सरस्वती ... एक लोकमाता
सरस्वती लुप्त होऊन हजारो वर्षे झाली. हिमालयात उगम पावून हरियाना, पंजाब, राजस्थान,गुजराथ मधून वहात जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळणारी सरस्वती, ऋग्वेदात जिचे रम्य वर्णन केले आहे, एके काळी जिचे पात्र ८-१० किलोमीटर रुन्द होते, जिच्या काठावर भारतातील सर्वात पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत , अशी सरस्वती आज मात्र तुम्हाला पहावयासही मिळत नाही. तिच्या पाण्यावर आज तुम्ही शेती करू शकत नाही. तिच्या लेकरांची तहानभूक ती आज भागवू शकत नाही. भूगर्भातील उत्पातामुळे तिचे पात्र आटले पण तिचे प्रेम मात्र आजही आटलेले नाही. आजही ती भारताला सुजलाम्-सुफलाम् करावयास आसुसलेली आहे. गरज आहे फक्त तिच्या मुलांनी आपला कर्तव्याचा भाग उचलण्याची.....
भाकरा-नानगल धरण झाले. पाण्याकरिता आक्रोश करणार्या जमिनीला पाणी मिळाले. पण अडाणी माणसाने त्याचा दुरुपयोग केला. वर्षात दोनदोन, तीनतीन पीके काढण्याच्या ईर्षेने त्याने जमिनीला तिला पचणार नाही इतके पाणी पाजले. जमिनीवर पाणी पडले की काही पाणी जमिनीत मुरते, काही पाण्याचे बाष्पीभवन होते, काही वाहून पुढे निघून जाते. मुरलेले पाणी जमिनीतून पुढे वाहून जाऊ शकते, काही विहीरी-तलाव यांच्या रुपाने परत वर येते. सुक्या दिवसांत माणसाला परत उपयोगी पडते. जमिनीत पाणी किती मुरू शकते याला मर्यादा असते. या मर्यादेपेक्षा तुम्ही दिलेले पाणी जास्त झाले तर ते जास्त पाणी उलटीसारखे परत फिरते. खालून वर येऊ लागते व उलटी प्रमाणेच ते जल निर्मल नसते :त्यात जमिनीतील क्षार असतात.काही वेळा तर हे क्षार जमिनीवर पांढरा थर निर्माण करतात." पंजाब-हरियानात धरणाचे पाणी मिळते आहे म्हणून वापरा कितीही " या धोरणाने हेच घडले. ही अशी संपृक्त (water-logged) जमीन शेतीला निरुपयोगी ठरते. आज पंजाब व हरियानात अशी प्रत्येकी दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन निरुपयोगी बनत आहे आणि याची व्याप्ति वाढतच आहे. महाराष्ट्रात कोल्हापुरात हेच घडत आहे. फार काय, पुणे जिल्ह्यातील दौंड सारख्या कोरड्या भागातही हे दिसत आहे.
याला उपाय नाहीत काय ? आहेत की ! (१) चर काढून त्या द्वारे पाण्याला वाट द्यावयाची. उतार असेल तर
पाणी पुढे वाहून जाईल. (२) नसेल तर पाणी पंपाने वर खेचावयाचे व बांधीव (Lined) कालव्याने पुढे न्यावयाचे. पण या करिता दोन अडचणी आहेत.एक खर्च व दुसरी महत्वाची. चर किंवा कालव्याकरिता जमीन लागते.(surface land) म्हणजे शेतकर्याची जमीन मिळाली पाहिजे. हे (acquisition)आता अशक्यच झाले आहे. मग काय नुसते वाढणारे नुकसान बघत बसावयाचे ?
नाही. तशी गरज नाही. डॉ. रमेश आठवले यांनी एक भारी योजना सुचवली आहे. जमिनीखाली सरस्वतीचे कोरडे पात्र आहे.त्याच प्रमाणे तिला मिळणार्या उपनद्यांची पात्रे आहेत त्याला नैसर्गिक उतार आहे. हरियाना-पंजाब-राजस्थान असा तिचा मार्ग आहे.
