कताई शास्त्र ६

बापू मामा's picture
बापू मामा in जनातलं, मनातलं
25 Sep 2012 - 10:16 pm

.

कापूस एक नैसर्गिक वनस्पतीज तंतू असुन त्याचे वातानुकुलन व शोषकता हे गुणधर्म इतर कोणत्याही तंतूंना नाहीत. कापसाच्या पेशीत ८०-९०% सेल्युलोज, ८-९% पाणी,व उरलेले प्रथिन्,वॅक्स असते.कापसाचा तंतूचा क्रॉस सेक्शन एखाद्या पाईप प्रमाणे दिसतो. समजा त्या पाईपच्या भिंतींची जाडी (wall thickness) जास्त (म्हणजेच जर आतिल पोकळ भाग कमी असेल) तर तो परिपक्व(mature) व कमी असेल तर अपरिपक्व(immature) आहे असे समजतात.

परिपक्व कापसाचे बल, लकाकी जास्त असते व पुढील प्रक्रियांमध्ये सुरळीत चालते. सुताची प्रत उत्तम येते.
मुख्य म्हणजे पुढील प्रक्रियांमध्ये होणार्‍या घर्षणामुळे व चक्राकार भ्रमणामुळे त्याचे गुंतागुंतीचे ( entangled clusters किंवा टेक्सटाईलच्या परिभाषेत neps) प्रमाण अल्प असते. या उलट अपरिपक्व कापसाचे गुणधर्म असतात. ताकद कमी, चालण्यास त्रासदायक व नेप्स जास्त.
कापसाचे प्रयोगशाळेत खालील प्राथमिक बाबींचे परिक्षण केले जाते.
१) लांबी :( स्टेपल लेंग्थ) : जुन्याकाळी हाताच्या बोटाच्या चिमटीत धरुन काही तंतू सरळ करत व अंदाज घेत. त्यानंतर Baer Sorter या उपकरणाद्वारे तंतू कंगव्याने सरळ करुन व वेल्वेट पॅड वर उंचीच्या क्रमाने ठेवत असत्,व त्याचे ग्राफ पेपर वर प्लॉटींग करुन्,सँपलची ईफेक्टिव व मीन लेंग्थ तसेच आखूड तंतूचे प्रमाण मिळवित असत.
आता आधुनिक डिजिटल फायब्रोग्राफ, HVI ता यंत्रांद्वारे सँपलमधील सर्वात लांब २.५%
तंतूंची लांबी(2.5% span length), व ५०% तंतूंची सरासरी लांबी (50% span length) मिळवितात व त्यानुसार यंत्रांचे सेटिंग करतात.
२) बल : १०० मिलिग्राम सँपल दोन ३ मिलिमिटर परस्परांतर असलेल्या चिमटीत (clamps) पकडून
त्यांना ताणतात. व रुईचे तुटते वेळीचे बल (breaking strength) मोजतात. याचे एकक ग्राम्स्/टेक्स हे आहे.
३) परिपक्वता व तलमता(maturity and fineness) : हे दोन्ही घटक एकाच यंत्राद्वारे मोजता येतात. एका खालच्या बाजूस छिद्रे असलेल्या सिलेंडरमध्ये ठराविक कापुस ठेवतात व हवाबन्द करुन खालच्या
छिद्रांमधून हवा सोडतात. हवेच्या प्रवाहास परिपक्व रुई अपरिपक्व पेक्षा जास्त अवरोध करेल. तसेच तलम रुई चा एकुण पृष्ठभाग जाड्या तंतुंच्या एकूण पृष्ठभागापेक्षा जास्त असेल कारण जाड रुई पेक्षा तलम रुईचे जास्त तन्तू तेवढ्याच वस्तुमानात बसतिल. त्यामुळे त्याचा अवरोध जास्त असेल.
परिपक्वता व तलमता यांचे संयुक्त एकक मायक्रोनेअर ( micronnaire) हे आहे.
४) ट्रॅश% : रुईतील जिनिंग झाल्यानंतरही राहिलेला कचरा हा एक महत्त्वाचा भाग आहे. जास्त कचरा असेल तर सुत उत्पादनात कमी ऊतारा मिळतो व हे नुकसान आहे.कचर्‍यात फुटलेले सरकीचे तुकडे, पाने, बोंडाचे आवरण्,देठ ईत्यादींचा समावेश असतो.
५) रंगाची प्रत : यामध्ये रुईचे शुभ्रता (Rd) व पिवळेपणा (+b) यांचे मापन होउन कलर ग्रेड ठरविली जाते. कोणताही सुताचा एक लॉट बनवताना त्याचा रंग एकसारखा असणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा तयार होणार्‍या कापडात पट्टे दिसतात(barre). त्यामुळे शेड व्हेरिएशन होणार नाही याची रुईच्या निवडी पासुन दक्षता घ्यावी लागते.
