मेघना आज एक वर्षाची झाली. मेघना मी एक वर्षापूर्वी घेतलेली कार. ह्युंदाई आय टेन मॅग्ना १.२ या तिच्या पुर्ण नावामधल्या फक्त मॅग्नाचं मराठीकरण करुन आम्ही तिचं नाव मेघना ठेवलं.
गेल्या वर्षी साधारण सप्टेंबर मध्ये आयुष्य भयानक कंटाळवाणं झालं होतं. जे व्हायला हवं असं वाटत होतं ते होईल असं अजिबात वाटत नव्हतं आणि जे व्हायला नको असं वाटत होतं ते मात्र पिच्छा सोडायला तयार नव्हतं. यातलं एक म्हणजे माझं ऑफीसमधलं काम. मी वेब डेव्हलपर आहे या वाक्याचा भुतकाळ झाला होता. आता मी जगभरात तीन हजार युजर्स असलेल्या आणि रोज काही ना काही फाटणार्या वेबसाईटचा टेक्निकल लीड होतो, सोळा जणांच्या टीमचा टीम कॉर्डीनेटर होतो. पण हे दुरुन डोंगर साजरे त्यातला प्रकार होता. टेक्निकल लीड या नात्याने माझं काम काय वेबसाईटमध्ये काही फाटलं तर जोपर्यंत डेव्हलपर्स पॅच मारत नाहीत तोपर्यंत युजर्सना गंडवणं. डेव्हलपर्स टीम बिझी असल्यामुळे नविन युजर सेटप करणे, त्यांचे पासवर्ड रीसेट करणं ही असली बकवास कामे करावी लागायची. सगळ्यात अवघड काम काय तर वेबसाईटवर वापरलेला प्रोजेक्ट प्लानचा अॅक्टीवेक्स कन्ट्रोल लोड ब्राउजरमध्ये कसा लोड करायचा हे युजरला समजावणं.
टीम कॉर्डीनेटरचं काम म्हणजे तर आनंदी आनंदच होता. आमची बेचाळीस जणांची टीम. महापे, पुणे, चेन्नई, ह्युस्टन आणि सॅन रॅमॉन अशा पाच ठीकाणी विखुरलेली. प्रोजेक्ट मॅनेजर महापे, नवी मुंबईला. बाकीच्या टीम त्या त्या ठिकाणचे टीम कॉर्डीनेटर सांभाळायचे. आणि इतकी खत्रुड कामे करावी लागायची की विचारु नका. टीम मध्ये नविन डेव्हलपर आला त्याच्या साठी मशिन शोधा. ते मशीन वरच्या किंवा खालच्या फ्लोअरवर असेल तर ती मशिन आपल्या फ्लोअरवर आणण्यासाठी रीक्वेस्ट टाका, तिचा फॉलोअप करा. नाईट शिफ्टच्या डेव्हलपर्सना रात्री नाश्ता नाही मिळाला, कँटीनमध्ये जा, तिकडे चौकशी करा आणि मग पीएम सोबत हे सगळं डिस्कस करा. भारीच.
या अशा कंटाळवाण्या गोष्टींमुळे काहीतरी वेगळं करावसं वाटत होतं. ट्रेकींग वगैरे कधीतरी ठीक वाटायचं. आणि तसंही मला जय भवानी जय शिवाजी म्हणत उन्हातान्हात वणवण करत फीरण्यात काहीही रस नव्हता. हडपसरला ग्लायडींग सेंटर आहे असं ऐकलं होतं.त्याची माहिती काढली होती. पण प्रत्यक्ष जाणं मात्र होत नव्हतं. हे सगळं असं चालू असताना एका मित्राने सहज म्हटलं की ड्रायव्हींग शिक. कल्पना वाईट नव्हती. मला निखिलची आठवण आली. मी आणि निखिल महापेला असताना बेस्ट फ्रेंड होतो. पुढे तो अमेरिकेला गेला. दोन महिन्यांनी मीसुद्धा गेलो. दोघांची ऑफीसेस दोन वेगवेगळ्या शहरात होती. दोन शहरांमधलं अंतर कारने अर्धा तासाचं. तो म्हणे मी तुझ्यासोबत राहायला येतो, आपण दोघात कार घेऊ. म्हणजे मला तुझ्या तिकडून ऑफीसला येता येईल. मला काही प्रॉब्लेमच नव्हता. झालं. निखिल आला तो माझा शोफर बनुनच. मी काही कधी कारच्या व्हीलला हात लावला नाही.