जमिनीत (perforated pipes) गाडावयाचे. त्यांच्या द्वारे हरियाना-पंजाब मधील संपृक्त जमीनीतील पाणी या पात्रांत सोडावयाचे. जमिनीखालील कोरड्या पात्रांतून वहातवहात ते सरस्वतीच्या पात्रात येईल.त्या मार्गाने ते राजस्थानमध्ये आले की ते बाहेर काढावयाचे. पहिली काही वर्षे ते थोडे क्षारयुक्त असेल पण नंतर ते शेतीला उपयुक्त होईल. बाहेर हे तंत्र वापरले गेले आहे व सिद्ध झाले आहे. आजही राजस्थानातील वाळवंटी भागात त्याचा उपयोग वनीकरणाकरिता केला तरी तो फार फायदेशीर प्रयोग होईल. फायदे बघा.
(१) पंजाब-हरियानातील जमीन परत उपयोगात येईल. (२) वरची जमीन (Surface land) ताब्यात घ्यावी लागणार नसल्याने शेतकर्याचा विरोध असणार नाही.(३) खर्च कमी लागेल. (४) पाण्याची वाफ होणार नसल्याने जास्त पाणी मिळेल. (५) राजस्थानातील वाळवंटाचे रुपांतर वनात-शेतीत होईल.
सरस्वती लोकमाता आहे. आजही ती आपणास उपयोगी पडणार आहे. राज्यांमधील-राजकीय पक्षांतील क्षुल्लक
भांडणे विसरून आपण तिला उर्जितावस्था प्राप्त करून देणार आहोत का ?
(डॉ. आठवले भूगर्भशास्त्रातील (Geology) तज्ञ असून हैद्राबादमधील National Geophysical Research Institute मधून ( Scientist G) म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत.)
शरद
प्रतिक्रिया
7 Feb 2012 - 1:08 pm | sagarpdy
कल्पना छान!
अधिक माहिती हवी.
7 Feb 2012 - 1:28 pm | अत्रुप्त आत्मा
फार छान माहिती दिलीत...अश्या समस्या आहेत हे तरी आंम्हाला यामुळे कळेल...
7 Feb 2012 - 2:29 pm | उदय के'सागर
खुपच छान महिती... खरंच, एक नदी म्हणुन "सरस्वती" हे फक्त "गंगा-जमुना(यमुना)-सरस्वती" ह्यातच वाचायला वा ऐकायला मिळतं... तिचं अस्तित्व उरलंच नाहिये.... :(
बादवे, डॉ. रमेश आठवले यांनी जी योजना सुचवली आहे त्यात खर्च कमी शिवाय शेतकरी पण सुरक्षीत आहेत मग ति प्रत्यक्षात आणण्यात ह्या राजकिय लोकांना अडथळा कुठे येतोय नेमका?
अश्याने विकास होत नाहि देशाचा हे तर वेगळेच पण आपणच आपल्या देशातिल तज्ञ लोकांना (डॉ. रमेश आठवलें सारखे) असं 'डि-मोटिवेट' करतो, त्यांच्या अभ्यासाला-संशोधनाला काहिच महत्त्व देत नाहि(भिकहि घालत नाहि)... मग हे असे लोक आपला देश सोडुन दुसर्या देशात गेले तर त्यात वाईट वाटण्याचे काहिच कारण नाहि.... आणि अर्थात ह्या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतात ते 'सर्व-सामान्य' नागरिकाला... :(
7 Feb 2012 - 2:40 pm | गणेशा
माहिती आवडली ..
असे होउ शकते हे पहिल्यांदाच कळाले... असे झाले तर छानच आहे
धन्यवाद .
7 Feb 2012 - 11:13 pm | रामपुरी
लेख छान पण शेवटचा भाग समजला नाही. कदाचित अधिक स्पष्टीकरणाची गरज आहे.
8 Feb 2012 - 4:28 am | खेडूत
सरस्वती ही वेदांची माता समजली गेली आहे.
प्राचीन भारतात ही नदी सर्वात रुंद होती. इ. स.पूर्व ३००० ते २००० दरम्यान ती आधी अरुंद आणि मग लुप्त झाली.
१९७० मध्ये अमेरिकन उपग्रहाच्या चित्रांमधून पश्चिम भारतातले पाण्याच्या मार्गाचे अवशेष प्रथम दिसले होते.