याशिवाय तंतुचे elongation, crimp इत्यादींचेही परिक्षण करतात.
मिक्सिंग व कंडीशनिंग नंतर प्रत्यक्ष यंत्राचा भाग सुरु होतो.रुक्ष वाटला तरी रंजकता आणण्याचा प्रयत्न करतो.
२) ब्लो रुम
या खात्यात यंत्रांची एक मालिकाच असते त्या मुळे तिला ब्लो रुम लाईन असे संबोधतात.
प्रेसिंग मध्ये गच्च झालेल्या रुईला ओपन करणे व त्यातील अवशिष्ट कचरा काढून ती एका शीट फॉर्म मध्ये (lap) पुढील कार्डिंग मशिनला देणे हे या खात्याचे मुख्य काम.या सोबतच विविध व्हरायटीच्या रुईंचे मिश्रण एकजीव करणे, धूळ काढून टाकणे ईत्यादी कामेही केली जातात.
यामध्ये रुईला प्रथम विरळ पेग्ज असलेल्या व क्रमाक्रमाने दाट व करवतीसारखे दातहोत जाणार्‍या बीटर्स व ओपनर्स मधून जावे लागते.
बीटर मधून पास होताना कापसातील सरकीचे तुकडे, पाने, देठे, व ईतर कचरा गुरुत्वाकर्षणाने तो जड असल्याने खाली पडतो व तुलनेने हलके असलेले तंतू पुढील मशिनच्या वाताकर्षणाने पुढील बीटरकडे जातात.
युनिमिक्स किंवा मल्टिमिक्सर या यंत्रात रुईच्या विविध व्हरायटींचे एकजीव मिश्रण होते. त्या नंतर फाईन ओपनर व डस्ट रिमुव्हर
व शेवटी स्कचर या यंत्रामधून ४० ईंच रुंदीची व अंदाजे १५ किलो वजनाची रुईच्या शीटची गुंडाळी (लॅप) बनविली जाते.
आधुनिक ब्लोरूम लाईनमध्ये बेल ओपनर ऐवजी बेल प्लकर हे यंत्र असते. या यंत्राला रुई बारीक करुन ( मिक्सिंग करून) देण्याची गरज नसते. त्याऐवजी बेलवरील पॅकींगच्या पट्ट्या काढून त्या बेल प्लकरखाली तशाच ठेवल्या जातात. बेल प्लक्अर त्यामधील थोडा थोडा कापूस पुढील यंत्राच्या गरजेप्रमाणे उचलतो. तसेच शेवटी स्कचर ऐवजी च्यूट फीड द्वारे लॅप शीट पुढील कार्डिंग या मशिनला पुरविले जाते.
त्यामुळे मिक्सिंग न करावे लगल्याने व लॅप तयार करायला न लागल्याने मनुष्यबळ कमी लागते.
बीटर खाली निघालेला कचरा (trash) हा सर्वसाधारणपणे रुईच्या ट्रॅश% इतका असतो. हा कचरा व धूळ एका फिल्टर द्वारे जमा केला जातो.
ब्लो रूम मध्ये ओपनिंग व क्लिनिंग करताना तंतूंची लांबी जास्त घटता कामा नये.( fibre rupture), तसेच ब्लोरुम मध्ये तंतुंच्या गुठळ्या ( entangled clusters/neps) जास्त प्रमाणात तयार होऊ नयेत याची पुरेपूर दक्षता घ्यावी लागते. त्यासाठी बीटर व कन्व्हेअर फॅनचे स्पीड यथायोग्य असावे लागते. तसेच बीटर चे दात सरळ व टोकदार राहतील याची दक्षता घेतात.
ब्लोरुम मध्ये कापुस जिनिंगमधून आल्याने त्यात काही दगड गोटे, धातूचे तुकडे असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घर्षणाने आगीची भीती जास्त असते,व त्यामुळे बहुमुल्य यंत्रसामग्रीचेही नुकसान होते. त्याकरिता आजकाल मेटल डिटेक्टर व स्पार्क डिटेक्टर
लावले जातात. एखादा धातूचा तुकडा आल्यास तो त्वरित वेगळा केला जातो. तसेच एखादी ठिणगी दिसून पडल्यास स्पार्क डिटेक्टर द्वारे
बाहेर काढली जाते.
तसेच आधुनिक कंटॅमिनेशन क्लिनर द्वारे कोणतीही ईतर रंगाची वस्तू , प्लास्टिकच्या पारदर्शक पिशव्या वगैरे वेगळे केले जातात.
टाकण्यासारखे फोटो बरेच आहेत. परंतु नुतनीकरणानंतर फोटो कसे टाकावे याचे ऊत्तर अद्याप मिळाले नाही.
a