त्यामुळे आता मात्र ड्रायव्हींग शिकायला काही हरकत नव्हती. हो नाही करता करता एक दिवस पैसे भरुन टाकले आणि आमचा ड्रायव्हींगचा क्लास सुरु झाला. बिच्चारा ट्रेनर. अक्षरशः झेलत होता मला. माझ्याईतका मंद त्याला कधीच भेटला नसेल. आपला राग मोठया मुश्किलीने कंट्रोल करुन तो समजावायचा, अहो सर एव्हढा अर्जंट ब्रेक लावलात तर मागचा गाडीवाला येउन आपल्याला धडकणार नाही का. ट्रेनिंगचे पंधरा दिवस संपले. हळूहळू का होईना, ड्रायव्हींग हा प्रकार आवडायला लागला होता. आता गाडी विकत घ्यावी असं वाटू लागलं होतं. नाही म्हणायला युएसला असताना भारतात परत गेलो की एक सेकंड हँड अल्टो घ्यायची असं ठरवलं ही होतं. अधून मधून मारुतीची ट्रु व्हॅल्यू वेबसाईट पाहत होतो. परंतू भारतात आल्यावर मात्र तो विचार बारगळला होता.
आता मात्र राहून राहून नवी कार घ्यावीशी वाटत होती. बाबांजवळ विषय काढला.
"अल्टो नको", बाबांनी स्पष्ट आणि नेमक्या शब्दात त्यांचं मत सांगितलं.
"का?"
"खुप छोटी आहे. बसल्यावर असं वाटतं की आपण जमिनीवरुन सरपटत चाललो आहोत."
"तुम्ही हे ज्या कारबद्दल बोलत आहात ती अल्टो नसेल. एट हंड्रेड असेल. अल्टो इतकीही छोटी नाही."
"पण नकोच."
अल्टोचा ऑप्शन बाबांनी निकालात काढला. दुसरा ऑप्शन पुढे आला तो वॅगन आर. वेबसाईटवर जाऊन डीटेल्स काढले. मला आवडली. घरच्यांना फोटो दाखवले.
"ही टुरीस्ट कार वाटते रे."
मी कपाळावर हात मारुन घेतला. एव्हाना मी कार घेतोय ही बातमी माझ्या मित्रमंडळीत पसरली होती. मी वॅगन आरचा विचार करतोय आणि ऑन रोड कॉस्ट फोर प्लस आहे हे सांगताच माझ्या बर्याच मित्रांनी "देन व्हाय डोन्ट यू गो फॉर आय टेन?" असा प्रश्न मला केला होता.
रस्त्यावर धावणार्या आय टेन पाहील्या आणि मी पाहता़क्षणीच त्या कारच्या प्रेमात पडलो. ऑन रोड पाचच्या आसपास जात होती. हरकत नव्हती. मी गाडी दिवाळीला हवीय म्हणून लगेच बुकिंग करुन टाकलं. ड्रायव्हींगचा क्लास लावणं ते गाडी बुक करणं हा जेमतेम महिन्याभराचा कालावधी होता. महिन्याभरात मी कार बुकसुद्धा केली होती. माझे डोळे भरुन आले. मन भुतकाळात गेलं...
