गेल्या काही दिवसात आपल्याच देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत भारतीयाची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही.
घटना १: स्थळ: गुवाहाटी. एक १५-१६ वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस एका पबमध्ये साजरा करून बाहेर पडत असताना तिची काही माणसांबरोबर वादावादी झाली.त्यानंतर १५-२० जणांनी त्या मुलीचे केस ओढून तिला रस्त्यावर पाडले.त्या मुलीचे कपडे फाडायचा प्रयत्न करण्य़ापर्यंत या हैवानांची मजल गेली.आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार रेकॉर्ड होत होता आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर आला आहे.त्या २० जणांची छायाचित्रे (त्या व्हिडिओतून घेतलेली) फेसबुक आणि इतर अनेक ठिकाणी आली आहेत.त्यांच्या चेहऱ्यांवर आपण करत आहोत ते कृत्य चुकीचे आहे असा पुसटसाही भाव नाही.यातील ३ जणांना पोलिसांनी पकडले आहे पण उरलेले अजूनही सापडलेले नाहीत.
जर का रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला अशा पध्दतीने वागविले जात असेल, तिचे कपडे फाडायचा प्रयत्न होत असेल तर आपण आपल्याला सुसंस्कृत का म्हणवावे?
काही वर्षांपूर्वी मुंबईत सुनील मोरे नामक पोलिस हवालदाराने मरीन लाइन्समधील पोलिस चौकीत एका १५-१६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.त्याच्या पुढच्या वर्षी ३१ डिसेंबरला रात्री गेटवे ऑफ इंडियावर नववर्षाचे स्वागत करत असलेल्या जमावाने दोन मुलींचे कपडे फाडले होते आणि ते कृत्य करणाऱ्यांचे हिंदुस्थान टाइम्समध्ये फोटोही आले होते.नशीबाने या मुलींना त्यांच्याबरोबर असलेल्या तरूणांनी त्यांना वेळीच गाडीतून त्यांच्या घरी नेऊन सोडले.समजा त्यांच्याबरोबर असे कोणी नसते तर त्यांची काय अवस्था झाली असती? अशा घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वयंघोषित नैतिक पोलिसांचे ’मॉरल पोलिसिंग’ चालू झाले. (अजून गुवाहाटीच्या प्रकरणात ते कसे चालू झाले नाही याचेच आश्चर्य वाटते).दरवेळी मुलींनी तोकडे कपडे घातल्यामुळे/दारू प्यायल्यामुळे या प्रसंगांना सामोरे जायची वेळ त्यांच्यावर येते अशाप्रकारचे ठेवणीतले डायलॉग झोडले जातात. इतरांनी काय करावे (तोकडे कपडे घालावे की घालू नये, दारू प्यावी की पिऊ नये) हे सांगायचा अधिकार अशा मॉरल पोलिसांना कोणी दिला?दुसरे म्हणजे मुलींनी तोकडे कपडे घातले हे त्यांच्या अंगाला हात लावायचे समर्थन कसे होऊ शकते?तिसरे म्हणजे तोकडे कपडे म्हणजे नक्की काय?अशा बुरसटलेल्या लोकांना नऊवारी साडीसोडून इतर सर्व काही तोकडेच वाटेल.गेट वे ऑफ इंडियाप्रकरणी हिंदुस्तान टाइम्स मध्ये आलेले फोटो मी पण बघितले होते.गुडघ्याइतक्या लांबीचा स्कर्ट आणि खांदे झाकणारा टॉप असा पेहराव त्या मुलींनी केला होता.याला तोकडे कपडे का म्हणावे?कामानिमित्त मी युरोप आणि ऑस्ट्रेलियात अनेकदा गेलो आहे.तिथे त्यापेक्षाही कितीतरी तोकडे कपडे घातलेल्या मुली असतात.तरीही भर रस्त्यावर त्यांच्या अंगाला हात लावून घाणेरडी कृत्ये होत नाहीत.
