॥
१
॥
जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्यलम्बितां भुजंगतुंगमालिकाम्
डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं
चकारचंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम्
जटांमधून धावत्या जलांनि धूत-कंठ जो
धरीत सर्पमालिका, गळ्यात हार शोभतो
डुम्मूडुम्मू करीत या, निनाद गाजवा शिवा
करीत तांडव प्रचंड, शंकरा शुभं करा
॥
२
॥
जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि
धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम
जटांतुनी गतीस्थ, गुंतल्या झर्यांपरी अहा
तरंग ज्याचिया शिरी विराजती, शिवा पहा
ललाट ज्योतदाह ज्या शिवाचिया शिरी वसे
किशोर चंद्रशेखरा-प्रती रुचीहि वाढु दे
॥
३
॥
धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधुवंधुर-
स्फुरद्दिगंत संतति प्रमोद मानमानसे
कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि
क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि
नगाधिराज-कन्यका-कटाक्ष मोदिता शिवे
दिगंत संतती स्फुरून, मोदतीहि भक्त हे
कृपाकटाक्ष टाकिता जया, विपत्ति मावळे
कधी दिगंबरामुळे कळे न रंजना मिळे
॥
४
॥
जटा भुजंगपिंगलस्फुरत्फणामणिप्रभा-
कदंबकुंकुम द्रवप्रलिप्त दिग्वधूमुखे
मदांध सिंधुरस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे
मनो विनोदद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि
जटाभुजंग तद्मणी-प्रदीप्त कांति ह्या दिशा
कदंब-पुष्प-पीत-दीप्त, शोभती झळाळत्या
दिशाधरांग-चीर ज्या विभूषवी दिगंबरा
प्रती जडो मती, घडो मनोविनोद, तारका
॥
५
॥
सहस्र लोचन प्रभृत्य शेषलेखशेखर-
प्रसून धूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः
भुजंगराज मालया निबद्धजाटजूटकः
श्रिये चिराय जायतां चकोरबंधुशेखरः
सहस्रलोचनादि देव, पादस्पर्शता सदा
तयांस भूषवित त्या, फुलांनि भूषती पदे
भुजंगराज हार हो, नि बांधतो जटाहि तो
प्रसन्न भालचंद्र तो, चिरायु संपदा करो
॥
६
॥
ललाटचत्वरज्वलद्धनंजयस्फुलिंगभा-
निपीतपंचसायकं नमन्निलिंपनायकम्
सुधामयुखलेखया विराजमानशेखरं
महा कपालि संपदे शिरोजटालमस्तु नः
कपाल-नेत्र-पावका क्षणात मोकलूनिया
वधी अनंग, हारवी सुरेंद्र आदि देवता
शिरास भूषवीतसे सुधांशुचंद्र ज्याचिया
कपालिना, जटाधरा, दिगंत संपदा करा
॥
७
॥
करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल-
द्धनंजयाहुतीकृत प्रचंडपंचसायके
धराधरेंद्र नंदिनी कुचाग्रचित्रपत्रक-
प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचनेरतिर्मम
अनंग ध्वंसिला जिने, त्रिनेत्रज्योत तीच ती
नगाधिराज-नंदिनी-स्तनाग्र भाग वेधती,
चित्र रेखते तिथे जयाचि दृष्टी योजुनी
त्रिलोचनाप्रती मना, जिवास वाढु दे रती
॥
८
॥
नवीन मेघ मंडली निरुद्धदुर्धरस्फुर-
त्कुहु निशीथिनीतमः प्रबंधबद्धकंधरः
निलिम्पनिर्झरि धरस्तनोतु कृत्ति सिंधुरः
कलानिधानबंधुरः श्रियं जगद्धुरंधरः
नव्या घनांनि दाटली, निशावसेपरी जशी
जटानिबद्धजान्हवीधरास कंठ भूषवी
गजेंद्र-चीर-शोभिता शशीकला विभूषवी
जगास धारका कृपा करून ’श्री’स वाढवी
॥
९
॥
प्रफुल्ल नील पंकज प्रपंचकालिमप्रभा-
वलंबि कंठकंधरारुचि प्रबंधकंधरम्
स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं
गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे
प्रफुल्ल नील पंकजापरी प्रदिप्त कंठ ज्या
जये त्रिपूर ध्वंसिला, तसाच कामदेव वा
