उंबरठ्यातील खिळे.
आई जाऊन आज १२ दिवस झाले होते.
आमच्या घरासाठी कष्ट उपसत बिचारीच्या हाडाची काडे झाली. वडिलांच्या तुटपुंज्या पगारावर संसाराचे गाडे ओढताना तिची होणारी दमछाक आम्ही आमच्या डोळ्यांनी पहात होतो. जमेल तसा तिला हातभारही लावत होतो. मी स्वत: पहाटे उठून वर्तमानपत्रे टाकायला जायचो तर धाकटा दुधाचा रतीब घालायला जायचा. दिवस भर शाळा कॉलेज करून शिकून आम्ही दोघेही आता स्थिरस्थावर झालो आणि आईच्या मागची विवंचना संपली. पण सुखाचे दिवस फार काळ बघायचे तिच्या नशिबात नसावे.
आई गेल्यावर घरातील वर्दळ वाढली. उद्या तेरावा झाला की मग मात्र घर खायला उठेल . आता राहिलो आम्ही तिघेच मी, बाबा आणि धाकटा. दु:ख जरा हलके झाल्यावर आलेल्यांच्यात आता माफक हास्यविनोदही चालू झाले. माणसाचे मन कसे घडविले आहे परमेश्वराने ! परवापरवा पर्यंत सारखे डोळ्यातील पाणी पुसणारी माझी मावशीही आता सावरून घर कामाला लागली होती. आईची साडी नेसून घरात वावरत असताना मीही एकदोनदा फसलो होतो. मग परत एकदा रडारड. पण असे एकदोन प्रसंग वगळता घर आता सावरले होते असे म्हणायला हरकत नव्हती.
आईच्या अगणित आठवणी सगळ्यांच्या मनात दाटून आल्या होत्या आणि परत परत उगाळल्या जात होत्या. बाबांचे मात्र मला आश्चर्य वाटत होते. शांतपणे ते घरात हवे नको ते पहात होते. त्यांच्या पाणी आटलेल्या डोळ्यात मागे कुठेतरी अश्रूंना बांध घातलेला मला स्पष्ट जाणवत होता. घर लहान, पाहुण्यांची गर्दी, मिळेल त्या जागी पडायचे अशा अवस्थेत बाबांच्या हुंदक्यांचे आवाज एकू येणे शक्यच नव्हते. पण त्यांच्या आणि आईच्या प्रेमाचा मी कळायला लागल्यापासून साक्षीदार होतो. त्यांनी घरासाठी किती खस्ता खाल्या, दोन दोन नोकर्या केल्या आणि आईबरोबर हा संसार आनंदाने केला. कष्ट भरपूर होते पण आनंदही अपरंपार होता.
जे वेळेला येऊ शकले नव्हते ते येत होते आणि आल्या आल्या त्या दिव्याच्या पुढ्यात जाऊन पाया पडत होते. थोडे टेकत होते. वयस्कर अनुभवी होते ते चहा टाकायला सांगून गप्पात परत रंगून जात होते. जेवताना आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव तीव्रतेने आठवत होती आणि डोळ्यात पाणी जमा होत होते. रात्री अंथरूणावर पडल्यावर मात्र स्वप्ने पडावीत तसे प्रसंग डोळ्यासमोरून सरकत होते.
आईने शिवलेला पहिला सदरा, थंडी वाजू नये म्हणून विणलेला तोकडा स्वेटर, अभ्यास केला नाही म्हणून दिलेला मार, मारून झाल्यावर तिचेच रडणे हे सगळे आठवून मन खिन्न झाले. धाकट्याची तीच परिस्थिती असणार हे त्याच्या चुळबुळींवरून कळत होते. नेहमी घोरणारे बाबा आज मात्र बिलकूल घोरत नव्हते.