दृश्य क्रमांक २: राजधानी दिल्लीपासून ५०-६० किलोमीटर अंतरावरील बागपतजवळच्या एका गावातील खाप पंचायतीने ४० पेक्षा कमी वयाच्या स्त्रियांना बाजारात खरेदीसाठी जाऊ नये, मोबाइल फोन वापरू नयेत अशा स्वरूपाची बंधने घातली आहेत आणि प्रेमविवाहाला बंदी घातली आहे.आणि धक्कादायक बातमी म्हणजे उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी ’प्रत्येकाला आपले विचार मांडायचे स्वातंत्र्य आहे’ असे म्हणत एका पध्दतीने या खाप पंचायतीचे समर्थन केले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानला का नावे ठेवा?असे तालिबान आपल्या देशातच आहेत आणि तेही राजधानीपासून इतक्या जवळ बिनदिक्कतपणे आपले बुरसटलेले विचार मांडतात आणि इतकेच नव्हे तर त्याची सक्ती करतात.मागे हरियाणातील जिंद जिल्ह्यात जातीबाहेर प्रेम केल्याच्या ’गुन्ह्याबद्दल’ एका युगुलाला ठार मारले होते आणि ते कृत्य केल्याचा कसलाही पश्चात्ताप त्या लोकांना नव्हता याची आठवण आली.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नाही असे समर्थन या खाप पंचायतीच्या लोकांनी केले होते.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नसले तर त्यांनी स्वत: प्रेमविवाह करू नयेत.पण ज्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान आहे अशांचा हक्क हिरावून घ्यायचा अधिकार त्यांना कोणी दिला?आणि त्याउपर त्यांना ’आमच्या जीवनपध्दतीच्या’ नावावर ठार मारायचा अधिकार त्यांना कोणी दिला?
अशा घटना वाचल्या की खूप व्यथित व्हायला होते.एक समाज म्हणून आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घ्यायचा अधिकारच नाही असे वाटते.या सगळ्याला जबाबदार कोण आहे?प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगायचा अधिकार आहे आणि आपल्याला ते मान्य नाही म्हणून (किंवा अन्य कोणत्याही कारणाने) अशी कृत्ये करायचा कोणालाच अधिकार नाही हे आपला समाज कधी शिकणार?आणि अशा बातम्या वाचून दु:ख व्यक्त करण्याशिवाय आपण काय करू शकतो?मला पाच वर्षांचा एक मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे.या सगळ्या गोष्टी समजण्याइतकी ही मुलं मोठी नाहीत.पण ती जशीजशी मोठी होतील त्याप्रमाणे मला त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत म्हणजे मोठे झाल्यावर माझी मुले अशा कृत्यांपासून दूर राहतील आणि तोपर्यंत अशा प्रकारांविरूध्द काही चळवळ उभी राहिली असेल तर त्यात पुढाकार घेतील.याव्यतिरिक्त आपण काही करू शकतो का?तुमची काय मते आहेत?
(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
मी "ऐसी अक्षरे" संकेतस्थळावर "पिसाळलेला हत्ती" नावाने वावरतो
मी "उपक्रम" संकेतस्थळावर "आयाळ वाढलेला सिंह" नावाने वावरतो
मी "मायबोली" संकेतस्थळावर "जिभल्या चाटणारा बोका" नावाने वावरतो
प्रतिक्रिया
19 Jul 2012 - 5:56 pm | श्रावण मोडक
अशावेळी काय करावं? ठाम असं काही सांगता येणार नाही मला तरी. दुर्लक्ष, बचाव, समर्थन, प्रतिहल्ला किंवा शरणागतता असे पर्याय असतात. त्या-त्या परिस्थितीनुसार मी यातला एखादा पर्याय वापरेन. परिस्थिती या शब्दामध्ये प्रतिसाद ज्याला द्यायचा आहे तो आयडीही येतोच. काही आयडी असे असतात, की दुर्लक्ष करावे हे उत्तम.
या धाग्यावरील तसले काही प्रतिसाद मी वर्गमूळ - घनमूळ काढून घेतले. पुरूष म्हणून झालेले काही उल्लेख मी सपशेल नाकारले आणि त्याकडे दुर्लक्ष केले.
