कधीतरी कुणासोबततरी कुठल्याश्या हॉटेलात जाणं होतं. पाणी वगैरे पिऊन जरा स्थिरस्थावर झाल्यावर मेनू कार्ड हातात येतं. गप्पा मारता मारता मंडळी काय खावं-प्यावं ठरवत असतात. तेव्हा मी मात्र पूर्ण हरवून गेलेली असते – तुझ्या आवडीचा पदार्थ त्या मेनू कार्डवर शोधण्यात – सहज चाळा म्हणून. मला काय हवंय ह्यापेक्षा, तुझ्या आवडीच्या पदार्थाचं नाव डोळ्यांसमोर यावं म्हणून क्षणात बरीच धडपड होते. लेदरचं मोठं जाडजूड मेनू कार्ड फटाफट चाळला जातो – अधाशीपणे . फक्त त्या एका पदार्थाचा उल्लेख नजरेसमोर यावा म्हणून. एखाददोन मिनिटात त्या पदार्थाचं नाव छापलेलं सापडतं. त्यावरून हलेकेच बोटं फिरतात. बघणार्यांना त्यात काही वेगळं वाटलेलं नसतं. त्यांच्या लेखी पदार्थाचा अंदाज घेतला जात असतो – त्याच्या किमतीचा अंदाज घेतला जात असतो ...
पण खरंतर अंदाज घेतला जात असतो अजिबात पुसट न झालेल्या तुझ्या आठवणींचा. तुला तुफान आवडणारा तो एक पदार्थ . पुन्हा पुन्हा त्याच एका हॉटेलात जाऊन मागवलेला तोच तो पदार्थ .त्यावर नेहमीच तुटून पडणारा तू . त्या पदार्थाचा तू न थकता केलेला कौतुक आणि मग ओशाळून "सॉरी, मी खाण्याच्या गप्पांमधेच गुंतलो अगं !" म्हणणारा निरागस तू . त्यानंतर नि :शब्दपणे सरणारी आपली हळवी भेट ..
मेनू कार्ड वरून बोटं फिरताना हे सगळं क्षणार्धात आठवतं आणि तितक्याच सहजपणे ते पान नजरेआडही टाकलं जातं हल्ली . तुला आवडणारा पदार्थ सोडून भलताच पदार्थ मागवला जातो . हसत खिदळत संपवला जातो. बिल भरून बाहेर निघायची वेळ येते...
बाहेर पडताना आपलं नेहमीचं टेबल आणि त्यावरच्या मेनू कार्डवर एक अलिप्त नजर फिरवली जाते. स्वत:लाही कळेल न कळेल असं अस्फुट हसू ओठावर येतं. आनंदाचं किंवा दु:ख्खाचं हसू नव्हे... भूतकाळाला दिलेलं ओळखीचं हसू फक्त..
प्रतिक्रिया
12 May 2011 - 11:53 pm | आनंदयात्री
भावनाविष्कार अप्रतिम आहे ...
जियो !!
13 May 2011 - 9:30 am | मुलूखावेगळी
मस्त लिहिलेय ग.
13 May 2011 - 10:36 am | मी ऋचा
सुरेख ग!
13 May 2011 - 10:56 am | नन्दादीप
छान लिहिलय.......!!!!!
13 May 2011 - 12:34 pm | टारझन
खरंच .. आपले हॉटेलातले दिवस आठवले . मला जेवताना जगाचा आणि तुझा देखील अगदी निरागसपणे विसर पडायचा . मला नेहमी आवडणारा पदार्थ म्हणजे चहा बटर . एका मसालेचहा बरोबर तु आवडीने जिराबटर मागवायचीस .. खास माझ्यासाठी. तुला आवडणारा जंबो क्रिमरोल मात्र कधी मागवला नाही. पॉकेटमनी कमी असे ना ! त्या मेनुकार्ड वर चहा सांडला तेंव्हा तो वेटर किती ओरडला होता नै आपल्याला ? मग रागाच्या भरात तु त्याच्या मेनुकार्डच्या १२ क्सेरॉक्स कॉपीज त्याच्या तोंडावर फेकल्या तेंव्हा माझा उर कसा भरुन आला होता. एका फुर्रक्यात मी तो चहा संपवला. मेनुकार्ड आजही माझ्या हृदयाच्या घराच्या मार्बल वर कोरलं गेलंय.