“सदा, गरीबी फार वाईट. तू आता मोठ्ठा झालास. आपल्या घरातील भांडणांचे मूळ कमी पडणारा पैसाच आहे हे आता तुला कळायला पाहिजे. यातून बाहेर पड बाळा. त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी कर. पैसा आला की बघ सगळे सुरळीत होईल”. आईने तेव्हा बजावलेले वाक्य मला आठवले. तेवढ्यात दरवाजात कसलातरी धडपडायचा आवाज झाला. पटकन उठून बघितले तर उंबर्याला अडखळून माझा काका धपडला होता. दिल्लीवरून तो तेराव्याला आला असणार. हा माझ्या आईचा अजून एक लाडका दीर. पण त्याचे लग्न झाल्यावर त्याच्याकडून आईने एक पैही घ्यायची नाकारली होती. तुझ्या संसारासाठी साठव असे म्हणाली होती त्याला. पुढे जाऊन मी त्याची पडलेली बॅग आणि त्यातील सामान गोळा करायला लागलो. मला जवळ घेऊन तो म्हणाला “सदा राहूदे... राहूदे...” मी खाली बसलो आणि ती बॅग भरू लागलो. उंबरठ्यावर पसरलेले सामान गोळा करताच झिजलेला उंबरठा माझ्या नजरेस पडला. मधेच झिजून त्याला एक प्रकारचा गुळगुळीतपणा आला होता. मी त्याच्यावरून मायेने हात फिरवला आणि रांगोळीची रिकामी जागा...तिच्याकडे बघवेना मला.. उंबरठ्यावर मोठमोठे कुर्हाडी खिळे ठोकलेले होते. जवळ जवळ १० एक तरी असतील. काय हालायची बिशात होती त्याची ! थोड्यावेळ गप्पा मारून झाल्यावर घरात समसूम झाली. उद्या तेरावा. लवकर ऊठून बाबांनी सांगितलेली बरीच कामे करायची होती. झोप तर येतच नव्हती, तसाच तळमळत अंथरूणावर पडलो झाले.
सगळे धार्मिक विधी झाल्यावर प्रसादाची जेवणे झाली आणि चार नंतर सगळे एक एक करून जायला निघाले संध्याकाळपर्यंत घर पार रिकामे झाले आणि आमचे तिघांचेही चेहरे कावरे बावरे झाले. उन्हे कलली आणि मावशीला न्यायला तिच्या घरचे आले आणि मग मात्र आम्हाला पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना येऊ लागली. घरात स्त्री नसली तर घराचे हॉटेल कसे होते हे आम्हाला पहिल्या तासातच कळाले. काय बोलावे हे न कळाल्यामुळे आम्ही तिघांनाही एकमेकांची तोंडे चुकवत त्या घरात वेगवेगळ्या जागा घेतल्या. थोड्यावेळाने एकामेकांच्या जवळ जाऊन परत दूर जात होतो. काही सुचत नव्हते. अंधार पडल्यावर मात्र आता एकामेकांचे भकास चेहरे दिसणार नाहीत या कल्पनेने जरा सुटकेचा निश्वास टाकून मी अंथरूणावर अंग टाकले.
सकाळपासूनच्या दगदगीमुळे व काही दिवस झोप न झाल्यामुळे पटकन झोप लागली.. जाग आली ती कोणी तरी काहीतरी ठोकत असल्याच्या आवाजाने. आता कोण ठोकते आहे ? घड्याळात बघितले तर काही फार वाजले नव्हते रात्रीचे ८. उठून बघितले तर बाबा उंबरठ्यावर काहीतरी करत होते. मला वाटले वर्दळीमुळे उंबरठा हलला असेल करत असतील दुरूस्ती. मदतीला गेलो. त्यांनी हत्यारांच्या पेटीतून एक मोठ्ठा कुर्हाडी खिळा काढला आणि तो खिळा त्या उंबरठ्यावर मधोमध ठेवून वर हातोड्याचा घाव घातला. खिळा थोडासाच आत गेला. जूने सागवान ते ! लाकडात गाठ आलेली असणार मी मनात म्हटले.
“बाबा काय झाले आहे याला ? हा हालत तर नाही. उद्या खिळे ठोकले तर नाही का चालणार ?”
“नाही रे बाबा ! तुला नाही कळायचे ते. आजच करायला पाहिजे !”
“ का बरे ?”
