एकदाच जन्म मिळतो, घेउ दे मला जरा
पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा
गर्भ राहिला म्हणून, माय-बाप हर्षिले
वाटले जसे अकाश बोट एक राहिले
मास हे नऊ असे बहरु दे मला जरा
पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा
जन्मण्याअधीच मी, 'गुन्हा'च जाहले कशी
माय! सावली तुझीच, वाढते तुझ्या कुशी
अंतरी तुझ्या निवांत, पाहते चराचरा
पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा
"मी न भार!' सांगतेय, मांडते अकांत मी
'स्त्रीच जाहले म्हणून, का तुम्हा नकोय मी??
मी तुझाच श्वास माय, दे तुझाच आसरा
पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा
मी नसेन तर जगात पाळणा हलेल का?
माय अन बहीण.. कोण या जगी उरेल का?
या इथे असेल फ़क्त हा पुरूष भिरभिरा
पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा
तोल ना ढळो कधी, निसर्ग हेच मागतो
स्त्री विना उरेल पोकळी, असेच सांगतो
येउद्या जगांत स्त्रीस, हीच वेळ सावरा!!
पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा
- प्राजु
प्रतिक्रिया
16 Aug 2011 - 10:25 pm | शैलेन्द्र
"तोल ना ढळो कधी, निसर्ग हेच मागतो
स्त्री विना उरेल पोकळी, असेच सांगतो
येउद्या जगांत स्त्रीस, हीच वेळ सावरा!!
पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा"
आवडली..
16 Aug 2011 - 10:37 pm | गणपा
काव्य आवडले.
17 Aug 2011 - 12:17 am | जाई.
कविता छान जमलीय.
शब्दरचना प्रभावी.
सगळ्या भावना अचूक पकडल्यात.
17 Aug 2011 - 6:56 am | स्पंदना
एक बाई एक अख्ख गाव वसवते अस म्ह्णतात. त्या मुळ बाईलाच नाकारुन अशी सारी गाव आपण उध्वस्त नाही का करत? मला आश्चर्य वाटत ते असा विचार करणार्या बायकांच. जी कोण सासु , अथवा स्वतः आई असेल तिला एकच प्रश्न विचारावासा वाटतो मला , मग बये तु कशाला अजुन जीव बाळगुन आहेस? तु पण मुलगीच ना? मग तु पहिला मर आणि मग या पोटातल्या बाळाला मार.
17 Aug 2011 - 7:31 am | अत्रुप्त आत्मा
शेवटचे कडवे माझ्या,असे अंतरात... शेवटचं कडवं जास्त आवडलं
17 Aug 2011 - 8:10 am | नगरीनिरंजन
छान कविता! आवडली.
17 Aug 2011 - 2:13 pm | किसन शिंदे
स्त्री-भ्रुण हत्येवर परखडपणे भाष्य करणारं तुमचं हे काव्य जबरदस्त आहे.
__/\__
17 Aug 2011 - 2:30 pm | गणेशा
अप्रतिम लिहिले आहे
क्लास ओळी.
17 Aug 2011 - 6:26 pm | शुचि
"मी न भार!' सांगतेय, मांडते आकांत मी
'स्त्रीच जाहले म्हणून, का तुम्हा नकोय मी??
"आ़कांत" शब्द अतिशय परीणामकारक योजला आहे. कविता आवडली हेवेसांनल.
17 Aug 2011 - 7:23 pm | पल्लवी
प्राजु, सगळी कडवी उच्च ! :)
काव्य पोहोचले आणि त्यातली कळकळ्सुद्धा.
18 Aug 2011 - 11:42 am | क्रान्ति
_/\_
18 Aug 2011 - 5:14 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार.
20 Aug 2011 - 11:58 am | मदनबाण
छान कविता... :)