झूरिक मध्ये काकस्पर्श

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
7 Aug 2012 - 6:19 pm

काकस्पर्श या मराठी सिनेमाचा एक खेळ झूरिकच्या राईटबर्ग म्युझिअममध्ये ( तेच सध्या मुखपृष्ठावर असलेले) झाला. यासाठी उपस्थित राहण्याची संधी मला लाभली.या प्रसंगी सिनेमातील प्रमुख अभिनेते सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थित होते.हा चित्रपट बर्लिन फिल्म फेस्टिवलसाठी सिलेक्ट झालेला असून पुढल्या आठवड्यात बर्लिनला दाखवला जाणार आहे. चित्रपटानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. त्यावेळची काही छायाचित्रे....







चित्रपटाला अर्थातच इन्ग्रजी सबटायटल्स होती. सुमारे एकशेवीसाचा प्रेक्षकवर्ग होता ( काही बासेल आणि बर्नहून आलेले होते) आणि त्यात मराठीव्यतिरिक्त बरेच अमराठी भारतीय आणि पाच सात गोरी मंडळी ( बहुतेक स्विस आणि ब्रिटिश ) होती...खेळ चांगला झाला आणि त्यानंतरची प्रश्नोत्तरेही रोचक आणि रंजक होती...गोर्‍या मंड्ळींसाठी " काकस्पर्श म्हणजे काय" हे इंग्रजीत सांगतानाची दिग्दर्शकांची शाब्दिक कसरत," ऑफरिंग राईसबॉल्स टू क्रोज.. व्हेन द क्रो टचेस द राईसबॉल, द सोल इज कन्सिडर्ड लिबरेटेड" वगैरे वगैरे भलतेच मजेदार होते...
मी हा सिनेमा इथे प्रथमच पाहिला. त्यावरची जालावरची परीक्षणे मात्र वाचलेली होती. सिनेमा पाहून आल्यानंतर रमताराम यांचे हे http://www.misalpav.com/node/21713 परीक्षण पुन्हा वाचले. त्यातल्या जवळजवळ सर्व मुद्द्यांशी सहमत आहे.सिनेमातल्या काही गोष्टी अगदी बेतलेल्या वाटल्या तरी मला सिनेमा आवडला. ( मला आवडणार नाही असे वाटले होते आधी) ..
नाट्यलेखनाच्या एका कार्यशाळेमध्ये एका शिक्षकांकडून ऐकले होते की कलाकृतीकडे तिच्या काळाच्या चष्म्यातून पहावे लागते.... ( म्हणजे कथेतला काळ आणि कथा लिहिला गेलेला काळही) .... हा सिनेमा पहायचा म्हणजे हे आधी मान्य करून घ्यावे लागते की असा एक काळ होता की बहुसंख्य लोक असे मानत असत की "स्त्री ही एक वस्तू आहे आणि तिचे कोणीतरी कोणापासूनतरी सतत रक्षण करायचे असते.. मग कोणीतरी कोणालातरी शब्द देते की अमुक स्त्रीला म्हणे तमुक पुरुषाचा स्पर्श होऊ देणार नाही.... हे मान्यच न करता सिनेमा पाहत येणे शक्य नाही... "अरे भाऊ , तू कोण हे ठरवणारा ? मग तिच्या इच्छेचे काय ? तुला नसेल लग्न करायचे तर नको करूस पण तिचे लग्न लावून दे ना मग " वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित करणे टोटल निरर्थक..... ते असो...
मूळ कथा उषा दातार यांची आहे. छोटीशी अकरा पानी कथा आहे, त्याचा विस्तार आणि पटकथा संवाद गिरीश जोशी यांचे...