“तेराव्या दिवशी उंबरठ्यात खिळे ठ्कल्यावर अतृप्त आत्मे घरात येत नाहीत. हे सगळे खिळे, नाल, याचसाठी ठोकलेले आहेत”
माझ्या डोक्यात आत्ता प्रकाश पडला. तो खिळा पूर्णपणे आत गेल्यावर त्याचे फक्त ते चपटे झालेले चौकोनी डोके वर राहीले आणि बाबा म्हणाले “चल झोप आता”.
बाबा त्यांच्या खोलीत गेले आणि मी माझ्या अंथरूणावर. झोपेचे आता खोबरेच झाले होते. परत सगळ्या आठवणी जागा झाल्या आणि डोळ्यातून येणारे अश्रू थांबेचनात. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. डोळे मिटले तर तो चपटा खिळा माझ्याकडे बघून दात विचकतोय असाही भास व्हायला लागला. कपाळावर घाम जमा झाला आणि शरमेने मान खाली गेली. त्याच तिरमिरीत मी उठलो. हत्यारांची पेटी काढली आणि तसाच उंबरठ्यावर धावलो. खिळे काढायचा अंबूर काढला आणि त्वेषाने त्या खिळ्याशी झटापट करायला लागलो. पण बाबांनी आई घरात येऊच नये अशी मजबूत व्यवस्था केली होती. त्याच तिरीमिरीत परसात गेलो आणि ती छोटी पहार घऊन आलो आणि त्या उंबरठ्याखाली सारली व उचलली.... त्या आवाजाने बाबा व धाकटा उठले आणि बाहेर आले.
“अरे काय करतोस काय तू ?”
“मी हे खिळे काढतोय बाबा”
“अरे नको काढूस”
“का? का नको काढू ? ज्या बाईने आपल्यासाठी आयुष्यभर खस्ता काढल्या, आमची नेहमीच काळजी केली त्या बाईचा आत्मा आत येऊन आम्हाला त्रास देईल असे वाटते की काय तुम्हाला ? हा खिळा येथे राहिला तर बाबा मी सांगतो मी या घरात राहणार नाही आणि आपल्याला कधीही शांतता लाभणार नाही”
माझ्या डोळ्यात संताप उतरला होता, आणि मी शरमेने आणि रागाने थरथर कापत होतो. रडत रडत मी बाबांना मिठी मारली. माझ्या डोक्यावर थोपटत त्यांनी मला शांत केले.
“चला आपण तो खिळाच काय, उंबरठाच काढून टाकू”
---------------------------------------------------------------------
“आमच्या घराण्यात त्या दिवसापासून कोणाच्याही घराला उंबरठा बसवायची परंपरा नाही.........”
मी डोळे पुसत माझ्या नवीन वाड्याच्या वास्तूशांतीसाठी आलेल्या माझ्या मित्रांना सांगितले.
जयंत कुलकर्णी.
लघुकथेचा एक प्रयत्न.
श्री प्रमोद देव यांनी केलेले या कथेचे अभिवाचन खाली दिले आहे. जरुर ऐका.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
24 Feb 2012 - 12:00 pm | मृत्युन्जय
अतिशय हृद्य. मिपावर आल्याचे समाधान वाटावे अश्या काही कथांपैकी एक.
24 Feb 2012 - 12:02 pm | प्रचेतस
+१ असेच म्हणतो.
जयंतकाका मिपाचे वैभव आहेत.
24 Feb 2012 - 12:08 pm | अन्या दातार
खरंच सुंदर जमलीये कथा.
अवांतरः या धाग्यावर अत्रुप्त आत्म्याला प्रतिक्रिया देता येणार का? अशी एक शंका उगीचच आली ;)
24 Feb 2012 - 12:11 pm | प्रास
आता उंबरठाच नाही तर काय अडचण?
असो.
जयंतराव स्पेशल लिखाण!
लघुकथा आवडली आहे.
आपण जयंतरावांचा फुल्स्पीड पंखा असल्याचं पुन्हा एकदा सार्थक झालं.
24 Feb 2012 - 12:52 pm | मी-सौरभ
टू जिनी सॉरी प्रास
24 Feb 2012 - 12:12 pm | रानी १३
मन हेलावुन टाकणारी कथा !!!!!! मस्त जमली आहे.... पुलेशु......
