जो आवडे सर्वांना तोचि,

अनिल तापकीर's picture
अनिल तापकीर in जनातलं, मनातलं
27 Nov 2012 - 8:32 pm

देव बोलतो बाल मुखातून' कोणा एका गीतकाराच्या गीतातील वाक्य, याची प्रचीती मला आली ती आमची 'ननु' म्हणजे चुलत भावाची मुलगी बोलायला लागल्यानंतर. तिचे बोबडे बोल, खुदकन गालावर खळी पडून हसणे. तिचे चिमुकले हात ती गळ्यात टाकून मान डोलवत बोलणे सगळेच लाजवाब होते. दिवसभर कितीही काम केले कितीही थकलो तरी ननुच्या नुसत्या जवळ येण्यानेच सारा थकवा दूर व्हायचा. वाड्यातील सर्वच जणांना तिने जणू भुरळ घातली होती. तिच्याबरोबर बोलताना बहुतेक जन आपापली बोबडे बोलण्याची हौस भागवून घ्यायचा. बाकीचे इतर सख्खे , सख्खे चुलत भाऊ देखील स्वताच्या मुलांना कपडे आणताना ननुला देखील कपडे घ्यायचे . कुठे जवळच्या गावाला जायचे असेल तर स्वताच्या मुलानपेक्षा गाडीवर पुढे बसण्याचा मान मात्र ननुलाच मिळायचा.
अशी सर्वांना हवीहवीशी वाटणारी ननु एकदा आजारी पडली .
.तिचे आईवडील दवाखान्यात घेऊन गेले. सर्वांना वाटले असेल किरकोळ लहानमुलाचे दुखणे म्हणून कोणी काही विशेष लक्ष दिले नाही. तिची आई म्हणजे आमची वाहिनी तिला घेऊन माहेरीच राहिली. दुसर्या दिवशी भाऊ आला त्याने सर्वांना सांगितले कि, ननुला श्वास घ्यायला त्रास होतोय. तेव्हा मी म्हणालो कि -भाऊ अरे सर्दीमुळे तिची छाती भरलीय त्यामुळे त्रास होत असेल. तर भाऊ म्हणाला. डॉक्टरला छातीबाबत वेगळा संशय येतोय त्यांनी तपासण्या करायला सांगितल्यात म्हणून सुमित्राला तिकडेच माहेरी ठेवलीय तेथून तपासणीला जायला जवळ आहेना.
आ.... मी तर हडबडलोच,लगेच म्हणालो आरे एवढी ठणठ्नीत आहे ननु तिला छातीचा काही प्रॉब्लेम वाटत नाही. एवढी दंगा करते आपण थकतो पण ती थकत नाही. डॉक्टरांचेच काही तरी चुकले असेल.
डॉक्टरांचे चुकले तर बरं होईल, पण त्यांचा अंदाज खरा निघाला तर? भाऊ काळजीच्या स्वरात म्हणाला.
काही होत नाही तुम्ही कुणीच काळजी करू नका आणि उगाच मनात काही आणू नका. आमचा मोठा चुलत भाऊ म्हणाला.
मनाला नुसतीच रुखरुख लागून राहिली होती. झोपताना सुद्धा ननुचेच विचार येत होते. नको नको ते मन चिंतीत होते. झोप येत नसून सुद्धा डोळे मिटून देवाची प्रार्थना करीत होतो. कि देवा डॉक्टरांचा अंदाज चुकू दे.
दुसऱ्या दिवशी भाऊ परत दवाखान्यात गेला. आला तो थेट तिसऱ्या दिवशी, चेहरा कमालीचा काळवंडलेला. त्यावर खूप सारी चिंता दिसत होती. त्याच्याकडे पाहूनच काळजात लख्खन झालं जवळ गेलो तर एवढा मोठा गड्यासारखा गडी पण मी जवळ जाताच माझ्या गळ्यात पडून रडू लागला. मी काय ते ओळखले होते त्याचा रडण्याचा बहर ओसरून दिला. जरावेळाने तो शांत झाल्यावर सांगू लागला- सगळ्या तपासण्या झाल्या काही डबल केल्या. त्यात आपल्या ननुच्या छातीला कुठेतरी छिद्र आहे त्यामुळे अशुद्ध रक्त शुद्ध रक्तात मिसळते. त्यामुळे तिला धाप लागते.
आरे पण होईल गोळ्या औषधाने बरे काळजी करू नको, मी धीर देण्याच्या उद्देशाने म्हटले.

नाही रे डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करायला पाहिजे नाहीतर पुढे खूप त्रास होईल.