कविता महाजन या आयडीशी थोडा संवाद करू पाहिला तो काही स्वाभाविक कारणांसाठी. त्यातील एक कारण म्हणजे हा आयडी 'ब्र' लिहिणाऱ्या कविता महाजन यांचा असेल तर माझी अपेक्षा थोडी अधिक किंवा वेगळी होती. कदाचित त्यासाठी वेगळा धागा काढावा लागला असता त्यांना, हीही शक्यता आहे. पण त्यांनी इथं प्रतिसाद देताना वापरलेले ते शब्दप्रयोग नको होते, असे मला वाटले इतकेच.
19 Jul 2012 - 6:15 pm | बॅटमॅन
व्हाईस वर्सा होणे शक्यच नाही कल्पनेतसुद्धा. आंजावरसुद्धा समानतेचा बोर्या वाजलाय हे दिसतंच आहे.
20 Jul 2012 - 10:52 am | इनिगोय
इथे येणारे लोक समाजातूनच इथे येतात ना? त्यामुळे ते तिथले गुणदोष आणणारच. इथल्या आभासी जगात केव्हा ना केव्हा मूळचा येळकोट उघडा पडणारच की.
आणि दुसरी बाजू अशी की काही सरळपणाचा आव आणतात, तर काही खरंच सरळ असूनही त्यांच्यावर आव आणल्याचा आरोप होतो!
सगळे पुरुष, सगळ्या बायका, सगळे अमूक आणि सगळे तमूक असे वर्गीकरण करत सुटणार्या लोकांना 'सगळे मूर्ख' म्हणून नाद सोडून देणे या पलीकडे काय करू शकणार आपण?
@मन१---, "खरं तर कुणीही कुणालाही इतकं स्पष्टीकरण देणं लागतं का?" या तुमच्या वाक्याशी मी १००% सहानुभूत आहे. आपलं वागणं, विचार सततच कोणाला तरी जस्टीफाय का करावे कोणी? आणि त्यातही समोरच्याचा अनुभव नसताना, प्रत्यक्ष भेट नसताना वाईट कॅटेगरीतलाच असण्याचं अनुमान काढणारे लोक म्हणजे अगदी थोरच. अशा थोरांना आत्मशून्यच्या उत्तराचीच भाषा वापरायची. आपला मुद्दा / बाजू पटवून देणं यांच्यापुढे निरर्थक ठरतं.
19 Jul 2012 - 4:17 am | शिल्पा ब
हा विषय चालु असतानाच आजच एक बातमी पाहीली
http://www.youtube.com/watch?v=wtvRT2lCZaE
न्यु यॉर्क सबवे मधली गोष्ट.
19 Jul 2012 - 7:44 am | पुण्याचे वटवाघूळ
आज टाईम्स ऑफ इंडियामध्ये पुढील दोन धक्कादायक बातम्या वाचल्या. आपल्याच समाजातील काही स्त्रिया अशा विचार करतात हे वाचून खरोखरच आश्चर्य वाटले. या दोन्ही बातम्या "गुवाहाटी" आणि "बागपत" शीच रिलेटेड आहेत म्हणून त्या याच चर्चेत देत आहे.
१. महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी मुलींना विनयभंग टाळण्यासाठी काळजी घेऊन त्याप्रमाणे कपडे घालायची सूचना केली. दुवा
२. महिलांवर बंधने घालायच्या खाप पंचायतीच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्व महिला सभा जीन्स आणि टॉपची होळी करणार आहेत. दुवा
म्हणजे याचा अर्थ समाजात स्त्रीचे दुय्यम स्थान काही स्त्रियांनाच मान्य आहे असा घ्यावा का? खरोखरच आश्चर्य वाटायला लावले या दोन बातम्यांनी.
19 Jul 2012 - 8:08 am | शिल्पा ब
मुर्खपणा आहे.
मी वारंवार जे म्हणतेय की घरातच आई - बापाने मुलांना स्त्रीयांना सन्मानाने वागणुक द्यावी हे शिकवावं ते फक्त सुसंकृत घरातच शक्य आहे जिथे स्त्रीला स्वत्वाची अन जबाबदारीची जाणिव आहे.
हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे असं माझं मत. असं काहीतरी केल्याने / बोलल्याने पेप्रात छापुन येतं एवढंच.
