काय कायदा काय वायदा कसले पोलिस ठाणे
ओलिस आहे मुके रांगणे गुंडच इथे शहाणे
डोंबाच्या हाती सत्तेचे उजवे चलनी नाणे
डावे पाठी री ओढे गुणगुणे पोरके अन गाणे
सारे गनिमी व्याध; अमीषे त्यांची मिठास वाणी
माया भरते दारी त्यांच्या अथक कृपेचे पाणी
कळसावर लखलखते सोने वार सोसते कोणी
आटपाटची नगरी ही तर; ताक चोरते लोणी
सांग विठू तू बद्ध करांनी का अजुनी रे मौनी
पायाखालिल वीट क्रयास्तव कलली पाहुन चैनी
रेत जाळते पाणी रानी चौखुर आणीबाणी
आक्रंदे प्रतिशोध; संयमी जनता केविलवाणी
..............................अज्ञात
प्रतिक्रिया
20 Mar 2012 - 8:24 pm | सांजसंध्या
व्यवस्थेविरूद्धचा मूक आक्रोश म्हणायचा का हा ?
21 Mar 2012 - 6:34 am | यकु
विडंबनाच्या कामी जेव्हा डोंब आम्ही झालो
होती नव्हती लाज तेवढी कोळून का प्यालो
असतील अज्ञात जर इथले रिवाज, गोष्ट सांगतो ऐका
कवितांच्या माथी नित्याचा इथे विडंबनाचा धोका
'जोवरी' होतो विचार तोवरीच कविता होती
त्यास्तव तिची ती कद्रु टोनिंग पसंत जीवाला नव्हती
असेल चुकलो, क्षमा करावी चरण स्पर्शतो आता
काल कंठण्या करीत बसतो इथे फुकाच्या बाता
कळसाचे सोने आणिक विठूस का ते बोला
विठूच तो जो देतो बुद्धी क्षमेस आपुल्या आला
प्रतिशोधाची का ही भाषा
पायी येऊन पडतो जेव्हा डोंबाच्या वेशात
21 Mar 2012 - 1:30 pm | निश
यशवंत साहेब , अतिशय मस्त आहे तुमचि कविता.
21 Mar 2012 - 1:56 pm | यकु
धन्यवाद. :)
>>यशवंत साहेब
-- साहेब तिकडे मातोश्रीवर, कृष्णकुंजमध्ये आणि दिल्लीत बसलेत, निशसाहेब!
(रावसाहेब) यशवंत
21 Mar 2012 - 7:42 pm | अज्ञातकुल
तुमची कविता नक्की आवडली. मात्र शेवटचं कडवं नीटसं उमगलं नाही बुवा. .............
21 Mar 2012 - 7:50 pm | यकु
>>>तुमची कविता नक्की आवडली.
--- धन्यवाद. :)
>>>मात्र शेवटचं कडवं नीटसं उमगलं नाही बुवा.
--- यावर माझा विश्वास नाही. :)
धन्यवाद. :)
21 Mar 2012 - 7:39 pm | अज्ञातकुल
नुकतंच माझ्या दृष्टीला पडलेलं वास्तव एवढंच म्हणेन मी.................. :)
21 Mar 2012 - 8:59 am | पैसा
दोन्ही आक्रोश "आवडले! "
21 Mar 2012 - 1:47 pm | निश
अज्ञातकुल साहेब, अतिशय मस्त आहे तुमची कविता
22 Mar 2012 - 11:39 am | मनीषा
सुरेख कविता !
23 Mar 2012 - 12:24 pm | अज्ञातकुल
सर्वांचे मनःपूर्वक आभार .......:)