गुलाम वजीर!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
20 May 2008 - 3:44 am

प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्‍यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही.
लौकिकार्थानं अक्षरशत्रू असलेला मीर सुलतान खान बुद्धिबळातल्या भल्याभल्यांना अक्षरशः शत्रू वाटला असला तर नवल नाही!
हिंदुस्थानात जे काही महान बुद्धिबळपटू होऊन गेले त्यात सुलतान खानचा क्रमांक आपल्याला बराच वर लावावा लागेल.

सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या मिठ्ठा प्रांतात १९०५ साली जन्मलेला, 'मीर सुलतान खान' असं एखाद्या नबाबाप्रमाणे भारदस्त नाव असलेला, हा महान बुद्धिबळपटू प्रत्यक्षात 'नबाब मलिक उमर हयात खान' ह्या पंजाब प्रांतातल्या एका सरंजामशहाच्या पदरी एक यकःश्चित गुलाम होता! नियतीचा खेळही कसा चमत्कारिक असतो बघा, प्रत्यक्ष जीवनातल्या ह्या गुलामाला पटावरच्या राज्याचं औटघटकेचं राजेपद मात्र बहाल झालेलं होतं!
उमर हयातने त्याला बुद्धिबळाचे धडे दिले आणि तो १९२८ साली अखिल हिंदुस्थानाचा जेता झाला. बुद्धिबळातली त्याची विलक्षण चमक बघून त्याच्या मालकाने त्याला आपल्याबरोबर १९२९ साली इंग्लंडच्या दौर्‍यावर नेलं. उणीपुरी चार वर्षे १९२९ ते १९३३ मीर इंग्लंडमधे खेळला आणि त्याने सारं जग हलवून सोडलं!

बुद्धिबळाच्या भारतीय प्रकाराशी सरावलेल्या मीरला, विल्यम विंटर आणि फ्रेडरिक येट्स ह्या ब्रिटिश मास्टर्सच्या मार्गदर्शनाखाली पाश्चात्य प्रकारातले किंचित फरक आत्मसात करण्यासाठी थोडा वेळ लागला आणि मग मात्र त्याने मागे वळून बघितलंच नाही. १९२९, १९३२ आणि १९३३ सालचे 'ब्रिटिश अजिंक्यपद' तर त्याने पटकावलेच, एवढेच नव्हे तर १९३०, १९३१ आणि १९३३ साली झालेल्या 'जागतिक बुद्धिबळ ऑलिंपियाड' मधे त्याचा समावेश ब्रिटिश संघाकडून केला गेला (आपण पारतंत्र्यात होतो ना!), आणि त्या स्पर्धेतून त्याने असामान्य कामगिरी केली.
रानावनात गुराढोरांच्या मागे पळणार्‍या एखाद्या काटकुळ्या पोराने थोड्या सरावाने असामान्य गुणवत्तेच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकावी तसंच काहीसं!

त्याला मुळीच लिहिता वाचता येत नसल्याने फार पंचाईत होत असे. सांगितलेल्या सूचना त्याला समजत नसत मग सय्यद अकबर शाह नावाच्या दुभाषाची मदत घेऊन तो त्याची वाटचाल सुरु ठेवी.
अलेक्झांडर अलेखिन, मॅक्स युवे, ऍरॉन निम्झोविच, अकिबा रुबेनस्टाईन (ह्यातले दोन जगज्जेते होते) अशा अतिरथी महारथीबरोबर तर तो खेळलाच पण 'बुद्धिबळ ही त्याची मातृभाषा आहे' असा ज्याचा अत्यादराने उल्लेख केला जाई अशा 'होजे राऊल कापाब्लँका' ह्या जगज्जेत्याला जेव्हा मीरने खडे चारले त्यावेळी मात्र सर्व जगाचे डोळे त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेने दिपून गेले!!
हास्टिंग्ज येथे १९३० साली खेळल्या गेलेल्या अजिंक्यपद स्पर्धेतला हा डाव आजही जगातल्या उत्कृष्ट डावांमधला एक समजला जातो ह्यापरते भाग्य ते कोणते!
ह्या डावात मीरने कॅपाब्लँकाच्या मोहर्‍यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत असे काही जखडून ठेवलेले दिसते की मीरविरुद्ध कोणी नवखाच खेळतो आहे असे वाटावे. त्यातही मीरचा स्वतःचा आंतरराष्ट्रीय सामन्यांचा किंवा खेळाडूंविरुद्धचा नगण्य अनुभव लक्षात घेता हे फारच उच्च कोटीचे ठरते.
'वजिराचा भारतीय बचाव' (क्वीन्स इंडियन डिफेन्स) असं नाव असलेल्या ह्या बचावात मीरने वापरलेल्या खेळ्यांमधून पुढे टायग्रान पेट्रोशान ह्या खेळाडूने 'पेट्रोशान वेरिएशन' अशी विख्यात पद्धती विकसित केली. ह्या पद्धतीचा गॅरी कास्पारोवने त्याच्या सुरुवातीच्या काळात भरपूर उपयोग केला.

