वीरगळ
महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्पे आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. तेच हे वीरगळ.
वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ. हे वीरगळ महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बहुसंख्येने दिसतात.
पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एखाद्या वीरपुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला, गाईगुरांना पळवून लावणार्यांपासून त्याचे संरक्षण केले, दरोडेखोरांकडून गावाचे संरक्षण केले आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राणोत्क्रमण झाले तर त्याचे स्मारक ऊभारण्यात येई.
उभट, आयताकृती दगड, त्याच्या चारही बाजूंना चौकटी कोरलेल्या, वर घुमटी अशी याची रचना. चारी बाजूंच्या चौकटींमध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले, एका चौकटीवर आडवा पडलेला वीर आणि घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले अशी यांची सर्वसाधारण रचना. वीरगळांवर वीराचे नाव कोरण्याची प्रथा नाही किंवा युद्धाची माहिती लिहिलेले शिलालेखही त्यावर आढळत नाहीत.
काही वीरगळांवर सागरी युद्धेही कोरलेली आढळतात. मुंबईतल्या एका वीरगळावर जहाजांमधील युद्ध कोरलेले आहे. हा वीरगळ उत्तर कोकणातल्या शिलाहार राजवटीमध्ये खोदला गेला.
महाराष्ट्रातील बहुतांश वीरगळ हे शिलाहारकाळ आणि यादवकाळात मोठ्या प्रमाणावर उभारले गेले.
१. रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असणारा वीरगळ
२. राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या बाजूस असणारा वीरगळ
३. माहुली किल्ल्यावरील भग्नावस्थेतील वीरगळ
गधेगाळ
ही शिळाशिल्पे बहुतेक वेळा शापवाणी (कर्स मेकर्स) करण्यासाठी निर्मिली गेली. वीरगळांप्रमाणेच यांचा उगम शिलाहारकालीन. यादवकाळातही हे गधेगाळ कोरले गेले.
वीरगळांसारखीच यांची रचना. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत.
घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर काही मंगलवचने तर खालच्या बाजूस अभद्र वचने कोरलेली. व त्या खाली अजून एक शिल्प कोरलेले. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर संकर दाखवलेला. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ.
काही वेळा ह्या असभ्य शिल्पांबरोबरच वरच्या बाजूस शिवलिंगाची पूजेचे शिल्प पण कोरले गेले आहे.
नागाव, अलिबाग येथील अक्षी गावातील गधेगाळ शिल्प सर्वात प्राचीनतम मानले जाते. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी याचे संपूर्ण वाचन केले.
गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।
स्त्री कोंकणा चक्री- वर्ती। स्त्री केसीदेवराय।
महाप्रधा- न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।
सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।
भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु।
महालषु- मीची वआण। लुनया कचली ज-
शके ९३४ अर्थात इ.स. १०१२ मधला हा संकृत मिश्रीत मराठी शिलालेख मराठीतील सर्वात आद्य लेख आहे. श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वराच्या सर्वमान्य आद्यलेखापेक्षाही जुना.
ह्याचा अर्थ असा-
कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.
ह्या खालच्या तीन ओळींत मात्र अभद्र वचन कोरलेले आहे.
हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे
व त्या खालच्या शिल्पामध्ये गाढव व स्त्रीचा संकर दाखवलेला आहे.
ह्या शिलालेखाच्या वरील भागात चंद्र सूर्य कोरलेले असून मधल्या ओळी मात्र आता बर्याचशा पुसट झालेल्या आहेत.
रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीतल्या अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात एक हत्तीगाळ जमिनीत अर्धवट रोवलेला आढळतो. घुमटीवर चंद्र-सूर्य कोरलेले असून मधल्या चौकटीत शिवपिंडीचे पूजन दाखवले आहे. तर खालच्या बाजूस हत्तीबरोबर संकर दाखवला आहे. शिलालेखाच्या ओळी पूर्णपणे बुजलेल्या आहेत.
जो कोणी ह्या शिवलिंगाच्या पूजेचा अव्हेर करेल त्याची अशी अवस्था होईल असा ह्या शिल्पाचा अर्थ काढता येतो.
हे शिल्प शिलाहार झंझ राजाच्या कारकिर्दीत घडवले गेले असावे (साधारण १० वे शतक) कारण अमृतेश्वराच्या मंदिराचा कर्ताही तोच आहे. मंदिराशेजारीच काही वीरगळ पण आहेत.
अंबेजोगाई-वेळापूर इथल्या गधेगाळामध्ये संस्कृतमध्ये शापवाणी कोरलेली आहे.
स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरा |
षष्टिं वर्ष सहस्त्रानि विष्ठायां जायते कृमि: ||
स्वकीय किंवा परकीय जो या वसुंधरेचे हरण करेल, असं करणारा सहा हजार वर्ष विष्ठेमधला कृमी बनेल
तर काटी येथील गधेगाळात 'हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि गाढोअ' अशा प्रकारची मराठी वाक्यरचना आहे.
महाराष्ट्रातील काही गधेगाळ पुढीलप्रमाणे
१. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४)
२. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी)
३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख.
४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे)
५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात)
६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५)
७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२)
९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४)
अशी हीन दर्जाची शापवाणी कोरीव लेखांमध्ये कशी काय वापरली गेली याचा काहीच अंदाज येत नाही. यादव-शिलाहारांच्या लेखांतच आणि मुख्यत्वे मराठी भाषेतच ती आढळली आहेत आणि त्यातही गधेगाळीबरोबर बरेच वेळा शिवलिंगही असल्याने शैवपंथियांमध्येच अशा प्रकारची शिल्पे जास्त प्रचलित असावीत.
५. रतनवाडीतील गधेगाळ
६. अक्षी येथील गधेगाळ(फोटो आंतरजालावरून)
७. पिंपळवंडी गधेगाळ(फोटो शैलेन भंडारे यांजकडून)
संदर्भः
१. प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ संपादक : डॉ. शं. गो. तुळपुळे
२. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार -प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.
