धुंद आठवांची रात, जेव्हा डोळ्यात निजेल
खोल खोल मनामध्ये तूच तूच दाटशील
एक एक पान माझे, सुटे सुटे रे होईल
हर एक अक्षराला, गंध तुझाच असेल
चंद्र खिडकीशी पुन्हा, रेंगाळेल, खोळंबेल
गळालेले रितेपण मुठी भरून घेईल
तुझ्या सयी सार्या स्निग्ध, सभोताली फुलतील
तुझ्या गालातले हसू, माझ्या ओठी उमलेल
हूरहूर, रूखरूख, चित्त बेभान करेल
जरा शहाणे झालेले, मन पुन्हा वेडावेल
तेच रूप ह्या जगाचं, पण नवीन भासेल
तेच काजळ डोळ्याचं, पण नव्याने हसेल
खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल
तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील
कंच बहर फुलांचा, जरी उद्या ओसरेल
ताजा आठव तुझाच, माझ्या ओंजळी असेल
- बागेश्री
ब्लॉगवरही प्रकाशितः http://venusahitya.blogspot.in
प्रतिक्रिया
13 Jan 2013 - 1:40 pm | अत्रुप्त आत्मा
खुळ्या मनाच्या भ्रमांची, भूल मलाही पडेल
तुझ्या असण्याचे भास, नसण्याला असतील.>>> छा..............न !!! :-)
13 Jan 2013 - 3:12 pm | पैसा
छान आहे!
14 Jan 2013 - 12:07 am | अनन्न्या
सुंदर वर्णन!!
14 Jan 2013 - 2:01 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त झालीये. :)
14 Jan 2013 - 8:57 pm | समयांत
एक सुंदर कविता.
शब्द खूप आवडलेत.
15 Jan 2013 - 9:33 pm | शुचि
कंच शब्द आणि एकंदर या ओळींचा अर्थच फार शृंगारीक आणि मनोहर वाटला.
19 Jan 2013 - 8:22 am | वेणू
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार मानते..
आज मी निवांत डोकावले आहे मिपावर, भरपूर वाचणार आहे... अभिप्राय नोंदवणार आहे :)
21 Jan 2013 - 3:20 pm | अनिल तापकीर
सुंदर शब्दात बांधलेली
आवडली