त्याचा प्रशिक्षक विल्यम विंटरने एक प्रसंग सांगितलाय. हँबुर्गमधल्या एका सामन्यात ऑस्ट्रियन चँपियनने मीरच्या अशिक्षितपणाची हेटाळणी करण्यासाठी "तुमचा चँपियन कोणती भाषा बोलतो"? असा उद्धट प्रश्न केला. मी "तो चेसची भाषा बोलतो" असे म्हणालो! त्याला एक स्मितहास्य देऊन मीर खेळायला लागला. तीन वेळा आलेला बरोबरीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारुन मीर खेळतच राहिला आणि त्यानंतर काही खेळ्यातच ऑस्ट्रियन चँपियनला डाव सोडावा लागला! :)
१९३२ आणि १९३३ अशी दोन वर्षे सुलतान खान जगातल्या पहिल्या दहा खेळाडूत स्थान मिळवून होता ह्यावरुन त्याच्या गुणवत्तेची कल्पना येऊ शकेल!

१९३३-३४ साली त्याच्या मालकानं भारताचा रस्ता पकडला आणि त्याला परतावं लागलं. एकदा भारतात परतल्यानंतर बुद्धिबळाच्या सरावाला आणि मोठ्या स्पर्धांना तो मुकला. त्याच्या ऐतिहासिक कीर्तीने भारावून गेलेले काही ब्रीटिश समीक्षक आणि खेळावर पुस्तके काढणारे लेखक त्याला १९५१ मधे भेटले आणि त्याच्या ज्ञानाचा अंदाज घेण्यासाठी म्हणून त्यांनी त्याला त्यावर्षीच्या बॉट्विन्निक विरुद्ध ब्रॉन्स्टीन ह्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेतला एक डाव दाखवला. त्या खेळ्या बघून बाहेरच्या जगाशी कुठलाही संबंध नसलेला हा साधासुधा माणूस उद्गारला "ह्या तर अत्यंत सुमार खेळाडूंच्या प्राथमिक अवस्थेतल्या खेळ्या आहेत!"

अशा ह्या असामान्य मीर सुलतानचं उदयाला येणं जसं सहज आनंददायी होतं तसंच त्याचं अलगद विस्मृतीत विरुन जाणंही चटका लावून जाणारं ठरलं. सध्याच्या पाकिस्तानातल्या सरगोधा प्रांतात आपल्या कुटुंबासमवेत छोट्या जमिनीच्या तुकड्यावर समाधानाने गुजराण करणार्‍या ह्या 'गुलाम वजिराने' १९६६ साली काळाच्या पटावरुन प्रस्थान ठेवले!

चतुरंग

क्रीडाप्रतिभा

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

20 May 2008 - 4:07 am | llपुण्याचे पेशवेll

वाचून वाईट वाटले की इतक्या उत्तम खेळणार्‍या खेळाडूला गुलाम असल्याकारणे मालक परत आल्यावर परत यावे लागले. कदाचित त्या पटाच्या बादशहाला त्याचे वैषम्य वाटले देखील नसेल. असो जर हा बादशहा जागतिक बुद्धिबळाच्या पटावर असता तर कदाचित अनेक मी मी म्हणणार्‍याना त्याने गुलाम केले असते.
त्या गुलाम 'वजीराला' माझा सलाम.
चतुरंगराव इतक्या सुंदर माहीती बद्दल धन्यवाद.
पुण्याचे पेशवे

तुम्ही खुप छान माहिती दिली आहे आणि
प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्‍यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही.
हे तर अगदी भन्नाट वाक्य आहे.