इतक्या लहानपणी हृदयाचे ऑपरेशन बापरे,.....तीच वय तरी आहे का?

ते म्हणतात, आताच ऑपरेशन केले तर व्यवस्थित होईल वाढते वय आहे लवकर चांगली होईल, ऑपरेशन नाही केले तर ती वीस वर्षे सुद्धा जगेल कि नाही याची शाश्वती नाही.

हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी येऊ लागले. मग मी विषय थांबविण्यासाठी त्याला म्हणलो -भाऊ आरे काही काळजी करू नको होईल सर्व ठीक. आजकाल डॉक्टर लोक मेल्याला माणसाला मरणाच्या दारातून परत आणतात. आणि लहान मुलांच्या बाबतीत विशेष लक्ष देतात. त्याची कशीबशी समजूत काढली.

हा हा म्हणता सगळ्या नातेवाईकांना बातमी समजली. जो तो हळहळू लागला. भेटायला येऊ लागला.

एकदा आम्ही म्हणजे भाऊ मी व मोठे दाजी असे तिघे चौघे डॉक्टरांकडे भेटायला गेलो. ऑपरेशन केलेच पाहिजे का? म्हणून विचारले तेव्हा त्यांनी आम्हाला सविस्तर सांगितले ते म्हणाले -बाळाच्या हृदयात छोटे छिद्र आहे त्यामुळे अशुद्ध रक्त शुद्ध रक्तात मिसळते. त्यामुळे तिला धाप लागते. आता ती लहान आहे म्हणून तिला एवढा त्रास होत नाही परंतु ती जशी जशी मोठी होत जाईल तेव्हा तो त्रास तिला खूप होईल. हृदयाला रक्ताचा पुरवठा म्हणावे तितका होणार नाही. आठ दहा वर्षानंतर तिच्या जगण्याच्या आशा खूप कमी आहे.

साहेब ऑपरेशन करून तरी ती नीट होईल का? मी विचारले.

ऑपरेशन जर व्यवस्थित झाले तर ती बरेच वर्षे चांगली जगेल. ऑपरेशन मधेही धोका आहेच. कारण ती खूप लहान आहे. शिवाय हृदयाचे ऑपरेशन म्हणाल्यावर धोका हा असणारच परंतु मी त्यासाठी निष्णांत सर्जन बोलविणार आहे. तरीही नक्की काहीच सांगता येत नाही.

एवढा धोका आहे तर मग ऑपरेशन न करता जगेल तितक्या दिवस जगू दिली तर -दाजी म्हणाले.

हे पहा आता ती लहान आहे म्हणून चांगली दिसते ती जशी मोठी होत जाईल तसा त्रास वाढत राहील शेवटी शेवटी तर तिचे हाल तुमच्याने पहावणार नाही. आता तरी ऑपरेशन सक्सेस होण्याचे काही चान्सेस आहेत नंतर तेही कमी होतील.

बरं ठीक आहे करू आपण ऑपरेशन पण खर्च किती येईल. दाजी म्हणाले.

साधारण दोन ते अडीच लाख रुपये खर्च येईल.

आकडा ऐकूनच आम्ही हबकलो. कारण एवढे पैसे जमा करणे खूप अवघड गोष्ट होती. तरीही आम्ही म्हणालो डॉक्टर तुम्ही तयारी करा.

ठीक आहे मी त्यानुसार सगळा कार्यक्रम आखतो. ऑपरेशन ससून मधेच होईल. तिला तिथे दाखल करून घ्या मी तशी चिठ्ठी देतो. एक महिनाभर तिला कोर्स करावा लागेल कारण तिचे वजन जरा कमी आहे. वजन वाढल्यानंतर ऑपरेशन होईल.

आम्ही हो म्हणून माना हलविल्या व उठू लागलो तेवढ्यात डॉक्टर म्हणाले - तुमची पैश्याची अडचण असेल तर एक करू शकता.

काय?

तुम्ही सकाळ मध्ये मदत हवी म्हणून जाहिरात देऊ शकता पत्ता ससूनचा द्या चांगली मदत होते. तेवढाच तुमचा थोडा बोजा कमी होईल.

धन्यवाद डॉक्टर तसेच करतो म्हणून आम्ही बाहेर पडलो.

ऑपरेशन करायचे ठरले घरातल्या बायकांना अजून कल्पना दिली नव्हती. त्यांना हे समजताच घरात वाईट परस्थिती निर्माण होणार होती. कारण ननुवर सगळ्यांचा खूप जीव होता. त्यांना लगेच सांगायचे नाही असे ठरले परंतु पेपर मध्ये पाहिल्यानंतर समजणारच होते तेव्हा समजून धक्का बसण्यापेक्षा आताच शांतपणे सांगणे गरजेचे होते. म्हणून ते काम आम्ही दाजींवर सोपविले.

एक महिनाभर आमच्या वाड्यावर जणू सुतकी कळा होती. गावातले लोक देखील हळ हळ करत होते कारण एवढ्या लहान हसत्या खेळत्या मुलीवर हा प्रसंग यावा खरोखर वाईट घटना होती.आमची पैश्यासाठी धावपळ चालू होती ससून मध्ये थोडीफार मदत यायला चालू झाली होती.

मी दोन तीन दिवसाआड ससूनला चक्कर टाकत होतो. तिथे गेलो कि ननु लगेच माझ्याकडे यायची मग मी तिला बाहेर घेऊन जायचो बाहेर आल्या नंतर तिला गाड्या दाखवायचो गाड्या पाहून ती हरकून जायची एखाद्या गाडीच्या होर्नाची मी नक्कल केली कि ती देखील तशी नक्कल करायची बराच वेळ मी तिला बाहेर घेऊन थांबत असे. मग दवाखान्यात येऊन तिच्या आईच्या ताब्यात देत असे. त्यावेळी मात्र ती आईकडे जात नसायची माझ्याच मागे लागायची. खूप रडायची तसेच मन घट्ट करून मी बाहेर पडायचो. बाहेर आलो कि तिच्या मामाबरोबर थोडे बोलायचो बिचारा मामा रात्रंदिवस दवाखान्यातच थांबायचा त्याचाही भाचीवर खूप जीव होता.

बघता बघता ऑपरेशन चा दिवस आला. पैश्याची कशी बशी सोय झाली होती. दवाखान्यात आमच्या नातेवाईकांची तुडूंब गर्दी झाली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती. तिला ऑपरेशनला नेण्याअगोदर सगळे तिला भेटत होते सगळे तिच्याशी बोलत होते ती देखील सगळ्यांशी बोलली शेवटी मी जवळ जाताच तिने माझ्याकडे झेप घेतली. माझ्याकडे आल्या आल्या मी तिचे पटापट मुके घेतले मुके घेतानाच माझ्या डोळ्यातून अश्रुंचे दोन थेंब खाली पडले. तरीपण आलेला कड आवरून मी तिला गुदगुल्या करून हसविले. तेवढ्यात नर्स आली आणि तिने ननुला द्या म्हणून सांगितले मी तिला नर्स जवळ दिली नर्स तिच्या ओळखीची झाली होती. म्हणून ती लगेच तिच्याकडे गेली आत जाताना अक्ष:रश ती हसत होती. ती हसत आत गेली नि आम्ही बाहेर तोंड लपवून रडत होतो.

मनातल्या मनात देवाचा धावा करत आम्ही बाहेर बसून राहिलो. चार तासानंतर डॉक्टर बाहेर आले ऑपरेशन चांगले झाले म्हणून सांगितले नि आम्हाला हायसे वाटले. मनावरील ताण जरा कमी झाला. ऑपरेशन चांगले झाले म्हणून बरेचसे नातेवाईक निघून गेले. ननुच्या आईवडिलांना व मामला बळेबळे चार घास खायला लावले इतरांनीही खाऊन घेतले. तेवढ्यात डॉक्टर धावत आले मला , दाजींना व भाऊला बाजूला घेतले व सांगितले कि, आपण तिच्या हृदयात जी कृत्रिम नळी बसविली होती ती काम करत नाही परस्थिती क्रिटीकल आहे. पुन्हा ऑपरेशन करावे लागेल. तेव्हा पेपर्सवर सह्या करा.

ऑपरेशन चांगले झाले ऐकून मनात ज्या आश्या निर्माण झाल्या होत्या त्यांना तडा गेला होता. इतक्या लहान मुलीचे तासाच्या अंतराने लगेच दुसरे ऑपरेशन म्हणजे अवघडच होते.

पुन्हा तीन तास आम्ही प्रचंड दडपणाखाली घालविले. डॉक्टर बाहेर आले ऑपरेशन झाले आहे पण तिची स्थिती नाजूक आहे लगेच काहीच सांगता येणार नाही असे म्हणून ते निघून गेले . बाहेर एका झाडाखाली आमच्या घरातल्या बाया ननुच्या आईला घेऊन बसल्या होत्या. रडून रडून सगळ्यांचेच डोळे सुजले होते. मी बाहेर आल्या वर त्यांना काही काळजी करू नका दुसरे ऑपरेशन देखील चांगले झाले आहे. सांगून त्यांना धीर दिला.

