चला वेळ आता आली आहे
निघायला हवे एवढेच फक्त खरे आहे
होणारच होते
म्हणजे छातीत दाटून येणे
वगैरे वगैरे ..
थोडेशे ढग जमा झाले होते डोळ्यामध्ये
कधीपण पाउस पडू शकतो
फक्त ढगफुटी होऊ नये एवढेच बघत होता तो
तिच्या साठी तो घट्ट होता
कमी दाबाचां किंवा जास्त दाबाचा पट्टा
तयार झाल्यावरती हे असेच होणार
कधीपण कोसळणार नि मने चिंब होणार ....
निघालीच ती दोघे निरोप घेऊन
सकाळचे विमान होते
सोडले मुलाने त्याना विमानतळावर
आग्रह तसा करणार होता
करीत होता
पण व्हिसा संपला होता
थांबून घेणे हातात नव्हते
त्याना सोडणे भाग होते
निरोप देताना तो पण दाटून आला होता
हे तर होणारच होते ...!!
आतमध्ये गेले नि सगळेच परके झाले
एकदा माघारी जाऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवावा
असे फार वाटून गेले
पण राहूनच गेले ....
मन घट्ट करणे एवढेच खरे होते
आभाळाकडे बघितले नि केवढे मोकळे वाटले
निळे निळे आभाळ
समुद्रासारखे अथांग वाटले
सगळेच मोकळे मोकळे
नि रिकामे रिकामे होते
वीतभर विमान एखाद्या पाखरासारखे वाटले
तेवढीच एक गमत
बाकी दुसरे काय होते ..?
नाहीतर भरलेले ढग कधीपण कोसळले असते
म्हणून ढगाच्यावर लवकर गेले पाहिजे
वरून हलकेच डोकावून बघितले
कोठे मुलगा दिसेल असे
उगाच वाटून गेले
बघितले तर खाली ढगच होते
ढग नि निव्वळ ढग
पांढरे शुभ्र धुके होते
सगळेच हरवून गेले होते
हे होणारच होते ...!!
प्रतिक्रिया
26 Sep 2011 - 10:44 am | मिसळलेला काव्यप्रेमी
कमी दाबाचां किंवा जास्त दाबाचा पट्टा
तयार झाल्यावरती हे असेच होणार
सुंदर मुक्तक!!
26 Sep 2011 - 11:54 am | ऋषिकेश
कविता आवडली.
कवितेच्या शीर्षकावरून एखादा उगाचच-आवेशपूर्ण लेख असेल असे वाटल्याने धागा उघडला नव्हता. मग बघितलं तर 'जे न देखे रवी मधे' आहे
26 Sep 2011 - 5:26 pm | मदनबाण
छान...
27 Sep 2011 - 1:10 am | पाषाणभेद
पकाकाका, भारतात परत येताय का?
छान काव्य.