अशा ह्या असामान्य मीर सुलतानचं उदयाला येणं जसं सहज आनंददायी होतं तसंच त्याचं अलगद विस्मृतीत विरुन जाणंही चटका लावून जाणारं ठरलं. सध्याच्या पाकिस्तानातल्या सरगोधा प्रांतात आपल्या कुटुंबासमवेत छोट्या जमिनीच्या तुकड्यावर समाधानाने गुजराण करणार्‍या ह्या 'गुलाम वजिराने' १९६६ साली काळाच्या पटावरुन प्रस्थान ठेवले!

हे तर अगदी मनाला चुटुका लावुन जाते.

भडकमकर मास्तर's picture

20 May 2008 - 9:32 am | भडकमकर मास्तर

मस्त गोष्ट ...
त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले...
बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही...
(असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......)

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

20 May 2008 - 8:29 pm | पिवळा डांबिस

चतुरंगजी, माफ करा!
पण मीही तो डाव (कॅपाब्लॅकाविरुद्धचा) पाहिला ओरिजिनल साईटवर जाऊन! त्या कॅपाब्लॅकाच्या **वर तुम्ही एक लाथ का दिली नाहीत याचेच आश्चर्य वाटले!!!!!
एक हत्ती राजाला जखडवून टाकीत असतांना त्याने दुसरा हत्ती तिथे आणण्याचे प्रयोजन काय? अरे त्या खानाचा एकतरी हत्ती तुला खाता येत होता ना!! मग ते कर ना!!
आणि तो वजिराशी काय खेळ खेळ्तोय? अरे वजीर हा कत्तलीसाठी च असतो हे तो विसरला काय? नुसता पुढेमागे-पुढेमागे करतोय !! अरे काहीतरी कत्तल कर ना!! समोरच्या खानाला जरा बुचकळ्यात पाड ना!!
माफ करा चतुरंगजी! पण या खेळांत आम्हाला खानाची बुद्धी दिसण्यापेक्षा त्या कॅपाब्लॅकाची निर्बुद्ध बुद्धीच दिसली!!
आम्हाला निदान दोनचार जागा तरी अशा दिसल्या की जर आम्ही तिथे जर असतो तर त्या खानाला नक्कीच हार्ड टाईम दिला असता! तो कॅपाब्लँका पुरता खानाला घाबरून गेलेला दिसला!!
स्पष्ट बोलण्याबद्द्ल क्षमस्व!!
आपला (बुद्धिबळात रस असलेला),
पिवळा डाबिस

चतुरंग's picture

20 May 2008 - 8:42 pm | चतुरंग

मी ही हा गेम पूर्वीच पाहिलाय.
पोझिशनल ऍडव्हांटेज - ह्या कल्पनेचा इतका अफलातून विस्तार करुन नंतर एका वजिरापेक्षा दोन हत्ती हे वरचढ ठरणार हे जाणून केवळ मोहर्‍यांच्या हालचालीची लवचिकता ह्या एकाच गोष्टीवर भर देत प्रतिस्पर्ध्याच्या वजिराला फक्त येरझार्‍या घालायला लावणे (ते ही कॅपा.सारख्याला) आणि शांतपणे पकड आवळत नेऊन शेवटी पासपॉन मधे रुपांतर करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे!
ह्यातल्या मीरच्या पाचव्या खेळीवर पुढे पेट्रोशान आणि त्यानंतर गॅरी कास्पारोव सारख्या लोकांनी अधिक काम करुन त्यातले डीप थेऑरेटिकल काम अधिक स्पष्ट केले. पण ते समजून घेण्याइतका माझा बुद्धिबळाचा अभ्यास नाही!
स्वतः कॅपाब्लांकाने ज्याचे वर्णन 'जीनियस' असे केले आहे त्या मीर बद्दल म्या पामराने काय बोलावे?
त्यामुळे आपली असहमती नेमकी कोणत्या कारणाकरिता आहे ह्याचा नक्की उलगडा मला तरी झाला नाही.