बारावी झाली. ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं. ज्यावर्षी मी ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं त्याच वर्षी ईंजिनीयरींगच्या फ्री सिटची फी चार हजारांवरून दहा हजारावर गेली. बाबांना धक्काच बसला. कारण बाबांनी वर्षाला चार हजार रुपये फी गृहीत धरून माझ्या ईंजिनीयरींगच्या खर्चाचा हिशोब केला होता. माझ्या सुदैवाने एक गोष्ट चांगली होती. ईंजिनीयरींग कॉलेज माझ्या घरापासून आठ किलोमीटर अंतरावर होतं त्यामुळे मी घरुन रोज येऊन जाऊन कॉलेज करू शकणार होतो. माझा बाहेर राह्यचा खायचा खर्च वाचणार होता. झालं. हो नाही करता माझं ईंजिनीयरींग सुरु झालं. पाठच्या भावांमध्ये फक्त एकेक वर्षाचं अंतर असल्यामुळे आता एक बारावीला होता तर छोटा अकरावीला. खर्चाची थोडीफार ओढाताण सुरू झाली होती.कॉलेज थोडंसं आडवाटेला होतं त्यामुळे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याईतक्या कमी एस टी बसेस कॉलेजला जायच्या. घरी बाबांची एक जुनी सायकल होती. मी सोयीचे पडेल म्हणून सायकलने कॉलेजला ये जा करण्याचा निर्णय घेतला. जायचे आठ किलोमीटर आणि यायचे आठ किलोमीटर. सोळा किलोमीटर तर होतं. आणि तसं त्या सायकल वर मी एक वर्ष काढलं सुदधा.
दुसरं वर्ष सुरु झालं. भावाची बारावी संपली होती. पठठयाने मेडिकलची एंट्रन्स एग्झाम सुदधा क्लियर केली.
"बाबा त्याच्या मेडिकलच्या फीचं काय करणार आहात तुम्ही?"
"बघूया. त्याची या वर्षीची फी भरण्याइतके पैसे आहेत माझ्याकडे जमा. या वर्षीची फी भरुया आपण त्याची. पुढच्या वर्षीपासूनची फी भरण्यासाठी आपण बॅंकेकडून शैक्षणिक कर्ज घेउया"
"बाबा, त्याने फीचं भागेल. मेडीकल कॉलेज दापोलीला आहे. त्याला हॉस्टेलला राहावं लागेल. त्याच्या खर्चाचं काय?"
"होईल काहीतरी. तू काळजी करू नकोस." बाबा माझ्या खांदयावर थोपटत मला धीर देत होते.मी मान वर करुन बाबांच्या चेह-याकडे पाहीलं. बाबांचे डोळे अश्रूने डबडबले होते.
माझं सेकंड ईयर चालू होतं. भावाचं मेडीकल कॉलेज चालू झालं होतं. सर्वात छोटा भाऊ आता बारावीला होता. खर्चाचा ताण वाढला होता. गरीबी काय असते हे आता जाणवायला लागलं होतं. अशातच माझी सायकल आता रोज काहीबाही दुखणं काढू लागली होती. जुनीच सायकल ती. त्यात जवळ जवळ दिड वर्ष मी तिला रोज सोळा किलोमिटर दामटलेली. आज काय तर चेन तुटली. उदया काय तर पेडल तुटलं. असं रोज काहीतरी होऊ लागलं. राहून राहून वाटत होतं की नवी सायकल मिळाली तर. पण ते तितकं सोपं नव्हतं. नवी सायकल आणण्यासाठी पैसे कुठून येणार होते. नाही म्हणायला मी सायकलींच्या वेगवेगळ्या दुकांनांमध्ये मी मला हव्या तशा सायकलच्या किंमती काढल्या होत्या. साधारण सतराशे अठराशे पर्यंत चांगली सायकल मिळू शकत होती. पण एव्हढे पैसे आणणार कुठून. खुप विचित्र दिवस होते ते. माझे क्लासमेट ज्या दिवसांमध्ये चाळीस पन्नास हजारांच्या मोटार सायकल घेऊन कॉलेजला यायचे त्या दिवसांमध्ये मला सायकल घेण्यासाठी अठाराशे रुपये कुठून आणायचे किंवा तेव्हढे पैसे बाबांकडे कसे मागायचे हा प्रश्न मला पडला होता.
शेवटी एक दिवस थोडं घाबरत घाबरतच मी बाबांसमोर विषय काढला.
