मे महिन्याच्या सुट्टीत सुध्दा ते त्याला लवकर उठवतात
भराभरा आवरुन सात वाजता नेहरुस्टेडियम गाठतात
रिक्षाने घरी परत येण्यासाठी त्याच्या खिशात २० रुपये कोंबतात
घरी त्याच्या साठी बोर्नेव्हीटा तयार ठेउन घाईघाईने ऑफीसला जातात
या सगळ्या मेहनतीच फळ अजुन त्यांना मिळायचय
होय, त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकर करायचय
आई बाबा सांगतात म्हणुन,
तो रविवारी सुध्दा सकाळी प्रॅक्टीसला जातो,
दिवाळीच्या सुट्टीतही फटाक्यां ऐवजी चेंडुच फोडतो,
ई.एस्.पी.एन., स्टार क्रिकेट नियमाने पाहतो,
आपण हे सगळे का करतोय हेही त्याला अजुन कळायचय,
पण, त्यांना मात्र त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकर करायचय
बर, हा सचिन फक्त क्रिकेटच खेळतो का?
नाही नाही, शाळा सुटल्यावर रोज तो अॅबॅकसच्या क्लासला जातो,
सोमवार आणि बुधवार त्याचा ड्रॉईंगचा क्लास असतो,
स्विमिंग तर यायलाच पाहिजे म्हणुन रोज संध्याकाळी तो पोहतो,
आई बाबांच्या इशार्यावर त्याला नुसते पळायचय,
कारण, त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकर करायचय
परीक्षेत मार्क कमी झाले म्हणुन आता तो रोज सकाळी शिकवणीला जातो,
स्टॅमीना टिकावा म्हणुन तो रोज दोन अंडीपण खातो,
च्यवनप्राश, शतावरी, ब्राम्ही आणि अजुनही कसली कसली औषध आणि काढे घेतो,
आईच्या मनात आता त्याला तबल्याच्या क्लासलाही घालायचय,
तर काय हो, त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकर करायचय
पण त्याचे काय?
त्याला आईच्या कुशीत शिरुन गुडुप झोपायचे आहे,
आजी कडुन छान छान गोष्ट ऐकायची आहे,
बाबा बरोबर खुप खुप खेळायचे आहे,
दादाची सायकल चोरुन चालवायला शिकायची आहे,
मित्र जमवुन त्यांच्या बरबरीने खुप खुप दंगा करायचा आहे,
खेळता खेळता त्यांच्या बरोबर कडकडुन भांडायचे पण आहे,
त्याला काय हवे आहे याच्याशी कोणाला काय करायचय,
आहो अजुनही कळले नाही का?
त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकरच करायचय
प्रतिक्रिया
12 May 2011 - 7:50 pm | नगरीनिरंजन
हृदयविदारक वास्तव हृदयस्पर्शी शब्दांनी सांगितलंत! फार आवडली. लहान मुलांइतकं शोषण जगात कुणाचंही होत नसेल.
15 May 2011 - 6:48 am | गोगोल
काय याच्यात?
13 May 2011 - 1:14 am | पिवळा डांबिस
अतिशय वास्तवदर्शी कविता!!
अशी काही मुलं प्रत्यक्षात पाहिली आहेत...
आमच्या भाचे-पुतण्यांपैकी असली तर त्यांच्या आई-वडिलांना सज्जड दमही दिला आहे...
पण परक्या मुलांच्या बाबतीत केवळ सहानुभूती वाटते...
:(
13 May 2011 - 1:39 am | आनंदयात्री
सहमत. याच्या थोडी उलटी, पण वस्तुस्थिती 'शिक्षणाच्या आयचा घो' मध्ये दाखवली आहे. तसा चित्रपट थोडा भडक वाटला.
13 May 2011 - 1:24 am | प्रियाली
खरं आहे, वास्तवदर्शी चित्र आहे. असे आई वडील आणि मुले पाहिली आहेत खरी. ज्यांना सचिन व्हायचे किंबहुना करायचे नसते त्यांना "डान्स के सुप्परस्टार", "सारेगामा लिटल चॅम्पियन्स" करायचे असते. इथून तिथून ओझ्याची गाढवे.
