फिरते आहे घेऊन, जखम एक ठसठसती
खपली आहे वरती पण आतून भळभळती
वरपांगी कमालीचा ... हसरा चेहरा
आतून पार भेदरलेला, भित्रा नि बावरा
आविर्भाव आहेत सारे, जग जिंकल्याचे
शल्य सदा काळजात, सारे हरल्याचे
सवयीचं होतंय आता, हुकमी हसू
कधी मात्र दगा देतात, आपलेच आसू
असेल का सोपं यापेक्षा अश्वत्थाम्याचं जिणं
जखम दाखवत जगाला, तेल मागत फिरणं
जयश्री अंबासकर
प्रतिक्रिया
2 Nov 2011 - 2:38 pm | प्रास
चांगली कविता आहे पण बरेचदा अशा कवितांमुळे उदासवाणं व्हायला होतं. काहीतरी उत्साहवर्धक आणा की इथे....
बाकी जयश्रीताई, मिपावर खूप काळाने दर्शन होतंय. बरं वाटलं.
येत जा की अधून मधून....
:-)
2 Nov 2011 - 3:31 pm | पैसा
पण कविता छान आहे.
2 Nov 2011 - 6:49 pm | दत्ता काळे
जयवी, तुमच्या इतर कवितांच्या तुलनेत हि कविता फारच डावी वाटली. ओढून ताणून ट ला ट, रि ला री जुवळल्यासारखं वाटतंय.
3 Nov 2011 - 12:24 pm | फिझा
छान कविता आहे !!
3 Nov 2011 - 1:52 pm | मदनबाण
कविता आवडली...
6 Nov 2011 - 9:39 am | जयवी
प्रास... ह्म्म.... तुम्ही म्हणताय ते मनापासून पटतंय पण असे मूड स्वींग्स असतातच ना !!
ज्योती, फिझा, मदनबाण...... शुक्रिया :)
दत्ता....... ... पुढच्या वेळी अधिक चांगली लिहिण्याचा प्रयत्न करेन.
6 Nov 2011 - 11:12 am | पिवळा डांबिस
जयश्री, नेहमीप्रमाणेच सुंदर कविता.....
असेल का सोपं यापेक्षा अश्वत्थाम्याचं जिणं
जखम दाखवत जगाला, तेल मागत फिरणं
क्या बात है!!! जियो!!
बाकीचं काही तू मनावर घेऊ नकोस. हल्ली मिपाकरांना सगळं कसं अगदी हलकंफुलकं हवं असतं! :)
पण तू लिहीत जा, तुला जे काही स्फुरतं ते!! जरी एखादी कविता कडवट असली तरीही!! कारल्याच्या भाजीलाही तिचा स्वतःचा असा स्वाद असतोच. थोडे का होईना पण पण आमच्यासारखे काही अडाणी आस्वाद घेतील.....
तुझ्या कवितांचा फॅन,
पिडां
11 Nov 2011 - 1:23 am | जयवी
धन्यवाद पि डा ...... :)
11 Nov 2011 - 4:10 pm | मनीषा
खूप सुंदर कविता .
या जखमा कधी ना कधी भरून येतीलच ..
पण अश्वत्थामा चे दु:ख मात्र चिरंतन आणि चिरंजीव आहे.
13 Nov 2011 - 1:30 pm | जयवी
शुक्रिया मनिषा :)