नाही भेटले मी दिवसभर तर त्याने खूप बेचैन व्हावे ,
भेटण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी त्याने नेहमी आधी यावे !
रोज भेटण्याची ओढ नित्य नेमाची पण नवीन असावी ,
रोज काहीतरी नवीन बोलण्यासाठी शब्दांची घाई असावी !
डोळ्यांसमोर असावा सतत चेहरा त्याचा हसणारा ,
आकाश शुभ्र असले तरी, ढग ओढून बरसणारा !
‘तुझ्याशिवाय मी ’ आता कल्पनेतही नसावी ,
कल्पनेतील तुझी साथ आता अस्तित्वात असावी !
ज्याची कल्पनाही केली नाही इतकी प्रेमाने भरलेली असावी ,
माझ्या आठवणीत त्यानेही अशीच कविता लिहिलेली असावी !
सत्य मात्र अबाधित पणे दोघांकडे पाहत असेल ,
तुम्ही थांबता कुठे कि मी थांबऊ म्हणत असेल !
गुंतत गेलो असे कि आता गाठ सुटणे नाही ,
नकळतच घडले सारे पण कसली खंत नाही !
उद्या मध्ये काय दडलेले आहे कोण सांगेल का रे ,
आज नाही भेटलास तर संपेल का रे सारे !
आता हे प्रेम कसली अपेक्षाच करत नाही
नाही आज भेटलो म्हणून उद्या बदलत नाही !
भेटलो असतो आज तर बरे झाले असते ,
असे म्हणत पुढचे आयुष्य सरले असते !
तुटत जातील धागे कदाचित आणि उसवत जाईल वीण ,
आणि तेव्हा मग जाणवेल जन्माचा शीण !
भावनांना शब्दात मांडायची पूर्ण कोशिश केली
पण आज भावनाच इतक्या दाटल्या, कि कविताच अपुरी पडली !
प्रतिक्रिया
25 Oct 2011 - 1:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अप्रतिम!!
25 Oct 2011 - 7:14 pm | धन्या
कितवीला आहात? ;)
गमतीचा भाग जाऊदया. छान आहे कविता. :)
26 Oct 2011 - 2:37 pm | इंटरनेटस्नेही
कविता आवडली.. शिवाय सदस्यनाम चुकून पिज्झा असे वाचल्याने अधिकच गंम्मत आली!