चतुरंग

आनंदयात्री's picture

20 May 2008 - 10:17 am | आनंदयात्री

चतुरंग राव छान लेख अन अत्यंत समर्पक शिर्षक. बुद्धीबळातल्या निरनिराळ्या खेळाडुंची ओळख करुन देण्याच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन अन धन्यवाद. पुढील लेखाची वाट पहात आहे. :)

आर्य's picture

20 May 2008 - 6:34 pm | आर्य

भारताने शोध लावलेल्या (चतुरंग) या खेळातील, भारतीय दिग्गजांची माहिती करुन दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार !
ऐखाद्या प्यादाचा व़जीर कसा होतो, याचा प्रत्यय मीरला आयुष्यात आला असावा
:H

स्वाती दिनेश's picture

20 May 2008 - 12:28 pm | स्वाती दिनेश

रानावनात गुराढोरांच्या मागे पळणार्‍या एखाद्या काटकुळ्या पोराने थोड्या सरावाने असामान्य गुणवत्तेच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकावी तसंच काहीसं!
आवडले.
शीर्षकही समर्पक आहे.
त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले...
बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही...
(असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......)
मास्तरांशी सहमत,
स्वाती

मन's picture

20 May 2008 - 12:40 pm | मन

मिळाली.
ह्या खेळाडुबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय.
मस्त लेख आहे.

आपलाच,
मनोबा

प्रभाकर पेठकर's picture

20 May 2008 - 1:09 pm | प्रभाकर पेठकर

सुलतान खान ह्यांची बुद्धीबळातील चमक विस्मयकारक आहे. अशा खेळाडूची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद.
छान शब्दात अत्यंत माहिती पूर्ण लेख आहे. अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2008 - 1:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुलतान खान ह्यांची बुद्धीबळातील चमक विस्मयकारक आहे. अशा खेळाडूची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद.
छान शब्दात अत्यंत माहिती पूर्ण लेख आहे. अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुमीत's picture

20 May 2008 - 2:29 pm | सुमीत

परत एकदा तुम्ही फक्त बुद्धीबळाच्या महान खेळाडूची ओळखच नव्हे तर त्याच्या खेळातली महानतेची ओळख करून दिलीत.

विसोबा खेचर's picture

20 May 2008 - 3:55 pm | विसोबा खेचर

रंगा,

बुद्धीबळ आणि बुधिबळाच्या खेळाडूविषयीचे तुझे लेख पाहून कौतुक वाटते. माझाही हा अत्यंत आवडता खेळ आहे, परंतु मी बर्‍याचदा हारतो! :(

आपल्याला बॉ जमतच नाही त्यातल्या काही चालींना उत्तर देणे, परंतु हा खेळ खेळायला खूप मौज वाटते. बुद्धिबळविषयक लेखन अजूनही येऊ दे...

बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? :)

आपला,
(कास्पारावप्रेमी) तात्या.

भडकमकर मास्तर's picture

20 May 2008 - 4:18 pm | भडकमकर मास्तर

_बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे?
:)) :)) :))

_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

20 May 2008 - 8:34 pm | पिवळा डांबिस

बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे?
कारण त्याने हा डाव चाल-बाय-चाल पाहिला आणि त्याचा आटाच सटकला....
असो. आता अभिप्रायाला स्वच्छ धूवून, पुसून, सोवळ्यात नेसून बसवला आहे.:)

विसोबा खेचर's picture

21 May 2008 - 8:06 am | विसोबा खेचर

असो. आता अभिप्रायाला स्वच्छ धूवून, पुसून, सोवळ्यात नेसून बसवला आहे.

धत तेरीकी! अरे चालल्या असत्या दोन-चार शिव्या!

मिसळपाववर सोवळं-ओवळं हा प्रकार नाही! :)

असो...

अवांतर - बर्‍याचदा सोवळ्याच्या आडच अनेक गोष्टी चालतात. त्यापेक्षा ओवळं राहिलेलं बरं! :))

आपला,
(ओवळा) तात्या.

अन्या दातार's picture

21 May 2008 - 1:55 am | अन्या दातार

अप्रतिम लेख. एका दुर्दैवी खेळाडूची चांगली ओळख करुन दिल्याबद्दल चतुरंग यांचे आभार.

धनंजय's picture

21 May 2008 - 8:27 am | धनंजय

वजिराची कुचंबणा बघितली.

पण खालच्या संवादातला एक प्रतिसाद वाचून गंमत वाटली:

"आखेलीन म्हणाले की सुलतान खान यांना जर सुरुवाती माहीत असत्या तर ते विश्वविजेते झाले असते. (आखेलीन आणि कापाब्लांका कडून स्तुती) ही दोन विश्वविजेत्यांकडून उच्च प्रशंसा होय. सुरुवाती माहीत नसणार्‍यासाठी त्यांचा खेळ फार चांगला होता. सुलतान खान आणि मी, दोघांमध्ये खूप साम्य आहे. दोघांपैकी कोणालाच सुरुवाती येत नाहीत. दुर्दैवाने साम्य तिथे संपते ;)"

दुर्दैवाने, माझेही तेच आहे. कोणीतरी प्रेमाने आणि दयाळूपणे मला सुरुवाती समजावून सांगितल्यात तर मोठे उपकार होतील.

