इवल्या इवल्या बाळाचे
इवले इवले ताट
चिऊ काऊ हम्माचे
अवती भवती पाट
पहिला घास चिऊचा
चिव चिव अंगणीचा
मेणाच्या घरातल्या
चिव चिव चिमणीचा
दुसरा घास काऊचा
काव काव फांदीवरचा
शेणाच्या घरातल्या
काव काव कावळ्याचा
तिसरा घास हम्माचा
हम्मा हम्मा कपिलाचा
गवताच्या गोठ्यातल्या
हम्मा हम्मा गाईचा
बाळाची अंगतपंगत
पक्षीप्राण्यांची संगत
हातवारे बाळाचे
वाढत आहे रंगत
गोड घास आईचा
मम्म मम्म करण्याचा
चांदोबाला बोलावत
गात निन्नी करण्याचा !
प्रतिक्रिया
12 Dec 2011 - 8:03 pm | अत्रुप्त आत्मा
गोड :-)
गोंडस :-)
गुब्बुगुब्बु :-)
चान चान :-)
12 Dec 2011 - 8:16 pm | हरिकथा
किती सुरेख बालगीत आहे, विदेशराव!
अगदी बाळकृष्णाला यशोदामाई भरवत असल्याची भावना उत्पन्न झाली. तिनेही असेच चिऊ-काऊचे नि कपिलेचे घास बनवून भरवले असतील तिच्या कान्ह्याला आणि असेच चांदोबा दाखवत जोजवले असेल.....
फारच छान!
काव्य आवडले.
13 Dec 2011 - 9:59 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त आहे..
आजच लेकीला ऐकवतो.. खुश होऊन जाईल.
धन्यवाद हो विदेश भाऊ!!