19 Jul 2012 - 2:28 pm | बॅटमॅन
पण निव्वळ पब्लिसिटी पाहिजे असती तर खाप पंचायतीला विरोध करून अजून जास्त मिळाली असती नाही का? जर हा पब्लिसिटी स्टंट असेल तर त्यांची चॉईस गंडली असेच म्हणायला पाहिजे.
19 Jul 2012 - 5:49 pm | Kavita Mahajan
विपाशा
तुझ्या रोजच्या
जायच्या यायच्या वाटेवर पाळत ठेवून
बरोब्बर गाठलं तुला त्यांनी
नेहमीप्रमाणं
लेक्चर देण्यासाठी जात असताना
किंवा लेक्चर देऊन परत येत असताना
तू तावडीत सापडलीस त्यांच्या
तुझ्या रथातून
तुला खाली खेचलं त्यांनी
तू नेहमी घालायचीस
तसलाच एक शुभ्र कफ़नीवजा ट्रायबॉन
तू अंगात घातलावतास त्या दिवशीही
तो फ़ाडून ओरबडून काढायला
हजार हात पुढं सरसावले
चहूबाजूंनी
भर रस्त्यात तुला नागवं केलं त्यांनी
षंढनीतीच्या
सनातन नियमांना अनुसरून
...........भिजकी वही ....या अरुण कोलटकर यांच्या संग्रहातील " विपाशा " या कवितेतील समकालीन
वास्तवाला लागू पडणार्या ओळी...
कवितेचा शेवट भयानक अस्वस्थं करणारा आहे.....
19 Jul 2012 - 6:00 pm | श्रावण मोडक
!
19 Jul 2012 - 6:05 pm | पैसा
हो. ज्यांची मनं अजून जिवतं आहेत त्याना वाटतं. पण समाज जेव्हा मॉब होतो, तेव्हा तो कुत्र्यांच्या कळपासारखा वागतो. त्या बेहोशीत कदाचित एरवी सरळ असणारे लोक सुद्धा वाहून जात असावेत. इथेच गविनी एका प्रतिसादात म्हटल ते इथे जास्त लागू होतं, मॉबसमोर मुला-पुरुषांची हीच अवस्था होते. पण मामला जेव्हा एका रोडसाईड रोमिओचा असेल तेव्हा बरेचदा तीव्र नजरेने काम होतं. बसमधे ट्रेनमधे हाताळण्याचे प्रसंग असतील तेव्हा मुलीनी घोळक्याने राहून अशाना सरळ करणे हा उपाय. माझ्या मुलीलाही मुलाबरोबरच तैकवांडोचं शिक्षण दिलेलं आहे आणि अगदी किरकोळ दिसणारी ती नुसत्या हाताने कौलाचे तुकडे करू शकते. तिच्यावर कोणताही प्रसंग समजा कधी आला तर ती नीटपणे त्याचा सामना करू शकेल याची मला खात्री आहे.
19 Jul 2012 - 9:55 pm | अर्धवटराव
>>माझ्या मुलीलाही मुलाबरोबरच तैकवांडोचं शिक्षण दिलेलं आहे आणि अगदी किरकोळ दिसणारी ती नुसत्या हाताने कौलाचे तुकडे करू शकते. तिच्यावर कोणताही प्रसंग समजा कधी आला तर ती नीटपणे त्याचा सामना करू शकेल याची मला खात्री आहे.
-- हाच तो, स्ट्रेट, थेट, पर्फेक्ट उपाय.
हा सूर्य, हा जयद्रथ.
अर्धवटराव
26 Jul 2012 - 7:39 am | पुण्याचे वटवाघूळ
हा धागा उगीचच वर आणायचा नाही. पण काल अशी अजून एक घटना घडली. बंगलोरहून म्हैसूरला ट्रेनने जात असलेल्या एका मुलीचा ट्रेनमध्ये विनयभंग करायचा प्रयत्न झाला. त्यास तिने विरोध करताच नराधमांनी तिला ट्रेनमधून खाली फेकून दिले. ही घटना कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील.
या चर्चेत मुलींच्या कपड्यावर आणि दारू पिण्यावर गरमागरम चर्चा केलेल्या संस्कृतीवाद्यांनी आता या मुलीने पण अंगप्रदर्शन करणारे कपडे घातले होते का आणि दारू प्यायली होती का हे सांगावे.
