सखा श्रावण

चंद्रप्रभा's picture
चंद्रप्रभा in जे न देखे रवी...
16 Sep 2007 - 3:32 pm

सखा श्रावण

नागपंचमीचा झुला हात टेकवी आभाळा
इंद्रधनुच्या फुलाने स्वर्ग पृथ्वीवर आला

हिरवा शालू सजविते फुलपाखरांची नक्षी
पंख भिजले झाडीती तरुवेलीवर पक्षी

खेळ पाठशिवणीचा चाले आकाशी ढगांचा
खेळ पृथ्वीवर रंगे तेंव्हा उन-सावलीचा

आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला
हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला

गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं
गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं

नमःशिवायचा नाद आसमंतात दाटला
फेर धरा गं सयांनो सखा श्रावण हा आला

-चंद्रप्रभा

(येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे.)

कविता

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

16 Sep 2007 - 4:21 pm | प्रियाली

सोप्या शब्दांतली निरागस कविता आवडली.

येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे.

स्वागत आहे. अजून लेखन होऊ दे. पुढील लेखनाला शुभेच्छा!

चंद्रप्रभा's picture

22 Sep 2007 - 11:18 am | चंद्रप्रभा

प्रतिक्रया वाचुन छान वाटले.

विसोबा खेचर's picture

16 Sep 2007 - 4:29 pm | विसोबा खेचर

नागपंचमीचा झुला हात टेकवी आभाळा
इंद्रधनुच्या फुलाने स्वर्ग पृथ्वीवर आला

गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं
गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं

साधी, सोपी आणि सुंदर कविता... वरील ओळी आवडून गेल्या...

>>(येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे.)

मिसळपाववर आणि पर्यायाने आंतरजालावर आपले स्वागत.. औरभी लिख्खो..

तात्या.

चंद्रप्रभा's picture

23 Sep 2007 - 3:03 pm | चंद्रप्रभा

तात्या साहेब,
या स्थळावर स्वागताबद्द्ल धन्यवाद.
यामुळे मला अनेक वाचकां पर्यंत पोहोचता आले
आणी माझा उत्साह दुणावला.
कवितेवर प्रतिक्रीया लगेच वाचायला मिळाल्या्ने छान वाटले.
सकाळ मध्ये मी कविता पाठवत असे, पण वृत्तपत्रिय लेखनात, हे लगेच प्रतिसाद असणे नव्हते.
असो,
लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे परत वाचतांना ज्या चुका दिसल्या त्या आता काढल्या.

-चंद्रप्रभा

धनंजय's picture

18 Sep 2007 - 5:55 am | धनंजय

> खेळ पाठशिवणीचा चाले आकाशी ढगांचा
> खेळ पृथ्वीवर रंगे तेंव्हा उन-सावलीचा
वा!
आंतरजालावर स्वागत आहे तुमचे.

चंद्रप्रभा's picture

23 Sep 2007 - 3:04 pm | चंद्रप्रभा

आपली प्रतिक्रीया वाचुन उत्साह वाटला.
आपणही कविता करता असे दिसते.

-चंद्रप्रभा

चित्रा's picture

18 Sep 2007 - 6:34 am | चित्रा

कविता. प्रसन्न वाटले.

चंद्रप्रभा's picture

23 Sep 2007 - 3:07 pm | चंद्रप्रभा

आपली प्रतिक्रीया वाचुन,
मलाही प्रसन्न वाटले.
अश्या त्वरीत प्रतिक्रीयेने छान वाटते आहे.

असे कधी कधी शब्द जुळतात, जुळून येतात.
कविता मनासारखी उतरली कीही वेगळेच प्रसन्नपण लाभते. त्यावर प्रतिसाद येणे म्हणजे आनंदच आहे.

-चंद्रप्रभा

सृष्टीलावण्या's picture

16 Mar 2008 - 8:51 pm | सृष्टीलावण्या

@आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला
हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला

पाश्चिमात्य जगातल्या Red Carpet पेक्षा ही हिरवी पायघड कितीतरी नेत्रसुखद.