प्रतिक्रिया
13 May 2012 - 3:46 pm | किसन शिंदे
नुकतंच गोनीदांच 'त्या तिथे रुखातळी' हे अतिशय सुंदर पुस्तक वाचलंय, त्यात अशाच एका वीरगळाचा उल्लेख वाचल्यानंतर तर याबद्दल खुप उत्सुकता होती आणि काही प्रश्न मनात निर्माण झाले होते जसे कि, वीरगळ म्हणजे काय? मुर्ती कि शिलालेख?
पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुझ्या या लेखात मला मिळाली आहेत. :)
13 May 2012 - 4:04 pm | मन१
हा लेख तर आम्च्या वाचनखुणेत गेलेलाच आहे.
शेजारिच उपक्रमावर काल परवाच अगदि ह्याच विषयावर चर्चा दिसली.
आद्य शिलालेख्,त्याबद्दल तिथला(ट्रेड्मार्क्/सिग्नेचर) वाद्/मतभेद वगैरे वगैरे.
हा लेख आणि ती चर्चा असं जोडून वाचलं तर बरच काही हाताला लागेल.
http://mr.upakram.org/node/3732
13 May 2012 - 4:13 pm | अत्रुप्त आत्मा
लेख नेहमी प्रमाणे चांगला...
अता प्रस्तुत विषया बद्दल थोडेसे...
ज्या तर्हेची शिल्प/मूर्ती आहेत,तो मानवाच्या प्राचीन धर्मश्रद्धांचा काळाबरोबर उरत उरत गेलेला गाळ अथवा अर्क आहे. वरिल माहिती वाचताना स.रा. गाडगीळांच्या ''लोकायत'' पुस्तकाची प्रकर्षाने अठवण येत होती.
@उपक्रमावर काल परवाच अगदि ह्याच विषयावर चर्चा दिसली.>>> मनोबा चांगली लिंक दिलित हो.
13 May 2012 - 4:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण
दिलीप बिरुटे
14 May 2012 - 11:22 pm | सोत्रि
सहमत!
- (वीरपुरुष) सोकाजी
13 May 2012 - 4:19 pm | पैसा
नेहमीप्रमाणेच बरीच माहिती मेहनतीने गोळा केलेली दिसतेय! धन्यवाद!
13 May 2012 - 4:39 pm | किसन शिंदे
वल्ली,
महाराष्ट्रातील काही गाळीव शिल्पे
हे महाराष्ट्रातील काही गाळी व शिल्पे असं आहे का?
13 May 2012 - 4:42 pm | प्रचेतस
नाही. गाळीव च आहे. :)
वीरगळ व गधेगाळांबद्दल लेख असल्याने शीर्षकात श्लेष साधायचा प्रयत्न केलाय. :)
13 May 2012 - 5:10 pm | मुक्त विहारि
अजून लिहा.
13 May 2012 - 5:38 pm | सूड
माहितीपूर्ण लेख !!
13 May 2012 - 6:36 pm | बॅटमॅन
मस्त हो वल्ली :)छान इंट्रॉडक्टरि लेख. बाकी कर्नाटक व राजस्थानचा उल्लेख केला असतात तर महाराष्ट्राबाहेरदेखील गधेगाळी आहेत हे वाचकांच्या लक्षात आले असते.
13 May 2012 - 7:33 pm | मोदक
नवीन माहिती...
13 May 2012 - 8:18 pm | प्रास
मस्त हो वल्लीशेठ!
नेहमीप्रमाणेच छान आणि माहितीपूर्ण लिखाण केलं आहे.
धन्यवाद! :-)
13 May 2012 - 11:59 pm | अन्या दातार
काय काय माहिती अगदी नीट गाळून आणतो रे हा माणूस? (माणूस?? छे छे, वल्लीच हा)
अवांतरः या शापशिल्पांना लोक कितपत सिरीयसली घेत असत याबद्दल काही माहिती मिळते का? कारण असेच शाप आम्ही काही मित्रमंडळींना देत असू*, पण कधीच प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत. ;)
*अधिक माहितीसाठी व्य.नि. करणे
14 May 2012 - 12:36 am | यकु
अरारा ! किती दिले त्याची गणतीच नाही रे ;-)
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
वल्ली: संकलन जबर्या.
14 May 2012 - 10:45 am | बॅटमॅन
आम्हीपण समस्त प्राणिसृष्टीचा मित्राच्या मातृकुलाशी संबंध लावत असू ;)
(सौजन्यः शितू चा सुरुवातीचा चॅप्टर)
19 Sep 2014 - 6:21 pm | यसवायजी
मस्त लेख हो वल्ली.
--
हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि
@ असेच शाप आम्ही काही मित्रमंडळींना देत असू >>
अगदी हेच म्ह्णणार होतो. शाळेतल्या त्या शिव्यांना एवढी हजारो वर्षांची उज्वल परंप्रा असेल हे माहित नव्हतं. ;)
19 Sep 2014 - 6:31 pm | बॅटमॅन
अन ही उज्ज्वल परंपरा जतन केल्याबद्दल कौतुक तर दूरच, वर शिव्याशापच मिळायचे. चालायचंच, परंपरा जतन करणं हे असिधाराव्रत म्हणतात ते काय खोटं नाय.
14 May 2012 - 8:33 am | ५० फक्त
मस्त लिहिलं आहेस रे., या पुढच्या कट्ट्याला गप्पा मारायला एक चांगला विषय मिळवुन दिलास,
असे विरगळ किंवा गधेगाळ आंतरजालावर कसे करावे ( अंडे घालुन अथवा न घालता कसेही) याची माहिती आहे का कोणाला ?
14 May 2012 - 10:15 am | प्यारे१
मस्त संकलन रे वल्ली....!
