'सिविल सोसायटी' विरुद्ध सरकार यांच्यातील जंगी सामना तुम्ही गेले तीनेक महिने तुम्ही विविध वृत्तपत्रे, वाहिन्या वगैरेवर वाचता, बघता, अनुभवत असालच. 'अण्णा हजारे आणि मंडळी' एका बाजूला तर 'सिंग-सिब्बल आणि कं' दुसरीकडे अश्या झुंजी टीव्हीचे पडदे सतत व्यापून असतात.
श्री. अण्णा हजारे यांच्या उपोषणाला जनतेतून मिळालेला (काहीसा अनपेक्षित) प्रतिसाद ते काल संपन्न झालेली सर्वपक्षीय बैठक यादरम्यान पुलाखालुना बरेच पाणी वाहून गेले. प्रस्तुत चर्चाविषय मांडण्यापूर्वी या आंदोलनानंतर घडलेल्या काही घटना उद्धृत करतो:
- केंद्रीय स्तरावर कायद्याबद्दलचे विधेयक आणण्यासाठी स्थापना झालेल्या समितीत कोणत्याही सरकारी पदे अथवा राजकीय पक्षांशी संलग्न नसणाऱ्या व्यक्तिंचा पहिल्यांदाच समावेश होणे.
- एखाद्या विधेयकाचा मसुदा मंत्रिमंडळाकडे जाण्यापूर्वीच सर्वांसाठी खुला होणे, त्यावर विविध माध्यमांतून जनतेमध्ये रीतसर चर्चा होणे. एरवी अनेक विधेयके बनताना एकही आक्षेप न घेणार्या जनसामान्यांमध्ये मसुदा विस्ताराने चर्चिला जाणे.
- एखाद्या विधेयकाचा मसुदा सरकारने समोर मांडण्याआधीच त्यावर विविध पक्षांच्या अध्यक्षांची कोणतीही सरकारी पदे अथवा राजकीय पक्षांशी संलग्न नसणाऱ्या व्यक्तिंशी सविस्तर चर्चा होणे.
- एखाद्या विधेयकाचा मसुदा मंत्रिमंडळाकडे जाण्यापूर्वी घेतल्या गेलेल्या बैठकीला बहिष्कार वगैरे न घालता सर्व पक्षाची उपस्थिती असणे. इतकेच नाही तर काही पक्षांनी विधेयकावर आपापली मते मुद्याला धरून मांडणे.
आता मूळ चर्चा प्रस्तावाकडे वळूया. ही चर्चा अण्णांची मागणी योग्य/ अयोग्य, जनलोकपालातील तरतुदी, सरकारचे धोरण वगैरे बद्दल करायची नसून त्यांच्या या आंदोलनानंतर झालेल्या या घटनांकडे बघून काय वाटते हे बघण्यासाठी आहे.
यासाठी काही प्रश्न खाली देत आहे. अर्थात चर्चा याच प्रश्नावर सिमीत नसली तरी या दिशेने ठेवावी अपेक्षा आहे.:
१. एरवी संसदेत विविध विधेयके मांडली जातात, त्यावर चर्चा होते. मात्र जिथे विरोध असतो तिथे आपले प्रतिनिधी संसदेत जो गोंधळ घालतात तो तुम्ही पाहिला असेलच. तर असा 'अन-सिवील' विरोध नोंदविणार्यांना या आंदोलनानंतर एकत्र येऊन, विषयाला धरून, मुद्देसूद चर्चा करावी लागली हा तुम्ही एक चांगला - सिविल - बदल समजता का?
२. एखाद्या विधेयकावर अशी (खरोखरच) सांगोपांग चर्चा होणे हा नवा पायंडा आहे का तात्पुरता बदल आहे असे तुम्हाला वाटते?
