जन्म घेतला का मी येथे
कधी कधी मज उगा वाटते
कमावण्याच्या अरूंद वाटेवर
बेकारांची गर्दी दाटते
किती भिकारी बनले येथे
एक टिचेच्या पोटासाठी
धान्य दडविती गोदामी ते
केवल आपुल्या स्वार्थासाठी
समानतेची शिकवण आमुची
एकात्मतेची आस वाटते
शाळेमधल्या दाखल्यात मग
धर्म-जात ती कशी नाचते?
घोटाळ्यांची भरवून स्पर्धा
इथला सेवक छळतो आहे
आर्त हुंदका महागाईचा
कुणा कधी का कळतो आहे?
शहिदांच्या बलीदानांवरही
शब्दच नव्हता स्मरला ज्यांना
अफजल गुरूच्या माफीसाठी
कोण पुरवितो भाषण त्यांना?
खून दरोडे, धोकादाडी
बलात्कारही रोज पाहिले
अराजक्तेच्या वादळात या
सदाचारी का कुणी न राहिले?
कुणा मागावी दाद आता ती
न्यायच पोषी अन्यायाला
त्या जनतेची चाड कुणा ती
जिथला राजा फितुर झाला?
या तमाची चिडच ज्याला
पेटून ऊठला एक दिवा तो
पणत्या करिती मदत दिव्याला
बदलच होता एक नवा तो
त्या रामाला लबाड ठरविती
मिळून सगळे इथले रावण
तुम्हीच सांगा कैशी व्हावी
भारत भूमी पवित्र-पावन?
बोथटलेल्या पुरूषत्वाची
आज मला जर चिडच आली
का मग म्हणता तुम्हीच मजला
हि तर सुंदर कविता झाली?
-अविनाश
(मायबोलीवर पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
6 Dec 2011 - 10:31 pm | प्राजु
चांगली आहे कविता...
पुलेशु.
7 Dec 2011 - 12:26 am | प्रशांत उदय मनोहर
असेच म्हणतो.
7 Dec 2011 - 10:11 am | फिझा
छान .. आहे कविता !!
7 Dec 2011 - 4:31 pm | अत्रुप्त आत्मा
कुणा मागावी दाद आता ती
न्यायच पोषी अन्यायाला
त्या जनतेची चाड कुणा ती
जिथला राजा फितुर झाला?.... ---^--- सलाम,लाजवाब,खल्लास