मिसळपाव वर आणखी किमान एक 'नवीन वाक्प्रचार' तयार होणार तर ! ;)
14 May 2012 - 10:21 am | पियुशा
छान माहीती :)
14 May 2012 - 10:27 am | मृत्युन्जय
वीरगळ माहिती होता. हे गधेगाळ नविनच. नवीन माहितीबद्दल धन्यवाद हो वल्लीशेठ
14 May 2012 - 11:04 am | सुकामेवा
तुळजापूर मंदिराबाहेर पण आशी एक गधेगाळ आहे त्याचा फोटो पण आहे माझ्याकडे शोधावा लागेल
14 May 2012 - 11:47 am | चौकटराजा
अशा काही चिजा हंपी येथे पाहिल्यासारख्या वाटतात. वल्ल्ली बुवा जोन्स ,येकदा जावाच तकडं ........ लई मज्जा येल !
14 May 2012 - 11:49 am | गवि
फारच उत्कृष्ट माहिती..
बादवे अनेक ठिकाणी, विशेषत: कोंकण / सह्याद्रि भागात अशाच स्वरुपाचे पण याहून जरा लहान आणि जरा कमी कोरीवकाम असलेले उभे दगड "सतीचे दगड" म्हणून मला लहानपणापासून दाखवले गेले आहेत, ते काय असतात मग?
सती गेल्यावर त्या जागी हा दगड ठेवण्यात येत असे असं मला त्या त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं. त्यामुळे वाईटच वाटायचं.
14 May 2012 - 11:55 am | स्पा
अत्यन्त उत्तम लेख आणी माहीती.
14 May 2012 - 12:02 pm | प्रचेतस
सतीशिळा पण वीरगळासारखीच असते. त्यात सतीचा आशीर्वाद देण्याच्या स्थितीमध्ये उभा हात कोरला जातो.
रायगडावर गचपणात एक सतीशिळा आहे. तोरण्याच्या पायथ्याला भट्टी गावात पण एक सतीशिळा आहे.
फोटो आंतरजालावरून (डाव्या हाताची सतीशिळा आणि उजवीकडचा वीरगळ आहे)
14 May 2012 - 12:11 pm | गवि
शंकानिरसनाबद्दल आभार रे.. माहितीत भर पडली.
दगड एकत्र असतील तर मग तो वीरपुरुष मृत्युमुखी पडला आणि त्याच्या सोबत त्याची पत्नी सती गेली असावी काय? :(
अजूनही एक लहान दगड दिसतोय. सती जाणार्या स्त्रिया अनेक असल्यास त्यातही मानाच्या पातळ्या असतील का..?! :(
सतीचा गौरव करणार्या दगडासोबतच सती न गेल्यास काय हाल होतील हे दर्शवणारेही काही शापदगड असतील काय..
उत्तरं काळाच्या आत गाडली गेलेले प्रश्न..
14 May 2012 - 12:38 pm | आनंदी गोपाळ
गधेगाळ नव्याने कळले. धन्यवाद!
14 May 2012 - 10:42 pm | स्वच्छंदी_मनोज
वल्लीजी अजून एका विशयाची छान माहीती आणी त्याला फोटोंची जोड असल्याने अधीकच उत्तम जमले आहे...
भटकताना खूप किल्ल्यांवर, गावात विरगळ बघीतले आहेत. आजोबा डोंगराच्या वाल्मिकी आश्रमासमोर तर विरगळंची रांग मांडून ठेवले आहेत. तसेच सुधागड किल्ल्यावरच्या भोराई देवळासमोरील माळावर तर संख्येने अनेक विरगळ दिसतात... आता मला पडलेला प्रश्ण,
विरगळाच्या उभ्या तिन भागांपैकी वरच्या भागावर बहुधा पर्वती शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेली त्याचे कारण काय असावे?
तसेच जिथे विरगळ उभा केला जातो त्याच ठीकाणी त्या वीराला वीरमरण आले असे समजायचे की युद्धात विरमरण आलेल्या वीराचा त्याच्या मुळ गावात विरगळ उभा केला जायचा?
तुमच्या कडे काही माहीती असल्यास जरूर सांगा...
गधेगाळा विशयी ऐकून होतो पण डिटेल माहीती आत्ता समजली... खालील फोटोत एका बाजूला चंद्र-सुर्य कोरलेले आहेत आणी दुसर्या बाजूला युद्धाचा प्रसंग. हा गधेगाळ असू शकतो काय? तिसरी बाजू भिंतीला टेकलेली असल्याने त्याबाजूला काय कोरले आहे ते बघीतले नाही. हा फोटो मी साल्हेर पायथ्याच्या सुर्याजी काकडे समाधी जवळ काढलेला आहे ..
15 May 2012 - 1:17 pm | प्रचेतस
हे वीरगळ शिलाहारांच्या काळात जास्त करून उभारले गेले. शिलाहार शिवोपासक त्यामुळेही शिवलिंगाची पूजा दाखवली जात असेल. नक्की कारण सांगता येणार नाही.
वीरगळ हे गावांवर आलेले संकट परतून टाकणार्या वीरांच्या स्मरणार्थ उभारले जात असल्याने ज्या गावांमध्ये जिथे वीरगळ आहेत त्या गावांत युद्ध झाले असे समजायला काहीच प्रत्यवाय नसावा. गडांवर असलेले वीरगळ हे गडांवरच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या वीरांची स्मारके आहेत.
तुमच्या फोटोतील साल्हेरच्या पायथ्याची शिळा हा वीरगळ आहे.
15 May 2012 - 3:29 pm | स्वच्छंदी_मनोज
धन्यवाद वल्लीजी.. शंका निरसन झाले..
15 May 2012 - 4:19 pm | बॅटमॅन
>>विरगळाच्या उभ्या तिन भागांपैकी वरच्या भागावर बहुधा पर्वती शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेली त्याचे कारण काय असावे?
शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेली स्त्री नक्की पार्वतीच असते का? माझ्या समजुतीप्रमाणे युद्धात मरण पावल्यावर तो वीर सपत्नीक शंकराची पूजा करताना दाखवला जातो. चूभूदेघे, माझी समजूत चुकीची असली तर कृपया सांगावे .