26 Jul 2012 - 10:14 am | गवि
आता बोला असं म्हणून कानफाटात मारणारा हा प्रश्न असला तरी मु़ळात हा एक न संपणारा विचारातला घोळ आहे.. दारु पिऊन किंवा मध्यरात्री (स्थलपरत्वे मध्यरात्रीची वेळ ठरते) किंवा कमी कपडे घातल्यानेच बलात्कार होतात, अतएव प्रत्येक बलात्कारित स्त्री ही कमी कपडे घालणारी, दारुडी, चवचाल असते असं अजिबात नाही. त्याउपर समजा ती तशी असली तरी कोणालाही तिच्यावर बलात्कार करण्याचं लायसेन्स मिळत नाही हे सर्व मुद्दे इतके ढोबळपणे सत्य आहेत की ते पुन्हापुन्हा बोलण्यात आता अर्थ नाही.
त्याचसोबत एक साधा विचारही डोक्याआड करण्यात शहाणपणा नाही की अमुक प्रकारे वागल्याने बलात्कार / विनयभंग होतो किवा होणं योग्य आहे हे चुकीचं असण्याचा अर्थ असा नव्हे की स्थलकालपरत्वे आपल्या शहाणपणातून अशी शक्यता किमान आपल्याबाजूने टाळणं हेही चूक आहे..
१. अगदी बिनवर्दळीच्या लहान गावातल्या आडरस्त्यावर रस्त्याच्या डावीकडे नीटपणे सर्व खबरदारी घेऊन वाहन चालवणार्यालाही एखादा बेदरकार तुफान दारु प्यायलेला ट्रक ड्रायव्हर येऊन उडवून जातो. ट्रकवाल्याची चूक असते. तो अमानुष असतो.. तो राक्षस असतो..
२. भारतात, त्यातही उदा. मुंबईत, अन त्यातही उदा. प.द्रुतगती महामार्गावर रस्त्याच्या डावीऐवजी उजव्या बाजूने (हा सर्व "स्थलकालपरत्वे"चा भाग) भर पावसात हेल्मेटशिवाय बाईक चालवली असता भीषण अपघाताची शक्यता जास्त असते..तिथेही ट्रकवाला आपल्याला उडवू शकतो. इथेही तो प्यायलेला आणि बेदरकार असू शकतोच.. याउप्पर इनफॅक्ट मजबुरीखातर हेल्मेट न घालता गेलेल्या एखाद्या बाईकस्वाराला ठार मारण्याचा कोणताही अधिकार ट्रकवाल्याला नाही. ..
इन बोथ केसेस ट्रकवाला दोषी आहेच आहे..आणि रस्त्याच्या कोणत्याही बाजूने बाईक चालवली तरी ट्रकवाल्याचं समर्थन होऊ शकत नाही.. पण..
फक्त पहिल्या उदाहरणातल्या सत्यतेमुळे दुसर्या बाबतीत आवश्यक होती पण घेतली गेली नाही अशी खबरदारी कशी बरं निरर्थक ठरते?
की सरळमार्गी वाहनचालकांनाही ट्रकवाले उडवतातच की असं म्हणून आधी ट्रकवाल्यांच्या प्रबोधनाखेरीज आणि सर्वसमावेशक सुधारणेखेरीज आम्ही हेल्मेटही घालणार नाही असं म्हणायचं??
आणि "रात्रीचा हायवेने चाललायस, हेल्मेट घालून स्लो चालव रे बाबा गाडी" असं सांगणार्या बापाला दुसर्या सकाळी पेपरातली "रस्त्यावर झोपलेल्या निष्पाप बालकाला ट्रकवाल्याने ठार केल्याची बातमी" दाखवून विचारायचं का "बाबा आता बोला.. हेल्मेट वापरण्याविषयी अन गाडी स्लो चालवण्याविषयी तावातावाने चर्चा करत होतात ना? त्या लहानग्याने काय चूक केली होती? तो तर गाडीही चालवत नव्हता.."
असो...
