लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त एक अविस्मरणीय आठवण

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in जनातलं, मनातलं
28 Sep 2011 - 9:35 pm

|| श्री गुरवे नम: ||

गानसम्राज्ञी लतादीदींचा आज वाढदिवस. त्यानिमित्त एक हृद्य आठवण....गेली चव्वेचाळीस वर्ष मनाच्या गाभाऱ्यात जिवापाड जपलेली....खास मिपाकरांसाठी !

साल १९६७. स्थळ : शुक्रवारपेठ, पुणे. मी त्यावेळेस पहिलीत होतो, वय वर्षे साडेपाच-सहा.

एका दिवशी मला आणि माझ्या धाकट्या भावाला माझी आई एका कार्यक्रमाला घेऊन गेली. कै. दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला स्वत: लतादीदी आवर्जून उपस्थित होत्या. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी सांगितलं की नुकतंच कोल्हापूरला त्यांनी एका गाण्याचं रेकॉर्डिंग केलं, ते गाणं लवकरच रेडिओवर / तबकडीवर ऐकायला मिळेल. लोकाग्रहास्तव त्यांनी त्या गाण्याच्या दोन ओळी (कोणत्याही साथसंगतीशिवाय) गुणगुणून दाखवल्या .... मोगरा फुलला, मोगरा फुलला | फुले वेचिता बहरू कळियासी आला | ही ती अजरामर रचना. मला खूप आवडली आणि मी आईकडे हट्ट धरला की मला या गाणाऱ्या मावशीला भेटायचं आहे. आईनं मला समजावलं कि ही मावशी मुंबईला राहते, त्यामुळे तिला प्रत्यक्ष भेटता येणार नाही. शेवटी मी (आणि आईनंसुद्धा) तिला एक पत्र लिहिलं. थोड्या दिवसांनी तिने मला (स्वत:च्या अक्षरात) उत्तरही पाठवलं आणि त्यात विचारलं कि “मी तुला भेटायला तुझ्या घरी येणार आहे, तेव्हा तुझ्यासाठी मी काय भेट आणू ?” मी तिला कळवलं कि “माझ्यासाठी एक रेसर गाडी आणि गिरीशसाठी (माझ्या धाकट्या भावासाठी) डबलडेकर बस आण.”

काही काळानंतर मे महिन्यातल्या एका सकाळी साडेसात-आठ वाजता एक भलीमोठी लांबलचक गाडी आमच्या दारात उभी राहिली. एक भक्कम माणूस (लतादीदींचा ड्रायव्हर श्री. जयसिंग) त्यातून उतरला आणि सुधांशु नूलकर कुठे राहतात अशी चौकशी करायला लागला. आमचं घर सापडल्यावर स्वत: लतादीदी (माझी `लतामावशी’) गाडीतून उतरून आमच्या घरात आली. मला भेटली, माझी चौकशी केली, आपल्या मांडीवर मला बसवून प्रेमाने माझे मुके घेतले. मी तिला पत्रात कळवल्याप्रमाणे तिने माझ्यासाठी रेसर गाडी आणि माझ्या भावासाठी डबलडेकर बस आणली होतीच, त्याशिवाय माझ्या आईसाठी कोल्हापूरहून श्रीमहालक्ष्मीदेवीचा फोटोही आणला. (आमच्या देवघरात आजही हा फोटो या प्रसंगाची आठवण देतो आहे). पाच दहा मिनिटं आमच्याशी गप्पा मारल्यावर ती मुंबईला रवाना झाली.

आपल्या छोट्याशा आयुष्यात येणारे असे अविस्मरणीय क्षणच आपल्याला जगण्याचं बळ देतात.

लतामावशीला वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन.

________________________________________________________________________________________

संगीत

प्रतिक्रिया

पांथस्थ's picture

28 Sep 2011 - 9:49 pm | पांथस्थ

खरच नशीबवान आहात. तुम्ही संपर्कात राहायचा/भेटायचा काही प्रयत्न केलात का नंतर?

प्रभो's picture

28 Sep 2011 - 10:32 pm | प्रभो

खरच नशीबवान आहात

+१ सहमत.

चिंतामणी's picture

29 Sep 2011 - 12:44 pm | चिंतामणी

खरच नशीबवान आहात

सुधांशुनूलकर's picture

29 Sep 2011 - 1:12 pm | सुधांशुनूलकर

होय, त्यनंतर दोन वेळा भेट झाली. त्यालाही आता वीस-पंचवीस वर्ष झाली.

सुधांशु

मोहनराव's picture

28 Sep 2011 - 10:08 pm | मोहनराव

भाग्यवान आहात!!!