गिरीशच्या लेखनाचा मी मोठा पंखा आहे. त्याच्या दोन लेखनकार्यशाळांना मी विद्यार्थी म्हणून उपस्थित राहिलेलो आहे... मी लिहिलेल्या काही दीर्घांकात कसे बदल करावेत वगैरे यासाठी त्याचे सल्ले घेतलेले आहेत वगैरे वगैरे... शेवटच्या दहा मिनिटांपर्यंत मला या सिनेमाची गोष्ट आवडलीच पण. काही प्रश्न जरूर निर्माण झाले... विशेषतः शेवटी शेवटी....
संपूर्ण सिनेमाभर हरीदादाचे पात्र जे उभे केले आहे, (जे सुधारणावादी आहे आणि त्याचा विधवांच्या केशवपनाला तात्विक विरोध आहे असे वाट्त राहते) ते शेवटच्या दहा मिन्टात टोटल उलटेपालटे केले आहे, ते मला अजिबात आवडले नाही, पटले नाही... म्हणजे जो माणूस आम्हाला सिनेमाभर पुरोगामी विचारांचा सुधारणावादी वाटत राहिला, जो सार्‍या गावाचा रोष पत्करून आपल्या वहिनीचे रक्षण करत राहिला, तो शेवटी मान्य करतो की मी सुधारणावादी नाही आणि फक्त भावाच्या आत्म्याला दिलेला शब्द ( वहिनीला परपुरुषाचा स्पर्श होऊ देणार नाही) पाळण्याच्या हट्टापायी हे केले.. आणि अर्थात म्हणजे श्योविनिजमने भरलेल्या सर्व पात्रांमध्ये हा एकच वेगळा माणूस ( म्हणूनच तो आपल्या कथेचा हीरो) असे जे आपण मान्य केले आहे ते सारे संपले... याचेही पाय मातीचेच... हा तर त्या वहिनीचा अधिक गुन्हेगार ... म्हणजे हाच कथेचा मुख्य व्हिलनही.. पुढे त्याने ( कितीही विधवांना मदत करून प्रायश्चित्त घेतले तरी ते सारे फिल्मी आणि खोटारडे, अति बेतलेले वाटले).... ही मला प्रेक्षकाची शुद्ध फसवणूक वाटली... ( पण एकूण दिग्दर्शकांनाही " हा टिपिकल हीरो नसून थोडासा हेकेखोर ऍन्टीहीरो आहे, हे मान्य दिसले... अशा स्वरूपाचे शब्द पुढे प्रश्नोत्तरांत त्यांनी वापरले..) मान्य आहे की कथानकात ट्विस्ट वगैरे असतात, पण ते रसपरिपोष वगैरेकरणारे असावेत.. असा रसभंग फार त्रासदायक असतो...
शिवाय शेवटी हरीदादा आपल्या मित्राला सांगतो की माझा शब्द खोटा पडू नये म्हणून ती स्वत: लवकर मेली ... हा म्हणजे आड्यन्सला रडवायचा मेलोड्रामा वाटला... उगीच काहीतरी अति...असो... या शेवटाबद्दल उपस्थित प्रेक्षकवर्गातल्या एका स्त्रीने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि " आयुष्यभर दु:ख भोगलेल्या स्त्रीला तुम्ही शेवटच्या क्षणीही काही सुख लाभू देत नाही आणि तिला मारून टाकता आणि सॅड शेवट करता" असे सुनावले त्यावर दिग्दर्शकांनी प्रश्नोत्तरात हे सांगितले की "त्याचा शब्द खोटा पडू नये म्हणून तिचे मरणे " हेच त्यांना सर्वात जास्त आवडले , म्हणून तर त्यांनी थोडाही बदल न करता गिरीश जोशीची पटकथा जशीच्या तशी वापरली...