"बाबा, हल्ली सायकल खुप काम काढते"
"चालवून घे ना राजा"
"नाही हो बाबा. मला खुप त्रास होतो. आठ किलोमीटरच्या अंतरामध्ये तिची चेन इतक्या पडते की विचारू नका. जरा टाईट करून घेतली सायकलवाल्याकडून की मग सायकल चालवताना खुप जोर लावावा लागतो. आणि मग दम लागतो मला"
"अरे पण नवी सायकल दोन हजाराच्या आत येणार नाही. तेव्हढी महाग सायकल नाही परवडणार आपल्याला"
"बाबा, बघा ना थोडं"
बाबांचा नाईलाज आहे हे मलाही कळत होतं पण त्या जुन्या सायकलमुळे रोजचं सोळा किलोमीटरचं सायकलिंग करताना मलाही खुप त्रास व्हायचा. शेवटी बाबांनी पाचशे पाचशे रुपये जमेल तसे देईन असं एका ओळखीच्या सायकलवाल्याला सांगितलं आणि मला नवी सायकल मिळाली....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
"ओ साबजी उठो. अगर सोनाही हैं तो घरपेही सो जाओ ना. यहापे क्या सोफापें एसीमें सोनेको आते हो क्या?"
मी डोळे चोळत उठलो. नाईट शिफ्टच्या सिक्युरीटीला सॉरी म्हटलं. त्याचंही बरोबर होतं. मी सीडॅ़कच्या जुहू, मुंबई सेंटरच्या पार्टटाईम डिप्लोमाला अॅडमिशन घेतलं होतं. विकडेजला ऑफीस. शनिवारी आणि रविवारी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ईन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कोर्सचे थेअरी क्लासेस असायचे. जॉबला असणार्यांसाठी विकडेजना रात्री प्रॅक्टीससाठी लॅब्ज ओपन असायच्या. मीही दिवसा ऑफीसला जाऊन संध्याकाळी गोरेगांवला रुमवर न जाता सरळ अंध्रेरीला उतरून जुहूला सीडॅकला जात असे. बरेच वेळा उशीर झाला की नउ साडे नउनंतर बस मिळायची नाही. मग अंधार्या जुहू गल्लीतून घाबरत घाबरत तंगडतोड मी कॉलेजला जात असे. दिवस ईतके वाईट होते की माझ्याजवळ इंजिनीयरींगची डीग्री होती, प्रोग्रामर म्हणून नोकरी होती. पण पगार होता साडेतीन हजार. आणि या साडेतीन हजारात मला माझं मुंबईतलं राहणं, खाणं, प्रवास आणि माझी पीजीची फी हे सगळं भागवायचं होतं. परीस्थीती माझा अंत पाहत होती. पण माझ्या डोळ्यात आकाशात भरारी मारायची स्वप्नं होती. मला कुठल्याही परिस्थीतीत माघार घ्यायची नव्हती. त्यामुळे दिवसा ऑफीसला जायचं. संध्याकाळी ऑफीस सुटलं की सरळ जुहू गल्लीतून रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास अर्धा तास चालत सीडॅकला जायचं. रात्रीचं जेवण परवडणारं नव्हतं, त्यामुळे कॉलेजसमोरच्या एका वडापावच्या गाडीवर दोन वडापाव किंवा भजीपाव असं जे काही मिळेल ते खायचं. साडे अकरा बारा पर्यंत सी, सी प्लस प्लस आणि जावाच्या कोडींगची प्रॅक्टीस करायची. आणि मग सिक्युरीटीची नजर चुकवून तिथेच सोफ्यावर पायाचं मुटकुळं करुन झोपायचं. सकाळी सहाला उठायचं, गोरेगांवला रुमवर जायचं, आंघोळ वगैरे उरकून लगेच वेस्टर्न रेल्वेने धक्के खात चर्चगेटला, ऑफीसला...
सहा वर्ष झाली या सार्याला. माझ्या लाईफस्टाईलमध्ये ड्रास्टीक ट्रान्स्फॉर्मेशन झाले आहेत. सुखं, समृद्धी, पैसा सारं काही आहे. पण सोबत त्या वडापाव खाऊन काढलेल्या रात्रींच्या आठवणीही सोबत आहेत. आणि का कोण जाणे येणार्या सुखांच्या जोडीने त्या आठवणीही येतात. आणि येताना एकटयाच न येता डोळ्यात पाणीही घेऊन येतात...