भवास तारणार आणि याग ध्वंसत्या हरा
भजेन शंकरास मी, गजांतका यमांतका
॥
१०
॥
अखर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी-
रसप्रवाहमाधुरी विजृंभणा मधुव्रतम्
स्मरांतकं पुरातकं भवांतकं मखांतकं
गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे
कलाबहारमाधुरीस भृंग जो असे शिवा
अनंगहंत आणखी त्रिपूर, याग ध्वंसका
भवास तारका हरा, सदा शुभंकरी शिवा,
भजेन शंकरास मी, गजांतका यमांतका
॥
११
॥
जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुर-
द्धगद्धगद्वि निर्गमत्कराल भाल हव्यवाट्-
धिमिद्धिमिद्धिमिनन्मृदंगतुंगमंगल-
ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवः
गतीस्थ सर्पहार जे, विषाग्नि सोडती असे
फणा उभा करून ते, कपालि ओतती विषे
मृदंगनाद गाजतो, ध्वनी मनास मोहतो
पवित्र तांडवी शिवा, विराजतो नि शोभतो
॥
१२
॥
दृषद्विचित्रतल्पयोर्भुजंग मौक्तिकस्रजो-
र्गरिष्ठरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः
तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः
समप्रवृत्तीकः कदा सदाशिवं भजाम्यम्
शिळा नि शेज, मोतियांचि माळ, सर्प वा असो
जवाहिरे नि मृत्तिका, तृणे नि कोमलाक्षि वा
असोत दोस्त वा न वा, करून भेद नाहिसे
कधी भजेन मी मना, सदाशिवा सदा सुखे
॥
१३
॥
कदा निलिंपनिर्झरी निकुंजकोटरे वसन्
विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्
विलोललोललोचनो ललामभाललग्नकः
शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्
कधी शिरी धरून हात, शंकरा स्तवेन मी
वसेन जान्हवीतिरी विमुक्त होउनी गती
सुनेत्रचंचलेचिया कपालिचा ’शिवाय’ तो
कधी चिरायु सौख्य पावण्या सदा स्मरेन मी
॥
१४
॥
निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-
निगुम्फनिर्भक्षरन्मधूष्णिकामनोहरः
तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं
परिश्रय परं पदं तदंगजत्विषांचयः
पदांस देवता जशा विनम्र होत त्यामुळे
विभूषित्या, तयांशिरी समर्पिता फुलांमुळे
मनोज्ञ भासती पदे, मनोहराकृतींमुळे
प्रसन्न ती करो अम्हा, सदाच सौरभामुळे
॥
१५
॥
प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी
महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना
विमुक्त वामलोचनो विवाहकालिकध्वनिः
शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम्
विशाल सागरातल्या शुभेच्छु पावकापरी
महाष्टसिद्धिकामना करीत सर्व सुंदरी
विवाहकालि शंकरा व पार्वतीस चिंतिती
जगास जिंकता ठरो, ’शिवाय’ मंत्र संगरी
॥
१६
॥
इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं
पठन्स्मरन्ब्रुवन्नरो विशुद्धिमेति संततम्
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं
विमोहनं हि देहिना तु शंकरस्य चिंतनम्
सदा करून मोकळ्या स्वरात श्लोक पाठ हे
म्हणून वा श्रवून हे, विशुद्धता सदा मिळे
हरीप्रती, गुरूप्रती, रती, न वेगळी गती
अशा जिवास मोहत्या, शिवाप्रती सदा रुची
॥
१७
॥
पूजाऽवसानसमये दशवक्त्रगीतं
यः शम्भुपूजनपरं पठति प्रदोषे
तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां
लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः
पूजासमाप्तीस संध्येस जो हे
म्हणेल लंकेश-रचित स्तोत्र
तयास रथ-हत्ती-अश्वासहित
शंभू प्रसन्नलक्ष्मी देई खचित
॥ इति श्री. रावणकृतं शिव-तांडव स्तोत्रं संपूर्णम् ॥
अशाप्रकारे, श्री. रावण विरचित शिव-तांडव स्तोत्र संपूर्ण होत आहे.