26 Jul 2012 - 10:58 am | मस्त कलंदर
तुमचा मुद्दा जरी बरोबर असला, तरी प्रत्येकवेळी 'मुलींचे कपडेच याला कारणीभूत असतात' हा मूर्ख वाद समोर आल्याने डोक्यात जातो. तसेच "ज्या संस्कृतीच्या प्रभावामुळे किंवा अभावामुळे गुवाहाटी आणि इतरत्र स्त्रियांना त्रास देणारे समाजकंटक तयार झाले, त्याच संस्कृतीचा दुसरा चेहरा म्हणजे पबमधे जाणारी १५/१६ वर्षांची मुलं मुली." अशीच वाक्येही चीड आणतात. आपली आपण काळजी घ्यावी हे आहेच, ती घेतलीही जाते(सर्वसामान्य स्त्रिया स्वतःला त्रास होईल असे वागून "आईगं, मला पहा त्रास झाला" असे गळे काढत नसाव्यात") लोक त्रास देतात म्हणून कुणी बायकांनी सिगारेट ओढायला किंवा दारू प्यायला सुरूवात केली असेलसं वाटत नाही. सीताहरण-द्रौपदी वस्त्रहरणाच्या काळातल्या स्त्रियांनाही त्रास झाला आणि आताही तो त्रास होतोच आहे. पण एका मुलीने कमी कपडे घातले म्हणून सातच्या आत घरातल्यासारखे,"झाकण उघडे ठेवल्यावर कुणीही हात घालणार" सारखं निर्लज्ज वक्तव्य काय किंवा "मुलींच्या तोकड्या कपड्यांमुळेच हे प्रकार होतात" ही दोन्ही वक्तव्य सारखीच वाटतात. याच धाग्यात मुलींनी/स्त्रियांनी आपल्याला कोणत्या त्रासांतून जावे लागले आहे हे लिहिले आहे, तेव्हाच्या वावराची ठिकाणं पाहता त्या योग्य त्या कपड्यांत असाव्यात असे वाटते. तसेच त्या सगळ्या पबात जात असाव्यात असे भौगौलिक व तत्कालिन स्थितीनुसार वाटत नाही, आणि त्यांना त्रास देणारे कंटकही कुठल्या पबांमधल्या मुलींना पाहून चेकाळून आलेले आणि म्हणून इतर स्त्रियांना त्रास देत आहेत असे वाटत नाही!!!
वरच्या बातमीबद्दलः २००५-६ साली आमच्या महाविद्यालयाची सहल घेऊन म्हैसूर-बंगळुरूला गेलो होतो. मुलांची संख्या जास्त असल्याने दोन बोगीमध्ये सगळॅ विद्यार्थी-विद्यार्थिनी बसले होते. गुलबर्गा-शहाबादच्या इथे काही कॉलेजला जाणारी मुलं आमच्या डब्यात चढली. सकाळची वेळ होती. एक साधारण ४०+ वयाची स्त्री उठून सकाळचे कार्यक्रम आटपत असताना तिची सीट ते टॉयलेट अशा तिच्या २-३ फेर्या झाल्या. तेव्हा त्या बाईने ढगळ पायजमा घातला होता. तरीदेखील ती १८-२४ ची मुले तिच्याकडे अत्यंत गलिच्छ् नजरांनी पाहात होती. नंतर आमच्या विद्यार्थ्यांपैकी काही मुले मुली एकत्र सर्वात वरच्या सीटसवर समोरासमोर बसून गाण्याच्या भेंड्या खेळत होती. जनरली पाहणारे दुरून आणि चोरून पाहतात, तर त्या मुलांनी अक्षरश: त्या सीटसना गराडा घातला आणि प्रत्येक मुलीला ते स्कॅन करत होते. आठदहा मुले एका फुटाच्या अंतरावरून अशी बघताना पाहून त्या मुलींचे काय झाले असेल? तिथे बसलेल्या मुलांनी आवाज करायचा प्रयत्न केला तर हे आठदहाजण काहीतरी जोरात यंडूगुंडू ओरड्ल्यावर त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. सुदैवाने त्यांच्या आसपासच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला कळवल्यानंतर दोन्ही बाजूनी येणारी आमची सेना पाहून त्या निर्लज्जांनी काढता पाय घेतला.
