शकत असलात तर तुम्हारी बलासे, नाही जमलं पेलायला तर? तरीही तुम्हारी बलासे. मनाला सोयरसुतक नाही. ते फक्त आरसा दाखवणार.
देहाच्याही आत किती दूरदूरचे किनारे
किती सागरांवरुन येती अनोळखी वारे...
जगण्याच्या अफाट रेट्यामध्ये अचानक, अनपेक्षितरीत्या स्वतःचंच मन असं समोर येऊन उभं ठाकतं. नेहमी साथ संगत करणारं हे मन कधीतरी जीवघेणी कोडी घेऊनही सामोरं येतं. प्रसंगी अनोळखी बनून जातं. सहसा बळ देणारं मन कधीतरी एखाद्या श्रांत, क्लांत क्षणी थकून, स्वतःच दुबळं बनून तुकड्यां तुकड्यांत विखरत राहतं. एक तुकडा इकडे, एक तुकडा तिकडे... माझा तुकडा नक्की कोणता? कोणता म्हणायचा आपला? हे सगळे तुकडे एकत्र सांधणं म्हणजे परीक्षा. हे कोण आहे नक्की? माझंच ना हे मन?
जन्मापासूनची जरी ही आहे संगत, आहे का विश्वास?
वाढलो एकत्र म्हणून म्हणावा काय सहवास?
कधीतरी उभा दावा मांडतं मन. आपलंच असतं, - आपल्याच आधाराने रहात असतं, की आपण राहतो मनाच्या आधाराने? - पण मस्ती तर बघा! आपला काही काही इलाज चालत नाही. हवं तसं फरफटत नेतं आपल्याला, त्याच्या जगात. नाना प्रकारच्या इच्छा, संवेदना, राग-लोभ हे सारं सारं कुठून येतं? श्वास कोंडायला लावणारे प्रश्न, घुसमट करुन टाकणारी सत्यं.. खजिनाच असतो मनापाशी. कुठून जमवतं? कुठे दडवतं? नेमक्या एखाद्या तलम अचूक वेळीच आपल्याला आठवणही करुन देतं. सुख आणि दु:खांच्या नुसत्या तलम धूसर आठवणींवरही जीव प्राण कंठाशी येईपर्यंत झुलवत ठेवतं. तुमच्या आमच्या सवडीनं, कधीतरी निवांत वेळी प्रकाशाची उबदार तिरीप अलगद तुमच्यापर्यंत आणून सोडणार्या खिडकीत बसून शिळोप्याच्या गप्पा केल्यासारखं, अलवारपणे गुपित वगैरे सांगितल्यासारखं वागायला सवड नाही मनापाशी. हजार सुया एकाच वेळी भोसकाव्यात तसं प्रश्नांची, जाणिवांची उधळण करतं मन. बघता बघता छिन्न विछिन्न करुन टाकतं. सावरायचे सोहाळे मागाहून करायचे.
या वेदना, संवेदना, ही स्फुरणे, हे हर्षविषाद
हा कुणाचा दारुण शाप? हा कुणाचा महाप्रसाद?
आयुष्याचा गूढ, अनाकलनीय चेहरा, त्याच्याशी डोळे भिडवून पाहणारं मनच. सगळी सुखदु:खं, आनंद, विषाद, आशा, निराशा ह्या सार्यासार्याला आपल्या ठायी आसरा देणारं, आपलंस करणारं आणि कुठेतरी तळागाळात लपवून ठेवून जपणारंही मनच. प्रसंगी भांबावणारं, भयभीतही होणारं आणि तरीही प्रत्येक टप्प्यावर इतर कोणी साथ दिली नाही, प्रसंगी स्वतःची सावलीही दूर झाली, तरीही उभा जन्म आपली अंतःस्थ शक्ती पणाला लावून तोलून धरणारं मन.
अर्ध्य जसा ओंजळीत धरला जन्म उभा शिणलेला..
कधीतरी मनाशी नजरभेट करायची आणि मनाची लख्ख नजर तोलायची उमज येते. ती आली, की हळूहळू सूर लागतो, मनोमन संवादाचा एक सलग धागा जुळतो. भोवतीने पसरलेला कोलाहल विरु लागतो, काळोख उजळू लागतो. मुक्ततेच्या सोहळ्याला सुरुवात झाली का?
