हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
5 Aug 2011 - 8:12 am

हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट

सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

                                                गंगाधर मुटे
-------------------------------------------------

वीररसकविता

प्रतिक्रिया

अर्धवट's picture

5 Aug 2011 - 8:59 am | अर्धवट

वाहवा... बरेच दिवसांनी नागपुरी तडका आला

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2011 - 9:37 am | अत्रुप्त आत्मा

एकदम ए के ४७ काढल्यासारखी वाटतीये.समरगीत /युद्धगीत काय म्हणाल ते म्हणा...पण अतिशय प्रभावी आहे.
शब्दाशब्दातून भावना प्रकट झालीये.शेवटच्या कडव्यात तर या मागची आख्खी भावना/वेदना टाहो फोडून बाहेर आलेली आहे.वाहव्वा अतिशय मर्मग्राही व परीणामकारक काव्य.

मी ऋचा's picture

5 Aug 2011 - 10:09 am | मी ऋचा

सह्ही!

पियुशा's picture

5 Aug 2011 - 12:02 pm | पियुशा

मस्त जमलय हो :)

यकु's picture

5 Aug 2011 - 5:22 pm | यकु

हाण्ण तिच्या ****!!!

नगरीनिरंजन's picture

5 Aug 2011 - 10:13 pm | नगरीनिरंजन

लय भारी!! एकेक कडवं ठासून भरलेल्या दारूच्या स्फोटात उडालेल्या तप्त तोफगोळ्यासारखं आहे.

राजेश घासकडवी's picture

5 Aug 2011 - 11:02 pm | राजेश घासकडवी

आक्रमक विचार मांडण्यासाठी लय चांगली निवडली आहे. कविता वाचताना पार्श्वभूमीला उखळीत दोन मुसळींनी धान्य कांडण्याचा ठेका मनात येतो. ही लय या कवितेचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र अनेक ठिकाणी ती तुटते. मग तडक्यातली मोहरी कच्ची राहून दाताखाली येते. शब्दयोजनेच्या थोड्या फरकांनी कविता अतिशय प्रभावी होऊ शकेल.

गंगाधर मुटे's picture

6 Aug 2011 - 3:01 pm | गंगाधर मुटे

तुम्हाला हवी ती लय मला माहित नाही. त्यामुळे शब्दयोजनेत बदल करता येणार नाही.

वीररसपूर्ण छान आहे तडका.

अभिजीत राजवाडे's picture

6 Aug 2011 - 5:17 am | अभिजीत राजवाडे

हल्ली वीररसातील कवितांचा अभाव दिसुन येतो. हि कविता वाचुन मनाला खात्री होते कि अजुन वीररस संपला नाही.
कविता प्रकाशित केल्याबद्द्ल खुप खुप आभार.

मदनबाण's picture

6 Aug 2011 - 10:31 am | मदनबाण

तडका उत्तम आहे... :)

तुमच्या कवितेतिल 'अन' शब्दाने फार परीणाम साधलाय, जस एखाद्याने घोषणा द्यावी अन अनुयायांनि त्याला साथ द्यावि तसे वाटते.

तुम्ही 'अन' पर्यंत कविता म्हणावी आणि आम्ही तुमच्या 'अन' नंतर अन्यायाच्या माथी बुटाचा तडाखा द्यावा असे काहीसे वाटले.

खूप दिवसांनी अशी विरश्रीपुर्ण कविता वाचायला मिळाली.

सौन्दर्य

गंगाधर मुटे's picture

11 Aug 2011 - 10:42 am | गंगाधर मुटे

श्री प्रमोद देव यांनी चाल लावली, ती ऐकतांना तुमच्या म्हणण्याला स्पष्टपणे दुजोरा मिळतो.

पिवळा डांबिस's picture

6 Aug 2011 - 11:43 am | पिवळा डांबिस

काव्यनायकाच्या पायात
कुठला आलाय बूट?
फाटकी चप्पल असली तरी
संपत्तीची लयलूट!!

खोट स्वतःमधली लपव आणि चल उठ
हाण जगाच्या टाळक्यात, स्वप्नातला बूट!!!!!!

गंगाधर मुटे's picture

6 Aug 2011 - 12:59 pm | गंगाधर मुटे

पायात चप्पल असेल तर बुटाऐवजी चप्पल मारायला हरकत नाही.
पण चप्पल मारली म्हणून चारचौघात सांगणे पुरुषांना जमणार नाही.
"जोडा मारला" असेच सांगावे लागेल.
"चप्पल मारणे" या शब्दांवर महिलावर्गाची मोनोपली आहे ना? :)

------------------------------------------------------------------------------

इतरांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये असलेली खोट सुधारावी,
ही थिअरी
या कवितेतील आशयासंदर्भात अत्यंत निरुपयोगी आहे.

गंगाधर मुटे's picture

6 Aug 2011 - 12:51 pm | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. :)

श्रीवेद's picture

6 Aug 2011 - 2:21 pm | श्रीवेद

खुप छान!! मस्त

चित्रगुप्त's picture

6 Aug 2011 - 2:30 pm | चित्रगुप्त

हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका...
आवडला.

गंगाधर मुटे's picture

8 Aug 2011 - 9:47 am | गंगाधर मुटे

श्री प्रमोद देव, मुंबई यांनी या गीताला जोशपूर्ण चाल लावली आहे.

येथे ऐकता येईल.

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Aug 2011 - 10:08 am | llपुण्याचे पेशवेll

मस्तं कविता आहे. जनतेनेच आता जाब विचारायची वेळ आली आहे. मग भले भारतात यादवी का माजेना. (अर्थात आता माजलेली नाही असे थोडीच आहे)

नेत्यांना इथल्या आता देउ नका सुट....
पाडा आता त्यांच्यात दरीएवढी फुट....
संचारु दे अंगात क्रांतीचे भुत....
अन (हे फक्त आणी फक्त ठेक्यासाठी)
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट....
------- वपाडाव (११-ऑगस्ट-२०११)

ओतप्रोत वीररसाने भरलेली कविता.....
मानगये..... सलाम...