मुंबईत आल्यानंतर बातम्यांमध्ये हैद्राबादहून मुंबईला येणार्या एक्सप्रेसमध्ये सर्वात खालच्या बर्थवर झोपलेल्या बाईवर, तर एका बाईला टॉयलेट मध्ये नेऊन, असे एकूण तीन की चार स्त्रियांवर बलात्कार केल्याच्या बातम्या होत्या!!
26 Jul 2012 - 11:15 am | गवि
उपरोक्त सर्व वाक्य अयोग्य आहेत. त्याविषयी तुमचा विरोध आणि चीड ही रास्त, साहजिक, स्वाभाविक आणि योग्य आहे. कोणी कोणी काय काय म्हणालं याची व्यक्तिगत चर्चा शक्य नसल्याने मुख्य मुद्दा इतकाच मांडू इच्छितो की एक मर्यादा सांगणारा /री प्रत्येकजणच सनातन, दुरित, प्रतिगामी, एमसीपी, बलात्कारसमर्थक, स्त्रीविरोधक, स्वातंत्र्यभंजक असते असं नव्हे.
अगदी बहुधा तुमच्याच प्रतिसादात "सीनियर मुलींनी" बॅग समोर धरण्याविषयी सांगून तुम्हाला जे खबरदार केलं त्या सिनीयर मुली ग्रोपिंगसमर्थक होत्या? त्या बसमधल्या मवाल्यांचं / भेकडांचं घाणेरडं वागणं याचं त्या समर्थन करत होत्या? नाही.. नक्कीच नाही.
तेव्हा कपड्यांविषयी शब्दही काढणार्या सर्वांना एका पंक्तीत बसवून घाऊक विरोध नको.. केवळ त्या "सीनियर मुलींनी" ज्या मनोभूमिकेतून तुम्हाला सांगितलं तितक्याच आणि तशाच भूमिकेतून सांगणारेही असतात इतकी जाणीव देण्यासाठी केवळ..
29 Jul 2012 - 10:43 am | पैसा
या धाग्यावर मी प्रतिसाद देणार नव्हते, पण मी लिहिलेल्या वाक्यात काय अयोग्य आहे ते कृपया समजावून सांगा. मी फक्त सत्य आहे ते लिहिलंय. भारतात १५//१६ वर्षाची पबमधे जाणारी मुलं मली नाहीत का समाजकंटक नाहीत? नक्की कोणत्या अर्थाने या वाक्याला तुम्ही अयोग्य ठरवताय? मी कुठे असं म्हटलय की बलात्कार करणे योग्य आहे? की मुलीनी अमके कपडे घातले म्हणून बलात्कार होतात? कोणीही माझ्या एकाही प्रतिसादात असा अर्थ निघतो असं दाखवून दिलं तर मी मिपावर यायचं काय, इंटरनेटवर यायचं सोडून देईन.
इथे बरेच जण सिलेक्टिव्ह रीडिंग करत आहेत आणि काही जणांवर हे जुनाट असे शिक्के मारून नुसता गोंधळ घालत आहेत. काही वर्षानी हा धागा वाचणार्याला इथे नेमकं काय चाललं होतं असा प्रश्न पडेल.
29 Jul 2012 - 4:10 pm | गवि
गोंधळ झालाय थोडा.. सवड काढून डीटेल रिप्लाय करतो. तुम्हाला वाटतंय तसं नाय...
26 Jul 2012 - 11:07 am | प्रभाकर पेठकर
१०० % सहमत, गविसाहेब.
शेवटचा परिच्छेद विशेष महत्त्वाचा. कित्येक प्रतिसादात हे स्पष्ट केले आहे की हा नुसता पुरुषांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांचा विषय नाही. सबळांनी दुर्बलांवर केलेल्या अत्याचाराचा आहे. आणि दुर्बलांवर अत्याचार जगभर होत आहेत, होत राहणार. हे वास्तव आहे, कसलेही समर्थन नाही.
दुर्दैवाने, (मला वाटतं) काही सद्हेतुने सुरु केलेला हा चर्चाप्रस्ताव, 'संस्कृतीरक्षक' आणि 'असंकृतीरक्षक' अशा, भांडणे लावण्याच्या हीन, उद्देशाने मुद्दामहून भरकटवला जातो आहे. माझा त्या उद्देशाला पाठींबा नसल्याकारणाने मी ह्या विषयावर काही भाष्य करणार नाही.