सर हलकीशी येऊन जाता
मेघ मिळाला मजला
एकरुप मी होता त्याशी
वणवा आतील विझला..
ही तर नुकतीच सुरुवात.. तुमचं आमचं टोचणारं दु:खं, सलणारे अपमान, खुपणारे पराभव, झुळझुळणारी सुखं, ह्या सार्याचं गाठोडं तर बांधलेलं असतंच मनाने. ह्याची स्वीकृतीही शिकवतं मन. आनंदसोहळा आता फार दूर उरलेला नसतो. अंतरात जमलेली महफिल आता सरणार नसते.
अंतर्यामीचे काही जोडीत अबोध नाते
दूर राईत एक पाखरु मंजूळ गाते
ओल्या वार्याचा गालांओठांना सुखद स्पर्श
अंग शहारे, आत दाटतो उत्कट हर्ष
जगामध्ये, जसा आनंदही भरलेला आहे, त्याचप्रमाणे विषादालाही जागा असणारच आणि, प्रत्येकासाठी कधीना कधी तोही भरुन वाहणार. सारी समष्टी एका सुखदु:खाच्या हेलकाव्यावर झुलत राहणार. जगाचा पसारा असाच.
ह्या सार्याचे मनाशी नाते जुळले, की ह्या सगळ्यांमधून झंकारणारा एक सुरेल नाद सर्व आयुष्याला व्यापून राहूनही उरेल, हे भान एकदा मनाने आणून दिले की अजून काय राहिले? मग एकच मागणे मागायचे..
गच्च अबोलपणाची सुटो मिठी जीवघेणी
वाचा स्वयंभू प्रकटो सारी उतरुन लेणी
नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा
एक सूर खरा लागो, उंच चढवून गळा!
***
ओळी स्व. शांता शेळके ह्यांच्या कवितांमधून.
प्रतिक्रिया
22 Jan 2013 - 3:20 pm | योगप्रभू
सुरेख केवळ अप्रतिम...
याला म्हणतात मनाच्या गाभ्यातील उत्कट चिंतन...
22 Jan 2013 - 3:24 pm | स्पंदना
बरसो रेऽऽ
बरसो रेऽऽ
टपोर टपोर शब्दांना कवितेच्या ओळीतुन गुंतवत (खर तर ते बोटांनी सुइ न वापरता जो गजरा विणतात त्याला काय म्हणायच्?..गुंफण करेक्ट) गुंफत बनलेला एक लेख म्हणु की श्वास म्हणु.
मस्त वाटल वाचताना. स्वतःशीच संवाद साधल्यासारख काही.
22 Jan 2013 - 3:26 pm | अभ्या..
प्रचंड म्हणजे प्रचंड आवडले आहे. अपर्णातै धन्यवाद.
22 Jan 2013 - 3:28 pm | अक्षया
अप्रतिम लेखन.खुप आवडले. :)
22 Jan 2013 - 3:33 pm | समयांत
मना जीवाच्या पासचे लिहीलेत :)
(कवितांच्या ओळींनी तर अगदी जळून गेलं अंतर्मन)
22 Jan 2013 - 3:47 pm | इनिगोय
स्वच्छ, नितळ, सुरेख लेख :)
ही शिकवणी एकदा सुरू झाली, की जगण्याला चव येत जाते, गाठीगुंते सुटत जातात..!
आभार, इतक्या देखण्या प्रकटनासाठी.
.
22 Jan 2013 - 3:56 pm | मन१
काहीतरी उत्कट, अमूर्त आहे असं जाणवलं.
म्हणजे अगदि रंगलेल्या मैफिलीच्या शेवटी शेवटी पुन्हा भैरवी ऐकावी, तृप्त व्हावं नि नंतरही ती भरवी कानात रुं़ई घालते, त्यातला उत्कट भाव लक्षात राहतो ना, तसं काहीतरी झालं.
22 Jan 2013 - 10:05 pm | मूकवाचक
+१
22 Jan 2013 - 4:17 pm | सूड
>>जगामध्ये, जसा आनंदही भरलेला आहे, त्याचप्रमाणे विषादालाही जागा असणारच आणि, प्रत्येकासाठी कधीना कधी तोही भरुन वाहणार.