सिनेमात एकच गाणे आहे, गाणे ऐकायला छान आहे... ( संगीत : राहुल रानडे) ... पण मला काही ते गाणे बघवेना... मी सिनेमा सोडून एका निराळ्या कारणासाठी अस्वस्थ होत राहिलो...नुकत्याच वयात आलेल्या स्त्रीला मखरात बसवणे आणि हे प्रकरण एकूणच साजरे करणे , हे मला अप्रशस्त आणि एम्बरॆसिंग वाटते ... इतकी वैयक्तिक वाटणारी आणि चर्चा करण्यास असभ्य वाटेल अशी ही गोष्ट...अशा गोष्टीचे समारंभ असत पूर्वी !!! आणि त्यावर गाणी ??? " का सखे तुजला, नाहणे आले?" यावर त्या सखीने काय उत्तर देणे अपेक्षित आहे?... हे म्हणजे प्रजोत्पादनाला लायक झालेल्या एखाद्या मुलग्याला / पुरुषाला फ़ेटाबिटा बांधून घोड्यावर बसवून " का बुवा तुजला , असे कसे झाले?" अशी छान सुरांत गाणी म्हणत मिरवणूक काढण्यासारखे झाले. बरं उत्सवमूर्तीनेही " मला जे झाले ते अत्यंत नैसर्गिक आणि वैयक्तिक असून हे बहुसंख्य जनतेला होतच असते सबब सर्व जनतेने भोवती टिपर्‍या वाजवत फेर धरून नाचू नये ही विनंती" असे न म्हणता विक्टोरिया क्रॉस मिळवल्याच्या थाटात कौतुक वगैरे करून घ्यायचे ... का ???.. ( असो, काळाचा चष्मा लावून हे ही सहन केले ..)
मला जाम उत्सुकता होती की गोर्‍या लोकांना हा सिनेमा कसा वाटतोय... आलेली गोरी मंडळी माझ्या ओळखीची नसल्याने त्यांना सिनेमा नक्की कसा वाटला हे समजण्यास मार्ग नाही.. त्यांच्यातला एक जण दिग्दर्शकांना म्हणाला, " It was unlike a typical bollywood movie and I liked it. Especially the songs " .. त्यांना नक्की कितपत कळाला ही शंकाच आहे.... काकस्पर्श ही संकल्पना नुसत्या सबटायटल्समधून कशी कळणार हा एक प्रश्न, बालविवाह व विधवांचे केशवपन ही रूढी त्यांनी कशी समजावून घ्यावी हा पुढचा प्रश्न...
सिनेमाला आलेले एक ज्येष्ठ गृहस्थ इतरांशी चर्चा करताना म्हणत होते, " आधीच गोर्‍या मंडळींचे भारताविषयी गैरसमज... त्यात हे असले सिनेमे पाहून त्यांचे मत काय होईल, कल्पना करवत नाही..." समजा झैरे किंवा बुरुंडी देशातल्या शंभर वर्षांपूर्वीच्या ( आता अत्यंत भंपक वाटणार्‍या) काही रूढींवर आधारित एखादा चांगला बनवलेला आताचा सिनेमा पाहून मी आताच्या झैरे किंवा बुरुंडी देशाविषयी गैरसमज करून घेईन काय ? माझे उत्तर "कदाचित हो" असे आले.... मग बर्लिनमध्ये हा सिनेमा दाखवून आपली बदनामी होतेय की नाही, या प्रश्नाचे उत्तरही "कदाचित हो" असे आले बुवा...
असो...
या सिनेमाच्या निमित्ताने अनेक महिन्यांनी जालावर काही लिहिले आहे. लेखनसंन्यास तुटणे ही एक आनंदाची गोष्ट आहे...