३. अण्णांच्या या आंदोलनानंतर दिसणारे हे बदल हेच आंदोलनाचे यश आहे असे तुम्हाला वाटते का? का या सिविल पद्धतीने केलेल्या मागण्यांना तितकाच सिविल प्रतिसाद देणार्या सरकारला, राजकीय पक्षांनाही याचे श्रेय द्याल?
४. जर नजीकच्या भविष्यात खरोखरच शक्य, योग्य तितके कठोर आणि सर्वसंमत असे लोकपाल विधेयक बनले तर भारतीय समाजाला अश्या प्रकारचे आंदोलन हे (तसे जुनेच परंतु) नव्याने मिळालेले शस्त्र आहे असे तुम्हाला वाटते का?
५. आंदोलनाचे परिणाम हे लोकपाला विधेयाकापुरते मर्यादित नसून भारतीय राजकारणावर अधिक दूरगामी परिणाम झाले आहेत असे तुम्हाला वाटते का? असल्यास कोणते आणि कसे?
चर्चा करताना शक्यतो वैयक्तीक टिप्पण्या टाळून (सिविलपणे? :) ) करावी ही विनंती
प्रतिक्रिया
4 Jul 2011 - 3:55 pm | रणजित चितळे
निदान तरुणांना (पु्र्वीच्या पिढीला माहित होते) कळून चुकले की भ्रष्टाचार सर्व स्तरावर भरमसाठपणे सुरु आहे. नाही तर त्यांचा लाच देणे व घेणे हे अजून एक प्रकारचे 'मॅनेजमेन्ट टेक्निक' आहे असे वाटणे झाले असते.
अण्णा हजारे ह्यांनी 'मॉरल अॅथोरिटी' चे छान उदाहरण लोकांसमोर ठेवले. नाहीतर आपण म्हणतो मी बदल कसा करु शकणार माझ्या कडे 'फॉर्मल अॅथोरिटी' नाही.
बाकी हे पुर्वी सुद्धा घडलेच आहे की जेव्हा म गांधींनी उपोषण करुन पाकिस्तानला ५५ कोटी रु द्यायला लावले होते.........
4 Jul 2011 - 4:14 pm | नितिन थत्ते
>>बाकी हे पुर्वी सुद्धा घडलेच आहे की जेव्हा म गांधींनी उपोषण करुन पाकिस्तानला ५५ कोटी रु द्यायला लावले होते.........
टिंब टिंब असा शेवट केला असला तरी मी हा वाद आत्ता चालवू इथे चालवणार नाही. तसेही ऋषिकेश यांना यावर चर्चा अपेक्षित नसावी.
4 Jul 2011 - 4:19 pm | सुनील
जेव्हा म गांधींनी उपोषण करुन पाकिस्तानला ५५ कोटी रु द्यायला लावले होते
ह्याबाबतीतील ठोस पुरावा वेगळा धागा काढून जरूर द्यावा. येथे (बिनबुडाचे) अवांतर नको
5 Jul 2011 - 10:31 am | शिल्पा ब
<<<ह्याबाबतीतील ठोस पुरावा वेगळा धागा काढून जरूर द्यावा.
अगदी अगदी. अज्जिबात काही ५५ कोटी वगैरे दिलेले नाहीत अशी आमची प्रामाणिक समजुत आहे. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले त्याच देशाचे तुकडे ते का म्हणुन करतील? अन अजुन वर त्यांना भारताचे ५५ कोटी देतील? लोकं आपले गांधींवर (बिनबुडाचे) आरोप करणे काही सोडत नाहीत. आमचे सुदैव हे की एथे थत्तेचिच्या आणि आपणासारखे लोक आहेत.
5 Jul 2011 - 10:36 am | नितिन थत्ते
हे अवांतर पुढे न चालवले तर बरे.
5 Jul 2011 - 10:42 am | शिल्पा ब
बरं. चालायचंच.