हे विशेष आवडलं. फक्त विषाद भरुन आला की हेच मन 'हे आपल्याच वाट्याला का' असा प्रश्न विचारतं. मग राखेतनं नवा आकार घ्यायचा की तिच्यातच विरुन जायचं यातलं आपणंच काय ते ठरवून मनाला ठाम सांगावं लागतं. ते एकदा मनावर ठसलं की अर्धी लढाई जिंकलेली असते.
22 Jan 2013 - 4:50 pm | रुमानी
मस्तच.......
नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा
एक सूर खरा लागो, उंच चढवून गळा!
लेखन अतिशय बोलक झालय. कवितेच्या ओळी खुपच सुरेख
22 Jan 2013 - 5:38 pm | पैसा
काय सुरेख लिहिलंस ग! केवळ अप्रतिम! शांताबाईंच्या लखलखीत शब्दांना साजेसं कोंदण जमलंय इथे. उन्हाच्या काहिलीतून चालून आल्यावर थंड वार्याची झुळूक यावी नाहीतर थंडगार पाण्याचा शिडकावा व्हावा तसं काहीतरी वाटलं. अचपळ मनाला शब्दात पकडणं कठीण. पण ती किमया तुला जमलीय. या हृदयीचे त्या हृदयी घातले असा काहीसा अनुभव आला. शब्दात सांगणं कठीण आहे. धन्यवाद! एवढंच म्हणू शकते फक्त!
22 Jan 2013 - 6:32 pm | प्रभाकर पेठकर
मनांचे सर्व 'मूड' पकडताना अचूक शब्दांची निवड केली आहे. त्यामुळेच लेखन परिणामकारक झाले आहे प्रत्येकाला अंतःर्मुख करणारे आहे.
तरीही, मला ते कुठेतरी नकारात्मक वळण घेत आहे असे वाटले. मी आणि माझे मन हे वेगवेगळे किंवा परके नाही. आपले मन आपले सर्वात खरे आणि प्रामाणिक मित्र असते. फक्त मनाच्या सहवासातच आपण 'मोकळे' होतो, सल्ला मसलत होते, रागावणे-चिडणे होते, आनंद व्यक्त होतो. कधी कधी इतर सर्वांना दूर सारून ह्या 'मित्राच्या' सहवासात काही क्षण तर कधी तासंतास रमणे ह्याचा छंदच लागतो. आपल्या ह्या मित्रा इतकं आश्वासक कोणी नसतं. जगात सर्वात जास्त म्हणजे अगदी १००% मोकळेपणाने बोलणे इथेच शक्य असते. आपल्या चुका इथेच कबूल केल्या जातात. इथेच हिरीरीने आपल्या चुकांचे समर्थनही केले जाते. 'मित्र' मन शांतपणे सर्व ऐकून घेते. जाणवलेल्या आपल्याच चुका निर्भयतेने दाखवून देते आणि पाठीवरून हातही फिरविते. ह्या 'मित्रा'पाशीच कोणाच्याही नकळत चार अश्रूही ढाळता येतात आणि त्याने केलेल्या सांत्वनाने नवसंजिवनीही अनुभवता येते. आयुष्य नव्याने सामोरे येते. परिपक्व होते.
असा हा दोस्त..... मरेपर्यंत उबदार साथ देतो. तो जर नसता तर आयुष्य अवघड नाही तर अशक्यच झाले असते.
22 Jan 2013 - 7:08 pm | यशोधरा
पेठकरकाका, नकारात्मक असं नाही, पण मला वाटतं, उदासीन आहे (उदास नव्हे). किंवा थोडंफार हळूहळू जसंजसं जगरहाटीचा व्यवहार उमगायला लागतो तेह्वा बाह्य जगाविषयी एक थोडाफार अलिप्तपणा वा उदासीन वृत्ती जाणवते. बोरकरांच्या शब्दांत सांगायचं झालं तर -
कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?
कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?
कळत जाते तसे कशा मूर्ती सार्या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?
कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?
कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?
कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?
**
22 Jan 2013 - 11:13 pm | कवितानागेश
अप्रतिम... :)
तुझे लिखाण वाचून परत ही कविता वाचल्यावर तर काय वाटतय ते शब्दात सापडणे कठीण आहे.