(इतरत्र प्रसिद्धी : माझा ब्लॉग मी शोधतो किनारा )
प्रतिक्रिया
28 Oct 2011 - 11:41 am | शिल्पा ब
त्रासदायक काळ पाठ सोडत नाही हे खरंच.
छान लिहिलंय.
( आधी मला वाटलं मलाच हॅपी बड्डे करायला धागा काढला का काय !! ;)
28 Oct 2011 - 2:15 pm | माझीही शॅम्पेन
आहो त्यानी हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस असा धागा काढला आहे हॅप्पी बर्थडे आंटीज असा नहिए. ( कृपया हलक घ्या :) )
अवांतर :- वाढदिवसाच्या शुभेच्छा !
बाकी लेख सुंदर ! स्ट्रगल साला कोणालाच चुकलेला नाही ! (मेघनाचा जरा फोटो टाका )
बाकी हे जबरा !
28 Oct 2011 - 11:42 am | अर्धवट
टोपी काढली आहे*,
केवळ स्मरणरंजन नाही तर वास्तव, भुतकाळ आणि त्यातले तुम्ही.. मस्त रंगवलंय.
* प्रताधिकार : रमताराम
31 Oct 2011 - 2:45 pm | छोटा डॉन
हेच म्हणतो.
अत्यंत सुंदर आणि नेमका लेख, आवडला.
- छोटा डॉन
28 Oct 2011 - 11:51 am | नगरीनिरंजन
उन्हातून चालल्यावरच सावलीची खरी मजा कळते.
28 Oct 2011 - 1:12 pm | नंदन
असेच म्हणतो, लेख आवडला.
28 Oct 2011 - 1:37 pm | पाषाणभेद
+१
खरं आहे.
छान लेख
28 Oct 2011 - 9:32 pm | प्रभो
सहमत आहे..
29 Oct 2011 - 1:15 pm | प्रदीप
लेख आवडला.
28 Oct 2011 - 11:53 am | जयंत कुलकर्णी
मला तर वाटते, या असल्या जून्या आठवणींनी आपले पाय जमिनीवर राहतात.
28 Oct 2011 - 12:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हळवं करणारं लेखन.
-दिलीप बिरुटे
30 Oct 2011 - 8:31 pm | मी-सौरभ
मस्त लेख!!
विविध प्रसंग आणि भावनांचा हा अविष्कार हळवा करुन गेला!!
28 Oct 2011 - 12:25 pm | स्पा
चायला धन्या....
लैच इमोशनल लिवतोस ब्वा तू
आवडला खूप लेख...
मीही सध्या अशाच काहीशा परिस्थितीतून जात आहे
हळू हळू एक एक स्वप्न पूर्ण होतायेत. :)
28 Oct 2011 - 1:27 pm | प्रचेतस
सहमत आहे.
छानच लिहिले आहे.
बाकी तुमची प्रिन्सेस आपल्याला लैच आवडली बघा.
28 Oct 2011 - 12:55 pm | मोहनराव
मस्त लेखन!!
ज्यांनी आयुष्यात हलाखीचे दिवस काढलेले असतात ती माणसे नंतर कितीही मोठी झाली तरी त्यांचे पाय सदैव जमिनीवर असतात!!
28 Oct 2011 - 1:09 pm | सुहास झेले
काय प्रतिक्रिया देऊ सुचत नाही.... अप्रतिम लिहिलंय :) :)
28 Oct 2011 - 1:11 pm | गवि
अतिशय आवडले आहे. पहिली गाडी घेतानाची माझी (आणि कदाचित) बर्याच जणांची भावना तू फार सुंदर लिहीली आहेस.
गाड्या बदलतात. आपण तेच राहिलो म्हणजे बरं.
28 Oct 2011 - 1:26 pm | मेघवेडा
गाड्या, दिवस, परिस्थिती इ. इ.
लेख आवडला. ननिंशीही सहमत.
28 Oct 2011 - 1:30 pm | गवि
दिवस परिस्थिती वगैरे सगळ्यासाठीच गाड्या शब्द वापरला आहे हे सांगणे नलगे.