28 Jul 2012 - 11:50 pm | आनंदी गोपाळ
शेवटचा परिच्छेद विशेष महत्त्वाचा. कित्येक प्रतिसादात हे स्पष्ट केले आहे की हा नुसता पुरुषांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांचा विषय नाही. सबळांनी दुर्बलांवर केलेल्या अत्याचाराचा आहे. आणि दुर्बलांवर अत्याचार जगभर होत आहेत, होत राहणार. हे वास्तव आहे, कसलेही समर्थन नाही.
"होत रहाणार" हे भविष्य आपण कोणत्या आधाराने वर्तविले आहे?
'संस्कृती' जेव्हा विकसित झाली, तेव्हाच दुर्बळावर अत्याचार होऊ नयेत म्हणून 'सेफगार्ड्स' तयार होऊ लागले. Do you believe in intrinsic goodness of humanity at all? Do you believe in society at all?
वर आपण कितीही घुमवून फिरवून 'कसलेही' समर्थन नाही असे प्रतिसाद लिहिले असलेत, तरी श्री पेठकर साहेब, हे 'होत रहाणार' वाचल्यावर पुन्हा एकदा आपण चुकीचे लिहित आहात असे वाटले.
(आजपर्यंत ८ वेळा हा धागा वाचून प्रतिक्रिया लिहिण्याचे टाळत होतो. पण पुनःपुन्हा तुम्ही अन तुमच्या समर्थकांनी मांडलेली विधाने वाचून राहवले नाही व लिहिले.)
29 Jul 2012 - 1:06 am | प्रभाकर पेठकर
श्री. आनंदी गोपाळ साहेब,
आपण चुकीचे लिहित आहात असे वाटले.
आपल्याला असे वाटण्यात कांहीच अनैसर्गिक नाही. आपल्याला आपल्या मतांचे स्वातंत्र्य नक्कीच आहे.
29 Jul 2012 - 1:59 am | अर्धवटराव
"हे असं होत राहाणार" याला एकमेव कारण मनुष्याच्या मनातलं द्वंद्व आहे. एकाच मनात नांदणारा एक विचार/भावना/प्रेरणा त्याच मनातल्या दुसर्या विचारावर/भावनेवर/प्रेरणेवर बलात्कार करतं. याच बिजाचे पुढे कुटुंब, समाज, देश वगैरे वृक्षात रुपांतर होतं. कारण humanity हि एका प्राण्याची - जरा विकसीत, पण प्राण्याचीच - state आहे. त्यातला intrinsic goodness जितका सत्य आहे तेव्हढाच intrinsic badness सुद्धा. असो.
अर्धवटराव
29 Jul 2012 - 8:17 pm | एमी
धागा परत वर आलाच आहे तर... वेळ आणि इच्छा असेल तर हेही वाचुन पहा... m.timesofindia.com/PDATOI/articleshow/15253358.cms
31 Jul 2012 - 12:42 pm | निनाद मुक्काम प...
@तरी श्री पेठकर साहेब, हे 'होत रहाणार' वाचल्यावर पुन्हा एकदा आपण चुकीचे लिहित आहात असे वाटले.
स्वप्न रंजन किंवा पोकळ आशावाद किंवा शिणेमा मध्ये दाखवतात तसे त्याचा शेवटी नायका मुळे समाजातील सर्व सिस्टीम मुळापासून बदलली जाते व सरत शेवटी
रामराज्य सुस्थापित होते.
पण वास्तविक आयुष्यात ह्याच्या अगदीच विपरीत घडते. हे आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेल्या पेठकर काकानी लिहिले.
आपल्या बालपणापासून गावात एका महिलेची विवस्त्र करून धिंड काढण्यात आली अशी बातमी वर्षातून एकदा तरी वाचून ,वाचून दुर्दैवाने ती शहरातील लोकांच्या एवढी अंगवळणी पडली आहे. की आसाम घटने नंतर पुढच्या आठवड्यात अश्या प्रकारची बातमी वृत्त पत्रात आली होती.
तेव्हा शिक्षण व प्रसार माध्यमांच्या मार्फत ह्या विषयांवर जनजागृती करणे हाच प्रभावी उपाय आहे.