24 Feb 2012 - 12:15 pm | पियुशा
मस्त भावस्पर्शी लेखन / कथा !!!!
वाचता वाचता डोळ्यात पाणी तराळुन गेले :)
24 Feb 2012 - 2:06 pm | रणजित चितळे
खरं बोललात. येथे पण तेच झाले
24 Feb 2012 - 12:22 pm | आचारी
अतिशय सुन्दर कथा!! थोड्क्यातच पण खुप काहि सा॑गुन जाणारी !!
24 Feb 2012 - 12:22 pm | आचारी
अतिशय सुन्दर कथा!! थोड्क्यातच पण खुप काहि सा॑गुन जाणारी !!
24 Feb 2012 - 12:31 pm | पिंगू
काका कथा आवडली आणि वास्तवदर्शीपण वाटली. ज्या आईने ममतेने वाढवले आणि तिच्याच आत्म्याला भ्यायचं हे काही मनाला पटण्यासारखे नाही आणि म्हणून जे लिहिलेलं आहे ते वास्तवदर्शीच म्हणेन..
- पिंगू
24 Feb 2012 - 12:57 pm | अमृत
काय प्रतिसाद द्यावा कळत नाही? :-( सध्या वि.स. खांडेकरांची पुस्तके वाचायचा सपाटा लावला आहे म्हणून असेल कदाचीत पण त्या ओघानी जाणारी वाटली. आणखी लिहा.
अमृत
24 Feb 2012 - 12:57 pm | अमृत
काय प्रतिसाद द्यावा कळत नाही? :-( सध्या वि.स. खांडेकरांची पुस्तके वाचायचा सपाटा लावला आहे म्हणून असेल कदाचीत पण त्या ओघानी जाणारी वाटली. आणखी लिहा.
अमृत
24 Feb 2012 - 1:11 pm | स्वातीविशु
सुरुवातीच्या काही ओळी वाचूनच डोळे भरुन आले. :(
पुढचे नंतर वाचेन..
24 Feb 2012 - 1:44 pm | पैसा
वाचताना हृदयात कालवाकालव झाली आणि अशाच प्रसंगातून गेल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
24 Feb 2012 - 2:07 pm | रणजित चितळे
जेवताना आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव तीव्रतेने आठवत होती आणि डोळ्यात पाणी जमा होत होते.
माझ्या गेलेल्या आईची आठवण करुन दिलीत. फारच छान कथा आहे.
24 Feb 2012 - 2:44 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सरसरुन काटा आला अंगावर!!!
अत्यंत प्रभावी झाली आहे कथा!!
तुम्हाला आमचा __/\__
24 Feb 2012 - 2:59 pm | मोहनराव
आपली स्तुती करावी तेवढी कमी आहे काका!
24 Feb 2012 - 3:09 pm | प्रीत-मोहर
खुप छान कथा..
24 Feb 2012 - 3:14 pm | दिपोटी
सुंदर ... अतिसुंदर !
- दिपोटी
24 Feb 2012 - 3:33 pm | Ravindra
सुन्दर लघुकथा.
24 Feb 2012 - 3:39 pm | प्यारे१
................
24 Feb 2012 - 4:11 pm | कवितानागेश
अतिशय सुंदर कथा....
24 Feb 2012 - 4:17 pm | प्रभाकर पेठकर
नुकतीच २३ ऑक्टोबर, वसुबारस, २०११ ला आई गेली. आम्ही तीन भावंडं, तिची अखंड सेवा केलेली माझी वहिनी, माझी पत्नी आम्ही सर्वांनी त्या ८१ वर्षाच्या सुरकुतलेल्या आणि डोळे मिटून पडलेल्या आईला फळांचा रस २- ३ चमचे पाजला. तिला घोट गिळण्याचेही भान नव्हते. संत्र्याचा रस गालात भरून ठेवायची. 'आई पिऊन टाक तो रस. संत्र्याचा आहे.' असे सांगून आपलं वाक्य तिच्या मेंदू पर्यंत पोहोचले आहे की नाही हे पाहात होतो. ती तो रस पिऊन टाकायची. रस पिऊन झाल्यावर आम्ही तिच्या चेहर्याकडे पाहात होतो. तिने श्वास घेतला, सोडला, पुन्हा घेतला, सोडला आणि.....................घेतलाच नाही, पुन्हा श्वास घेतलाच नाही.............आईईईईईई....! आभाळ कोसळलं.