चित्रपट

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2012 - 7:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर, लेखनसन्यास तुटला याचा आनंद वाटला. आता नाटकांवर जो आपला आवडीचा प्रांत आहे, त्यावर लिहा. बाकी, काकस्पर्श पाहिला नसल्यामुळे माझा या विषयावर पास.

-दिलीप बिरुटे

मन१'s picture

7 Aug 2012 - 7:09 pm | मन१

+१

या चित्रपटावरची परिक्षणे वाचल्याने हेही त्यातलेच एक असे असे वाटत होते पण तसे नव्हते.
तुमच्या लेखनातील काही भाग वाचून हसून पुरेवाट झालिये.
का सखे तुजला, नाहणे आले?" यावर त्या सखीने काय उत्तर देणे अपेक्षित आहे?
हा हा हा.
याची वेगळी ष्टोरी आहे. इथे सांगणे प्रशस्त होणार नाही म्हणून गप्प बसते.

रमताराम's picture

8 Aug 2012 - 1:15 pm | रमताराम

नुकत्याच वयात आलेल्या स्त्रीला मखरात बसवणे आणि हे प्रकरण एकूणच साजरे करणे , हे मला अप्रशस्त आणि एम्बरॆसिंग वाटते ... इतकी वैयक्तिक वाटणारी आणि चर्चा करण्यास असभ्य वाटेल अशी ही गोष्ट...अशा गोष्टीचे समारंभ असत पूर्वी !!!
मास्तर तुम्हाला आवडतात की नाही हा मुद्दा अलाहिदा. या समारंभाचे कारण फार सुंदर (पुन्हा मतभेद संभवतोच हे मान्य) रितीने अरुणाताई किंवा शांताबाईंनी विशद केलेले (कुणी ते नक्की आठवत नाही) वाचण्यात आले होते. काकस्पर्श मधे स्त्रीत्त्व जागृत झाल्यावर उमाची जी प्रतिक्रिया उमटली आहे (आणि ज्याबद्दल तुमच्या परदेशी लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे) ती स्वाभाविक असे. एका बंदिस्त समाजात शारीरिक बदलांबाबत अळिमिळी गुपचिळी, अनुल्लेखनीयता असताना असा अचानक सामोरा आलेला बदल धक्कादायक वाटला नाही तरच नवल. याचसाठी तिला यात भीतीदायक काही नाही, हा जगण्याचा भागच आहे यासाठी असा समारंभ करून त्या मुलीला उलट यातून आयुष्यातील एका आनंददायी पर्वाची सुरवातच होते आहे असा दिलासा देण्याचा प्रयत्नच असे तो. चार आपल्यासारख्याच बाया - वयाने मोठ्या असल्याने कदाचित आपल्याहून अधिक माहितगार, अनुभवी - या निमित्ताने आपले कौतुक करत आहेत यातून इतक्या सार्‍या आयाबाया आपल्या सोबत आहेत, आधार देऊ पहात आहे असे आश्वस्त करण्याचा प्रयत्न असतो तो. यातून तिला बसलेल्या तीव्र धक्क्यातून सावरण्याचे बळ नि आधार मिळावा हा हेतू असतो.

आता आजच्या काळातही अनेकांच्या मनातून तो तथाकथित स्टिग्मा जात नसल्याने अंगावर पाल पडल्याप्रमाणे प्रतिक्रिया येतात, यात आपण धड परंपरेबाबत जागरूक ना धड पुरोगामी अशा स्थितीत अडकलेले असतो. मग अर्धवट माहितीवरून उगाचच तीव्र प्रतिक्रिया देण्याची घाई केली जाते.

अवांतरः '२२ जून १८५७' नावाच्या नचिकेत नि जयू पटवर्धन यांचा प्रसिद्ध चित्रपट बहुतेकांना आठवत असेल (इथल्या मंडळींना आठवण्याबाबत तर खात्रीच आहे, पण ते असो.) त्यात देखील धाकल्या चाफेकरांच्या पत्नीला - सीताला - न्हाण आल्यानंतर असाच कार्यक्रम साग्रसंगीत - 'सीताबाईला, चाफेकळील न्हाणं आलं, पैलं न्हाणं आलं' या गाण्यासह - पडद्यावर दाखवला आहे. त्या चित्रपटावर काही आक्षेप आल्याचे स्मरत नाही. प्रश्न वैयक्तिक आवडीनिवडीचा असेलच तर मग तो चित्रपटाचा दोष म्हणता येत नाहीच.

सिनेमा पाहून आल्यानंतर रमताराम यांचे हे http://www.misalpav.com/node/21713 परीक्षण पुन्हा वाचले. त्यातल्या जवळजवळ सर्व मुद्द्यांशी सहमत आहे.
अर्रर्र. हे वाचलंच नव्हतं. धन्यवाद. (आमच्या एखाद्या मुद्द्याशी सहमत होणारा सापडणं मुश्कील. 'जवळजवळ सर्व' मुद्द्यांशी म्हणजे आमची लॉटरीच लागली म्हणायची.)

भडकमकर मास्तर's picture

9 Aug 2012 - 8:17 am | भडकमकर मास्तर

काकस्पर्श मधे स्त्रीत्त्व जागृत झाल्यावर उमाची जी प्रतिक्रिया उमटली आहे (आणि ज्याबद्दल तुमच्या परदेशी लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे)

मी असे नाही लिहिलेले ...
आणि आमचे कस्ले आलेत परदेशी लोक हॅहॅहॅ
प्रश्न वैयक्तिक आवडीनिवडीचा असेलच तर मग तो चित्रपटाचा दोष म्हणता येत नाहीच.
अगदी मान्य...
रूढी / पद्धत नव्हती किंवा चुकीची दाखवली आहे, असे म्हणायचे नाही / नव्हते ... चित्रपटाचा दोष म्हणून तर अजिबात नाही ...२२ जून १८९७ सिनेमामध्येही असे गाणे पहिले आहे...