आमची तु काल्पणिक हं .. उगा कोणाला गुदगुल्या नकोत फुकाच्या ;)
- वल्हवी
13 May 2011 - 10:24 pm | चिगो
अरे, टारझन नाय, "टर-जन" आहेस तू.. तिच्या हळव्या भावनांचा हलवा केलास साल्या..
बाकी पल्लवी, झ्याक लिहीलंय..
(टपरीबाज) चिगो
13 May 2011 - 10:51 pm | अप्पा जोगळेकर
कोणता पदार्थ हे लिहिलंच नाहीये याकरता निषेध नोंदवत आहे.
13 May 2011 - 11:26 pm | पंगा
!
14 May 2011 - 1:37 am | पल्लवी
सगळयाच प्रतिक्रियांबद्दल आभार..
टारझन ह्यांच्याकडुन अशा प्रतिसादाची अपेक्षा होतीच..
मी बरीच जुनी सभासद असल्याने आणि कोण कसे प्रतिसाद देतील ह्याची साधारण कल्पना असल्याने त्या प्रतिसादाचे फार काही वाटले नाही. . पण तरिही, पुष्कळ दिवसांनी टाकलेल्या लेखाची विनाकारण उडवलेली खिल्ली खुपलीच.
अशी वर्तणूक नव्या अथवा माझ्यासारख्या अधे-मधे लिहिणार्या लोकांना मिपा वर लिहिण्यापासुन परावॄत्त करण्यास पुरेशी ठरु शकते, हे नक्की..
असो. वेळ देउन लेख वाचणार्यांचे पुन्हा आभार.. :)
14 May 2011 - 1:26 pm | टारझन
१. माझा प्रतिसाद माझ्या अनुभवावरुन लिहीलेला. एखादा लेख वाचुन त्यावरुन प्रतिसादात अनुभव येण्याची ही पहीली वेळ नाही. ह्यात तुमच्या लेखाची खिल्ली कशी उडते हे कळत नाही.
२. पब्लिक फोरम वर लिहीता तेंव्हा पॉझिटिव्ह - निगेटिव्ह प्रतिक्रीया मिळणारंच, तेंव्हा जर आपण नकारात्मक प्रतिक्रीयांमुळे लिखाणापासुन परावृत्त होत असाल तर मग लिहुच नका ना. जाहिर पणे आम्ही लिखाणापासुन परावुत्त होऊ असे गळे काढण्यात काय प्रुव्ह होणार आहे ?
३. सुमार लेखनाला बळेच "वा वा .. काय भारी अफलातुन लिहीलंय .. " अशा गोडबोलेछाप प्रतिक्रीया देणे आम्हाला तरी जमत नाही.तसेच चांगल्या लेखणाची स्तुती देखील आम्ही करतोच. उगाच दिलेल्या गोडगोड प्रतिक्रीयांमुले हुरुप येऊन लोकं जिलेब्या पाडल्यासारखे लेख / कविता / पाकृ टाकतात त्यामुळे आमच्या सारख्या असंख्य वाचकांचा मुड जातो .त्याची जबाबदारी जिलब्या पाडु लेखक घेतात काय?
४. पहिला मुद्दा सोडता बाकी मुद्दे "खास तुमच्या" साठी लिहीलेले नसुन जेनेरिक आहेत. ह्याची नोंद घ्यावी.
बाकी वेळ घेऊन आमचे नाव टंकल्या बद्दल आभार. शिवाय अपेक्षा असुन देखील अपेक्षाभंग न केल्यामुळे परावृत्त झाल्याबद्दल अभिनंदन .