4 Jul 2011 - 5:45 pm | तिमा
ही घटना नेहमीपेक्षा वेगळी आहे हे मान्य. पण नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विविध विरोधी पक्षांचा पवित्रा वाचा. त्यांना मुळात निवडून न आलेल्या या 'बाहेरच्या' सिविल सोसायटीच्या लोकांना सरकारने समितीत सामिल करुन घेतले याचाच राग आहे. म्हणजे या विरोधी पक्षांचे खायचे दांत व दाखवायचे दांत वेगळे दिसतात.
त्या मानाने या सर्व प्रकरणात काँग्रेस खूपच जबाबदारीने वागली आहे असे म्हणावे लागेल. पण तरीही याचे दूरगामी परिणाम होतील असे वाटत नाही. राजकीय नेत्यांना ही अशी 'बाहेरची' लुडबुड आपल्या अंगाशी येईल याचा लगेचच अंदाज आला आहे, त्यामुळे ते सर्व एक होऊन संसदेत या बिलाला निरुपद्रवी बनवतील यात कोणतीही शंका नाही.
4 Jul 2011 - 5:53 pm | धमाल मुलगा
अगदी अगदी. नेमकं हेच म्हणायला आलो होतो. विधेयक पास होईल पण निव्वळ दात-नखं काढलेल्या सिंहासारखं असेल असं वाटतंय.
4 Jul 2011 - 9:07 pm | राजेश घासकडवी
विधेयकं तयार करण्यात विधिमंडळ बाह्य गटांना जाहीरपणे सामावून घेणं स्वागतार्ह वाटतं. त्यांवर आधीपासून चर्चा करणं प्रत्यक्षात आलं तर ते लोकशाहीला फायदेशीर ठरेल. गेल्या काही महिन्यात जाणवण्याजोगा फरक पडला आहे का, किंवा तो फरक टिकून राहील का याबद्दल मला पुरेशी माहिती नाही. चर्चेतून ती मिळेल अशी आशा आहे.
सभागृहांमधला एकंदरीत सिविलपणा गेल्या काही दशकांत वाढला आहे अशी शंका आहे. एकेकाळी सभागृहात मारामाऱ्या फेकाफेकी हे सर्रास चालायचं. आजकाल तशा बातम्या खूपच कमी ऐकू येतात.
4 Jul 2011 - 9:14 pm | नितिन थत्ते
सहमत आहे.
सिविलपणा वाढला आहे याबाबत जरा साशंक आहे. उलट लोकसभेचे थेट प्रक्षेपण होऊ लागल्यापासून क्यामेर्याचा फोकस आपल्याकडे रहावा म्हणून सदस्य अधिक आरडाओरडा करतात असे वाटते.
4 Jul 2011 - 11:48 pm | पंगा
शक्य आहे. पण तरीही १९८०च्या दशकाअखेरकडे तमिळनाडू असेंब्लीत जयललिताकाकूंचे जे काही झाले, तसे काही थेट प्रक्षेपण होऊ लागल्यापासून घडल्याचे ऐकिवात तरी नाही, आणि क्यामेर्याच्या फोकसखाली बहुधा यापुढे घडणारही नाही, अशी आशा तरी आहे. हे एन्फोर्स्ड का होईना, पण सिविलिटी वाढल्याचेच लक्षण नाही काय?
आरडाओरडा वगैरे त्यामानाने अगदीच मामूली प्रकार आहे. आणि बहुधा ते जिवंत लोकशाहीचे (मिसगायडेड) लक्षण याहून अधिक फारसे काही नसावे. (चूभूद्याघ्या.)
4 Jul 2011 - 11:37 pm | श्रावण मोडक
माझे चुकत नसेल. चुकत असेल तर माहितगारांनी जरूर कान उपटावेत.