संदर्भः
१. शिवतांडवस्तोत्राचा हिंदीत अर्थ http://hindi.webdunia.com/religion/occasion/vijayadashami/0710/19/107101...
२. पंडित जसराज यांनी गायलेले
http://mp3ruler.com/mp3/shiv_tandav_stotram_pandit_jasraj.html
३. रामदास कामत यांनी गायलेले
http://music.cooltoad.com/music/song.php?id=456184&PHPSESSID=1eb37958618...
http://anuvad-ranjan.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
प्रतिक्रिया
6 Dec 2012 - 10:17 pm | प्रचेतस
अतिशय सुंदर अनुवाद.
संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर विशेष आवडला.
7 Dec 2012 - 4:20 pm | मूकवाचक
+१
7 Dec 2012 - 11:35 am | महेशकुळकर्णी
अगदी यथार्थ अनुवाद ! खूपच छान!
7 Dec 2012 - 4:01 pm | विटेकर
सुंदर
7 Dec 2012 - 4:07 pm | सुखी
हे स्तोत्रा पंडित भवानी शंकर यांनी पखवाज या वाद्यावर वाजवला ते ऐकायचा भाग्य मला मिळाल होत... तेव्हा पासून या स्तोत्राच भावार्थ शोधायचा डोक्यात होता.... तुमची फार छान अनुवाद केला आहे. वाचन खूण साठवली आहे :)
7 Dec 2012 - 4:31 pm | राजघराणं
आव्डेश
7 Dec 2012 - 4:47 pm | हारुन शेख
हे स्तोत्र कर्पुरादी स्तोत्रानंतर तंत्रात सर्वात महत्वाचे मानले जाते. एकूण सगळी रचनाच वेगळ्या भावावस्थेत तुम्हाला नेऊन पोहोचवते. संस्कारवर्गात लहान मुलांना हे स्तोत्र शिकवले आहे. मुले खूप जल्लोषात म्हणायची. एकमेकांत अत्यंत कलात्मकतेने गुंफलेले यमकयुक्त शब्द आणि लय. म्हणतांना वाणी पण शुद्ध होते. एकाग्रता पण वाढते. तसेच अजून एक स्तोत्र म्हणजे 'महिषासूरमर्दिनीस्तोत्र '. तुम्ही अनुवाद सुरेख केलाय.
7 Dec 2012 - 6:06 pm | बॅटमॅन
मूळ स्तोत्र आणि तुमचा अनुवाद म्हणजे मणिकाञ्चन योग म्हणावा लागेल. समवृत्त अनुवाद, तोही यथार्थ आशयगर्भ करणे हे येरागबाळ्याचे काम आजिबात नोहे. भर्तृहरीच्या शतकत्रयीच्या भाषांतरात ते अनुभवाला येतं, प्रत्यक्ष वामनपंडित देखील काही ठिकाणी चकलेत वृत्त आणि आशयाची बंधने पाळताना. सी डी देशमुखांचा मेघदूताचा समश्लोकी अनुवाद मात्र तुलनेने खूप सरस उतरला आहे.मराठीत यमकाचे अॅडेड बंधन येते ते तर आहेच. पण हे सगळे असून तुम्ही समवृत्त अनुवादाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेललेत, त्याबद्दल कौतुक करावे तितके थोडेच आहे.