बाकी, "ती शेजारची बबडी बघा पायाला चक्रे लावल्यासारखी दिवसाला ८ क्लासेस करते. काय पण राबवून घेतात तिचे आईवडील तिला. बिच्चारी!! आमचा बंड्या बघा, फक्त ४ क्लासना जातो हं!" असे म्हणणारे आईवडील सुद्धा पाहिले आहेत. ;)
13 May 2011 - 2:23 am | गणपा
वास्तव कवितेच्या रुपकातुन छान मांडलय.
प्रियालीशीही सहमत.
13 May 2011 - 7:49 am | आत्मशून्य
शेवटचा पॅरा तर जबरा. खर तर अख्खी कवीताच मस्त.
14 May 2011 - 9:59 am | चिगो
आपल्या अपेक्षांची ओझी, "आम्ही पहा, मुलासाठी क्कित्ती करतोय?" हे दाखवायची खुमखुमी, ह्यात मुलांच्या इच्छा आणि आवडीकडे बघतयं कोण ??
अतिशय वास्तवदर्शी, हृद्यस्पर्शी कविता...
14 May 2011 - 1:57 pm | अविनाशकुलकर्णी
वा भौ मस्त
17 May 2011 - 9:49 am | ज्ञानोबाचे पैजार
रोज सकाळी कामावर जाताना असे अनेक सचिन आई बाबांच्या मागे बसुन, पाठीवर भले मोठे क्रिकेट चे कीट घेउन निघालेले पहातो. त्यातले काहीजण तर चक्क डुलक्या काढत असतात. फार करुण दॄष्य असते ते. एखादे लेकरु पडायचे कधीतरी मागच्या मागे. फार काळजी वाटते त्यांची.
चिगो यांच्याशी सहमत. पण ही आईवडीलांची खुमखुमी नसावी. दोघेही जण नोकरी करत असल्या मुळे, आपण आपल्या मुलासाठी वेळ देउ शकत नाही ह्या न्युनगंडातुन आलेली आगतिकता असावी असे वाटते.
अशा मुलांबरोबर त्यांच्या पालकांची सुध्दा दयाच येते.
17 May 2011 - 11:22 am | लिखाळ
मस्त.. कविता आवडली !
शेवटच्या कडव्यामधल्या अपेक्षासुद्धा 'मोठ्यांच्या मनात लहानांना काय हवे असावे?' या सदरातल्या असाव्यात. खरेच लहानांना काय हवे ते त्यांनाच माहीत :)
18 May 2011 - 9:55 am | प्रियाली
लहानांना काय हवे ते लहान अनेकदा सहज बोलून दाखवतात. :) मोठ्यांसारखा आडपडदा ठेवून बोलण्याची कला ते शिकलेले नसतात पण इतके स्पष्ट बोलून दाखवल्यावरही अनेकदा मोठे न ऐकल्यासारखे करतात किंवा "हॅ! तुला काय कळतंय, तुझ्या भविष्याची जबाबदारी आमची आहे." म्हणून लहानांना टोलवतात.
बर्याचदा येथे सर्वस्वी चूक किंवा बरोबर असं कुणी नसतं पण मोठ्यांनी मोठेपणा घेऊन अधिक समजूतीने घ्यावे ही अपेक्षा रास्त वाटते.
18 May 2011 - 10:51 am | नितिन थत्ते
शर्यतीत धावणार्या घोड्याला शर्यत जिंकायची नसते. त्याच्या पाठीवरच्या स्वाराला जिंकायची असते. :)
18 May 2011 - 11:00 am | नावातकायआहे
मस्त.
19 May 2011 - 5:27 am | कवितानागेश
पालक आपल्या मुलांना नक्की काय समजतात त्यावर ही 'शर्यत' ठरते.