क्रमशः

तंत्रमाहिती

प्रतिक्रिया

लेख चांगलाच झालाय. पुन्हा एकदा वाचणार आहे.

तर्री's picture

26 Sep 2012 - 3:19 pm | तर्री

मस्त , रोचक व उपयुक्त माहिती !

एकची कापूस - नाना वसने |

गवि's picture

26 Sep 2012 - 3:34 pm | गवि

या वेगळ्या विषयावरच्या आणखी एक उत्तम भाग..... आभार..

पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

साती's picture

30 Sep 2012 - 11:55 am | साती

वेगळ्याच विषयावर छान माहिती देताय.
धन्यवाद!

बहुगुणी's picture

30 Sep 2012 - 6:58 pm | बहुगुणी

धातू कणांच्या घर्षणाने आगीचा धोका टाळण्यासाठी मेटल डिटेक्टर व स्पार्क डिटेक्टर वापरल्यावर ते धातू कण वेगळे कसे केले जातात? ते शक्य तितक्या लवकर, कापसाच्या धाग्यांपासून शक्य तितक्या लांबवर नेणं आवश्यक असणार. चुंबक वापरत असतील असा अंदाज आहे, या प्रक्रियेबद्दल आणखी माहिती वाचायला आवडेल.

बापू मामा's picture

2 Mar 2018 - 9:30 pm | बापू मामा

बहुगुणीजी, आपले उत्तर व परत या शास्त्रावर माहितीपर लिहिण्यास रुजु होण्यासाठी फार उशिरा लिहित आहे,क्षमस्व।
आपण लिहिलेले अगदी बरोबर आहे।कापसाचे पुंजके मानवाद्वारे अथवा यंत्राने उचलले गेल्याबरोबर पाईपद्वारे वाहून नेताना पहिल्याच वाहक पाईपमध्ये मेटल डिटेक्टर ही चुंबकीय सुरक्षा लावलेली अष्टे।तिने डिटेक्ट केल्यानंतर अंदाजे पाच मीटर् अंतरावर बसवलेल्या डायव्हर्टरची झापड उघडून धातू गुरुत्वाकर्षणाने खालील टाकीत पडतो व पुढील धोका टळतो।

मार्मिक गोडसे's picture

2 Mar 2018 - 11:39 pm | मार्मिक गोडसे

सगळे भाग वाचून काढले, बरीच नवीन माहिती मिळतेय .
कापसातही static electricity निर्माण होते का?

कोरड्या कापसात होते।म्हणूनच स्टॅटिक इलेक्ट्रीसीटीचे वहन होण्याकरिता गिरण्यांमध्ये 50 ते 60% रिलेटीव्ह ह्युमिडिटी ठेवली जाते।व पाणी तसेच ऍंटीस्टॅटीक केमिकल्सचे मिश्रण त्याच्या मिक्सिंगमध्ये फवारले जाते।(मॉईश्चर रिगेन होण्यासाठी)