तिचं प्रेम, तिचा राग, तिची शिस्त, तिची महत्वाकांक्षा, तिचे संस्कार, तिची स्वप्न, तिचं धैर्य, तिचं शहाणपण सर्वस्वाचं एक थंड कलेवर उरलं. आम्ही पोरके झालो.
वडील ९६ सालीच गेले होते. तेव्हाही खुप रडलो होतो पण आज पोरकेपण पुर्णत्वास गेले. ५८व्या वर्षी एकटा पडलो.
24 Feb 2012 - 10:50 pm | टुकुल
सुन्न करुन गेला तुमचा हा प्रतिसाद.. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे असे प्रसंग, पण जेव्हा विचार येतो कि मला पण ह्यातुन जावे लागेल कधीतरी, त्यावेळी मनात विचारांची खुप कालवाकालव होते, हिशोब होतो कि आतापर्यंत किती सुख आणी त्रास दिला आईवडीलांना आणी अजुन त्यांच्यासाठी काही करु शकतो का ज्यानी त्यांना आनंद होईल. भिती खरतर नंतरच्या पच्छातापाची आहे .
--टुकुल.
24 Feb 2012 - 11:57 pm | प्रभाकर पेठकर
आई-वडिलांचे श्राद्ध-पक्ष मी करीत नाही. माझा त्यावर विश्वास नाही. त्यांना जिवंतपणी प्रेमाने,आदराने वागवावे त्याचीच आई-वडीलांना म्हातारपणी खुप गरज असते. श्राद्ध-पक्षाला, मृत्यूपश्चात, काही अर्थ नसतो.
माझे कुठलेही 'दिवस' करू नयेत. देहदान करावे अशी इच्छा मी आत्ताच मुलाजवळ व्यक्त केली आहे.
25 Feb 2012 - 9:12 am | मन१
काहीतरी म्हत्वाचं सांगून गेलात.
आभार....
24 Feb 2012 - 5:19 pm | ५० फक्त
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेंव्हा कंदिल एकटा होता...
ती गेली....
24 Feb 2012 - 5:37 pm | जयंत कुलकर्णी
सर्व पतिसादकांना धन्यवाद. वाचकांनाही !
ज्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांना त्यांच्या आयुष्यातील दु:खद आठवणी परत आठवल्या असणार त्यासाठी त्यांची माफी मागतो.
ही कथा तशी सत्यावर आधारित आहे, माझ्या वडिलांनी सांगितलेली.
24 Feb 2012 - 5:39 pm | वपाडाव
.
24 Feb 2012 - 5:50 pm | राजघराणं
असेच लेख रोजची मिपावारी भाग पाडतात. बाकी आपले इतरही लिखाण थोरच
24 Feb 2012 - 5:53 pm | छोटा डॉन
ह्याला कथा वगैरे म्हणतात का ते माहित नाही, कदाचित अशा प्रकारचे लिखाण 'कथा' वगैरेंच्या व्याख्येत बसणार नाही किंवा ती व्याख्या अपुरी होईल.
मात्र जे काही लिहले आहे हे अत्यंत प्रभावी आहे असे म्हणतो.
बर्याच दिवसांनी मिपावर एवढे प्रभावी लेखन वाचले हे ही कबुल करतो.
- छोटा डॉन
25 Feb 2012 - 9:11 am | मन१
+१
24 Feb 2012 - 7:26 pm | अनामिक
हृदय हेलावणारं लेखन. वाचता वाचता स्क्रीन कधी धुसर झाली ते कळलंच नाही.
मिपावर कमी होत चाललेल्या अत्यंत प्रभावी लेखनापैकी एक!
24 Feb 2012 - 7:30 pm | निशदे
फारच सुंदर.
असेच प्रयत्न तुमच्या हातून अधिकाधिक होऊ द्यात.....