15 May 2012 - 4:26 pm | प्रचेतस
असे असूही शकेल किंवा असेच असेल.
वीरगळांवर शिलालेख नसल्याने याबाबत नक्की काही सांगता येणार नाही.
15 May 2012 - 9:41 am | झकासराव
वल्ली द ग्रेट..
उत्तम माहिती देणारा लेख. :)
15 May 2012 - 10:34 am | शैलेन्द्र
मस्त लेख वल्ली..
अजा पर्वतावर गेलायेस का? लोक म्हणतात ती वाल्मीकींची समाधी आहे, पण मलातरी ती कुणा योध्याची समाधी वाटते, तिथेच अनेक वीरगळ आसपास पडलेले आहेत. तुला वेळ असेल तेंव्हा सांग, आपण जावुन येवु..
आमच्या डोंबीवलीतही एक गधेगाळ आहे, मस्त छत्री बित्री बांधुन जतन केलाय.. :)
15 May 2012 - 5:22 pm | हुप्प्या
एक गोष्ट खटकली. एखादा योद्धा हुतात्मा झाला तर त्याचे नाव गाव काही न लिहिता एक साधे शिल्प बनवायचे आणि दुसरे गधेगाळासारखे अश्लील, स्त्रीची विटंबना करणारे शिल्प बनवायचे तेही अमुक एक हुकुमाची तामिली न करणार्याची काय गत होईल ते सांगण्याकरता हे जरा विकृत वाटते.
वीराचे स्मारक अनामिक ठेवायचा अट्टाहास कशासाठी? आणि अमक्या राजाची आज्ञा वा अमक्या देवाचा आदेश न मानणार्याचे काय होईल ह्याचे इतके रसभरित वर्णन का?
ही सगळी शिल्पे तशी उघड्यावरच असणार. लहान मुले, आया बहिणी अशा लोकांना ती दिसणार ह्याचा विचार न करता इतकी बटबटीत शिल्पे घडवणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे मला नक्की खटकते. संस्कृतीचा एक असंस्कृत पैलू दिसून येतो.
पण दगडावरील रेघेप्रमाणे हे एक नि:संशय सत्य आहे हे ही तितकेच खरे.
15 May 2012 - 11:12 pm | शैलेन्द्र
सुसंस्कृत व असंस्कृत तुम्ही कशाला म्हणता त्यावर बरेच अवलंबुन आहे. त्याकाळात आपण जितके मोकळे होतो तितके अजुनही झालेलो नाही अस म्हणायच की त्यामानाने आता आपण बरेच सुधारलोय अस समजायच, हे ज्याने त्याने ठरवाव.. :)
16 May 2012 - 1:41 am | हुप्प्या
काही गोष्टींचे असंस्कृत असणे हे कालातीत असते. निदान माणूस सुसंस्कृत झाल्यानंतर तरी (आदिमानव असतानाच काळ सोडून देऊ.)!
अमुक एक करणार्याच्या आईला गाढवाने अमुक तमुक केले अशी शिवी देणे आणि त्याचे शिल्प बनवून ते चव्हाट्यावर स्थापणे हे ग्राम्य आणि अशिष्ट आहेच आहे.
मुळात कुणाच्या तथाकथित वाईट वर्तनाची शिक्षा त्याच्या आईला का ? खुद्द त्या व्यक्तीलाच का नाही? आणि तीही अशी अनैसर्गिक, पशुशी संबंध ठेवून? ही तमाम स्त्री जातीची विटंबना आहे.
कल्पना करा की कुणी निरागस बालक हे शिल्प पाहून आपल्या आईला विचारतो आहे की हा हत्ती किंवा हे गाढव काय करतो आहे? तर त्या माऊलीवर काय प्रसंग येईल आणि तो केवळ जुना काळ आहे म्हणून तो सुसह्य असेल का?
15 May 2012 - 11:01 pm | साती
बाकी गधेगाळीबद्दल जास्त माहिती पाहिजे असल्यास रा चि ढेरे यांचे ' शिवी आणि समाजेतिहास ' हे पुस्तक वाचा.
आंतरजालावर काही ठिकाणी काही पाने अपलोड केलेली आहेत.
इच्छुकांनी विपु करावी.
19 May 2012 - 8:37 pm | राही
गद्धेगाळीची वचने म्हणजे केवळ शिव्या-गाळी नसून राजाज्ञा मोडली तर कोणते परिणाम भोगावे लागतील हे सांगणार्या धमक्या असाव्यात, कारण अश्या गाळी बहुधा दानपत्रे, जमिनीच्या वहिवाटीबाबतची आज्ञापत्रे या संदर्भात जास्त करून सापडतात. आई हा प्रत्येकाच्या मनाचा हळुवार कोपरा असतो. आईवर अशी भयानक आपत्ती येऊ नये म्हणून कोणीही राजाज्ञाभंग करू धजावणार नाही अशी लेखकर्त्याची,पक्षी शासनकर्त्याची अपेक्षा असणार. ही दंडाज्ञा सतत सर्वांच्या नजरेसमोर रहावी ह्या हेतूनेच ती सर्वांना सुस्पष्ट दिसेल अश्या ठिकाणी कोरून ठेवली गेली असावी.
जाता जाता : पूर्वीच्या काळी गुन्हेगारांची गय केली जात नसे. शिक्षेचे प्रकारही अतिभयानक, प्रसंगी अमानुष असत हे आपल्याला माहीतच आहे.