संसदेत (आणि विधिमंडळातही) कायदा तयार होण्याची एक प्रक्रिया रुढ आहे. तिला घटनात्मक आधार आहे. त्यानुसार अशा प्रत्येक विधेयकावर संसदेतर, विधिमंडळबाह्य घटकांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था आहे. अगदी स्थायी समितीही अशी सल्लामसलत करू शकते, नंतर विषय समितीही करू शकते. अशा प्रक्रिया याआधीही झालेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे वनाधिकार विधेयक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अशी इतरही विधेयके आहेतच (आत्ता याक्षणी यादी देणार नाही, थोडा इतरांनीही शोध घ्यावा). तीच गोष्ट एनआरईजीएसचीही असावी. त्यापलीकडे सध्यादेखील नगरराज विधेयकाविषयीही अशी चर्चा आणि प्रक्रिया सुरू आहे. संसदेतर किंवा विधिमंडळबाह्य घटकांचा कायदा बनवण्यातील सहभाग ही काही आज सुरू झालेली प्रक्रिया नव्हे. आत्ता सिव्हिल सोसायटी म्हणून पुढे येऊ पाहणाऱ्यांनाही ते माहिती असावेच. तरीही या प्रक्रियेला महत्त्व मिळतेय, कारण विधेयकाची प्रारंभीक रचनाच अशा सहभागाने होते आहे ही धारणा. पण अशा प्रक्रियेत जेव्हा असेच विधेयक आले पाहिजे अशा स्वरूपाचा हट्ट सुरू होतो तेव्हा प्रश्न निर्माण होतात. तूर्त ते बाजूला ठेवू.
विधेयक ते कायदा यांच्या या प्रक्रियेत आजची ही सिव्हिल सोसायटी आणि तिचे हे फेसबुकी वगैरे अनुयायी याआधी किती सहभागी झाले आहेत आणि होतात असा प्रश्न विचारला तर कासोट्याला हात घातल्यासारखे होणार आहे.
प्रायव्हेट मेंबर बिल तर विस्मृतीत गेल्यासारखेच आहे. पीआरएसच्या संस्थळावर काही माहिती आहे. 'भारतीय संसदेत १९७० नंतर एकही प्रायव्हेट मेंबर बिल मंजूर झालेले नाही. १४ व्या लोकसभेत अशी साधारण ३२८ विधेयके सादर झाली. त्यापैकी केवळ १४ विधेयकांवर चर्चा झाली, असे लोकसभेच्याच अधिकृत आकडेवारीवरून दिसते.'
असे विचारणे 'तुम्ही कोण हे विचारणारे?' असे प्रत्युत्तर मिळवणारे असेल, तरीही विचारतो: 'सिव्हिल सोसायटी'तील किती जण (काही अंशी अण्णांचा अपवाद) हा दावा करू शकतील की, आपल्या कारकिर्दीत आपण याआधी विधेयक मंजुरीच्या प्रक्रियेत स्वतःहून स्थायी समितीपुढे किंवा विषय समितीपुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे! उत्तर मिळणार नाही, अशी भीती खोटी ठरेल काय?
मी संसदेची निरंकुश सुप्रीमसी मानणाऱ्यांपैकी नाही. पण म्हणून सिव्हिल सोसायटीची सुप्रीमसी, किंवा गेलाबाजार 'सत्याग्रह'ही जसाच्या तसा स्वीकारावा असे म्हणणार नाही. ही सिव्हिल सोसायटीही संसदेचे काम अधिक लोकाभिमुख होण्यासाठी काही करताना दिसत नाही.
इथंच थांबतो.
5 Jul 2011 - 8:00 am | नितिन थत्ते
विशेष वेगळे काही घडलेले नाही.
कायदा बनवत असताना संसदेच्या आणि सरकारच्या बाहेरील व्यक्तींशी चर्चा होत असतेच. (कायदा पारित करण्याचा हक्क संसदेलाच असला तरी).