28 Oct 2011 - 1:34 pm | दादा कोंडके
काही वर्षापुर्वी सकाळमध्ये (बहुतेक) दिवाळीअंकासाठी मराठी तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी स्फुर्ती देण्यासाठी, गरीबीतुन वर आलेल्या यशस्वी आंथ्रप्रिनर कडुन (व्यवसायिक?) लेख मागवण्यात आले होते. गाईडलाईन म्हणुन असं सांगितलं होतं की, "आता माझ्याकडे यंव आहे, त्यंव आहे" असं सांगण्यापेक्षा पुर्वीची परिस्थिती कशी होती, तुम्ही कसं तोंड दिलत वगैरे लिहा. पण बहुतेक लेख सध्याच्या ऐश्वर्याचे वर्णन करणारेच होते!
'इडली, ऑर्कीड आणि मी' मध्ये सुद्धा सुरुवात चांगली झाली आहे, पण नंतर नंतर मला बोअर वाटलं.
28 Oct 2011 - 1:34 pm | पैसा
अगदी मनापासून लिहिलंय हे जाणवतंय. आणखी कितीही गाड्या घेतल्या तरी ती पहिली सायकल कधी विसरता येणं शक्य नाही!
28 Oct 2011 - 1:59 pm | स्मिता.
धनाजीराव, लेख अगदी तुमच्या मनातून उतरलाय हे जाणवतच आहे. आता जास्त बोलायला सुचन नाहिये. आवडला एवढंच सांगते.
28 Oct 2011 - 2:03 pm | विदेश
आवडला . छान आहे .
28 Oct 2011 - 2:26 pm | अप्पा जोगळेकर
छान लिहिलं आहे. आवडलं.
ओढाताणीचे दिवस कधी अनुभवलेच नाहीत त्यामुळे पुढेमागे अशी परिस्थिती ओढवली तर काय ही कल्पनासुद्धा नकोशी वाटते.
28 Oct 2011 - 8:57 pm | रेवती
लेखन आवडले.
मेघनाचा फोटू बघण्यास उत्सुक!;)
28 Oct 2011 - 10:14 pm | निनाद मुक्काम प...
अप्रतिम व युवावर्गासाठी स्फूर्तीदायी लेखन
मेघनाचा फोटो तोही तुमाच्यासह पहायला आवडेल..
28 Oct 2011 - 10:25 pm | यकु
मस्त हो धनाजीराव!
आम्ही एका टुलींग कंपनीत काम केलं होतं.. लय बेक्कार परिस्थितीत औरंगाबादला नवा आलो होतो तेव्हा.
एका नातेवाईकाची कंपनी होती. मी बारावी पास झाल्यानंतर औरंगाबादच्या, आपल्या ओळखीच्या कंपनीत काम करायला मिळणार म्हणून मस्त ईन वगैरे करुन त्या कंपनीत गेलो.. तिथल्या मॅनेजर-कम-सुपर वायझर कम वगैरे वगैरे माणसाला भेटलो. बोललो. म्हणालो,
''मी इथं जॉईन व्हायला आलोय... ''
तो म्हणे
"असं का..?" त्यानं इकडं तिकडं बघीतलं आणि म्हणे,
"तो कोपर्यातला झाडू घ्या.. आणि फ्लोअर साफ करुन घ्या एवढा.."
खाड्कन जमीनीवर आलो आणि....घेतलं झाडून...
हा आणि पुढच्या आठ दहा महिन्यातले धडे तरळले डोळ्यासमोर..
29 Oct 2011 - 9:29 am | मदनबाण
छान लेखन...
29 Oct 2011 - 2:15 pm | निनाद मुक्काम प...
ज्यांनी अतिशय हालाखीत दिवस काढले त्यांचे पुढे पाय जमिनीवर राहतात असा सर्वसाधारण समज आहे.
माझ्यामते जमिनीवर पाय सैदैव राहण्यासाठी बालपणी झालेले संस्कार व अनुभव सगळ्यात महत्वाचे असतात .
अनेक राजकीय नेते ,अभिनेते पुढे वैभव प्राप्त झाल्यावर आकाशात तरंगतात .