ते मुलांना 'लहान' मुले समजतात, की 'स्वतंत्र' व्यक्ती समजतात, की जबाब्दारीचे ओझे समजतात, की शर्यतीचे घोडे समजतात, की स्वतःची प्रतिमा समजतात, की फक्त म्हातारपणची काठी समजतात, की मिरवण्याची मौल्यवान वस्तू समजतात, त्याप्रमाणे वागणूक बदलते.
खरे तर कुठल्याही नात्यात 'आदर्श' वागणूक ठरवणे कठीण आहे.
18 Mar 2012 - 10:12 am | सांजसंध्या
विचार करायला लावणारी कविता..
18 Mar 2012 - 11:56 am | ५० फक्त
उत्तम कविता,
माझ्या आणि पोराच्या सुदैवानं शेवटचं कडवं आमच्या घरात असणा-या दृष्याची प्रतिमा आहे, त्यामुळं सुखात आहे आजतरी मी आणि माझा लेक दोघंही. अर्थात बायकोच्या डोक्यात त्या कुसेगावकर का तिसेगावकर मुळं पोराला नाच शिकवायचं आलं होतं मध्ये, एक दोन वेळा ते सर घरी आला नाही म्हणुन बोंबाबोंब केल्यावर बंद झालं.
18 Mar 2012 - 12:45 pm | चौकटराजा
माझ्या माहितीप्रमाणे रमेश तेंडलकराना आपल्या लाडक्या शेडेफळाला " सचिन तेंडूलकर " बनवायचेच नव्हते. सचिन अंधारातच चाचपडत असावा
कारण त्याने प्रथम एम आर एफ आयोजित डेनिस लिली यांच्या कॅम्यमधे फास्ट बोलर च्या करियर साठी प्रयत्न केला होता . सचिनचे पहिल्या ७८
सामन्यात शतक झालेले नाही. याचा अर्थ असा की सचिनला कोणी घडविले ? .आज त्याने नतमस्तक होउन ते श्रेय अजित तेंडूलकर, रमाकांत आचरेकर याना दिले आहे . पण खरे तर आपल्यातील दोष दूर करण्याचा कायमचा ध्यास याचे दुसरे नाव " सचिन तेंडूलकर " आहे. भारत देशात
करियर व कॅरेक्टर याचा गुणाकार केला तर इतकी महान व्यक्ति १८ व्या शतकापासून कोणी झाली असेल असे वाटत नाही.
पैजार साहेब,
या अशा पालकांच्या क्रॉनिक केसेस् खूप आहेत आपल्या समाजात . पण दुसर्या बाजूला आळशी पालकही खूप आहेत. एकंदरीत उत्तम अभ्यास .( पाहिलाच क्र १ च येतो हे लक्शात घेऊन) व जोडीला आपल्या पाल्याच्या कलाप्रमाणे एक दोनच छंदाचा पाठपुरावा हा सुवर्ण मध्य आहे.
बाकी दोन्ही अतिरेकी पालकाना पैजारा माराव्यात तेवढ्या थोडया. पण त्या तरी कशा मारणार ,,, पसंद अपनी ... खयाल अपना .
19 Mar 2012 - 4:10 pm | ज्ञानोबाचे पैजार
प्रत्येक पालक हा सुज्ञच असतो. आपल्याला आलेले बरे वाईट अनुभव आपल्या पाल्याच्या वाट्याला येउ नये अशी त्याची प्रामाणिक इच्छा असते. आपल्या पाल्याचे भवितव्य त्याला चांगले कळत असते.
कोणाचे कान पिळण्या साठी हे लिहीलेले नव्हते.
वर एकदा लिहील्या प्रमाणे स्कुटरच्या मागे पेंगत बसलेल्या त्या बछड्यांना बघुन अस्वस्थ झालो होतो इतकेच.
कोणी काय करावे, किंवा कोणत्या गोष्टीचा कोणी कसा अर्थ लावावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त माझे निरीक्षण नोंदवले इतकेच.
पैजारबुवा,
28 Jul 2017 - 3:46 pm | पुंबा
अचानक ही कविता वाचण्यात आली.. खूप आवडली..
नविन मिपाकरांना वाचावयास मिळावी म्हणून वर काढत आहे..