आज गूड्स अॅण्ड सर्विसेस टॅक्स चे विधेयक असेच चर्चेत आहे. नुकतीच आपण ज्या विधेयकावर इथे चर्चा केली ते "कम्यूनल अॅण्ड टार्गेटेड....." विधेयक असेच अनेक वर्षापासून चर्चेत आहे, त्याचे मसुदे वेळोवेळी बदलले आहेत. अर्थसंकल्प हेही एक बिल असते त्यासंबंधी चर्चा ऑक्टोबर नोव्हेंबरपासून विविध पातळ्यांवर चालू असते.
तेव्हा कायदा करण्यापूर्वी बाहेरच्या लोकांशी चर्चा ही काही नवी बाब नाही.
वेगळे काय असेल तर अमूक कायदा "आत्ताच्या आत्ता" करायला हवा अशी मागणी आणि कायद्याचा स्वतंत्र मसुदा आधीच तयार असणे.
अजून वेगळे काय असेल तर "आम्ही निर्दोष असे विधेयक आधीच बनवले आहे. ते संसद वगैरेंचा विचार न करता सरकारने ताबडतोब कायदा म्हणून लागू करावे" या मागणीसाठी उपोषण.
वेगळे काय असेल तर मीडियातल्या हवेमुळे सरकारने नमते घेऊन लोकपाल विधेयकाची गरज आहे असे मान्य करणे आणि त्यासाठी (विधेयक संसदेत मांडण्याची) टाइमबाउंड कमिटमेंट करणे.
यापुढेही अशा मीडिया हाइप्ड जिव्हाळ्याच्या विषयांवर कायदे करताना कदाचित अशीच प्रथा पाळली जाईल.
[सिव्हिल सोसायटी/अण्णा यांनी यातून काही साध्य केले का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच असेल].
5 Jul 2011 - 9:38 am | ऋषिकेश
या बाहेरील व्यक्ती देखील राजकीय किंवा अधिकृत सरकारी पदे भुषविणार्या असतात असे वाटते. जसे कम्युनल अॅण्ड टार्गेटड लॉ चे विधेयक हे 'गैरसरकारी' संस्था बनवू पहात असली तरी त्याचे सभासद हे खासदार, राजकीय नेते किंवा सरकारी पदे असलेलेच आहेत. मात्र यावेळी अण्णांसारखे कोणतेही पद नसलेल्यांना सरकारला समाविष्ट करून घ्यावे लागले असे दिसते.
कायदा बनविणार्या समितीने तज्ञांची मते घेणे किंवा अशी मते देण्यासाठी / सल्ला देण्यासाठी एखादी समिती स्थापन करणे वेगळे आणि कायद्याचा मसुदा बनविण्याच्या समितीतच मंत्र्यांबरोबरच (पक्षी: तो दर्जा देऊन) अश्या 'अराजकीय' वगैरे लोकांना घेणे वेगळे असे वाटते.
वर श्रामो म्हणाले त्या 'फॉरेस्ट अॅक्ट' २००६ बनविण्यासाठी कोणती समिती होती ते जालावर पटकन मिळाले नाहि. मात्र त्याची अंमलबजावणी कशी झाली आहे व त्यात काहि बदल आवश्यक आहेत का याची चिकित्सा करण्यासाठी २०१० मधे श्री पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली दिसते. त्यात काहि खासदार, राजकीय नेते किंवा सरकारी पदे नसलेल्या वक्ती दिसल्या मात्र त्यांचे काम कायद्याचा मसुदा तयार करणे नसुन सरकारला केवळ 'सल्ला' देण्याचे आहे. शिवाय त्यात कोणताही मंत्री नाहि. केंद्रीय मंत्र्यांच्या समितीत 'सिविल' को-चेअरमन हे सकृतदर्शनी वेगळे वाटले.