धक्का बसलेल्या त्या मुलीला दिलासा, बळ आणि आधार देणारी इतकी सुंदर रूढी बंद झाल्याबद्दल ( बहुतेक बंद झालेली असावी ... जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा) दु:ख व्यक्त करतो आणि सध्या हे समारंभ फार दिसत नाहीत त्यामुळे माझ्यासारख्याला हे अप्रशस्त वाटत असावेत , हे मान्य करतो.. "का सखे तुजला नाहणे आले?" हे प्रश्न जनता वयात आलेल्या मुलीला पुन्हापुन्हा विचारू लागल्यानंतर त्यात वाटणारा अप्रशस्तपणाही कमी होऊन जाईल , अशी शक्यता आहे असे वाटते... .ज्यांना ही रूढी पसंत असेल त्यांनी ती पुन्हा सुरू करावी आणि त्यायोगे अर्धवट पुरोगाम्यांचा निरुत्साह आणि सुयोग्य,यथार्थ प्र थां प्रतीचा इग्नरन्स झडून जावा , अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि याविषयीचे माझे वैयक्तिक मत संपवतो.

>> याचसाठी तिला यात भीतीदायक काही नाही, हा जगण्याचा भागच आहे यासाठी असा समारंभ करून त्या मुलीला उलट यातून आयुष्यातील एका आनंददायी पर्वाची सुरवातच होते आहे असा दिलासा देण्याचा प्रयत्नच असे तो.
ओक्के, त्याकाळी बालविवाह होत असत. मग असं न्हाण येण्याआधीच ज्या स्त्रीला वैधव्य आलं तिला पण अशीच वागणूक मिळत असे का ? की असा समारंभ फक्त सवाष्ण मुलीसाठी असे ?

चौकटराजा's picture

9 Aug 2012 - 8:19 am | चौकटराजा

आमचे घरी ही अशी वयात येण्याची गोष्ट घडल्यावर मला ही ती सांगण्यात आली होती. " तिला" हळद कुंकू
लावून मिठाई देण्यात आली. मी " तिचे" याबद्द्ल अभिनंदन केले. आता काही वर्षी गेली. " ती' म्हणते बाबा, हे चूल मूल काय ताप आहे स्त्री च्या वाटयाला ? आता अभिनंदन परत घ्यावे काय ?

अभिज्ञ's picture

13 Aug 2012 - 10:22 pm | अभिज्ञ

मुलींचा वयात येताना सोहळा करायची पध्दत आजही ब-याच खेडेगावात पहायला मिळते.
शहरात ह्याचे फारसे अप्रुप नसले तरी अजूनहि हि पद्धत अस्तित्वात आहे.

माझ्या स्वतःच्या पाहण्यात असले दोन एक समारंभ आले आहेत ते देखील अगदी अलिकडे म्हणजे २००५-६ साली.

त्यामुळे चित्रपटात ह्याचे चित्रण ते देखील १९३० सालातल्या कथेत, मलातरी आक्षेपार्ह वाटले नाही.

काहिवेळा आधी परिक्षण (वाईट पध्दतीचे) वाचल्याने देखील चित्रपट पाहताना उगाच नकारात्मक भुमिका होते.

हा चित्रपट पाहण्या आधी मिपावर संजोपरावांचे परिक्षण वाचले होते. ते वाचून हा फारच टुकार सिनेमा आहे अशी माझी ठाम समजुत झाली होती. परंतु प्रत्यक्षात सिनेमा अजिबात टुकार वाटला नाही. उलट एक चांगला व वेगळ्या विषयावरचा मराठी सिनेमा पहायला मिळाल्याचे समाधान वाटले.

असो.

अभिज्ञ.

पैसा's picture

13 Aug 2012 - 10:40 pm | पैसा

या सिनेमाबद्दल इतकी उलटसुलट टोकाची मतं वाचली आहेत की आता स्वतः पाहिल्याशिवाय मत बनवणार नाही. पण लेख आवडला. या निमित्ताने मास्तरांनी फारच दिवसांनी लिहिले आहे. त्याबद्दल आनंद वाटला.