24 Feb 2012 - 7:46 pm | शुचि
आजच्या दिवसाचे सार्थक झाले.
24 Feb 2012 - 8:11 pm | jaypal
सगळी पात्रं डोळ्या समोर फेर धरतात. (मनातल्या मनात एक डॉक्युमेंटरी/आर्ट्फिल्मच तयार होते जणु)

वाचता वाचता त्या घरातील सदस्य कधी झालो? ते कळलच नाही.
24 Feb 2012 - 8:26 pm | रेवती
लेखन आवडले.
वाचताना डोळ्यात पाणी आले.
24 Feb 2012 - 8:33 pm | जाई.
प्रभावी लेखन
बऱ्याच दिवसांनी चांगल अस वाचायला मिळालं
24 Feb 2012 - 9:58 pm | रामपुरी
...
24 Feb 2012 - 10:13 pm | कौशी
खरोखर भावस्पर्शी ..
24 Feb 2012 - 10:16 pm | प्राजु
अतिशय प्रभावी आणि सुंदर कथा.
एकदम हळवे करणारी!
बर्याच दिवसानी मिपावर काही चांगलं वाचायला मिळालं.
24 Feb 2012 - 10:41 pm | टुकुल
अतिशय सुंदर आणी तुम्ही पण एकदम हळुवार पणे उलगडलाय हा प्रसंग.
--टुकुल.
25 Feb 2012 - 5:59 am | अभिजीत राजवाडे
तो बोल, मंद, हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला.
असे काहीसे वाटले. कथा आवडली.
25 Feb 2012 - 6:41 am | सूड
कथा अतिशय आवडली. फक्त ट्रेनमध्ये उगाच वाचायला काढली, चारचौघात पुरषाच्या डोळ्यात पाणी येऊ नये हा अलिखित नियम असतो. तो पाळावा लागला.
25 Feb 2012 - 6:59 am | पाषाणभेद
सुंदर भावस्पर्शी कथा.
25 Feb 2012 - 8:46 am | डॉ.श्रीराम दिवटे
आईबद्दल अतिशय हळव्या भावना व्यक्त झाल्या आहेत. कथेचे शीर्षक वाचूनच गाभा वाचनीय असणार याचा अंदाज आला होता. उत्तम लेखन. पुलेशु.
25 Feb 2012 - 9:09 am | Pearl
खूप सुंदर, अप्रतिम कथा.
एकदम टचिंग.
25 Feb 2012 - 9:22 am | श्रीयुत संतोष जोशी
प्रभावी. शब्द नाहीयेत पतिसाद द्यायला. अतिशय भावस्पर्शी.
25 Feb 2012 - 10:22 am | अरुण मनोहर
वाह जयन्तराव, क्या बात है! खूप ह्रदयस्पर्शी कथा.
25 Feb 2012 - 11:58 am | श्रीवेद
भावस्पर्शी कथा.
25 Feb 2012 - 1:43 pm | जयंत कुलकर्णी
सगळ्यांचे आभार मानण्यासाठी एक प्रतिसाद आपल्या सगळ्यांच्या परवानगीने वाढवत आहे. ज्यांनी वाचले नसेल त्यांनी पावलोच्या डायरीच्या काही पानांचे मी केलेले भाषांतरही जरूर वाचावे. मला खरे तर ते जास्त आवडले आहे.
निद्रेचा तुरुंग
या गोष्टीचे यश माझ्या लिखाणाचे नसून त्या दोन अक्षरांचे आहे - "आई" याची मला पूर्ण जाणीव आहे.
25 Feb 2012 - 3:15 pm | ज्ञानोबाचे पैजार
खरे आहे जयंतराव, "आई" हा प्रत्येकाचा विक पॉइंट असतो. पण या विषयावरील प्रत्येक लिखाणामुळे इतके हळवे व्हायला होतेच असे नाही. त्याचे श्रेय तुम्हाला जातेच.
निद्रेचा तुरुंग तर खरोखर सुंदर जमले आहे. मी अजुनही त्यामधुन बाहेर पडु शकलो नाही. नुसते आठवले तरी अंगावर शहारे येतात.