१२व्या खेळीत मोठीच घटना झाली तितके मलाही समजले. "सी" कॉलम पूर्ण मोकळा झाला. पण याचा फायदा काळ्याला होणार की पांढर्‍याला ते कळण्याइतके माझे बुद्धीचे बळ नाही. (पांढर्‍याने सापळा लावून "सी" कॉलम उघडला, म्हणजे पांढर्‍याला फायदा होण्यासाठीच... पण तो कसा?)

असो. चतुरंग यांनी मस्त लेख लिहिला आहे. या विलक्षण खेळाडूची ओळख झाली.

चतुरंग यांनी थोडेसे बाळबोध रसग्रहणही शिकवावे. उदाहरणार्थ Queens Indian Defence हा थोडा समजावून सांगितला तर मजा येईल. उदाहरणार्थ सहाव्या खेळीत पांढर्‍याने ए३ (डाव्या हत्तीचे प्यादे) पुढे केले नसते तर काय झाले असते? हे काळ्या उंटाचा मार्ग रोखण्यासाठी आहे का? हेच का? दुसरे काही का नाही? सी कॉलम मोकळा करण्यासाठी सापळा कधी आणि कसा लागला? काळा वजीर उजवीकडे (एच, जी, कॉलममध्ये) हेलपाटे घालत होता, ते एफ-जी-एच कॉलममधील प्याद्यांना धाक द्यायला का? त्यामुळे पराभव थोडा तरी लांबला का?

अशा प्रश्नांनी बेजार होऊन मी बुद्धिबळाचा नाद पूर्णपणे सोडला आहे. (शिवाय नेहमी हरायचो, ही वेगळी गोष्ट.)

वाचक's picture

21 May 2008 - 8:32 am | वाचक

मलाही 'बुद्धिबळात' अर्थात प्रचंड गती आहे असे नव्हे पण मलाही अगदी असेच वाटले कि काळा वजिर पटाच्या उजवीकडे नुस्ताच 'मागे पुढे' करत होता. निदान ते प्यादे तरी खाल्ले असते तर थोडा मार्ग तरी मोकळा झाला असता.

विसोबा खेचर's picture

21 May 2008 - 8:38 am | विसोबा खेचर

रंगा,

इथे माझ्यासकट अन्य सभासदांनाही या खेळात बराच रस दिसतो आहे. तू लेका लिहीच एखादी लेखमालिका जी साध्या सोप्या रितीने बुद्धीबळाची ओपनींग्ज समजावून सांगेल. माझ्यासारखे अनेकजण ओपनिंग्ज मध्येच मार खातात त्यामुळे पुढची हार जवळजवळ निश्चित होते! :)

आपला,
(फ्रेंच डिफेन्स प्रेमी) तात्या.

चतुरंग's picture

21 May 2008 - 8:52 am | चतुरंग

आत्ताच मी आलेले प्रतिसाद बघत होतो आणि त्या अनुषंगानेच विचार सुरु होता.
बुद्धिबळ ओपनिंग्ज हा एक फार मोठा विषय आहे पण मी त्यातली काही प्राथमिक घेऊन काय लिहिता येईल ते बघतो.
अभ्यासाला थोडा वेळ लागेल पण जरुर काहीतरी चांगले देऊ शकेन असे वाटते.
प्रयत्न करायला काहीच हरकत नसावी.

आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! :)

चतुरंग

केशवसुमार's picture

21 May 2008 - 9:53 am | केशवसुमार

रंगाशेठ,
मस्त लेख.. बुद्धीबळ!! आमचा एकदम आवडता खेळ.. रात्ररात्र (|: डाव लावून बसायचे.. :W ~X(
खूप वर्षांपुर्वी काही कारणाने आम्हाला ह्या आमच्या आवडत्या खेळाला रामराम ठोकावा लागला.. :& या लेखाने त्या सगळ्या जून्या आठवणी ताज्या केल्या.. :B
(एके काळचा वजीर्)केशवसुमार
स्वगतः कोण रे तो मोठ्याने हसला आम्ही बुद्धीबळ खेळायचे म्हणल्यावर.. X(