- डाकु टारझन
14 May 2011 - 4:58 pm | आनंदयात्री
>>तेंव्हा जर आपण नकारात्मक प्रतिक्रीयांमुळे लिखाणापासुन परावृत्त होत असाल तर मग लिहुच नका ना. जाहिर पणे आम्ही लिखाणापासुन परावुत्त होऊ असे गळे काढण्यात काय प्रुव्ह होणार आहे ?
नाही टार्या तुझे असे प्रकारचे प्रतिसाद आता अति झालेत. गंमत म्हणुन ठिक आहे यार, नेहमी नेहमी काय ? कंटाळा येतो ते वाचायचा. आता जर तु म्हणशील तुम्हाला कंटाळा येतो तर वाचु नका !! नेमके हेच्च तु कर ना .. नकोस ना वाचुस !! काय नेहमी नेहमी सगळी कडे असे प्रतिसाद देत फिरतोस रे.
14 May 2011 - 7:40 pm | मनिष
आंद्याशी १००% सहमत.
15 May 2011 - 8:34 am | टारझन
अलिकडे मिपावर अतिसपक साहित्य येतंय , अतिफालतु लेख येतात , पहिल्या पानावरचं काही वाचावसं वाटत नाही , असे डायलॉग राउंड रॉबिन पद्धतीत , खरडवह्या किंवा प्रत्यक्षातही ऐकायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात मिपा वारंवार गंडण्यामुळे उरले सुरले फक्त आमचेच प्रतिसाद वाचायला मिळत असावेत. त्यात ह्या अति चे उगमस्थान असावे
'नेहमी' ह्या शब्दाला आक्षेप आहे. एक युक्तिवाद असा येतो की काय 'नेहमी' फालतु साहित्य प्रसवले जाते आहे काय ? बाकी "केवळ" तुम्हाला कंटाळा न येण्यासाठी प्रतिसाद देणे बंद केल्या जाईल.
हेच करतो आम्ही. बहुतेक येणार्या १० पैकी १ किंवा २ धाग्यांवरच माझे प्रतिसाद असावेत.
डायरिया झाल्यासारख्या डायर्या पडत असल्याने कदाचित असे होत असावे. असो . इथुन पुढे प्रतिसाद देणे बंद करु. बाकी "नेहमी नेहमी" ह्या शब्दांवर पुन्हा आक्षेप आहे . आनंदयात्रींनी असे ढोबळ विधान करणे आश्चर्यकारक वाटते.
तसेच वरिल प्रतिसादातही लेखिकेला व्यक्तिगत टार्गेट केल्याचे दाखवल्यास मनिष ला ३.५ बीएचके ते पण कोथरुडात.
बाकी एखाद्या छाणश्या धाग्यावर आमचे वाकडे प्रतिसाद दाखवल्यास आम्ही स्वतः खाते रद्द करुन घेऊ.
(टीप : दळण दळलेले / वारंवार एकाच विषयाचा पिठ पाडलेले "सो कॉल्ड चांगले लेखण " अपवाद आणि केवळ आनंदयात्रींसाठी लेखनप्रपंच )
आणि आम्ही आमच्यासाठीच प्रतिसाद देतो , पटत नसतील तर इग्नोर करावे जसे पाकिस्तान-अमेरिकेचे मिसळपाव वरील रक्षामंत्री करतात , तसे. शिंपल
-( प्रतिसाद संपले ) टारझन
15 May 2011 - 1:51 pm | नन्दादीप
टार्याशी सहमत (९९% तरी)
<<अलिकडे मिपावर अतिसपक साहित्य येतंय , ................... प्रत्यक्षातही ऐकायला मिळत आहेत. >
सहमत.
<<तसेच वरिल प्रतिसादातही लेखिकेला व्यक्तिगत टार्गेट केल्याचे दाखवल्यास >
मला तर नाही बॉ वाटले तसे...... आणि तसे वातले तरी टार्याने त्याला योग्य प्रतिसाद देऊन तो गैरसमज दूर केला आहे.