22 Jan 2013 - 11:15 pm | पैसा
पूर्ण सहमत! :)
23 Jan 2013 - 12:42 am | प्रभाकर पेठकर
तसेही असेल. कदाचित माझा शब्द चुकला असेल. मलातरी माझ्या मनाची दोस्ती खूप खूप भावते. त्याच्याशी चर्चा करायला, माझ्या चुका कबूल करायला, सल्लामसलत करायला आणि आनंदाच्या क्षणी वाटणारे समाधान वाटून घ्यायला आवडते. असो.
22 Jan 2013 - 6:54 pm | शुचि
वा! मुक्तक आवडलं.
22 Jan 2013 - 6:57 pm | यशोधरा
सर्वांचे मनापासून आभार. :)
22 Jan 2013 - 7:41 pm | रेवती
तुमचं आमचं टोचणारं दु:खं, सलणारे अपमान, खुपणारे पराभव, झुळझुळणारी सुखं, ह्या सार्याचं गाठोडं तर बांधलेलं असतंच मनाने. ह्याची स्वीकृतीही शिकवतं मन.
अगदी. फार सुरेख लिहिलयस. आवडलं.
22 Jan 2013 - 7:43 pm | मुक्त विहारि
एकदम झक्कास..
22 Jan 2013 - 9:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेबरोबरचं मुक्तक आवडलं.........!!!
-दिलीप बिरुटे
22 Jan 2013 - 9:59 pm | प्रचेतस
अप्रतिम मुक्तक.
वाक्यरचना अतिशय सुंदर.
23 Jan 2013 - 12:36 am | इन्दुसुता
योगप्रभूंशी सहमत.
मुक्तक अतिशय आवडले.
23 Jan 2013 - 8:06 am | मनीषा
सुरेख !
हा लेख म्हणजे शब्दफुलांचा गजराच जणु.
23 Jan 2013 - 8:33 am | आनन्दिता
अतिशय तरल लिखाण... मस्त.. खुप खुप भावलं..
23 Jan 2013 - 11:29 am | श्रिया
लेखन भावविभोर करणारे आहे. जिवलगाची तुम्ही पुन्हा भेटच घडवून आणली, असे वाटले.
सहजच बहिणाबाईंच्या ओळी आठवल्या,
मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना
23 Jan 2013 - 1:24 pm | नंदन
'सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास' सारख्या निर्मितीच्या सहजखुणेचा असो किंवा 'घेरीत आल्या काळोखाच्या वत्सल छाया, दुःखाचीही अशी लागते अनवट माया' अशा अंताच्या स्वीकाराचा असो - शांताबाईंच्या कवितांतून एक संयत आणि प्रगल्भ सूर लागलेला सतत जाणवत राहतो. 'अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा' म्हणावं असा. त्याच्या निरनिराळ्या आविष्कारांची बोलकी उदाहरणं या लेखातून वाचायला मिळाली. फार सुरेख!
23 Jan 2013 - 4:47 pm | यशोधरा
खरं आहे नंदन. शांताबाई फार सहज आणि प्रगल्भ लिहित, आणि ओघवते. तशाच इंदिरा संतांच्या कविताही फार अलवार असतात. कुब्जा किंवा उभी तुळस वेल्हाळ अशा कविता वाचताना त्यांच्या शब्दांनाही आपल्याकडून धक्का लागू नये अशी काळजी घ्यावीशी वाटते. खूप सुरेख, हळुवार आणि आबदार कविता.
23 Jan 2013 - 6:19 pm | इनिगोय
आबदार.. अगदी जपणुकीतला घरंदाज शब्द!
23 Jan 2013 - 1:36 pm | सस्नेह
शांताबाईंच्या शब्दांचा रसास्वाद आवडला.
'मन' यावर जितकं लिहावं तितकं थोडंच आहे...
23 Jan 2013 - 5:01 pm | दत्ता काळे
छान लिहीलं आहे.
23 Jan 2013 - 5:14 pm | हासिनी
सुंदर लिहलं आहे! मस्त!!
:)
23 Jan 2013 - 6:31 pm | राघव
खूप छान वाटले वाचून.
राघव
27 Jan 2013 - 10:53 am | क्रान्ति
'मना तुझे मनोगत' आवडलं. शांताबाईंच्या अलवार काव्याला निरुपणाचा उत्कट सुगंध!
29 Jan 2013 - 2:35 pm | नाना चेंगट
लेखन आवडले.