शुचि's picture

28 Sep 2011 - 10:12 pm | शुचि

.

अनामिक's picture

28 Sep 2011 - 10:19 pm | अनामिक

छान आठवण!
गानसम्राज्ञीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

विनीत संखे's picture

28 Sep 2011 - 10:50 pm | विनीत संखे

गानसरस्वतीस आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

विकास's picture

29 Sep 2011 - 12:16 am | विकास

मस्तच आठवण आहे!

लताजींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Sep 2011 - 1:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

29 Sep 2011 - 10:29 am | विसोबा खेचर

जियो..!

(दीदीभक्त) तात्या.

श्यामल's picture

29 Sep 2011 - 12:07 pm | श्यामल

भाग्यवंत आहात !

भारताच्या गानकोकीळेस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

जे.पी.मॉर्गन's picture

29 Sep 2011 - 12:15 pm | जे.पी.मॉर्गन

ती रेसर कार आणि डबलडेकर बस आहे का अजून? ती ही देव्हार्‍यात ठेवायची हो ! भारी एकदम !

लताबाईंना _/\_

जे. पी.

सुधांशुनूलकर's picture

29 Sep 2011 - 1:20 pm | सुधांशुनूलकर

नाही हो, मी अगदी लहान होतो तरीही १९८० पर्यंत जपून ठेवल्या होत्या. त्यानंतर त्या मोडून गेल्या. मात्र श्रीमहालक्ष्मीदेवीचा फोटो आणि तिने पाठवलेली पत्रं अजून आहेत,

सुधांशु
________________________________________________________________________________________

सुधांशुनूलकर's picture

29 Sep 2011 - 1:21 pm | सुधांशुनूलकर

नाही हो, मी अगदी लहान होतो तरीही १९८० पर्यंत जपून ठेवल्या होत्या. त्यानंतर त्या मोडून गेल्या. मात्र श्रीमहालक्ष्मीदेवीचा फोटो आणि तिने पाठवलेली पत्रं अजून आहेत,

सुधांशु
________________________________________________________________________________________

तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो.

केशवराव's picture

29 Sep 2011 - 2:52 pm | केशवराव

व्वा , कमालीचा रोमांचक अनुभव ! एकदा तुम्हालाच भेटलेच पाहिजे. चरण स्पर्श करायला !
[लता म्हणजे आमचे दैवत .दैवताला कसला वाढदिवस?]

सुधांशुनूलकर's picture

29 Sep 2011 - 4:08 pm | सुधांशुनूलकर

केशवराव, जरूर भेटूया केव्हातरी,
सुधांशु.

सुधांशुनूलकर's picture

29 Sep 2011 - 4:06 pm | सुधांशुनूलकर

केशवराव, जरूर भेटूया केव्हातरी

सुधांशु

नितिनभालेराव's picture

29 Sep 2011 - 4:50 pm | नितिनभालेराव

तुम्हाला वेळ असेल तर खरच जाऊन लता दिदीना भेटा!!
त्या नककीच ओळखतील.

रेवती's picture

29 Sep 2011 - 6:18 pm | रेवती

मस्त आठवण!

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2011 - 3:22 pm | बिपिन कार्यकर्ते

हायला! रोमांचक आठवण!

गणपा's picture

30 Sep 2011 - 4:32 pm | गणपा

लकी यु.

प्रशांत's picture

25 Aug 2020 - 7:41 am | प्रशांत

मस्त आठवण!

सिरुसेरि's picture

27 Aug 2020 - 4:36 pm | सिरुसेरि

रोचक आठवण .

जुइ's picture

7 Feb 2022 - 1:37 am | जुइ

अरे वा छान किस्सा आहे! नशीबवान आहात.

गामा पैलवान's picture

8 Feb 2022 - 2:24 am | गामा पैलवान

सुधांशूनूलकर,

भाग्यवान आहात. तुम्हांस लतादीदींकडनं दोन भेटी मिळाल्यात. रेसर कार दुसरी भेट आहे. पहिली भेट 'मोगरा फुलला' आहे. ती भेट मोगऱ्याप्रमाणे सदैव टवटवीत फुललेलीच राहील.

लताबाईंच्या स्मृतीस वंदन.

आ.न.,
-गा.पै.

श्रीरंग_जोशी's picture

8 Feb 2022 - 3:06 am | श्रीरंग_जोशी

आयुष्यभराचे समाधान मिळवून मिळवून देणारा हा अनुभव तुम्हाला बालपणी मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा अनुभव इथे लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.