अर्थात तरीही श्रामोंचा या क्षेत्रातील अभ्यास व रुची बघता इतरही कायदे 'अश्या' पद्धतीने बनलेले असावेत असे वाटते. मी ही शोधतो आहे. कोणाला मिळाल्यास सांगा म्हणजे मलाही नवी माहिती मिळेल व माझे याबाबतीत 'वेगळे' घडल्याचे म्हणणे मी मागे घेईन
5 Jul 2011 - 10:44 am | श्रावण मोडक
नाही. फक्त तसेच असत नाही. संसदेच्या संस्थळावर जाऊन कायदा कसा होतो याविषयीची माहिती पहावी. ती पुरेशी बोलकी आहे. या स्थायी आणि विषय समित्यांच्या सुनावणीची जाहिरातही होत असते, लोकसहभागाचे आवाहन करत. त्याकडे लक्ष जात नसते, हा अनुभव आजचा नाही. हे असे फक्त विधेयकाबाबतच होते असे नाही. एरवीही अनेक सरकारी प्रक्रियांमध्ये होत असते.
वनाधिकार कायद्याच्या वेळी देशभरातील आदिवासींच्या संघटना या प्रक्रियेत सहभागी झाल्या. समित्यांपुढे प्रदीर्घ सुनावण्या झाल्या. बाजू मांडणाऱ्या दस्तावेजांची संख्याही प्रचंड आहे. गंमत म्हणजे, त्यावेळी या गटांनी गुगल ग्रूप्स, याहू ग्रूप्सच्या माध्यमांतून आपापली चर्चा घडवून ही प्रक्रिया पुढे नेली होती. त्याच्या त्या काळात बातम्या मात्र झाल्या नाहीतच.
अर्थसंकल्पाची चर्चा होते तेव्हा विविध हितसंबंधी गट त्यात असतात. प्रामुख्याने उद्योगांच्या संघटना, व्यापाऱ्यांच्या संघटना, ग्राहकांच्या संघटना अशांशी ही सल्लामसलत होत असते. त्यानंतरच अर्थसंकल्पीय तरतुदींना आकार येत असतो.
साधारण अशीच प्रक्रिया घटनाकारांना इतरही विधेयकांबाबत अपेक्षीत होती, आहे आणि राहीलही. प्रश्न इतकाच की, अर्थसंकल्पाबाबत सक्रिय असणाऱ्या किंवा वनाधिकार, राष्ट्रीय रोजगार, नगरराज यासारख्या विधेयकांबाबत कालही आणि आजही सक्रिय असणाऱ्या गटांसारखे किती गट मध्यमवर्गीयांतून, भारतीय मध्यमवर्गीयांतून आकाराला आले आणि त्यांनी आपल्या दबावाचा कायदा बनवण्याच्या प्रक्रियेत वापर केला? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे.
5 Jul 2011 - 1:20 pm | नितिन थत्ते
>>साधारण अशीच प्रक्रिया घटनाकारांना इतरही विधेयकांबाबत अपेक्षीत होती, आहे आणि राहीलही. प्रश्न इतकाच की, अर्थसंकल्पाबाबत सक्रिय असणाऱ्या किंवा वनाधिकार, राष्ट्रीय रोजगार, नगरराज यासारख्या विधेयकांबाबत कालही आणि आजही सक्रिय असणाऱ्या गटांसारखे किती गट मध्यमवर्गीयांतून, भारतीय मध्यमवर्गीयांतून आकाराला आले आणि त्यांनी आपल्या दबावाचा कायदा बनवण्याच्या प्रक्रियेत वापर केला? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे.
पूर्वी कधीतरी म्हटल्याप्रमाणे सरकार हे आपल्यापेक्षा काहीतरी वेगळी गोष्ट आहे/ किंवा सरकार "आपले" नाही असे समजून प्रक्रियेतून अलिप्त राहण्याची, आणि आपल्यासारख्या इतरांची बेटे* बनवून आपली कुटुंबे इतर समाजापासून वेगळी काढण्याची मध्यमवर्गाची प्रवृत्ती दिसून येते.