विनोद कांबळी हे एक उदाहरण आहे.
3 Nov 2011 - 7:57 pm | सुहास..
माझ्यामते जमिनीवर पाय सैदैव राहण्यासाठी बालपणी झालेले संस्कार व अनुभव सगळ्यात महत्वाचे असतात >>
+१
अणि खालील प्रतिसादातील संजोपदादांशी ही सहमत !
29 Oct 2011 - 5:54 pm | सन्जोप राव
लेखन आवडले. नवीन चारचाकी घेण्याच्या निमित्ताने घेतलेला आठवणींचा धांडोळा अंतर्मुख करुन गेला.
30 Oct 2011 - 7:49 am | राजेश घासकडवी
रोज सोळा किलोमीटर बोचणारी सायकलची सीट आठवली की नव्या कारची खुर्ची अधिकच मऊ लागते.
एवढे कष्ट करून तिन्ही मुलांना उच्च शिक्षण देण्याचा आटापिटा करणाऱ्या तुमच्या वडिलांना सलाम. इतक्या प्रेमाने आणि निष्ठेने काही पेरलं की त्याची फळं चांगलीच मिळतात.
30 Oct 2011 - 11:02 pm | अविनाशकुलकर्णी
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
31 Oct 2011 - 4:26 am | Nile
कष्टाचे हेच दिवस आयुष्यातला अनमोल ठेवा कधी आणि का बनतो हे कळतच नाही. असेच वेगवेगळे अनुभव जगलेला तोच खरा श्रीमंत.
31 Oct 2011 - 6:50 am | चतुरंग
कष्टाचे दिवस काढावे लागणे आणि लक्षात राहणे आवश्यक आहे असे वाटते. त्यातून पिंड घडतो, जिद्द जोपासली जाते, सगळ्या गोष्टी सहजसाध्य असल्या तर त्याची किंमत वाटत नाही. हे अनुभव आयुष्याची शिदोरी असते.
तीन मुलांना मार्गी लावणार्या तुमच्या आई-वडिलांनाही सलाम.
लाडक्या मेघनाचा फोटू डकवा राव! :)
-रंगा
31 Oct 2011 - 2:35 pm | वपाडाव
हळवं केलंस लेका !!
\/\/\/ खाली लिहिलेलं वाच बघु \/\/\/
31 Oct 2011 - 8:42 pm | आत्मशून्य
मस्त.
का कोण जाणे पण आर्थीकद्रूश्ट्या स्वावलंबी बनण्याचा स्ट्रगल संपला की आयूष्य फार साचल्याप्रमाणे वाटत राहतं, जणू नाविन्यच हरवतं. आता सर्वकाही हाताशी असतं... पण अवखळता संपलेली असते.
2 Nov 2011 - 6:37 pm | चिर्कुट
मस्तच लिहिलं आहे धरावा..
आम्ही मात्र आय १० च्या ऐवजी वॅगन आर ला पसंती दिली.. :-)
2 Nov 2011 - 7:04 pm | दत्ता काळे
कष्टसाध्य गोष्टी माणसाला आनंद आणि अभिमान देऊन जातात.
कष्टलेल्या आयुष्याच्या आठवणींची भावना निर्माण होऊन आतून गलबल्यासारखं होतं खरं.
2 Nov 2011 - 7:05 pm | दत्ता काळे
लेखन आवडलं.
2 Nov 2011 - 9:49 pm | अतुल पाटील
मेहनती चे फळ तुम्हाला मिळ्तेय हे वाचुन छान वाटले.
3 Nov 2011 - 12:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
धनाजीराव, लेखन आवडलं. तुला वडलांचा जसा भक्कम पाठींबा मिळणं तसा सगळ्यांना मिळतोच असं नाही. त्याबाबतीत मी सुद्धा फार नशीबवान.