आता लहान तोंडी एक मोठा घास घेतो. फक्त शेवटच्या श्लोकात समवृत्त जमलेले नाहीये, त्यामुळे बाकीच्या अनुवादाची शोभा किञ्चित उणी पडतेय. त्याला माझ्यापरीने ठिगळ लावू पाहातोय, आगाऊपणाबद्दल माफ करा.
मूळ श्लोक: वृत्त वसंततिलका.
पूजाऽवसानसमये दशवक्त्रगीतं
यः शम्भुपूजनपरं पठति प्रदोषे
तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां
लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः
तुमचा अनुवादः इंदवज्रासदृश रचना.
पूजासमाप्तीस संध्येस जो हे
म्हणेल लंकेश-रचित स्तोत्र
तयास रथ-हत्ती-अश्वासहित
शंभू प्रसन्नलक्ष्मी देई खचित
एक सजेशनः वृत्तः वसंततिलका.
पूजासमाप्तिस प्रदोषिं जपे मनी जो |
पौलस्त्यनिर्मित शिवस्तव हा कुणी जो |
त्याते मिळे रथगजेंद्रतुरंगयुक्ता |
लक्ष्मी प्रसन्नवदना प्रिय शंभुभक्ता ||
7 Dec 2012 - 6:21 pm | हारुन शेख
सी. डी देशमुखांचा समश्लोकी अनुवाद कुठे वाचायला मिळेल बरे ? मी कुसुमाग्रजांचा वाचला आहे. केवळ अप्रतिम. 'ज्ञातस्वादो विवृतजघना को विहातुं समर्थ:' चा अनुवाद कुसुमाग्रज 'अंक अनावृत सोडून जाईल रसिक कोणता बरे' असा करतात . मुळातला उन्मादक भाव थोडा सोज्वळ करूनही अनुवाद किती मस्त उतरवलाय. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेस सलाम.
7 Dec 2012 - 8:21 pm | बॅटमॅन
इंट्रेस्टिंग! कुसुमाग्रजांनी समश्लोकी अनुवाद केलाय हेच मला माहिती नव्हते आत्ता तुम्ही सांगेपर्यंत :) पूर्वमेघातले काही श्लोक वगळले तर मेघदूत पूर्ण नाही वाचलेले. बाकी सी डींचा अनुवाद आता कुठे मिळेल सांगणे अवघड आहे, घरी आहे म्हणून मला वाचता आला इतकेच.
7 Dec 2012 - 8:57 pm | नरेंद्र गोळे
वल्ली, मूकवाचक, महेश कुलकर्णी, विटेकर, सुखी, राजघराणं, हारून शेख आणि बॅटमन आपणा सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद.
बॅटमन,
आपली सूचना रास्तच आहे.
मात्र आपण सुचवलेल्या ओळींत किंचित बदल करून खालीलप्रमाणे केल्यास अधिक समर्पक ठरतील असे वाटते. तुम्हाला काय वाटते?
पूजासमाप्तिस संध्येस जपेल जो हे
लंकेशगीत शिवस्तोत्र अनन्य-भावे
शंभू तया, रथ-गजेंद्र-तुरंग स्थायी
लक्ष्मी प्रसन्न-वदना, वर-दान देई
कुसुमाग्रजांनी मराठीत केलेला अनुवाद समवृत्त नसून भिन्नवृत्त आहे. देशमुखांचा समश्लोकी, समवृत्त अनुवाद मला काहीसा संस्कृतप्रचूर असूनही, त्यापेक्षा सरस वाटतो. त्यांना मात्र स्वत:ला मराठी अनुवादापेक्षा त्यांचा इंग्रजी अनुवादच जास्त रुचलेला आहे. वस्तुत: त्यांचा इंग्रजी अनुवाद समश्लोकी मात्र नाही. मुळातील चार ओळींकरता त्यात पाच ओळी खर्चाव्या लागलेल्या आहेत.
