जर तू असता तर
तुला दिसले असते
सुरे घेतलेले हात
कल्ले कापलेलं शरीर
निळ्याशार पाण्यातला लाल ढग
तुला दिसले असते
अजस्त्र शरीरावरचे
निर्जीव भासणारे डोळे
दिसलीही असती त्यात वेदना
पण नसती दिसली दया याचना
जर तू असता तर
तुला दिसले असते
काळे पिवळे पट्टे
आणि त्यावर लाल जखमा
भेदरलेले गोड बछडे
आणि जमिनीवर आपटलेली शेपटी
दिसले असते तुला
थंड भासणारे हिरवे-पिंगट डोळे
क्रोधाचा पेटलेला त्यात वणवा
पण तुझ्या प्रार्थनेची वानवा
जर तू असता तर
तुला दिसले असते
कुर्हाडीचे घाव सोसणारे
महाकाय मूक वृ़क्ष
चूड घेतलेल्या हातांनी
पेटवलेले भीषण वणवे
उघडे बोडके डोंगर
त्यावरचे तुझे मंदिर
आणि हातापाया न पडता
समोर कोसळणारी झाडे
जर तू असता तर
तुला दिसले असते
क्षुद्र मुके जीव
मानाने जगणारे
मरण येईपर्यंत
आयुष्याशी झगडणारे
जर तू असता तर
उचलले असतेस तुझे
चक्र, वज्र, त्रिशूळ, तलवार
आणि छाटली असतीस समोरची
झुकलेली मुंडकी लाचार
प्रतिक्रिया
6 May 2011 - 4:55 pm | शुचि
अप्रतिम कविता आहे. फारच सुंदर.
परत वाचली.
प्रत्येक कडवं हृदयाला पीळ पाडणारं आहे.
7 May 2011 - 3:00 am | पाषाणभेद
आवडली
8 May 2011 - 3:29 am | प्राजु
अफाट!!
प्रत्येक कडवं आर-पार घुसलं. खूप सुंदर!
9 May 2011 - 9:10 am | स्पंदना
नगरी सलाम!
9 May 2011 - 11:40 am | नगरीनिरंजन
शुचि, पाभे, प्राजु, अपर्णा,
मनःपूर्वक धन्यवाद!
4 Sep 2011 - 1:27 pm | मनिष
अप्रतिम, अफाट!!!
खूप, खूप आवडली!
4 Sep 2011 - 1:29 pm | अर्धवट
खूप चटका लावणारं लिहिलय राव
4 Sep 2011 - 5:02 pm | तिमा
हेच विचार मनांत येत असतात पण तुमच्यासारखे इतके सुंदर शब्दात नाही गुंफता येत. कविता आवडली.
4 Sep 2011 - 6:50 pm | मदनबाण
सुरेख... :)
4 Sep 2011 - 7:11 pm | धन्या
सुंदर कविता !!!
आजचं दाहक वास्तव नेमक्या शब्दांत उतरवलं आहे...
4 Sep 2011 - 7:32 pm | नंदू
अप्रतिम कविता!
4 Sep 2011 - 7:39 pm | स्पा
:(
मस्त
आवडली
5 Sep 2011 - 2:58 pm | चित्रगुप्त
कविता भावली. अश्याच येऊ द्यात आणखी.