त्या आधारे डॉ. वाकणकर यांनी उपग्रहाने पाठवलेली चित्रे आणि प्राचीन साहित्य, पुरातत्व संदर्भांच्या आधारे अथक संशोधन केले होते आणि सरस्वतीचा एक संभाव्य मार्ग शोधला १९८२ मध्ये त्यांच्या संशोधनाला इतर शास्त्रज्ञांचा दुजोरा मिळाला आणि अधिकृत मान्यता मिळाली. डॉ वाकणकरांचे बंधू हरिभाऊ हे पण फ्रांस मध्ये पुरातत्व शास्त्रज्ञ होते आणि त्यांना भारत सरकार ने पद्मश्री दिली होती.
डिसेंबर १९८७ मध्ये एका प्रदर्शनासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळालं त्या वेळी त्यांनी खूप छान माहिती दिली होती. आळंदी इथे आठ बाय बारा फूट आकाराच्या भारतमातेच्या मानचित्रावर गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती या नद्या एल. इ. डी. ने विविध रंगात दाखवल्या होत्या आणि श्राव्य माहिती च्या आधारे सरस्वती बद्दल माहिती दिली होती. त्यावेळी ही माहिती सर्वांनाच नवीन होती. त्याची पेपरात चर्चा आणि कौतुक झाले. ( तो वि हिं प चा कार्यक्रम असल्याने साहजिकच टीका पण केली गेली.) पुढे लुप्त सरस्वती बद्दल आणखी वाचत गेलो.
डॉ. वाकणकर यांनी वेदिक सरस्वती नदी शोध प्रतिष्ठान (जोधपूर) या संस्थेच्या माध्यमातून काम केलं, ते त्यांच्या पश्चात अजूनही सुरु आहे. इस्रो चे डॉ कस्तुरीरंगन आणि प्रादेशिक दूर संवेदन सेवा केंद्र (RRSSC) यानी या संस्थेला मदत म्हणून कैलास मान सरोवर ते द्वारका दरम्यान च्या उपग्रह चित्रांच्या अभ्यासाला मदत केली.
नदी जोड प्रकल्पाच्या तयारीसाठी सरस्वती चा अभ्यास महत्वाचा झाला आहे.
पुढे इंग्लंडात आल्यावर ब्रिटीश म्युझियम मध्ये पण अधिक माहिती मिळाली.
अधिक माहिती साठी स्टीफन बाबाच्या या दुव्यावर पण माहिती मिळेल.
बाकी इथला मूळ मुद्दा थोडा वेगळा आहे. त्यांची कल्पना नीट कळली नाहीय.
|बाहेर हे तंत्र वापरले गेले आहे व सिद्ध झाले आहे.
म्हणजे कुठे? अधिक माहिती कशी मिळेल?
8 Feb 2012 - 9:21 am | पिंगू
वर उल्लेख केलेलं तंत्र हे भूजल पुनर्भरण करण्याचं एक तंत्र आहे आणि हे तंत्र किफायतशीरपण आहे.
ह्याबद्दल अॅग्रोवन मध्ये लेखमाला वाचली होती. पण दुवा सापडत नाहीये.. :(
- पिंगू
8 Feb 2012 - 11:11 am | पैसा
पण काही मुद्दे आहेत. सरस्वतीचे पुरातन पात्र जमिनीखाली किती खोल आहे? म्हणजे पाईप्स किती मोठ्या/लहान आकाराचे, लांबीचे लागतील? अशा प्रकारे पाणी जमा व्हायला किती काळ जावा लागेल? सरस्वतीचे स्वतःचे पाण्याचे काही स्रोत शिल्लक आहेत का? सरकार दरबारी याबद्दल चर्चा झाली आहे का? खर्च किती अपेक्षित आहे? याबद्दल माहिती उपलब्ध आहे का?
8 Feb 2012 - 8:49 pm | धनंजय
चांगले मुद्दे आहेत.
त्या भागावरून वाहाणारी नदी होती (अजून छोटीशी सरस्वती नदी शिवालिक पर्वतांतून निघतेच) तीत जाणारे पाणी आता दुसर्या कुठल्या नदीतून समुद्राला मिळते. (बहुधा सतलज, काही थोड्या प्रमाणात यमुनेतून.) राजस्थानातल्या या भागात आज भूजलपातळी खूपच खोल आहे. ती या नदीतून सिंचन करून वाढवायची (मग भूजलातून नदीला पाणी मिळेल) असे काही म्हणता येत नाही. कारण भूजलाचे ते कोठार हिमालयातल्या (सतलज-यमुना यांच्या) पाण्यानेच भरावे लागेल.
