दिप मिळाले जे मजला, आकांक्षाची होळी करुनी
राख राख चेतवुन मी, तेच जाळिले रस्त्यांवरुनी
इथे घाव माझेच पुराने, या वाटेवर ना कुठे चांदणे
नको रुसु त्या बहरांवरती, फसवुन ज्यांनी ग्रीष्मात नेले
वळणावरती होउ वेगळे, घेउन हिस्से आपआपुले
इथे प्रेम ही केविलवाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे
मळभ उरातील नैराश्येचे, माथ्यावरती आले भरुनी
धुळीत मिळुनी स्वप्नफुले ती, वेड्यावानी गेली विरुनी
इथे दु:खाचे झुलती पाळणे, या वाटेवर ना कुठे चांदणे
जिथे कोसळे वीज अचानक, त्याच कातळी आपुले निशान
तिथे बहरत्या वसंतातही, उमलुन येई काट्यांचे रान
इथे फक्त फसवे बहाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे
कृपया जाणकारांनी आपले मत स्पष्ट लिहावे.
(अकारण प्रोत्साहन दिल्यास अजुन कविता वाचन्याची सजा भोगायला तयार रहावे!)
प्रतिक्रिया
11 Jun 2008 - 2:51 pm | अरुण मनोहर
>>>>जिथे कोसळे वीज अचानक, त्याच कातळी आपुले निशान
तिथे बहरत्या वसंतातही, उमलुन येई काट्यांचे रान
इथे फक्त फसवे बहाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे
केवळ निराशे खेरीज कवीला आणखी काही सांगायचे आहे असा भास शेवटचे कडवे वाचून होतो.
हा भास आहे असे मला भासले ते पुढच्या दोन अकारण ओळी वाचून.
कृपया जाणकारांनी आपले मत स्पष्ट लिहावे.
(अकारण प्रोत्साहन दिल्यास अजुन कविता वाचन्याची सजा भोगायला तयार रहावे!)
अवांतर- तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवण्याची शक्यता असते.