राजाच्याजवळी अधिकार कसले...

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
6 Jun 2011 - 3:32 pm

राजाच्याजवळी अधिकार कसले आहे चमत्कारिक
देई ठेऊन ते कुठे अजून हे नाही कुणा ठाऊक
त्याचा बडगा चालतो न कधीही आहे मुका वाटते
शक्ती येई न त्यास हो कधि तरी राष्ट्र कसे चालते?

देशातून कल्लोळ आज उठला राजा पाहतो जरी
मंत्र्यावर राज्य टाकून निजतसे रात्री बिछान्यावरी
बारा भानगडी अश्या सतत हो तो हाक ये नेमकी
राजा गोंधळ माजला चहूकडे आता तरी उठ कि

'अम्मा'ची करण्यात जम्मत तसे शिबूसवे भांडता
जाई संपुनिया टर्महि मुळी पत्ता कधि लागता
राजाने परतून राज्य बघुनी मांडे मनी भाजले
डाव्यांवीण असले तरीही फसले चोहीकडे आदळे

चर्चेच्या अगदी भरात गढूनी शत्रू घुसे अंगणी
दे केव्हा हुलकावणी न समजे राजा परी आतुनी
सांगे युद्ध नको घरात परता पाहा दिवेलागण
ओळीने फिरुनी धरा मेणदिवे रस्त्यावरी येउन

चोराला बिलगून ऐकत बसे काळ्या धनाची कथा
डोळे बंद करून बसतसे कृतीशुन्यतेची व्यथा
घोटाळे समजूनहि दिसतसे निष्क्रियतेची पीडा
राजाला म्हणती हताश सगळे मानास गेला तडा

होती वार, हार तशीच फजिती राजा रडे आतुनी
सोनिया चरणी रिमोट करणी चाले परि आतुनी
राजा असुनी कणाच आपुला कोठे बरे ठेविला
खुर्चीची उब राहि मात्र तरीही सत्तेविना राहिला

केशवकुमांरांची माफी मागून उद्वेग व्यक्त करण्यासाठी हे विडंबन लिहिले आहे. मुळ कविता बहुदा ओळखालच

विडंबन

प्रतिक्रिया

कविता चांगली आहे

पण राज्य राजा चालवत नाही राणि चालवते

चेतन

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चम्त्कारिक!! :)
मस्त लिहिले आहेस.

चित्रा's picture

7 Jun 2011 - 3:54 am | चित्रा

कविता आवडली.

आमच्याकडे खरी सत्ता नाही असे म्हणणे मात्र राजाच्या पथ्यावर पडत असावे. सत्ता नाही म्हटले की वाईट गोष्टींची जबाबदारी दुसर्‍याची आहे असे म्हणून स्वतः नामानिराळे राहता येते. दुसरीकडे सत्तेचे फायदेही मिळतात.

नाना बेरके's picture

7 Jun 2011 - 11:28 am | नाना बेरके

विडंबन उत्तम.
पण आपल्याकडे राजा नसून राणी आहे आणि ' सरदार ' राज्यकारभार सांभाळतो आहे. त्यामुळे "राणी डोले, सरदार हाले" अशी परिस्थिती आहे.