*[अनुदानित/सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची आबाळ होते म्हणून शाळा सुधारण्यासाठी संघर्ष न करता आपल्यासाठी सुटेबल अशा वेगळ्या एक्स्क्लूझिव शाळा निर्माण करणे. सार्वजनिक तरण तलाव, बागा, खेळाची संकुले निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी या सोयी असलेल्या सोसायटीत जाऊन राहणे].
5 Jul 2011 - 2:04 pm | ऋषिकेश
मंत्र्यांच्या बरोबरीने 'सिविल सोसायटीतील' लोकांना समितीत घेतले जात नाही, त्यातही मंत्री असताना इतरांना को-चेअरमन वगैरे केले जात नाही असा माझा समज होता. आता तुम्ही म्हणताय ते संस्थळ बघून मगच लिहितो.
बाकी जर याअधीही सिविल सोसायटीतल्या लोकांना घेऊन कायदे झाले आहेत तर परवाच्या सभेत सर्वपक्षांनी (संसदेला, पक्षी खासदारांना डावलून) अण्णांना समितीत घेतल्याबद्दल का धारेवर धरले?
5 Jul 2011 - 2:47 pm | श्रावण मोडक
कारण ही प्रक्रिया संसदेला बांधील राहून झालेली नाही; सरकार आणि हा गट यांच्यातील ही द्विपक्षी चर्चा आहे, आणि त्याचे फलीत म्हणून एक विधेयक संसदेसमोर आणण्याचा घाट त्यामागे आहे, असा काहीसा राजकीय पक्षांचा आक्षेप आहे. याचमुळे ही चर्चा सुरू असताना मध्येच प्रणव मुखर्जी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांची मते जाणून घेण्याचा जो प्रयत्न केला त्याचाही विचार केला पाहिजे. तो सरळसरळ राजकीय चाणाक्षपणातून केलेला फाटेफोड प्रयत्नच होता.
अवांतर - याआधीच्या ज्या प्रक्रियात लोकसहभाग होता, त्याला सिव्हिल सोसायटी वगैरे विशेषणे लागलेली नव्हती. वनाधिकारात तर आदिवासींच्या संघटना होत्या. त्यांना कोण सिव्हिल सोसायटी वगैरे म्हणणार म्हणा!
5 Jul 2011 - 3:21 pm | सुनील
उत्तम चर्चा चालू आहे.
मूळात राज्यसभेवर कलावंत, खेळाडू, लेखक इत्यादींना घेण्याचा मूळ हेतू हा असावा की, ही मंडळी (जरी खासदार असली तरी) मूळात राजकारणी नव्हेत. ती तशी "सिविल सोसायटीतीलच". त्यांच्या विविध क्षेत्रातील अनुभवाचा फायदा व्हावा.
परंतु, हे फारसे झाल्याचे दिसले नाही.
5 Jul 2011 - 4:54 pm | विजुभाऊ
ते ५५ कोटी पाकिस्तानला अजूनही मिळालेले नाहीत.http://www.indianexpress.com/news/past-receipts-pakistan-still-owes-indi...
9 Jul 2011 - 11:09 am | रणजित चितळे
ते ५५ कोटी पाकिस्तानला अजूनही मिळालेले नाहीत -
विजुभाऊ आपणच दिलेल्या संकेत स्थळावरल्या शेवटचा परिच्छेद तस तर काही म्हणत नाही. हे बघा.
However, India has cleared its share of the pre-partition debt of Rs 50 crore soon after independence in 1947.
9 Jul 2011 - 11:26 am | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
५५ कोटी दिले गेले आहेत. (किंबहुना "उपोषण ५५ कोटीसाठी असेल तर १५ तारखेला पैसे देणार अशी घोषणा होऊनही उपोषण १८ ला का सुटले?" या प्रश्नाचे उत्तर 'पैसे पाकिस्तानला पोचण्यास लागणारा वेळ' असे मिळाल्याचे स्मरते).