आजकाल बर्याचदा असं वाटतं
ही रात्र कधीच संपू नये
रात्रीच्या या गर्द काळोखाने लपेटून घ्यावं माझं मन
हा सूर्य कधी उगवूच नये
नाहितर पुन्हा हा सूर्य त्याच्या लख्ख प्रकाशात विचारेल मल माझ्या कर्माचे जाब
पण कसं सांगू त्याला माझ्यावर किती आहे वरिष्ठांचा दाब?
सूर्याचं जाऊदया तो आरसाही असंच करतो
स्वतःला पहायला गेलो तर नोटांनी लगडलेलं निर्जीव झाड दाखवतो
काही नोटा ७/१२ च्या उतार्याच्या काही NA करून देण्याच्या
काही वृद्ध हतबल मातांच्या शिव्याशापाच्या
पण माझ्या घामाची अशी एकही नाही
कशी असेल? मी घाम कधी गाळलाच नाही
गुदमरून गेलाय जीव माझ्याच श्वासात
म्हणूनच बसून राहतो मी गडद काळ्या अंधारात
डोळ्यांना प्रकाश सहन होत नाही; अहो त्यांना त्याची सवयच नाही
कशी असेल? सूर्यास्त पाहणार्यांना सूर्योदय कसा सोसवेल?
हीच दशा झालीय आम्हा भारतीयांची
हिम्मतच होत नाही या सगळ्यातून बाहेर पडण्याची
मरून पडलो अंधारात तरी कोणाला कळणार नाही
पण प्रकाशाचे सांगू नका आम्ही उजेडात येणार नाही
मग कोणी येई महत्मा आणि साधूबुवा
म्हणे आम्हास नेईन उजेडात दाखवेन प्रकाश
नको नको आण्णा आणि बाबा आम्हाला आता फक्त अंधाराचीच आस
आणि खरंच एखाद्या दिवशी झालाच समजा सूर्योदय
तरीही त्याचे ते तेज आम्हाला झेपणार नाही
म्ह्णून म्हणतो बसू द्या आम्हाला अंधारातच
हा अंधार वर्षानुवर्षे कधी बोचला नाही आणि बोचणार नाही.