19 May 2012 - 8:39 pm | राही
गद्धेगाळीची वचने म्हणजे केवळ शिव्या-गाळी नसून राजाज्ञा मोडली तर कोणते परिणाम भोगावे लागतील हे सांगणार्या धमक्या असाव्यात, कारण अश्या गाळी बहुधा दानपत्रे, जमिनीच्या वहिवाटीबाबतची आज्ञापत्रे या संदर्भात जास्त करून सापडतात. आई हा प्रत्येकाच्या मनाचा हळुवार कोपरा असतो. आईवर अशी भयानक आपत्ती येऊ नये म्हणून कोणीही राजाज्ञाभंग करू धजावणार नाही अशी लेखकर्त्याची,पक्षी शासनकर्त्याची अपेक्षा असणार. ही दंडाज्ञा सतत सर्वांच्या नजरेसमोर रहावी ह्या हेतूनेच ती सर्वांना सुस्पष्ट दिसेल अश्या ठिकाणी कोरून ठेवली गेली असावी.
जाता जाता : पूर्वीच्या काळी गुन्हेगारांची गय केली जात नसे. शिक्षेचे प्रकारही अतिभयानक, प्रसंगी अमानुष असत हे आपल्याला माहीतच आहे.
26 Nov 2012 - 4:09 pm | मालोजीराव
लेख दिसत नसल्याने....वल्ली कडून ऐकलेल्या लेखाप्रमाणे 'वाचल्याची' नोंद करीत आहे. फोटू लटकवत आहे...भविष्यातील वाचकांना दिसण्यासाठी ;)
19 Sep 2014 - 3:00 pm | धन्या
सांप्रतकाळी चालू असलेल्या गधेगाळीवरुन आम्हाला ही सातवाहनकालिन गधेगाळ आठवली. :)
19 Sep 2014 - 6:28 pm | होकाका
बरं झालं एक चांगला लेख वाचायला मिळाला तुमच्यामुळे. नाहीतर गाढवांच्या भांडाणाशिवाय मिपावर काही असतं का असा हल्ली प्रश्ण पडू लागला होता.
27 Apr 2016 - 9:56 am | मुक्त विहारि
27 Apr 2016 - 10:08 am | हकु
अज्ञान आणि अति देवभोळेपणा.
अज्ञानाबद्दल तक्रार नाही. हा लेख वाचला नसता तर हा दगड कसला आहे हे मलाही कळलं नसतं.
27 Apr 2016 - 10:12 am | मुक्त विहारि
मला पण नसतेच समजले.
ह्या अशा लेखांमुळे आपले अज्ञान दूर होते म्हणूनच तर आम्ही "मिपा" सोडत नाही.
27 Apr 2016 - 10:02 am | कैलासवासी सोन्याबापु
हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे
इंटरेस्टिंग ! सध्या मराठीत असलेल्या एका प्रसिद्ध शिवीचं मुळ ह्याच्यात असावे काय? :D
27 Apr 2016 - 10:17 am | हकु
शब्द ही अगदी तसाच आहे हे बघून आश्चर्य वाटलं. म्हणजे मराठीतल्या सध्या प्रचलित असलेल्या इतर शिव्या तेव्हाही वापरात असतील की काय? ;)
27 Apr 2016 - 10:28 am | विजय पुरोहित
साहजिकच आहे...
असणारच.
27 Apr 2016 - 10:33 am | प्रचेतस
तेव्हाच्या काळातील गाळींवर ह्यापूर्वीच मराठी शिलालेखांतील शापवचने हा एक लेख लिहिला होता.
27 Apr 2016 - 11:50 am | हकु
काही दिवसांपूर्वी अलंगगडावर जाण्याचा योग आला. तिथे हा शिलालेख सापडला.
एका सतीबद्दल चा हा मजकूर आहे एवढीच माहिती फेसबूक वरून मिळाली.
आपल्याला याविषयी काही माहिती आहे का?
27 Apr 2016 - 12:13 pm | प्रचेतस
हा लेख पहिल्यांदाच पाहात आहे.
सतीचा वाटत नाही, सतीशिळांवर लेख लिहिण्याची पद्धत नव्हती. अक्षरवाटिका शिवकालीन आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे हा लेख तदनंतर (शक्यतो पेशवेकाळात) लिहिला गेला असावा. हे दुर्गम किल्ले शिवाजीराजांनी घेतले होते की नाही हे ठाऊक नाही मात्र पेशव्यांच्या ताब्यात होते हे निश्चित.
किलेदार अलंग असे शब्द वाचता येत आहेत.
8 Jul 2016 - 12:13 am | मनो
या पुस्तकात बहुदा अलंग शिलालेखाचे वाचन आहे.
पुण्यात असाल तर मंडळात अथवा डेक्कन कॉलेज येथे सचिन जोशी यांना विचारून पहा. मंडळात महेश तेंडुलकरही कदाचित भेटतील.
8 Jul 2016 - 9:37 pm | यशोधरा
आज हे पुस्तक मराठी ग्रंथ वाचनालयाच्या गड-कोटांच्या पुस्तकांवरील प्रदर्शनात पाहिले.
7 Jul 2016 - 8:52 pm | सुचिकांत
९ कुवली धान्य म्हणजे किती होईल साधारण?
7 Jul 2016 - 11:06 pm | प्रचेतस
नऊ कुवली म्हणजे नऊ मापे. जुन्याकाळचं माप असायचं. उखळीसारख्या आकाराचं पण लहान असं ( hourglass shape). त्यात किती शेर धान्य बसायचं ते आता आठवत नाही.
कुवली हा शब्द संस्कृत शब्द कुडप (धान्याचं माप) ह्या पासून तयार झालाय. कुडप - कुळव - कुवळ - कुवल .
8 Jul 2016 - 12:38 am | सतिश गावडे
माझ्या लहानपणी हे माप मी प्रत्यक्ष वापरात असलेलं पाहीलेलं आहे. आदोली/आधोली (बहुतेक कशाच्या तरी अर्धे माप) म्हणायचे त्याला. आंब्याच्या हंगामात कातकरी बायका आंबे विकायला यायच्या. तेव्हा त्या आंब्यांचा मोबदला म्हणून या मापाने भात दिला जायचा त्या कातकरी बायकांना.
आदोलीपेक्षा छोटे माप "निटवा" होते. तो बहुधा आदोलीच्याही अर्धा असावा.