3 Nov 2011 - 11:32 am | ५० फक्त
मस्त लिहिलंस रे, पण सुरुवातीपासुन शेवटपर्यंत थोडा रस्ता बदलल्यासारखा वाटला, दोन वेगळे मस्त लेख होउ शकले असते या दोन विषयांवर,
माझ्या मिंटिचा पण वाढदिवस आहे तिसरा जानेवारीत, तेंव्हा काहीतरी लिहिन त्या ड्बल बॅरल इटालियन ब्युटीबद्दल. पण एक खरं गाड्या डिझाइन कराव्यात त्या इटालियन लोकांनीच आणि त्यात इंजिन बसवावीत जर्मनांनी.
मल्टिएअर १.१ ची वाट बघतोय.
3 Nov 2011 - 5:49 pm | धमाल मुलगा
काय बोलु भावा?
शब्दच नाहीत ह्या अनुभवांबद्दल बोलायला!
बाकी, ते दिवस असतात, म्हणून ह्या दिवसांची आपल्याला किंमत कळते इतकंच म्हणेन.
4 Nov 2011 - 8:50 pm | VINODBANKHELE
जिंकलत धनाजी राव
9 Jan 2013 - 10:52 am | स्पंदना
एकुण वडिलांनी जिद्द्दीन मुलांना उच्च सिक्षण दिल तर? व्हेरी गुड.
काळ कायमच चांगला असावा अस काही नाही आहे, पण तो सुरवातिला वाईट अन मग नंतर चांगला असण अन त्यावेळी डोळ्यात पाणी येण हे सुदैवच नाही का?
11 Jan 2013 - 2:21 pm | यशोधरा
सुरेख लिहिलं आहे.
अशीच अधिकाधिक उत्तम परिस्थिती तुम्हांला ह्यापुढे लाभत राहो, आणि तरीही तुमचे पाय सतत जमिनीवर राहोत ह्या सदिच्छा.
11 Jan 2013 - 2:56 pm | तर्री
लेखन एकदम पसंत !
11 Jan 2013 - 3:05 pm | जयवी
सुरेख लिहिलंय !!
माझी "प्रिया"........... आठवली :)
माझ्या काकाची बजाज ची "प्रिया" स्कूटर होती. ते तिला "माझी प्रिया" म्हणायचे :)
11 Jan 2013 - 4:42 pm | चित्रगुप्त
छान लिखाण.
आई-वडील आपल्यासाठी किती-काही करत असतात... त्याची जाण जन्मभर बाळगणे महत्वाचे.
4 Dec 2017 - 2:43 pm | प्रचेतस
कालच तुमच्यासोबत तुमच्या प्रिन्सेसच्या ४०००० किलोमीटरचा पल्ला ओलांडण्याच्या क्षणाचा प्रत्यक्ष साक्षीदार झालो. प्रिन्सेस अंमळ थकल्यासारखी वाटली. :)
4 Dec 2017 - 3:30 pm | कपिलमुनी
वजनदार प्यासेंजर बसले की असा होता !
आजकाल गाडीला नाजुक प्यासेंजरची सवय आहे असा ऐकण्यात आलय :)
4 Dec 2017 - 3:41 pm | सतिश गावडे
काय सांगू राव, यांच्या वजनाने गाडीचा ड्राईव्ह बेल्ट तुटला आणि गाडी शिंदे वाडीला एका भल्या गॅरेजवाल्याकडे सोडून यावे लागले. :)
4 Dec 2017 - 4:54 pm | अभ्या..
ड्राईव्ह बेल्टने कशाला बांधलेस त्याला?
बादवे यांच्या म्हणजे आणि कोण म्हणे?
7 Dec 2017 - 2:51 am | प्रसाद गोडबोले
गावडेसरांचे ऐतिहासिक लेखन वर काढल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर !
गावडे सरांचा अनुभवाचा स्पेक्ट्रम अफाट आह तसेच सरळ साधेपणाने अनुभव कथन करण्याची हतोटी कौतुकास्पद आहे ! ह्याच मुळे त्यांच्या अनुभवाशी काही अंशी का होईना समरस झाल्यासार्खे वाटते , थोडं एकट्याने विचार करत बसलं की स्वत: चे काही अनुभव डोळ्यासमोर तरळुन जातात , कधी हसुही येतं कधी रडु ही येतें !
असो. चालायचंच .
प्रिन्शेस ला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा !