हा वन डीश मील साठी छान, सोपा, टेस्टी ऑप्शन. ही खिचडी कमी तिखट केली तर लहान मुलं पण आवडीने खातात. लहान मूलांना द्यायला हा एक हेल्दी ऑप्शन आहे.
साहित्यः
अर्धी वाटी तेल, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, कढिलिंबाची ४-५ पानं, २/३ पाकळ्या लसूण बारीक चिरून किंवा किसून (साधारण १ टीस्पून), कच्चे/भाजलेले शेंगदाणे पाव वाटी, सुकं खोबरं अर्धी वाटी, गोडा मसाला अर्धा टीस्पून, तिखट अर्धा टीस्पून, तांदूळ १ वाटी, पाऊण वाटी हिरवी (स्प्लिट) मूगडाळ, १ टीस्पून मीठ, ४ वाट्या पाणी
कृती:
१) एका स्टीलच्या कुकरमध्ये तेल गरम करत ठेवावे. एकीकडे तांदूळ आणि मूगाची डाळ धुवून ठेवावी.
२) तेल गरम झाले की त्यात जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. आता त्यात शेंगदाणे, कढिलिंब, लसूण घाला.
शेंगदाणे परतून घ्या. मग सुकं खोबरं घाला. हळद घाला. मग तांदूळ आणि मूगाची डाळ घाला. चांगले परता.
३) आता त्यात पाणी, तिखट, मीठ, गोडा मसाला घाला. आवडत असल्यास १ चमचा तूप घाला.
४) कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर ३ शिट्ट्या होऊ द्या.
५) १५ मिनिटांनी कुकरचे झाकण पडले/निघाले की गरम गरम मूगाच्या डाळीची खिचडीवर तूप घालून लोणचे, दही, भाजलेला/तळलेला पापड ह्या बरोबर खा.
टीपः
इथे १ वाटी = १ आमटीची मोठी वाटी असे प्रमाण घेतले आहे.
प्रतिक्रिया
11 Oct 2012 - 7:44 pm | मदनबाण
हा माझा प्रिय खाद्य प्रकार हाय ! :)खिचडी + लिंबाचे लोणचे आणि या बरोबर मठ्ठा = स्वर्गसुख :)
अवांतर :--- उगाच जुना मराठी चित्रपट (साल १९८५) आठवला,त्याचे नाव सुद्धा "खिचडी" ;)
11 Oct 2012 - 8:12 pm | निवेदिता-ताई
खिचडी केली की बास असते..अजुन दुसरे काही करावेही लागत नाही.
पण या बरोबर मठ्ठ्यापेक्षा कढी छान लागते
11 Oct 2012 - 8:20 pm | मदनबाण
पण या बरोबर मठ्ठ्यापेक्षा कढी छान लागते.
मला दोन्ही आवडते. ! ;)
11 Oct 2012 - 8:45 pm | सस्नेह
कढी-खिचडी हा आमचा लाडका आठवडी मेनू आहे.
खिचडी मात्र अंमळ मऊ गुलगुलीत असते. म्हणजे १ वाटी तांदूळ असेल तर ४ वाट्या पाणी !
11 Oct 2012 - 9:01 pm | जाई.
छान !!!!!!!१
11 Oct 2012 - 9:13 pm | सानिकास्वप्निल
वाह! मुगाची खिचडी म्हणजे सगळ्यात आवडता पदार्थ कम्फर्ट फूड आणी त्यात ती सालंवाली मुगाच्या डाळीची असेल तर क्या बात :)
मी ह्या खिचडीत एखाद-दुसरे कोकम व भाजक्या जीर्या-खोबर्याचे वाटण १ टेस्पून घालते.
11 Oct 2012 - 9:45 pm | पैसा
आवडता प्रकार! शेंगदाणे हा उत्तम बदल आहे माझ्यासाठी, कारण खिचडीत मी बहुतेकवेळा मटार घालते. पाकृ, फोटो सर्व छान फक्त फोडणीसाठी अर्धी वाटी तेल जरा जास्त वाटले!
11 Oct 2012 - 10:11 pm | सुनील
प्रकार छानच.
मूगडाळ तशी पटकन शिजते त्यामुळे डाळ-तांदूळ जर कोरडे होईपर्यंत परतून घेतले असतील तर, नुसत्या पॅनमध्येदेखिल खिचडी होते. कुकरची गरज नाही.
आजवर शेंगदाणे घालून केलेली नाही. करून बघायला हवी. क्वचित बदल म्हणून मूग आणि तूर ह्या दोन्ही डाळींचे मिश्रण घेऊन केलेली आहे. तीदेखिल चांगली होते.
11 Oct 2012 - 10:31 pm | रेवती
खरं तर मु. खि. आवडत नसलेले लोक कमीच असावेत. माझा नवरा ही खि. चांगली करतो, त्यामुळे मला कधितरीच करण्याची वेळ येते. खाण्याची वेळ मात्र नेहमी येत असते. ;) असो, कधी बोलावताय मु. खि., पापड, लिंबाचं गोडं लोणचं खायला? ;)
11 Oct 2012 - 10:40 pm | गणपा
अडी-नडीला धावून येणारा पोटभरू पदार्थ.
(नुसते खयला आवडत असले तरी) यात शेंददाणे घातलेले आवडत नाही. एरवी साधीच आवडते. पण कधी तरी बदल म्हणुन कधी मटार, गाजर, वांगी टाकून बनवतो.
12 Oct 2012 - 2:16 am | सुनील
नुसते खयला आवडत असले तरी
शेंगदाणे "नुसते"देखिल खातात?
फारच "कोरडे" लागत असतील, नाही? ;)
12 Oct 2012 - 12:09 am | अर्धवटराव
सोज्वळ आजीसारखा :)
अर्धवटराव
12 Oct 2012 - 2:02 am | श्रीरंग_जोशी
मुगाच्या डाळीची खिचडी म्हणजे माझा वीक पॉइंट.
सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे बनविण्यास अतिशय सुटसुटीत. हापिसातून थकून भागून घरी आल्यावर, दुसरे काही बनवयची इच्छा नसेल तर मॅगी अगोदर या खिचडीचा नंबर लागतो.
सोबत कैरी / लिंबाचे लोणचे, मठ्ठा / कढी, कोशिंबिर, सांडगे, पापड (तळलेले किंवा भाजलेले कोणतेही) यापैकी जे असेल ते.
या पाककृतीबद्दल विशेष धन्यवाद. इतके "वाटण-धाटण" करून वेगळ्या प्रकारे करून पाहीन :-).
13 Oct 2012 - 1:39 am | रमेश आठवले
गुजरातमध्ये मुगाची डाळ तिच्या सालासकट मिळते. काही लोक या डाळीची खिचडी करून खातात. गुजरातीत या डाळीला फोतरेवाली डाळ म्हणतात . हल्ली आहारात fiber चे महत्व वाढले आहे. तेंवा हि खिचडी पण करून पहावी.
14 Oct 2012 - 1:27 am | प्रभाकर पेठकर
गुजराथमध्येच का? महाराष्ट्रातही मिळते. अगदी आमच्या मुंबई-पुण्यातही मिळते. इथे मस्कतमध्येही मिळते.