8 Jul 2016 - 11:50 pm | रुपी
"आठवा" का? त्याचाही आकार hourglass सारखा असतो. माझ्या लहानपणी गिरणीत धान्य दळायला देताना आई यानेच मोजून द्यायची - बहुतेक चार आठवे म्हणजे एक शेरभर धान्य असे काहीतरी होते. बहुतेक आईकडे अजूनही असेल हा आठवा. काळसर अशा रंगाचा होता - नक्की कुठला धातू असावा सांगता नाही येणार.
9 Jul 2016 - 1:18 am | प्रचेतस
हो. बहुतेक तेच.
बिडाचं असतं ते. आणि दोन्ही बाजूंची मापे वेगळी असतात. एक लहान माप तर एक मोठं.
9 Jul 2016 - 10:55 am | अभ्या..
ते तसं लहान मोठं बारमध्ये वापरतात 60 आणि 30 चे माप म्हणून, चिपट हे दोन्हीबाजूस सेम असायचं. चार चिपट्याचा एक शेर होई. माझया घरात तांब्याचा शेर होता. त्याच्या कडा पितळी होत्या व त्यावर वजन मापे प्रमाणिकरणासारखा एक ब्रिटिश शिक्का उठवलेला होता.
सध्या मणात मोजली जाणारी एकमेव गोष्ट जळणाची लाकडे.
9 Jul 2016 - 11:25 am | धनंजय माने
चिपटं एकाच बाजूनं तोंड असलेलं असतंय. आकार डमरू सारखा असला तरी एका बाजूने थोडं बहिर्वक्र बंद केलेलं असं. साधारण ७५० ग्रॅम भरतं.
13 Jul 2016 - 3:49 am | रुपी
अच्छा. हा आठवा पण आकाराने hourglass सारखा - म्हणजे खाली आणि वर रुंद आणि मध्ये अरूंद असा असतो, पण त्याला एकाच बाजूने तोंड आहे. शिवाय वजनाला फार जड नसल्यामुळे बिडाचाही नसावा असे वाटते. आईकडे अजूनही असेल तर कधी चक्कर झाल्यावर फोटो काढून ठेवेन.
13 Jul 2016 - 8:57 am | मार्मिक गोडसे
मराठी मोजमापे…
१
२
8 Jul 2016 - 8:59 pm | मार्मिक गोडसे
२९ जून २०१६ च्या लोकसत्ता वृत्तपत्रात 'बदलापुरात शिलाहारकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा!' हया लेखात गधेगाळ शिलाशिल्पावरील चंद्र व सुर्य ह्या प्रतिमांचा अर्थ आकाशात चंद्र व सूर्य असेपर्यंत ही राजाज्ञा कायम राहील असा दिला आहे. वीरगळावरही चंद्र व सुर्याचा प्रतिमा असतात, त्याचा अर्थ जब तक सुरज चाँद रहेगा *** तेर नाम रहेगा असा असावा.
वीरगळ मधील वीरचा संदर्भ समजला,परंतू कल्लू व गळ ह्यांची सांगड लागत नाही.
8 Jul 2016 - 9:24 pm | यसवायजी
कन्नडमधे संधी(?) होताना "क,त,प" चे "ग,द,ब" होते. त्यमु़ळे क चे ग होते. बोली भाषेत कल्लंही म्हणतात.
वीर+कल्ल मुळे वीरगल्लचे वीरगळ झाले असेल.
कॉल्लींग ब्याट्या..
9 Jul 2016 - 1:19 am | प्रचेतस
तेच.
वीरकल्लू- वीरगल्लू - वीरगळ.
9 Jul 2016 - 6:33 am | दिगोचि
मी कोठेतरी असे वाचले आहे की पन्ढरपूरचा देव विठ्ठल म्हणजे वीरगळ या नावाचा एक धनगर. हे खरे आहे काय?
9 Jul 2016 - 6:41 am | प्रचेतस
नाही हो.
विठ्ठलाच्या उपपत्ती वेगळ्या आहेत.
9 Jul 2016 - 10:33 am | स्वीट टॉकर
नेहमीप्रमाणे उत्तम माहिती! वीरगळ बर्याच ठिकाणी पाहिले होते पण माहिती अजिबात नव्हती. धन्यवाद!
9 Jul 2016 - 1:04 pm | जगप्रवासी
आजोबा गडावरील वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळील वीरगळ
10 Jul 2016 - 8:14 am | दिगोचि
मी गेली एक वर्ष मिपावर आहे. येणारे प्रतिसाद वाचल्यावर असे दिसले की मिपावर प्रतिसाद लिहिणार्यामधे एक गैरसमज मला दिसला तो असा की इतर प्रतिसाद लिहिणारे अज्ञानी आहेत फक्त मीच हुशार असे अनेकाना वाटते. मी वीरगळ म्हणजे विठ्ठल का विचारले होते त्याला उत्तर मिळाले की अहो विठ्ठल या नावाच्या उपपत्ती अनेक आहेत. लिहिणार्याना असे वाटले नाही की इतराना पण त्या माहित असतील. लिहिणार्यानी आपण काय लिहितो ते नीट वाचावे व इतराचा अपमान होइल असे लिहु नये.लिहिणार्याच्या उत्तराने माझ्या ज्ञानात भरपडली नाही फक्त अपमान झाला.
10 Jul 2016 - 9:07 am | माहितगार
आपल्या विचार भावना मनात दडपण्या पेक्षा मनमोकळेपणाने व्यक्त करणे चांगलेच पण प्रत्येकाने आपल्याशी सहमत झालेच पाहीजे हा आग्रह योग्य नव्हे.
१) आपली कुणा सोबत खरडी अथवा व्यनितून खाजगी चर्चा अथवा इतर धाग्यावर चर्चा झाली असेल तर माहित नाही, या धाग्यावर प्रचेतस यांनी दिलेल्या उत्तरात मला कुठेही काही व्यक्तीगतता अथवा अपमानास्पद काही आढळले नाही किंवा प्रचेतस यांचा तसा उद्देशही दिसत नाही. विठ्ठल या नावाची उत्पत्ती वीरगळ या शब्दातून येऊ शकते या मताशी ते (प्रचेतस) सध्या तरी सहमत नसावेत एवढाच अर्थ होतो.
२) तुम्ही अपरंपरागत शक्यता विचारात घेत आहात, अपरंपरागत नवा अथवा वेग्ळा विचार करून पाहण्यात त्या बद्दल चर्चा करण्यात वावगे काही नाही, पण आपल्या विचाराशी सहमत न होणारे आपला अपमानच करत आहेत असे परस्पर गृहीत धरणे योग्य नाही.
३) अपरंपरागत नवा अथवा वेगळा विचार मांडताना आपण बरोबरच आहोत असे गृहीत धरणेही योग्य नाही. प्रत्येक वेगळा विचार लोकांनी न स्विकारल्याने अभाळ कोसळते असेही नसावे किंवा इतरांनी असहमती दर्शवली तरीही इतरही अभ्यासकांसोबत आपण विचार विमर्श काळाच्या ओघात चालू ठेऊ शकता.
३) अपरंपरागत नवा अथवा वेगळा विचार मांडताना प्रचेतस यांनी त्यांच्या माहिती पुरते उत्तर दिलेले दिसते. अपरंपरागत नवा अथवा वेगळा विचार मांडणार्यांनी या पेक्षा खूप खूप अधिक कठीण चर्चांना आणि प्रसंगाना सामोरे जावे लागते.
10 Jul 2016 - 6:38 pm | दिगोचि
प्रचेतस यानी मला दिलेल्या उत्तराचा टोन मला पेट्रनायझिन्ग वाटला म्हणुन मी तसा प्रतिसाद लिहिला. त्यात कोठेहि मी बरोबर आहे असे म्हटलेले नाही. मी एक शन्का विचारली कारण कल्ट ऑफ विठोबा या पुस्तकात विट्ठल हा वीरगळ (हीरो स्टोन) आहे असे मी वाचले म्हणुन मी हे खरे आहे का हा प्रश्न विचारला. त्याला मला माहित नाही हा प्रतिसाद योग्य. कित्येकाना मला माहित नाही हे सान्गायला कदचित कठीण जाते असे वाटले. तुम्ही मात्र माझ्यावर काहीच्याबाही आरोप केले आहेत.
10 Jul 2016 - 8:06 pm | प्रचेतस
मी 'नाही' म्हटलं ह्याचा अर्थ विठ्ठलाची मूर्ती ही वीरगळ नाही असं ठामपणे म्हटलं.
वीरगळ ही स्मारक शिळा (Memorial Stone)असते. तर विठ्ठल ही शिळा नसून मूर्त स्वरुप आहे. हा सर्वात मोठा फरक आहे. शिवाय वीरगळातील वीर हा नेहमीच सशस्त्र असतो. अगदी अपवादात्मकरित्याही मी नि:शस्त्र वीर कधीही पाहिला नाही.
इतरही बरेच फरक आहेत.
जिथे मला काही माहीत नाही तिथे मी मला माहीत नाही किंवा सांगता येणार नाही ह्या स्वरुपाचे कित्येक प्रतिसाद दिलेले आहेत जे तुम्ही खोदकाम करून बघू शकता.
10 Jul 2016 - 8:13 pm | माहितगार
मी विचारांची चिकित्सा करतो आणि चर्चेतील व्यक्तिवर व्यक्तीगत आरोप करणे टाळण्या बाबत काटेकोर असतो. मी आपल्यावर आरोप करतो आहे आणि तेही काहीच्या बाही असे तुम्हाला का वाटावे हे अनाकलनीय आहे. तरी सुद्धा इतर कुणा मिपाकरांना (अर्थात डूआयडीवरुन नको) वरील चर्चेतून मी आरोपबाजी केली आहे असे वाटले तर जरुर निदर्शनास आणावे, मला माझे प्रतिसाद लेखन इतरांच्या दृष्टीकोणातून समजावून घेण्यास की तुम्ही म्हणत आहात तसे मी खरेच कुठे चुकतो आहे किंवा चुकलो आहे का, आणि खरेच तशी जरुरी असेल तर सुधारणा करण्यासाठी तपासणे निश्चित आवडेल.
प्रचेतसांना माहित नाही हे सांगणे अवघड गेले का, असहमती व्यक्त करणे सोपे गेले ते प्रचेतसच आपल्याला सांगू शकतील पण त्यांच्या मनमोकळ्या असहमती दर्शवण्यात मला व्यक्तिश: काही वावगे अथवा तुमचा अपमान व्हावा असे काही जाणवले नाही असो.
शुभेच्छा
10 Jul 2016 - 6:39 pm | दिगोचि
प्रचेतस यानी मला दिलेल्या उत्तराचा टोन मला पेट्रनायझिन्ग वाटला म्हणुन मी तसा प्रतिसाद लिहिला. त्यात कोठेहि मी बरोबर आहे असे म्हटलेले नाही. मी एक शन्का विचारली कारण कल्ट ऑफ विठोबा या पुस्तकात विट्ठल हा वीरगळ (हीरो स्टोन) आहे असे मी वाचले म्हणुन मी हे खरे आहे का हा प्रश्न विचारला. त्याला मला माहित नाही हा प्रतिसाद योग्य. कित्येकाना मला माहित नाही हे सान्गायला कदचित कठीण जाते असे वाटले. तुम्ही मात्र माझ्यावर काहीच्याबाही आरोप केले आहेत.
11 Jul 2016 - 1:30 pm | दिगोचि
जे उत्तर आज वाचले तेच जर तेव्हा मिळाले असते तर लिहायची वेळ आली नसती. तुम्ही पूर्वी मला माहित नाही असे असे सान्गितले आहे ते मला शोधाण्याची मला जरूर वाटत नाही.
