संडे स्पेशल (सांज्याच्या पोळ्या)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
19 May 2008 - 6:14 pm

या दोन प्रकारे करता येतात. गुळाच्या किंवा साखरेच्या. पण सर्वसाधारणपणे सांज्याच्या म्हटल्यावर गुळाच्याच केल्या जातात.
साहित्यः
१ वाटी जाड रवा
दिड वाटी गुळ
२ वाट्या पाणी
१/२ च. जायफळ पूड
१/२ च. वेलदोडा पूड
१/२ वाटी रिफाडंड तेल
पाव च.मीठ
२ वाट्या कणिक
१/२वाटी मैदा
पाव वाटी तेल
तांदळाची पिठी

१.जाड रवा रिफाइंड तेलात खमंग भाजून घ्यावा.
२.दोन वाट्यापाणी+२ वाट्या गुळ एकत्र उकळत ठेवावे. गुळ विरघळला कि त्यात रवा घालून हलवावे व वाफ आणावी. चांगली वाफ येऊन रवा शिजला कि त्यात वेलदोडा -जायफळ पूड घालावी. व उतरून गार करावा.
३.मैदा+कणिक चाळून मीठ घालून पाव वाटी तेलातील अर्धे तेल घालून भिजवावी.
४.दोन तास कणिक भिजल्यावर पाणी व तेलाचा वापर करून सैलसर तिंबावी (पुरण पोळीच्या कणिकेप्रमाणे)
५.कणकेचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याच्या दुप्पट सांज्याचा गोळा घेऊन कणकेच्या उंड्यात भरावा व तांदळाच्या पिठीवर पोळ्या हलक्या हाताने लाटाव्यात. नॉनस्टीक तव्यावर बदामी रंगावर भाजाव्यात. पोळीला एकदाच उलटावे. न तुटता होतात.

टीपः रवा रिफाइंड तेलातच भाजावा. डालड्यात भाजू नये.
सांजा कोरडा वाटला तर दुधाचा हात लावून मऊसूत करून घ्यावा.
वरील साहित्यात ८-१० मध्यम आकाराच्या पोळ्या होतात.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 May 2008 - 6:26 pm | विसोबा खेचर

प्रथम सांदणं आता सांज्याच्या पोळ्या!

अहो स्वातीताई, का असा अन्याय करता आहात? एवढ्या सुंदर पाकृ चाखायला न मिळता नुसत्या वाचायलाच मिळताहेत हा अन्यायच नव्हे का? :)

आपला,
(सांदणं, सांज्याच्या पोळ्या ही नुसती नावं वाचूनच बेचैन झालेला!) तात्या.

स्वाती दिनेश's picture

19 May 2008 - 6:27 pm | स्वाती दिनेश

सांज्याची पोळी माझी आवडती.खूप दिवसात केल्या नाहीत.आता तुझी पाकृ वाचून करायचा मूड आला आहे,आता करते लवकरच.
(मी रवा साजूक तूपावर भाजते,आता तुझ्या कृतीप्रमाणे रिफाइंड तेलावर भाजून पाहते.)
मला गुळाचा शिरा पण भारी आवडतो,त्यामुळे पोळ्यांसाठी मी जरा जास्तच शिरा करते,नुसता खायला,:)

स्वाती राजेश's picture

19 May 2008 - 6:31 pm | स्वाती राजेश

रवा तुपावर/डालड्यात भाजलास तर थंड झाल्यावर तूप/डालडा थिजून सांजा खूप घट्ट होतो व पोळी नीट लाटली न जाता काठ राहतात.

स्वाती दिनेश's picture

19 May 2008 - 6:36 pm | स्वाती दिनेश

हो अग, होतं असं खरं ,पण मग मी शिरा खाते, ;)
पण आता यावेळी तेलावर भाजून करते,:)

साजुक तुपावर भाजला रवा मग शिरा घट्टं झाल्यावर किंचित दुध घातलं आणि केल्या पोळ्या ;)
आता हे नक्की करेन...
काय मस्त दिल्यायस दोन्ही पा. क्रु.
अवांतरः खव्याच्या, खजुराच्या पोळ्याही छान लागतात नाही? मी १-२ वेळाच केल्या होत्या...त्याचही प्रमाण टाक ना तुला वेळ झाला की....

बेसनलाडू's picture

20 May 2008 - 9:11 am | बेसनलाडू

पुण्याला काकांकडे, आदल्या दिवशी केलेला गोडाचा शिरा संपला नाही की नंतरच्या दिवशी त्याच्या सांजोर्‍या होत. सांज्याच्या पोळ्या = सांजोर्‍या(? चूभूद्याघ्या). मग आम्ही भावंडं आंब्याचं लोणचं नि सांजोर्‍या अशा बेतावर तुटून पडत असू, याची आठवण झाली.
(स्मरणशील)बेसनलाडू

शितल's picture

20 May 2008 - 7:17 pm | शितल

मला ही सा॑ज्याच्या पोळ्या आवडतात माझी मावशी त्या करायची आणि आम्हाला पाठवायची, पण खव्याच्या पोळ्या मला प्रच॑ड आवडात पण खाल्या आहेत नुसत्या घरी केल्या नाहीत , तुला जर त्याची पाककृती माहित असेल सा॑ग.

वरदा's picture

20 May 2008 - 7:27 pm | वरदा

आज संध्याकाळी...

प्राजु's picture

20 May 2008 - 7:29 pm | प्राजु

स्वाती....
फंडू रेसिपि.....
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

21 May 2008 - 4:18 am | मदनबाण

मी फक्त एवढच म्हणु शकतो.....

(खादाड)
मदनबाण.....