>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

प्राजु's picture

16 Mar 2008 - 9:06 pm | प्राजु

चंद्रप्रभाताई,
मिपावर स्वागत.
आपली कविता अतिशय देखणी (हो देखणीच) आहे...

गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं
गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं

नमःशिवायचा नाद आसमंतात दाटला
फेर धरा गं सयांनो सखा श्रावण हा आला

या ओळी तर अगदीच दूधात साखर... अशाच आणखिही येऊदेत तुमच्या कविता.

- (सर्वव्यापी)प्राजु

सचिन's picture

16 Mar 2008 - 9:08 pm | सचिन

सुरेख कविता !
हिरवा शालू सजविते फुलपाखरांची नक्षी
पंख भिजले झाडीती तरुवेलीवर पक्षी
यांसारख्या ओळींमुळे वाटते की त्या श्रावणझरींमधे आम्हीही भिजतो आहोत.

कुसुमाग्रजांच्या
हासरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजरा श्रावण आला
तांबूस कोमल पाऊल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण आला...
ची आठवण झाली.

या मोहक अनुभूतीबद्दल धन्यवाद !
आणि मिपावर सुस्वागतम !

अविनाश ओगले's picture

16 Mar 2008 - 9:12 pm | अविनाश ओगले

वेगळी, पसन्न. हिरवाईचा आनंद देणारी.

चंद्रप्रभाताई,

आपल्या आईच्या कविता लोकांपर्यंत पोहोचाव्यात असे मुलाला वाटणे हाच तुमच्यातील कवयित्रीचा पहिला विजय. एरवी आईच्या (नोकरी/घर्/नातेवाइक/मैत्रिणी/स्वयंपाक) व्यतिरिक्त इतर व्यक्तिगत जाणिवांशी मुलांची उत्तरोत्तर ताटातूट होत जाते आणि हा नव्या कुटुंबव्यवस्थेचा/ नव्या जमान्याचा परिणाम आहे असा माझा एक समज आहे. तेंव्हा हा एका ''आई"चा ही विजय ठरतो.

इतकी छान समज असण्याबद्दल तुमच्या मुलाचेही अभिनंदन!!!

आता यापुढे मात्र तुम्ही आणि तुमच्या कविता......

-एक इसम

नन्दु's picture

16 Mar 2008 - 10:52 pm | नन्दु

खरच मनाला आनद देनारि व उल्लासित करनारि कविता
छान!!!!!!!!!

मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

स्वाती राजेश's picture

17 Mar 2008 - 12:24 am | स्वाती राजेश

सुंदर कविता लिहिली आहे..
आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला
हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला
या ओळी आवडल्या.
अशाच तुमच्या सुंदर कविता आम्हाला वाचायला मिळू दे..
पुढील कवितांची वाट पहात आहे.

लगोलग छानशी चाल लावली जावी आणि माणिक वर्माबाईंच्या गोड गळ्यातून हे गाणे यावे असे कुठेतरी वाटून गेले!

तुम्हाला टंकलेखनात साहाय्य्भूत ठरलेल्या तुमच्या मुलाचेही कौतुक!

चतुरंग

वरदा's picture

19 Mar 2008 - 7:55 am | वरदा

गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं
गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं

ह्या ओळी विशेष आवडल्या...तुमच्या मुलाचीही एखादी कविता इथे नक्की द्या..अजून खूप कवितांची वाट पाहतेय...

वरदा

सुधीर कांदळकर's picture

19 Mar 2008 - 11:00 pm | सुधीर कांदळकर

चांगली आहे कविता.

गहिवरला मेघ नभी ची आठवण झाली.

शुभेच्छा. पण लवकरच मुलाच्या मदतीशिवाय लिहू लागा. जालनिरक्षरता बरी नव्हे.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

निनाद's picture

19 Aug 2011 - 11:47 am | निनाद

श्रावण सुंदर आला...