7 Dec 2012 - 9:02 pm | बॅटमॅन
हो तर! या ओळी नक्कीच मस्त समर्पक आहेत, धन्यवाद :)
7 Dec 2012 - 9:13 pm | हारुन शेख
बरोबर कुसुमाग्रजांचा अनुवाद समश्लोकी आहे पण भिन्नवृत्त.त्यांनी 'मंदाक्रांता' ऐवजी 'शार्दुलविक्रिडीत' वापरलय. भाषा संस्कृतप्रचुर नाही पण खास कुसुमाग्रजांची छाप घेऊन उमटलेली. मला कुसुमाग्रजांचा अनुवाद खूप भावला. सी. डी. देशमुखांचा वाचला नसल्यामुळे तुलनात्मक मत मांडता येत नाही.
7 Dec 2012 - 9:29 pm | नरेंद्र गोळे
ते शार्दुलविक्रिडीतही नाही. कुठलेसे मात्रावृत्त असावे असे वाटते आहे.
8 Dec 2012 - 12:27 am | पैसा
अत्यंत सरस भावानुवाद! प्रतिक्रिया वाचून वाल्गुदेयाबद्दल पुन्हा एकदा कौतुक वाटलं.
8 Dec 2012 - 8:43 am | कवितानागेश
आवडले. :)
8 Dec 2012 - 10:53 am | रमेश आठवले
रावणाने रचलेले हे स्तोत्र मुळातच अवघड आहे. त्याचे समश्लोकी मराठी भाषांतर त्याहूनही अवघड. हे शिवधनुष्य समर्थपणे पेलल्या बद्दल नरेंद्र गोळे यांचे हार्दिक अभिनंदन.
विनोबा भावे यांनी गीतेचे मराठी समश्लोकी भाषांतर गीताई हे शीर्षक देऊन लिहिले आहे. छोटयाश्या प्रस्तावनेत विनोबा म्हणतात -गीताई ही ईश्वराने माझ्या हातून घडवलेली सर्वोत्तम सेवा मी समजतो आहे.
8 Dec 2012 - 11:12 am | ज्ञानोबाचे पैजार
सुंदर भाषांतर, शिवतांडव स्त्रोत्र अनेक वेळा ऐकले होते. ते आवडतेही. बरेचसे पाठही झाले होते. पण त्याचा अर्थ आज कळतोय.
मनःपुर्वक धन्यवाद.
पैजारबुवा,
8 Dec 2012 - 11:47 am | सुबक ठेंगणी
ह्या स्तोत्राच्या लयीतच तांडवाचा भास आहे...मराठीतही जसाच्या तसा उतरला आहे. वाचनखूण तर साठवली आहेच पण हा दुवाही अनेकांना देणार आहे :)
9 Dec 2012 - 12:25 pm | नरेंद्र गोळे
पैसा, लीमाऊजेए, रमेश आठवले, ज्ञानोबांचे पैजार आणि सुबक ठेंगणी सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद.
निरंतर सूचनांचा रोख लक्षात घेऊन बरेच सुधार केलेले आहेत. सर्वात नवी आवृत्ती खालील दुव्यावर पाहता येईल.
http://anuvad-ranjan.blogspot.in/2012/11/blog-post.html#links
9 Dec 2012 - 1:51 pm | नूतन
आवडलं. शाळेचे दिवस आठवले . मुबंई ब वरुन प्रभाते मनी मध्ये प्रसारीत होत असे. त्यावेळी चाल व ठेक्यामुळे आवडे.पण आज त्याच तालतील मराठी अनुवाद वाचुन अर्थही समजला त्यमुले अधिकच सुन्दर वाटले.
14 Dec 2012 - 10:12 pm | अनिल तापकीर
सुंदर अनुवाद
15 Dec 2012 - 5:38 pm | नरेंद्र गोळे
धन्यवाद नूतन आणि अनिल.
लीमाउजेट,
आपले नाव लिहिण्यात झालेली चूक माझ्या लक्षात आली.
