कापूस परिषद, हिंगणघाट
हिंगणघाट येथे ७ नोव्हेंबरला
विदर्भ विभागीय कापूस व धान उत्पादक परिषदचे आयोजन
कापूस उत्पादक शेतकर्यांच्या आत्महत्त्यांना आळा घालायचा असेल तर कापसाला प्रती क्विंटल किमान ६०००/- रुपये भाव मिळणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी केंद्रसरकारने कापसाची आधारभूत किंमत कापूस पणन महासंघाच्या शिफारशीप्रमाणे रु. ६०००/- जाहीर करून कापूस उत्पादकांना त्यांचा न्यायोचित हक्क मिळणे आवश्यक आहे
दिवसेंदिवस सरकारी धोरणामुळे डुबत चाललेला कापूस व धान उत्पादक शेतकरी, या पिकांचा भरून न निघणारा उत्पादन खर्च, दिवसेंदिवस या शेतकर्यांवरील वाढत चाललेला कर्जाचा बोजा, खुल्या अर्थव्यवस्थेत निर्यातबंदी ही संकल्पना बसत नसतानाही जागतिक बाजारपेठेतील तेजीचा फायदा शेतकर्यांना मिळू नये या दृष्ट हेतूने बगरबासमती (एचएमटी, सोनम, जयश्रीराम इत्यादी) धानाच्या जातीवरील असलेली निर्यातबंदी तसेच कापसाचा देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील व्यापार नियंत्रणमुक्त व्हावा म्हणून कापसावर निर्यातबंदी लावण्यात येऊ नये.
आज सरकारच्या या निर्यातबंदी, रास्त भाव मिळू न देणे या धोरणामुळे कापूस व धान उत्पादक शेतकर्यांमध्ये आत्महत्यांचे वाढते प्रमाण, शेतकर्यांमध्ये वाढत चाललेले नैराश्य, नियोजन आयोगाच्या सर्वेक्षणानुसार ४० टक्के शेतकर्यांनी शेती या व्यवसायातून बाहेर पडण्याची व्यक्त केलेली इच्छा, शेतकर्यांवरील दिवसेंदिवस वाढत चाललेला कर्जाचा डोंगर, या सर्व समस्येतून शेतकर्यांला बाहेर काढण्याच्या दृष्टीने कापूस, धान व कर्जमुक्ती या प्रश्नावर व्यापक चर्चा होऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या दृष्टीने सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०११ ला गोकुलधाम मैदानावर दुपारी १२ वाजता, हिंगणघाट (जि. वर्धा) येथे विदर्भ विभागीय कापूस व धान उत्पादक परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी शेतकर्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने, शेतीव्यवसाय नियंत्रणमुक्त करण्याच्या दृष्टीने, शेतकर्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने व त्याला माणूस म्हणून सन्मानाने व सुखाने जगता यावे तसेच त्याची बाजारात पत वाढावी यासाठी या परिषदेतील खालील मागण्यांची परिपूर्ती करून घेण्याच्या दृष्टीने हजारोंच्या संख्येने सामील होऊन ही परिषद यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या
१) कापूस निर्यातीवरील सर्व बंधने हटवावी व कापूस बाजार नियंत्रणमुक्त करावा.
२) कापसाची आधारभूत किंमत कापूस पणण महासंघाच्या शिफारशीप्रमाणे रु. ६०००/- जाहीर करावी.
३) बिगरबासमती तांदळावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी हटविण्यात यावी.
४) संपूर्ण शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती
५) सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा.
६) ग्रामिण भागातील लोडशेडींग बंद करण्यात यावे.
७) आघाडी सरकारच्या जाहिरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे वीज बिलातून शेतकर्यांची संपूर्ण मुक्तता करण्यात यावी.
परिषदेला शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी मार्गदर्शन करणार असून परिषदेमध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष अॅड वामनराव चटप, स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रांताध्यक्षा सौ. सरोजताई काशीकर, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ. शैलजाताई देशपांडे, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रमुख संजय कोले, बळीराज्य विदर्भ प्रमुख जगदिशनाना बोंडे, स्वभापच्या युवा आघाडीचे प्रमुख अॅड दिनेश शर्मा इत्यादी नेते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
* * * * *
विदर्भ विभागीय कापूस व धान उत्पादक परिषदेच्या निमित्ताने
"कापसाची व्यथा" ही स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे.
सर्वांना विनंती की, कापूस व धान पिकासंदर्भातील लेख
आणि गझल,कविता कृपया २५ ऑक्टोंबर पूर्वी
ranmewa@gmail.com या मेलवर पाठवाव्यात ही विनंती.
गंगाधर मुटे
आयोजक, कापूस व धान उत्पादक परिषद
तथा जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, वर्धा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
21 Oct 2011 - 11:10 pm | रामपुरी
१) कापूस निर्यातीवरील सर्व बंधने हटवावी व कापूस बाजार नियंत्रणमुक्त करावा.
म्हणजे बाजारपेठेत महागाई वाढली म्हणून परत भाषणे करायला मोकळे
२) कापसाची आधारभूत किंमत कापूस पणण महासंघाच्या शिफारशीप्रमाणे रु. ६०००/- जाहीर करावी.
आत्ता किती आहे?
३) बिगरबासमती तांदळावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी हटविण्यात यावी.
परत तेच म्हणजे क्रमांक एक प्रमाणेच
४) संपूर्ण शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती
का??? त्यापेक्षा उत्पादनक्षमता वाढविण्यावर आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपायांवर विचारविनिमय/मार्गदर्शन का होत नाही?
५) सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा
योग्य
६) ग्रामिण भागातील लोडशेडींग बंद करण्यात यावे.