मागाना मल एक सान्गावेसे वाटते की मी १९६६ पासुन भारता बाहेर राहात आहे व तेथे आज पर्यन्त अनेक कमिट्यावर काम केले आहे त्यात माझ्यावर कोणीहि असे म्हटले नाही की हा फक्त आपण बरोबरच आहोत असे गृहीत धरतो व दुसर्यान्ची बाजु ऐकुन घेत नाही. माझा प्रश्न हा एका रिसर्च स्कॉलरच्या कामावरुनहोय्त त्यावर लेखकाचा काय विचर आहे हे मला पाहिजे होते. बस बाकी अधिक काही नव्हते. माझ्या विचाराशी सहमत व्हा असे मी लिहिलेले नाही फक्त त्यान्च्या उत्तराचा टोन मला आवडला नाही. आणि हो मी फोनवर मिपावरील कोणाशीहि चर्चा केलेली नाही व करेन असे वाटत नाही. मलाही कोणा व्यक्तिवर टीका केलेली आवडत नाही जी येथे केली गेली. म्हणून हा प्रपन्च. हा वाद येथेच थाम्बवतो.
11 Jul 2016 - 2:08 pm | प्रचेतस
तुम्ही कुठे आहात आणि कुठे कुठे काय काय काम केलेत ह्याच्याशी मला काही देणेघेणे नाही. येथे सर्व मिपाकर म्हणूनच येतात.
बाकी तुमचा टोन मलाही अपमानास्पद वाटला.
असो.
9 Dec 2016 - 12:23 pm | मार्मिक गोडसे
वीरगळांचे दस्तावेजीकरण
21 Jan 2017 - 6:39 am | उपयोजक
कोल्हापुरात खुदाई करताना ૪ फुटी प्राचीन शिळा सापडली.त्यावर खंडोबा व महादेवांची चित्रे आहेत.त्याबद्दल काही सांगता येईल का?
21 Jan 2017 - 9:25 am | माहितगार
तुम्ही दुवा दिलेला दिसत नाही. गूगल सर्च करताना कोल्हापूरातली हि एक बातमी दिसली.
बाकी सातारा जिल्ह्यातील हे एक लोकमत वृत्तही जिज्ञासूंना रोचक वाटू शकेल असे वाटते.
21 Jan 2017 - 6:43 pm | उपयोजक
याबद्दल सांगा!
21 Jan 2017 - 6:45 pm | उपयोजक
काल खोदकाम करताना सापडली.
22 Jan 2017 - 7:28 am | एस
हा वीरगळ आहे. अतिशय सुस्थितीत आहे हे पाहून आनंद झाला. खंडोबा नाहीये. खंडोबाच्या शिल्पात सोबत बानू/म्हाळसा आणि कुत्रे असतात. शिल्पाची त्रिस्तरीय रचना इथे व्यवस्थित दिसते आहे. सर्वात खाली घोडेस्वारांचे युद्ध दाखवले आहे. मधल्या पट्टिकेत अप्सरा त्या धारातीर्थी पडलेल्या वीराला धरून स्वर्गात (कैलासात) नेत आहेत. आणि सर्वात वरच्या पट्टीत तो वीर सपत्नीक (?) शिवलिंगाची पूजा करतो आहे.
प्रचेतस अजून सांगतीलच.
22 Jan 2017 - 11:24 am | प्रचेतस
वीरगळच आहे. एस यांनी व्यवस्थित विशद करून सांगितलेच आहे.
कोल्हापुरात काही देखणे वीरगळ आहेत. एक तर खुद्द महालक्ष्मी मंदिराच्या आवारातच आहे. हा सापडलेला वीरगळ पण अतिशय देखणा आहे.
22 Mar 2023 - 10:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाय वल्ली. काल कराड आणि पुढे देवराष्ट्रला गेलो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचं गाव बघायचं होतं, तिथून जवळ असलेल्या देवराष्ट्रे या गावी गेलो. 'कृष्णकाठ' मधे उल्लेख आहे, म्हणून पुरातन महादेवाचे मंदिर बघायला गेलो, छान आहे, त्यास 'समुद्रेश्वर' म्हणतात. गावाचं दैवत म्हणून 'सागरोबा' असेही नाव आहे. तिथे बाहेर दोन वीरगळ दिसले. डोंगरातून तिथे पाणी झीरपत येते आणि एका खोलगट भागात पाणी साठवून असते, बारमाही पाणी असते म्हणे. तर, तिथे दोन वीरगळ दिसले. वीरगळ एकावर काही आकार तर, एक पूर्ण सपाट दगड झाला होता. वीरगळ बघीतल्यावर, तुम्ही आणि तुमच्या धाग्याची आठवण झाली. मग छायाचित्र काढले. आता माहिती सांगावी. पण या वीरगळात तीन स्त्रिया दिसत आहेत. वर महादेवाची पींड दिसत आहे. बाकी खालील भाग सपाट झालेला दिसतो. सविस्तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. वीरगळ अनेक ठीकाणी दिसतात. छायाचित्र घ्यायचे राहून जाते.
-दिलीप बिरुटे
22 Mar 2023 - 1:51 pm | प्रचेतस
धन्यवाद सर,
मधल्या पॅनलमध्ये तीन स्त्रिया नसून दोन्ही बाजूंना एक एक अप्सरा आहे आणि मध्यभागी मृत वीर आहे. त्याला त्या दोन अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहेत. खालच्या पॅनलमध्ये ढाल तलवारीने युद्ध करणाऱ्या वीराचे शिल्पांकन आहे. वरच्या पॅनलमध्ये तो वीर स्वर्गवासी झालेला असून शिवाची आराधना करताना दाखवलेला आहे.
22 Mar 2023 - 5:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं आहे व्हय, ते सगळं. माहितीबद्दल धन्स.
सगळी वीरगळं एक चित्र-लिपीच आहे.
बाय द वे, तुम्ही या वीरगळावर एक पुस्तक करा. पुलेशु.
-दिलीप बिरुटे