संध्याकाळी दाजी म्हणाले बाकीच्यांनी घरी जा इथे फक्त तिघे चौघे थांबा, मी थांबू लागलो तर ते म्हणाले तू घरी जा कारण घरच्या माणसांना तूच व्यवस्थित सांगशील सगळे वाट पाहत असतील नि काळजी पण करत असतील.....नाईलाजाने मी घरी आलो सगळ्यांची समजूत काढली जेवण करून आडवा झालो. झोप येत नव्हती. ननु सारखी डोळ्यांसमोर येत होती.

साडे बारा वाजता दार वाजविले म्हणून हळूच उठून बघितले तर माझे दोन मित्र सुधीर नि विशाल होते मला म्हणाले चल आपल्याला ससूनला जायचे आहे. माझ्या काळजात धस्स झाले. घाबऱ्या घाबऱ्या मि विचारले काय झाले.त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला व मला बाजूला घेऊन म्हणाले. मोठ्याने बोलू नको लोकं जागी होतील. सव्वा बारा वाजता ननु गेली. त्याने असे म्हणताच मी मटकन खालीच बसलो. व रडू लागलो. ते म्हणाले -अरे रडू नको सगळी जागी झाली तर गोंधळ उडेल. स्वताला सावर नि निघ. मी आत जाऊन कपडे घातले.

व निघालो तेवढ्यात बायको बाहेर आली तिने काय झाले असेल ते ओळखले त्यामुळे सुधीर तिला म्हणाला वाहिनी आम्ही ससूनला चाललो आहोत. बातमी वाईट आहे. पण लगेच कोणाला बोलू नका. तिने फक्त मान डोलावली व अश्रू पुसत आत गेली.

सकाळी सात वाजता ननुचे प्रेत घेऊन आम्ही गावात आलो. आणि रडण्याचा जणू महासागराच उसळला आमची सर्वांची लाडकी ननु आम्हाला सोडून गेली होती. कोणाला आवरावे नि कोणाची समजूत घालावी हे गावातल्या लोकांना समजत नव्हते कारण सर्वांचा शोक इतका होता कि वर्णन देखील करता येणार नाही. आमच्या बरोबर सगळा गाव देखील शोकात बुडाला होता.

अंत्ययात्रेच्या वेळी चार वर्षाच्या ननुचे प्रेत मी हातात घेऊन निघालो सर्व माणसे माझ्या मागून येत होती. मंदिरा समोर आलो नि डोक्यात एक विचार आला. आमच्या घराण्याच्या वेलीवर आलेले एक सुंदर फुल परमेश्वराने अलगत खुडले होते. ते त्याला खूप आवडले होते.

म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला.

साहित्यिक

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

27 Nov 2012 - 8:53 pm | दादा कोंडके

देव बोलतो बाल मुखातून' कोणा एका गीतकाराच्या गीतातील वाक्य, याची प्रचीती मला आली

कथेच्या सुरवातीलाच देव आहे.

नंतर,

झोप येत नसून सुद्धा डोळे मिटून देवाची प्रार्थना करीत होतो. कि देवा डॉक्टरांचा अंदाज चुकू दे

मनातल्या मनात देवाचा धावा करत आम्ही बाहेर बसून राहिलो.

एव्हढा देवाचा धावा करून देखील बिचारी ननु गेलीच.

याउप्पर तुम्ही म्हणताय,

म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला.

आग लागो तुमच्या या असल्या देवाला. :(

पैसा's picture

27 Nov 2012 - 10:33 pm | पैसा

लेख वाचून वाईट वाटले. अकृत्रिम लिहिले आहे. :(

स्पंदना's picture

29 Nov 2012 - 5:13 am | स्पंदना

नाही अकृत्रीम नाही.
मनाचा आवेग इतका आहे त्याला आवर घालत जमतील तसे साधे सुधे शब्द वापरत लिहिल आहे.
बरच वर्णन एकत्र कुटुंबाच, एका वाड्यात रहाणार्‍यांच आहे.
मन हलल, तापकिर.

दादा कोंडके's picture

29 Nov 2012 - 1:30 pm | दादा कोंडके

ओ तै, मला पण हा लेख अकृत्रीमच वाटला. तुम्हाला या लेखात कृत्रीम काय वाटलं ते स्पष्ट कराल काय?

स्पंदना's picture

29 Nov 2012 - 6:47 pm | स्पंदना

पकड्या दादा तुम्ही. लेख कृत्रीम नाही, अकृत्रीम आहे. म्हणजे मनापासुन लिहिलेला.