मात्र ती दुरूस्त करण्याचा उपाय हल्ली उपलब्ध नाही असे दिसते. क्षमस्व!
16 Dec 2012 - 6:35 pm | jaypal
आहे ,आवडला.
6 Jan 2013 - 12:56 am | इन्दुसुता
काय प्रतिभा असते बुवा एकेकाची, आणि वाचन सुद्धा..
दंडवत हो तुमच्या ( आणि समस्त सूचना देणार्यांच्या ) प्रतिभेला.
8 Jan 2013 - 8:11 pm | नरेंद्र गोळे
जयपाल आणि इंद्रसुता प्रतिसादांखातर धन्यवाद!
४. मूळ पंचचामर छंदातील, स्व. बजरंग लाल जोशी द्वारा रचित हिंदी अनुवाद
http://joshikavi.blogspot.in/2011/03/blog-post_1945.html
हा एक नवाच दुवा आज मिळाला आहे. तुम्हालाही सुरस वाटेल.
28 Feb 2013 - 5:32 pm | नरेंद्र गोळे
http://www.maayboli.com/node/41491
ह्या दुव्यावर, श्री.योगेश जोशी, दुबई, ह्यांनी संगीतबद्ध केलेला
रावणविरचित शिवतांडवस्तोत्राचा मराठी अनुवाद मिळू शकेल!
2 Mar 2013 - 7:41 pm | हुप्प्या
http://www.dhingana.com/maula-maula-song-the-attacks-of-26/11-hindi-late...
अॅटॅक्स ऑफ २६/११ ह्या नव्या चित्रपटात हे गाणे आहे.
6 Mar 2013 - 10:45 pm | मदनबाण
हुप्प्या ने सांगितले तेच टंकणार होतो.
आपला अनुवाद आवडला,नाहीतर डमक डमक आणि टमक टमक याच्या पलिकडे मला काय घंटा समजले नव्हते !
2 Mar 2013 - 8:23 pm | आनंद घारे
रावणविरचित असे हे स्तोत्र आहे हे ऐकून त्याबद्दल कुतूहल वाटत होते. पण त्यामधली जोडाक्षरे पाहून ते वाचायचा धीर झाला नव्हता. तुमचा अनुवाद वाचून ते किती अप्रतिम आहे हे समजले, याचे श्रेय तुम्हालाही जातेच.
5 Mar 2013 - 11:06 am | नरेंद्र गोळे
हुप्प्या दुव्याबद्दल धन्यवाद!
घारे साहेब प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.
अनुवादामुळे का होईना तुम्हाला ह्या नादमय स्तोत्रात रुची निर्माण झाली हे काही कमी नाही.
9 Mar 2013 - 4:41 pm | आतिवास
शब्दांच्या,लयीला, प्रवाहाला आणि अर्थाला अजिबात धक्का न पोचवता केलेला हा अनुवाद अतिशय आवडला.
9 Mar 2013 - 5:06 pm | धन्या
काका, या अनुवादाची ध्वनीफीत ऐकली.
निशब्द !
8 Jun 2017 - 3:21 pm | मितान
या अनुवादासाठी साष्टांग नमस्कार काका __/\__
8 Jun 2017 - 7:44 pm | कपिलमुनी
अनुवादाची ध्वनीफीतीचा दुवा मिळेल का?
8 Jun 2017 - 10:21 pm | एस
काय छान आहे अनुवाद!
8 Jun 2017 - 10:50 pm | बोलघेवडा
बाहुबली-१ मध्ये शिवताण्डवस्तोत्राचा काही भाग अतिशय सुंदर चाल लावून वापरला आहे.
https://www.youtube.com/watch?v=6foqGD24WqU
https://www.youtube.com/watch?v=-YvzpqRrnDo
12 Jun 2017 - 6:38 pm | धर्मराजमुटके
ध्वनीफीतीचा दुवा द्यावा ही विनंती !