वस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात आपला भारत प्राचिन काळापासून अग्रेसर आहे. कोंकणातील बंदरे इसवीसन पुर्व
व इसवीसनोत्तर प्राचिन काळात कापडाच्या मध्य पुर्व तसेच युरोपीय देशाशी व्यापारामुळे संपन्न झाली होती. मध्य युगात भारतीय कापडाच्या आयातीसाठी युरोपीय देशांनी इस्ट ईंडिया कंपन्यांसारख्या
संस्था ही काढल्या होत्या.
औद्योगिक क्रांती नंतर मात्र चित्र बदलले. भारतातून मँचेस्टरसाठी कच्चा माल (कापूस) निर्यात होवू लागला.
तयार कापडास भारतासारखी हुकुमी बाजारपेठ मिळाली. मँचेस्टर संपन्न झाले,व एतद्देशीय कारागिर बेकार ,निर्धन झाले.कपाशीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले गेले. ईंग्रजांनी कापसाच्या जलद वाहतुकीसाठी
भारतभर रेल्वेचे जाळे पसरवले. देशाची संपन्नता गेली. बेकारी वाढली.
एका द्रष्ट्या व्यक्तीच्या लक्षात ही गोष्ट आली. कापसाचा व्यापार करणार्या त्या व्यक्तीने कापड उद्योग येथेच
सुरु करुन रोजगार निर्मिति करण्याचा निश्चय केला.
मित्रहो, हा द्रष्टा म्हणजे भारतीय उद्योग क्षेत्राचा जनक सर जमशेद्जी नसरवानजी टाटा.
टाटांनी भारतातील पहिली कापड गिरणी 'द एम्प्रेस मिल्स' ही १ जानेवारी १८७७ रोजी नागपुरात
सुरु केली. या साठी महाराष्ट्र त्यांचा सदैव ऋणी राहिल.
एम्प्रेस मिल्स ही टाटा उद्योग समुहाची जननी आहे ( होती, कारण टाटांनी मोठ्या दु:खाने ही गिरणी
कामगारांच्या अवास्तव मागण्यांमुळे १९८२ साली बन्द केली.)
मागील भागात आपण कापसाच्या शेतापासून बाजारापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला.
कापूस हे सामान्य नाम असुन कपाशी हे सरकीसह कापसाचे विशेष नाम व रुई हे सरकी वेगळी केलेल्या
कापसाच्या तंतूंचे विशेष नाम आहे.
सर्वसाधारणपणे गिरण्या रुईची खरेदि करण्या आधीच तिची प्रयोगशाळेत योग्य लांबी,
परिपक्वता,तलमता,बल्,रंगाची प्रत इत्यादींचे परिक्षण करून गरजेनुसार कापसाची खरेदी करतात.
भारतात कॉटन मार्केटमध्ये प्रचंड उलाढाली होतात.
आता मुख्य विषयास म्हणजे कताई शास्त्रास हात घालू.
गिरणीमध्ये कापुस आल्यावर त्यावर खालील खात्यांमध्ये प्रक्रिया होतात.
१) मिक्सिंग व कंडिशनिंग
निर्माण करायच्या सुताच्या गरजेनुसार रुईच्या विविध जाती,विविध स्टेशन-गावाकडून आलेल्या गाठी,
येथे उघडल्या जातात व त्यांचे एकजीनसी मिश्रण करुन ते ढिग २४ ते४८ तास ७०-७५% सापेक्ष आर्द्रतेत ठेवले जातात. (मुंबईची पावसाळ्यात सापेक्ष आर्द्रता६०ते ७०% असते). असे केल्याने रुईची
प्रेसिंग मध्ये व बाहेरिल कोरड्या हवेने घटलेली आर्द्रता पुनर्स्थापित (moisture regain) होवुन
पुढील प्रक्रियांमध्ये घर्षणामुळे निर्माण होणारे स्थितिज विद्युत भार कमी होण्यास मदत होते. कापसाचे
बल वाढते.
पॉलिएस्टर, विस्कोस इत्यादींचे डाईड यार्न बनवायचे असेल ,तर मिक्सिंग मध्येच तंतू रंगवले जातात.
सोबत बेल ब्रेकिंग मशिन व मिक्सिंग खात्याचे चित्र दिले आहे.
क्रमशः
प्रतिक्रिया
15 Sep 2012 - 10:20 pm | बापू मामा
श्री गणपा
दोन चित्रे उघडली नाहीत. कृपया मदत करा.
15 Sep 2012 - 10:52 pm | गणपा
दुरुस्ती केली आहे.
हा ही भाग आवडला.
16 Sep 2012 - 2:37 am | श्रीरंग_जोशी
या लेखांमधली माहिती व आपली शैली दोन्हीही आवडले.
अवांतर - शुक्रवार तलावाशेजारी ज्या ठिकाणी शतकाहूनही अधिक काळ एम्प्रेस मिल चालली तिथे आज एम्प्रेस सिटी नावाची मॉल दिमाखात उभी आहे.
16 Sep 2012 - 3:02 am | रेवती
अगदी छान माहिती.
16 Sep 2012 - 3:15 am | प्रभाकर पेठकर
सर्व भाग वाचले. लिखाण माहितीपूर्ण आहे.
'स्थितिज विद्युत भार' म्हणजे 'स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी' का?
16 Sep 2012 - 4:13 am | वाचक
चालली आहे, इतर कुठे मराठीतून वाचनात न आलेली माहिती मिळते आहे त्याबद्दल आभार.
तुम्हाला ही सर्व माहिती कशी झाली ह्याचेही काही विवेचन आले तर आवडेल. भाग थोडे मोठे करावेत हीच विनंती करतो.
16 Sep 2012 - 7:31 am | बापू मामा
होय, ईंग्रजी व व्यवहारातील वापराचा हा शब्द देण्याचे राहून गेले.
16 Sep 2012 - 1:34 pm | पिंगू
अतिशय छान माहिती मिळते आहे. आणखी पुढेही आणखी उपयुक्त माहिती मिळेल अशी आशा धरुन आहे.
16 Sep 2012 - 9:59 pm | खडीसाखर
सगळे भाग आवडले. पु.ले.शु. :)
17 Sep 2012 - 6:03 pm | बापू मामा
तुम्हाला ही सर्व माहिती कशी झाली ह्याचेही काही विवेचन आले तर आवडेल.
मी स्वतः एम्प्रेस मिल्स नागपूर मध्ये ती जेंव्हा टाटा टेक्सटाईल्सतर्फे चालवली जात होती ,(१९७७-७८)
त्यावेळी कामास होतो. त्यावेळी गिरणीचे ५ युनिट होते. टाटांनी केवळ आधुनिकिकरण करुन काही कामगार कपात करण्याचा व गिरणीला जीवदान देण्याचा प्रस्ताव मांडला.परंतू हटवादी ईंटक नेतृत्वाने तो धुडकावून लावला. नाईलाजाने टाटांना गिरणी बंद करावी लागली हा ईतिहास आहे.
17 Sep 2012 - 6:05 pm | बॅटमॅन
महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणवल्या जाणार्या इचलकरंजीबद्दलसुद्धा काही लिखाण आले तर वाचायला आवडेल.
17 Sep 2012 - 9:05 pm | भाग्या
छान माहिती.
काही फोटो दिसत नाहीत.
मि.पा.वर नवीन आहे (मी),
खूप चान्गली माहिती मिळते आहे.
मराठी टायपिन्ग हळु हळु येत आहे.
आनन्द होतोय.
पुढील भागाची वाट पहातेय.