29 Feb 2012 - 5:10 pm | कपिलमुनी
आइची पोकळी कधीच भरून निघत नाही ..हे वाक्यावाक्यामधून जाणवला
1 Mar 2012 - 10:35 am | मराठमोळा
जवळची व्यक्ती आयुष्यातून निघून जाणे - याच गोष्टीची ईतकी भिती वाटते तर आई देवाघरी जाणे ही कल्पनादेखील करवत नाही.
कथेबद्दल बोलायचं झालं तर मी निशःब्द!!
1 Mar 2012 - 1:40 pm | चिगो
खुप हळवं केलंत, काका..
4 Mar 2012 - 10:15 pm | किचेन
रडले ..खुप रडले.
23 Jun 2012 - 10:10 am | इनिगोय
आजच्या चतुरंगमध्ये (लोकसत्ता शनिवार पुरवणी) ही कथा वाचली, इथे वाचली होती तेव्हाही तेवढीच आवडली होती. अभिनंदन आणि पुलेशु. :)
23 Jun 2012 - 2:07 pm | जयंत कुलकर्णी
मला माहितच नव्हते. मी पाठवली होती पण ते छापतील असे वाटले नव्हते. कळवल्याबद्दल धन्यवाद !
मला हे कळविणारे आपण पहिलेच म्हणून स्पेशल धन्यवाद. माझ्या जाला बाहेरच्या मित्रांना मी लिहितो हे माहित नसल्यामुळे कदाचित त्यांना धक्क बसेल..........हा...हा....
यात सर्व मिपावासीयांचा सहभाग आहे याची नम्र जाणीव मला आहे आहे हे लक्षात घ्यावे ही विनंती.
24 Jun 2012 - 5:04 pm | शैलेन्द्र
हेच लिहायला आलो होतो.. अभिनंदन काका..
25 Jun 2012 - 3:40 pm | इनिगोय
कस्चं कस्चं :)
असेच धक्के नेमाने येऊ द्यात..
23 Jun 2012 - 10:33 am | अक्षया
सुंदर भावस्पर्शी कथा.
23 Jun 2012 - 3:25 pm | बॅटमॅन
उत्खनन करून हा अप्रतिम धागा वर काढल्याबद्दल इनिगोय यांचे धन्यवाद!!!!
23 Jun 2012 - 5:26 pm | स्वप्निल घायाळ
खूपच छान !!!!
24 Jun 2012 - 3:22 pm | मन१
आजच्याच लोकसत्तेतही हा लेख दिसला "चतुरंग"मध्ये
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=233...
6 Sep 2014 - 3:21 pm | लव उ
मग शोधुन काढ्ला तुमचा हा ले़ख.
6 Sep 2014 - 3:38 pm | जयंत कुलकर्णी
आईची आठवण अशीच असते...
14 Oct 2014 - 1:13 am | बोबो
सुंदर कथा....
14 Feb 2015 - 9:31 pm | जेपी
....
15 Feb 2015 - 7:32 am | अत्रन्गि पाउस
+१
15 Feb 2015 - 12:23 am | कुहू
निशब्द करणारा लेख
23 Mar 2017 - 12:21 am | जयंत कुलकर्णी
श्री. प्रमोद देव यांनी केलेले अभिवाचन....
चार वर्सापूर्वी मी ही लघूकथा प्रथम लिहिली... माझा हा पहिलाच प्रयत्न होता... :-)
23 Mar 2017 - 4:11 am | पिलीयन रायडर
हे मिपा युट्युब चॅनलवर टाकलं तर चालेल का?
23 Mar 2017 - 4:45 am | जयंत कुलकर्णी
हो ! टाका की....
23 Mar 2017 - 8:00 am | पिलीयन रायडर
https://youtu.be/NVUkWzoy8yc इथे अपलोड केली आहे!
23 Mar 2017 - 8:10 pm | रांचो
काही कथांचा प्रभाव कधीच ओसरत नाही. त्यातलीच हि एक. __/\__
24 Mar 2017 - 1:17 am | जव्हेरगंज
अतिशय सशक्त कथा!!!!
मानाचा मुजरा !!
_/\_
24 Mar 2017 - 5:09 pm | सिरुसेरि
छान कथा . + १००