14 May 2011 - 9:01 am | सहज
भूतकाळाला दिलेलं ओळखीचं हसू..
वाक्य आवडलं.
लिहीत रहा. पु.ले.शु.
14 May 2011 - 1:36 pm | यकु
भूतकाळाला दिलेलं ओळखीचं हसू..
वाक्य आवडलं.
लिहीत रहा. पु.ले.शु.
14 May 2011 - 1:58 pm | यकु
प्र.का.टा.आ.
14 May 2011 - 12:05 pm | नितिन थत्ते
आवडलं
14 May 2011 - 1:17 pm | स्मिता.
मस्त लिहिलंय गं पल्लवी.
"भूतकाळाला दिलेलं ओळखीचं हसू फक्त.." हे तर खूपच छान!
14 May 2011 - 8:20 pm | वेताळ
तुमच हॉटेल कुठे आहे?
15 May 2011 - 12:59 am | माझीही शॅम्पेन
पल्लवी लेख आवडला !
आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती मेनु-कार्डावरील मेनु द्वारे आठवत राहते ,
:) एकदम भन्नाट फॅंडा मुक्तक ! -/\--
अवांतर :- जसा हॉटेल मध्धे मेनु निवडतो तशयाच चांगल्या म्हणणार्या प्रतिक्रियातून प्रेरणा घ्या , बाकीच्या सोडून द्या
15 May 2011 - 8:22 am | छोटा डॉन
लेख आणि संकल्पना छानच आहे.
असेच लिहीत रहा एवढेच म्हणतो.
- छोटा डॉन
15 May 2011 - 8:53 am | नगरीनिरंजन
मुक्तक आवडले. उगाच मुळूमुळू लेख असतात तसे नसल्याने आनंद वाटला. लेख चांगला असला तरी प्रत्येकालाच हा विषय आणि भाव रुचेल असा वाटला नाही.
बाकी देवाणघेवाण म्हणून एकमेकांना चान चान करणारे ही असतात. त्यामुळे पुलेशु.
15 May 2011 - 10:59 am | तिमा
लेख तरल पातळीवरचा.
आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती मेनु-कार्डावरील मेनु द्वारे आठवत राहते ,
कारण त्याच्या मेनू कार्डावरुन तुम्हाला कटाप करण्यात आलेले असते. (भौतिक पातळीवर)
15 May 2011 - 6:09 pm | धमाल मुलगा
बर्याच दिवसांनी आलीस गो पल्लवी :)
छान लिहिलंयस हो. एखादी तसं पाहलं तर छोटीशीच घटना, चारचौघांच्या लेखी क्षुल्लक असलेली गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी किती जवळची आणि मोठी सुंदर असू शकते ह्याचं थोडक्या शब्दात सुंदर चित्रण आहे हे. :)
मला विशेष आवडलं ते म्हणजे, "भूतकाळाला दिलेलं ओळखीचं हसू फक्त.." मस्तच! मेलोड्राम्याटिकही नाही, की बेफिकीरही नाही...प्र्याक्टिकल एकदम, पण तरीही भावनेशी फारकत न घेतलेले.
मस्त! असं चांगलं लिहितेस तर नेहमी का नाही लिहीत बरं तू? :)
16 May 2011 - 8:54 am | अभिज्ञ
मुक्तक आवडले.
अभिज्ञ.
16 May 2011 - 4:32 pm | ५० फक्त
आवडला मुळ मेन्यु आणि त्यावरची फोडणी दोन्ही.
28 Mar 2013 - 5:32 pm | उत्खनक
छोटेखानी पण छान मुक्तक!
आवडलेले लेखन. :)
28 Mar 2013 - 5:50 pm | मन१
उत्खनक साहेबास धनय्वाद.
29 Mar 2013 - 12:52 am | आतिवास
आवडलं.
29 Mar 2013 - 1:04 am | तुमचा अभिषेक
आवडलं हे... काहीतरी आठवल स्वतालाही यातच सारे आले..