योग्य
७) आघाडी सरकारच्या जाहिरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे वीज बिलातून शेतकर्यांची संपूर्ण मुक्तता करण्यात यावी.
का??? हा व्यवसाय असेल तर व्यवसायासारखा का होउ शकत नाही. प्रत्येक वेळी मदतीच्या कुबड्या का घ्याव्या लागतात? एकदाही अशी बातमी का येत नाही की "यावर्षी पाऊस उत्तम झाला. पीक उत्तम आले. शेतकरी खुषीत आहेत. आयकर विवरण पत्र भरणार्या शेतकर्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे" वगैरे... हे का होत नाही? की शरद जोशींसारखे राजकारणी हे होउच देत नाहीत (त्यांचा व्यवसाय बुडेल म्हणून)? कि चांगल्या बातम्या पुढे येउ न देता फक्त वाईट बातम्यांवरच असल्या राजकारण्यांचा व्यवसाय चालतो?
चालू द्या..
जय जवान जय किसान, जय हिंद
22 Oct 2011 - 12:01 am | यकु
गंगाधर मुटे यांनी शेती/ शेतकर्यांविषयी केलेले त्यांचे लिखाण ठराविक काळानंतर जालावर सगळीकडे प्रकाशित होते हे सर्वांना माहित आहे .. ते वाचून त्यांच्या कार्यात कुणी सक्रिय सहभाग घेत नसले, किमान त्यांच्या लिखाणाची पोच म्हणून चार शब्द बोलून दाखवत नसले तरी त्यांचे लिखाण आले की अनुदारपणे बोलून घेण्याची हौस मात्र भागवून घेण्याची संधी खुली होते...
चालू द्या..
23 Oct 2011 - 8:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यशवंत, मला शेतीविषयक फारशी माहिती नाही. कापूस व धान उत्पादक परिषदेसाठी येणार्या सर्व शेतकर्यांचे आणि संयोजकांचे अभिनंदन केवळ असे म्हणायचे हेही तितके बरोबर नाही.
शेती करणे तितके सोपे नाही ही गोष्ट खरी मानली तरी शेतकर्याच्या कापसाला सहा हजार भाव सरकार कसे देईल त्याची काही मांडणी केली असती तर शेतकर्यांची मागणी योग्य आहे असे म्हणता येईल. दुसरी गोष्ट अशी की, शेतकर्यांच्या कापसाला आणि धानाला (तांदळाचा भाव) सरकार योग्य भाव देत नाही म्हणून चाळीस टक्के शेतकरी शेतीव्यवसायातून बाहेर पडतोय याचा काही विदा आहे काय ? शेतकर्यांच्या आत्महत्येची वेगवेगळी कारणं आहेत. खतांचे वाढते भाव, योग्य नियोजना अभावी केलीजाणारी शेती, शेतीकामासाठी न मिळणारे मजूर, पाणी, शेतकर्याच्या पिकाला मिळणारा भाव, शेतकर्याचा माल असूनही शेतकर्याला त्याची किंमत ठरवता येत नाही, शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा परतावा न करता येणे, बँकेचे थकीत हप्ते, या आणि अशा विविध गोष्टी शेतकर्यांच्या आत्महत्येभोवती पिंगा घालणार्या गोष्टी आहेत असे मला वाटते. तेव्हा शेतकर्यांच्या मागणीसाठी ही परिषद होत आहे, तेव्हा सर्वांचे अभिनंदन केले पाहिजे यात काही वाद नाही. संबंधित विषयासंबंधी प्रतिसाद कमी आले तरी चालतील परंतु तपशिलवार माहिती विचारण्यात काही गैर नाही असे मला वाटते.
-दिलीप बिरुटे
24 Oct 2011 - 9:43 pm | यकु
मला रामपुरी यांच्या विशिष्ट प्रतिसादाबद्दल काही म्हणायचे नाही..
माहितीच विचारायची असेल (आणि खरच हवी असेल) तर ती "खवतुन बोलू " असे म्हणूनही लोक घेतात- देतात..
शेती या विषयावर लिहीणारे एकमेव मुटे हेच आहेत.. आणि हा विषय इथल्या कुणी उठून काही करावे असा नाही.. वाद वगळता.. प्रतिसादक एकतर प्रतिसादच देत नाहीत किंवा अंगावर येणारे प्रतिसाद देतात (मी पुन्हा सांगतो रामपुरी यांच्या प्रतिसादाबद्दल मी बोलत नाहीय). हे नेहमीचं निरिक्षण. म्हणून लिहीले.
तपशीलवार माहिती आली पाहिजे याबद्दल सहमत आहे; पण त्यासाठी वस्स् कन अंगावर येणारे प्रतिसाद कशाला पाहिजेत?
26 Oct 2011 - 12:59 pm | चेतन सुभाष गुगळे
<< त्यासाठी वस्स् कन अंगावर येणारे प्रतिसाद कशाला पाहिजेत? >>
हा अनुभव मिसळपाव वर लेखन (स्वतंत्र किंवा प्रतिसादात्मक कसेही) प्रकाशित केले की (काही अपवाद वगळता) येतोच येतो. शेतीविषयक लेखन करणारे इतर कोणी नाही म्हणून मुटे साहेबांचा अशा सन्माननीय अपवादांमध्ये समावेश करावा असे तुमचे मत आहे काय?
22 Oct 2011 - 9:43 am | मदनबाण
ह्म्म्म... नविन गोष्टी कळल्या.
25 Oct 2011 - 10:03 pm | आशु जोग
शेतकर्यांचा राजा आज शेती मंत्री आहे
ते काही उपाय करू शकतील का ?
त्यांचे या विषयावरचे तासाभराचे भाषण ऐकण्याचा योग आला
त्यात त्यांनी फार मोठी यादी दिली शेतकर्यांसाठी केल्या जाणार्या
सरकारी मदतीची