चटेरीपटेरी अंडरप्यांट घालून
डोक्यावर टोपीचा द्रोण लेऊन
म्हातारा बसलेला असतो संध्याकाळी
त्या लाकडी बाकावर
सूर्याचे कोवळे उन्ह घेत अंगावर
उघडाबंब ...!!
कधी कानावर फुल लावून
पेपर वाचत बसलेला असतो हा म्हातारा
पेपर वाचता वाचता जातो हरवून
म्हातारा गोरा गोरा
खरपूस भाजल्यासारखा त्याचा रंग
खारके सारखा सुरकतुन
रापून करपून गेलेय अंग नि अंग
म्हातारा पेपर वाचत उघडा बंब ...
म्हातारा बसलेला असतो
आपले कलिंगडी पोट सांभाळत
पोटात खुपसली असते रबरी ट्यूब
काय झालेय त्याला कुणास ठाऊक ..?
तरी तो असतो निर्विकार
आत्ममग्न
पेपर वाचत उघडाबंब ..!!
कालपासून पाने गळू लागलीत झाडांची
सुकून भिरभिरू लागलीत सर्वत्र
रस्ताभर ..
फुले कोमेजून गेलीत
बहर संपून गेलाय झाडांचा ,फुलांचा
थोड्या दिवसात बर्फ पडेल
रस्ते भरून जातील बर्फाने
ऋतू संपून गेलाय
झाडा-फुलाना कशी जाणीव होते आपण संपल्याची
कशी बघत बसतात आपला उध्वस्तपणा उघड्या डोळ्यांनी
म्हातार्याला जाणीव झालीय
आपला बहर संपून गेल्याची
तो शांतपणे बघत बसलाय झाडांची पानगळ
नि वाचत बसलाय पेपर
त्याच्यावरची बघत बसतो चित्र
म्हातारी माणसे किती छान दिसतात
रंगी-बेरंगी टवटवीत
झिम्म उत्साहात बुडून जातात ...
आजची आताची पानगळ बघून घेऊ
तेवढीच ती आपली
प्रवास संपल्याची खूण त्याला दिसून गेलीय
चर्चची बेल त्याला येंकु येतेय
नम्रपणे संपणार्या समरला तो करतोय बाय
या पुढच्या वर्षी
मी असेन नसेनही कदाचित ....
तो ज्या बाकावर बसतोय
त्या बाकावर
काळ्या पाटीवर स्वच्छ अक्षरात
लिहून ठेवलेय कोणीतरी
त्याला ती अक्षरे आता आताशी
आपलीच वाटू लागलीत
जॉर्ज बर्की :
जो समरमध्ये
ह्या बाकावर बसून
ह्या मस्त निसर्गात हरवून जायचा ...!
प्रतिक्रिया
8 Dec 2011 - 7:13 pm | चित्रा
सुरेख कविता.. आवडली.
(पश्चिमेकडची तुमची वारी सुरेख कवितांना जन्म देते आहे हे पाहून बरे वाटते आहे.)
8 Dec 2011 - 7:40 pm | ५० फक्त
असं आहे होय, मला वाटलं मिपावरच्या एखाद्या सदस्याबद्दल आहे का काय कविता.
बाकी कविता मस्त आवडली.