ते पाणी येथे आणावे, तर सतलज/यमुना आडवून आणावे लागेल. म्हणजे या खणलेल्या पात्रात आणि कालव्यात काय फरक राहील? राजस्थानातील भूजल पातळी भरून काढणे म्हणजे कालव्यातून झिरपण्यापेक्षा काय वेगळे?
सिंधू नदीचे सर्व पाणी आज समुद्रात पोचण्यापूर्वीच वापरले जाते. सतलज नदीमधले पाणी राजस्थानात मोठ्या प्रमाणात पाठवले, तर सतलज-सिंधूवर तगणार्या शेतकर्यांच्या पाटातले पाणी तोडले जाईल.
(हा पाकिस्तान-धार्जिणेपणा नव्हे. अनेक देशांतून/राज्यांतून जाणार्या नद्या असल्या, तर उगमाच्या ठिकाणी सर्व हक्क आहेत असे तत्त्व शाहाणपणाचे नाही. कारण काही नद्या अन्य देशांतून भारतात वाहात येतात. उदाहरणार्थ जेहलम, सिंधू, ब्रम्हपुत्र. हे तत्त्व मानल्यास पुढे कधी तिबेट-चीन या नद्यांचे पाणी उगमाच्या आजूबाजूला रिचवू लागतील. चीन-तिबेटाला पाण्याची तहान आहेच, आणि पाणी आडवून रिचवण्याचे तंत्र आता बरेच विकसित झालेले आहे. म्हणून "नदीच्या उगमापाशी सर्वे हक्क" हे तत्त्व न-मानणेच शहाणपणाचे.)
9 Feb 2012 - 7:53 am | शरद
(१) अधिक माहिती
भाकरावर एक निबंध श्री. धर्माधिकारी यांनी लिहला असून तो बराच मोठा (४ एम.बी.) असल्याने येथे टाकणे अवघड आहे. यात waterlogging बद्दल भरपूर माहिती आहे व ज्यांना उत्सुकता असेल त्यांना तो देण्याचा मी प्रयत्न करीन. माझे जालावरचे ज्ञान अगदीच तुटपुंजे असल्याने जरा प्रयत्न करावा लागेल.पण खरच कोणाला उत्साह असेल तर डॉ. आठवले यांना rathavale@gmail.com यावर भेटावे.
(२) श्री. पंगू ....
इथे जल पुनर्भरणाचा विचार नाही. अगदी उलट जमिनीतील जास्त झालेले पाणी काढून टाकावयाचे आहे.
(३) श्री. खेडूत ..
हा प्रयोग बाहेर म्हणजे नेदर्लॅडमध्ये उपयोगिला आहे व त्यांच्या मदतीनेच लहान प्रमाणात येथे उपयोगात आणावयाचा प्रयत्न झाला आहे. श्री.धर्माधिकारी यांचा लेख बघा.
(४) श्री. पैसा ...
श्री पृथ्वीराज चव्हाण केंद्रात असतांना त्यांना ही माहिती दिली गेली होती. पुढे काय झाले ? ..अर्थात काहीच नाही.
(५) श्री. धनंजय ..
सरस्वती लुप्त झाली असून घाग्गरा ही एक पावसाळी नदी सरस्वतीच्या पूर्व मार्गवरून वहाते. ती अगदीच किरकोळ नदी आहे, विचारात घेण्यासारखे काही नाही.
भूजलाचे कोठार हिमालयात आहे, मान्य. आपण फक्त पंजाब-हरियानातील waterlogged जमीन, तेथील पाणी काढून, परत उपयोगात आणता येईल का याचा विचार करत आहोत. व हे जादा पाणी तेथून हालवून राजस्थानमध्ये वापरावयाचे आहे.
सतलज-यमुना यांचे पाणी अडविणे इ. येथे अपेक्षित नाही.
चीनने ब्रह्मपुत्रेवर तिबेटमध्ये धरण बांधावयास सुरवात केलीच आहे.भारत-बांगलादेश यांनी चिंताही व्यक्त केली आहे.
शरद
9 Feb 2012 - 3:41 pm | वपाडाव
विस्तृत रुपात मांडली असती तर अजुन ज्ञान झिरपले असते...
आपला(शरदजी) अन खेडुन यांचा प्रतिसादही उत्तम... पैसातैंच्या शंकाही...