स्वप्नाळू राती, सहज एकदा, नदीकिनारी बसले
ओढून घेता, पदर नभाचा, रम्य दॄश्य ते दिसले
चांदणे होते, चमचमणारे, तीरावरी उतरले
पाण्यामध्ये, पोहते तारे, पाहुनिया मी हसले
आकाशीच्या पडद्यावरति, चालत होते, मन कुंचले
चंद्र सोळा चितारलेले, लख्ख दिवे लखलखले
रंगीत संगीत रेषा हलता, जरा जरासे पर हलले
फुलपाखरे, फडफडणारी, स्वप्नचित्र असे दिसले..
हिरवाईत होते, शुभ्र रेशमी, ससे देखणे, गोजिरवाणे
पिठूर चांदणे, माळून येता, शुभ्रतेत मी न्हाले
कुठे एकला, गात होता, चंदन तो .. गंधित गाणे
मधुर सुरांवर, सुगंधित कण, मंद मंदसे दरवळले
पलीकडे, त्या काठावरती, स्वप्नांची एक बाग फुले
बागेमधली, स्वप्नफुले ती, पाहताच मी फुलले
उगाच नाही, सांगत काही, स्वप्नामधे मी दंगले
चितारताना, नभावरी मग, पुन्हा पुन्हा मी रमले
- संध्या
03 Feb 2010
प्रतिक्रिया
17 Mar 2012 - 12:06 pm | सांजसंध्या
अगदी सुरूवातीची कविता आहे..
(रस्ता पहिली आणि ही दुसरी कविता )
17 Mar 2012 - 12:27 pm | चौकटराजा
आज मला नव्याने गवसले
पूर्वी जे मी स्वप्नी पाहिले
सांजसंध्ये म्हणुनच पहिले
आभार मी तुझे मानले
चौकट राजाची धाव अस्ताई किंवा अंतर्या पर्यंत कारण नाही प्रतिभा नि आहे आळस .
मी प्रत्यक्ष काश्मीर पाहिले आहे पण त्याचा परिणाम म्हणून काय काश्मीर माझ्या स्वप्नात आले. ते काहीसे असे होते. स्वप्नातच मी पूर्ण
कार्यक्रम ओ पी नय्यर यांच्या गीताचा पाहिला ऐकला आहे. स्थळ पुणे शेतकी कॉलेजचे शेत.( स्वप्नात कशाचेही काँबबीनेशन येते) कसबा
पेठ पुणे येथील रस्त्यावर पाराखाली उभे राहून माडी ( बहुधा कुटंबवत्सल माणसाचे घर ) वरून वाजविली जाणारी मदनमोहन लता कॉम्म्बोची
गाणी ऐकली आहेत. या तीनही अविस्मरणीय स्वप्नांची गाथा तुझ्या गीताने ( चुकलो,. कवितेने ) पुन्हा गायिली. आगे बढो !
17 Mar 2012 - 12:39 pm | निश
सांजसंध्या़जी, मस्त कविता सुरेख कविता आहे
तुमच्या कवितेत एक तरलता आहे.
खरच मस्त कविता आहे.
17 Mar 2012 - 1:00 pm | प्रचेतस
कविता आवडली.
मीटर थोडंस गंडलय इथे.
17 Mar 2012 - 2:26 pm | अत्रुप्त आत्मा
अतिशय हळुवारपणे मनाला गंधित करणारी काव्यरचना आहे... लाजव्वाब...!
फक्त काही ठिकाणी मिटरमधे थोडी गंडलीये...पण ठिक आहे,चालुन जाइल :-)
@स्वप्नाळू राती, सहज एकदा, नदीकिनारी बसले
ओढून घेता, पदर नभाचा, रम्य दॄश्य ते दिसले
चांदणे होते, चमचमणारे, तीरावरी उतरले
पाण्यामध्ये, पोहते तारे, पाहुनिया मी हसले >>> या सर्व ओळींमधले दृष्य...मी तुळापुरला(संभाजी महाराज समाधी...नदीकाठी) कोजागिरीच्या रात्री अनुभवलेले आहे... तिथे तो ३ नद्यांचा संगम झाल्यामुळे नदि-पात्र विशाल/शांत डोहासारखे/काहिसे भयाकारी पण तितकेच ओढ लावणारे..असे आहे...ते सगळ दृष्य वाचता वाचताच अठवत होतं... रोमांचकारी अतिशय रोमांचकारी... :-)
17 Mar 2012 - 2:38 pm | प्रचेतस
एखाद्या कवितेला भटजींकडून विडंबनाऐवजी असा तरल, हळूवार प्रतिसाद येणं म्हणजे त्या कवितेचं अहोभाग्यच.
17 Mar 2012 - 3:09 pm | अत्रुप्त आत्मा
एखाद्या कवितेला भटजींकडून विडंबनाऐवजी असा तरल, हळूवार प्रतिसाद येणं म्हणजे त्या कवितेचं अहोभाग्यच. >>> आणी आम्च्या अश्या तरल प्रतिसादांना बॅरल भरुन कौतुकाचा उप-प्रतिसाद येणं.. हे आमचं ५किलो भाग्य... ;-)
17 Mar 2012 - 4:17 pm | प्रचेतस
बॅरल भरून प्रतिसाद तुम्ही दिलात का आम्ही?
17 Mar 2012 - 4:56 pm | अत्रुप्त आत्मा
बॅरल भरुन वाक्य नव्हे ,बॅरल भरुन "कौतुकाचा" उप-प्रतिसाद असं म्हंटलवतं :-)
17 Mar 2012 - 2:20 pm | गोंधळी
:smile:
17 Mar 2012 - 4:26 pm | स्पा
कुहू ची आठवण आली
17 Mar 2012 - 8:13 pm | सांजसंध्या
सर्वांचे मनःपूर्वक आभार
वल्लीजी आणि आत्माजी..पुढच्या वेळी नक्कीच काळजी घेईन मीटरची . थँक्स :)
19 Mar 2012 - 1:27 pm | सांजसंध्या
आमचं स्वप्नचित्र हरवलं कि...:)
19 Mar 2012 - 1:37 pm | प्रचेतस
कसं काय ब्वा हरवलं?
19 Mar 2012 - 1:41 pm | सांजसंध्या
तुमचं दोघांचं तुंबळ युद्ध पहायला सगळे मिपाकर गेलेत ना ;)
तुमचं म्हणजे आत्मा आणि तुम्ही...
19 Mar 2012 - 1:48 pm | प्रचेतस
:)
19 Mar 2012 - 4:25 pm | अत्रुप्त आत्मा
@तुमचं दोघांचं तुंबळ युद्ध पहायला सगळे मिपाकर गेलेत ना ;-) >>> युद्ध संपल्यावर स्वप्नचित्रांचीच गरज असते... येतील सगळे पुन्हा, मेंदु ताळ्यावर आणायला.. ;-)
19 Mar 2012 - 4:28 pm | स्पा
.