अनिल तापकीर's picture

28 Nov 2012 - 1:08 pm | अनिल तापकीर

दादा कोंडकेजि तुमचे बरोबर आहे पण देवाचा राग करुनहि परिस्थीति बदलेली नसती.
ज्योति़जी हि कथा पुर्ण सत्य आहे

ज्ञानराम's picture

28 Nov 2012 - 2:18 pm | ज्ञानराम

:(

अनिल तापकीर's picture

28 Nov 2012 - 2:22 pm | अनिल तापकीर

धन्यवाद्,ज्ञानरामजी

क्लिंटन's picture

28 Nov 2012 - 2:33 pm | क्लिंटन

वाईट वाटले :(

अनिल तापकीर's picture

28 Nov 2012 - 2:35 pm | अनिल तापकीर

धन्यवाद क्लिटंनजी

पियुशा's picture

28 Nov 2012 - 2:37 pm | पियुशा

:)
काही सुचत नाही लिहायला

पियुशा's picture

28 Nov 2012 - 2:38 pm | पियुशा

:(

अनिल तापकीर's picture

28 Nov 2012 - 2:40 pm | अनिल तापकीर

पियुश्या धन्यवाद

टुकुल's picture

28 Nov 2012 - 2:49 pm | टुकुल

अतिशय दु:खद :-(

--टुकुल

अनिल तापकीर's picture

28 Nov 2012 - 3:01 pm | अनिल तापकीर

टुकुलजि धन्यवाद

पण तरिहि शेवट वेगळा असावा असे वाटत होते. वाईट झाले.

मदनबाण's picture

28 Nov 2012 - 4:15 pm | मदनबाण

वाचुन फार वाईट वाटले. :(

अनिल तापकीर's picture

28 Nov 2012 - 4:22 pm | अनिल तापकीर

गोमट्या नि मदनबाण धन्यवाद

अमित's picture

28 Nov 2012 - 4:26 pm | अमित

वाचून वाईट वाटले

खूप परिणामकारक लिहिले आहे.

स्मिता.'s picture

28 Nov 2012 - 5:03 pm | स्मिता.

कथा वाचून वाईट वाटलेच पण ती सत्यघटना आहे हे वाचून आणखीच दु:ख झाले.

अनिल तापकीर's picture

28 Nov 2012 - 6:24 pm | अनिल तापकीर

अमित्,ब्याटमन्,स्मिता धन्यवाद

इरसाल's picture

29 Nov 2012 - 1:37 pm | इरसाल

यापुर्वी हे कुठेतरी वाचलेय. दोन्हीवेळेस तीच भावना दाटुन आली.

मोदक's picture

29 Nov 2012 - 2:16 pm | मोदक

:-(

प्यारे१'s picture

29 Nov 2012 - 5:20 pm | प्यारे१

राम कृष्ण हरि!

अनिल तापकीर's picture

29 Nov 2012 - 6:13 pm | अनिल तापकीर

धन्यवाद इरसालजि,प्यारे,मोदक.
इरसालजी हि कथा तुम्हि मायबोलीवर किंवा,मिमवर वाचलि असेल

अनिल तापकीर's picture

29 Nov 2012 - 6:14 pm | अनिल तापकीर

अपर्नाजि धन्यवाद

अनिल तापकीर's picture

29 Nov 2012 - 6:15 pm | अनिल तापकीर

दादा कोडकेजी माझीच वाचताना चुक झाली क्षमस्व

कवितानागेश's picture

29 Nov 2012 - 7:23 pm | कवितानागेश

असे प्रसंग फार हळहळ लावून जातात जीवाला.
विशेषतः सगळे प्रयत्न करुनही कुणाचातरी जीवच जातो तेंव्हा...... :(

अनिल तापकीर's picture

29 Nov 2012 - 9:57 pm | अनिल तापकीर

धन्यवाद्,लीमाउजेटजी

आमच्या मित्राचा ४ थी मध्ये शिकणारा मुलगा लहान मेंदुमध्ये गाठ होण्याने साधारण ३-४ महिने टाटाला अ‍ॅडमिट होता. रोज थोडा थोडा शरीरावरील ताबा सुटत चालला होता. थोडे थोडे अन्न कमी होत होत वारला. पाहणे सुध्दा भयानक होते. अनुभव तर काय .....

अनिल तापकीर's picture

1 Dec 2012 - 8:01 pm | अनिल तापकीर

जानुजी फार वाईट असतात ते अनुभव परमेश्वर असे अनुभव कुनालाही न देवो