माझ्यामधील एक भाग चालत गेला दुसरा रस्ता

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
25 Apr 2011 - 11:20 pm

Two roads diverged in a wood, and...
I took the one...
And that has made all the difference.
Robert Frost (1874–1963)

माझ्यामधील एक भाग चालत गेला दुसरा रस्ता
- - - - -
जाता जाता पुढ्यात माझ्या होत्या मागे दोन वाटा,
त्यांत निवड केली, त्यातून पुढे सगळा फरक पडला.
म्हणून वाटते, तोच प्रसंग आहे इतका स्मृतीस भिडला
जरी फुटला पुढे त्याही फाट्यास फाटा, फाट्यास फाटा.
माझ्यामधील एक भाग आतल्या आत देऊन छाटा
चालत गेला दुसरा रस्ता, हा सोडून पलीकडला.
मी येथे चालत चाललो तो तिथे जडत जडला.
दोन्ही डगरी अनुसरतो, तरी सलतो टाचेत काटा.
-
येथे काटे रुततात, तसे नाही तेथे टोचरे काही
या वाटेत दम लागतो, या वाटेत हुरूप गळतो
त्या वाटेत श्रम नाही, भ्रम अन् निराशा नाही.
तो माझा चिरतरुण भाग अजून धडाडीने,
उत्कंठेने, उत्साहाने मार्ग क्रमतो. मी दळतो
जड जाते, झोकून दुखरे चिवट खांदे चिकाटीने.
- - - - -

ध्वनिमुद्रण :
Get this widget | Track details | eSnips Social DNA

वृत्त ४ "वजनी पद्मावर्तनी" गणांची ओळ. पुढील ध्वनिमुद्रणात गणांच्या मधील यती स्पष्ट अतिस्वल्पविरामाने दाखवली आहे :
Get this widget | Track details | eSnips Social DNA

काही वेळा वरील विजेटे काम करत नाहीत. या ईस्निप्स दुव्यावर जाऊन दोन्ही ध्वनिफिती मिळू शकतील. कवितावाचन : "both_roads.mp3" वृत्त : "both_roads_rhythm.mp3"

कविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

26 Apr 2011 - 12:01 am | पाषाणभेद

दोन वाटांत फरक आहे तरीही मग किचकट वाट का निवडली? अन त्याचा त्याला पश्चाताप होतोय का?

सल आहे, पण पश्चात्ताप असा नाही.

दोन वाटांत फरक आहे खरा, पण फरक किचकटपणात नसावा. "कमी-त्रासदायक" वाटेवर गेलेला कवीचा भाग स्वभावाने वेगळा आहे, हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. वाटांमधला फरक खरोखरच्या किचकटपणाचा आहे की स्वभाववैशिष्ट्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा आहे हे कवितेतल्या ओळींवरून तरी सुस्पष्ट नाही.

(कवितेतल्या या दोन वृत्ती म्हणजे "मुंगी विरुद्ध टोळ" आहेत काय? [बालकथेमध्ये मुंगीची बाजू घेतलेली आहे]. किंवा "खत्रुड विरुद्ध कलंदर" अशा त्या दोन वृत्ती आहेत काय? [बहुतेक कथांमध्ये कलंदरची बाजू घेतलेली असते.] किंवा अशा काळ्यापांढर्‍यात वृत्तींचे वर्गीकरण करता तरी येते काय? खरे मनुष्यस्वभाव फक्त करड्यातच वावरत असतात.)

पंगा's picture

26 Apr 2011 - 2:47 am | पंगा

खरे मनुष्यस्वभाव फक्त करड्यातच वावरत असतात.

!

+१.

:)

आळश्यांचा राजा's picture

28 Apr 2011 - 3:15 pm | आळश्यांचा राजा

द कलर ऑफ ट्रुथ इज ग्रे!

(सौजन्य - एशियन पेण्ट्स!)

(ग्रे)

मस्तच!
रॉबर्ट फ्रॉस्टच्या 'द रोड नॉट टेकन' चा स्वैर अनुवाद आहे की काय?
तुम्ही लिहिलेली कविता आवडली.

रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेतल्या शेवटच्या अडीच ओळी या कवितेतील पहिल्या दोन ओळी झालेल्या आहेत. मात्र पुढील ओळी (फ्रॉस्टला अपेक्षित नसलेली) वेगळी गोष्ट सांगतात.

अच्छा! अनपेक्षित गोष्ट आवडली.

निनाव's picture

26 Apr 2011 - 1:09 am | निनाव

मला कवितेचा विषय प्रचंड आवडला. कल्पना अफलातून आहे. कविता छानच झाली आहे. कुठे कुठे शब्द लय सोडतात बघून पुर्व परवानगी शिवाय शब्द रचना बदलून देत आहे, - नावडल्यास क्षमा. दुखवायचा हेतु मुळीच नाहिये. - आपला निनाव.

शिर्षकः **निवडला मार्ग दुसरा **

जाता जाता पुढे माझ्या होत्या दोन वाटा,
निवडली एक अन फरक सगळा झाला
प्रसंग तो इतुका स्मृतीस भिडला
पुढे फुटल्या त्या वाटेसही अनेक फाटा

छाटूनि माझ्या मधील एक भागनं आतल्या आत
अनुसरला मार्ग सोडूनि दुसरा
चालत होतो मी पुढे इथे, अन मात्र तो तिथंच जडला
काटे रुततात इथे, न टोचरे त्या वाटेवरी काही
लागतो दम ह्या वाटेवर, गळतो हुरूप कधी काही
त्या वाटेवर मात्र नसे निराशा, अन कसले श्रमही नाही

तो माझा चिरतरुण भाग अजून धडाडीने,
उत्कंठेने, उत्साहाने मार्ग क्रमतो.
जड जाते अविरत
झोकून दुखरे चिवट खांदे चिकाटीने
मी दळतो , मी क्रमतो!

रेवती's picture

26 Apr 2011 - 1:15 am | रेवती

पहिली दोन कडवी गेय आहेत. तिसर्‍याच्या शेवटी जरा गडबड होते आहे काय? की माझेच म्हणायला चुकते आहे.
'क्रमतो' ला गडबड होते आहे.

अतिशय छान सांगितले आहे ... मस्तच

गणेशा's picture

26 Apr 2011 - 1:19 am | गणेशा

प्र.का.टा.आ

रेवती , गणेशा: मूळ कविता श्री धंनजय ह्यांचीच आहे. मी फक्त वाचनास सोपी जावी ह्या अर्थी प्रयत्न केला आहे.. शेवटच्या कडव्यात तुम्ही सांगतात तशी लय सुटली , त्नेव्हा शेवटची ओळ घालून मूळ कविते ला अधिक अनुसरेल असा प्रयत्न केला आहे.....

.... क.१
....क.२

तो माझा चिरतरुण भाग अजून धडाडीने,
उत्कंठेने, उत्साहाने मार्ग क्रमतो.
जड जाते अविरत
झोकून दुखरे चिवट खांदे चिकाटीने
मी दळतो , मी क्रमतो - गर्वतो,
जो मार्ग मी अनुसरला.

धनंजय's picture

26 Apr 2011 - 2:21 am | धनंजय

मुळात आकारबंध ८-६ सॉनेटचा आहे :-) कविता "वजना"च्या वृत्तात बांधलेली आहे. (मराठी सामान्य संवादाच्या पद्धतीने वाचली तर आपोआप वजनांची लय नियमित होते. पण मराठी कवितांमध्ये संस्कृत-धाटणीच्या मात्रा मोजणीने लय साधणेसुद्धा प्रचलित आहे. मीसुद्धा ती पद्धत कित्येकदा वापरतो. म्हणून गोंधळ होणे स्वाभाविक आहे.)

ध्वनिमुद्रण करून उद्यापर्यंत येथे देतो.

परवानगीचे/दुखावण्याचे मनात आणू नका. वाचकाने कविता आणि कल्पनाही सगळ्या प्रकारे आपलीशी करण्यातच गंमत आहे.

मुक्त मनानं घेतल्याचे बघुन बरे वाटले. कविता खूपच सुंदर आहे , म्हणून गुंफलो , अर्थात ह्याचे श्रेय तुम्हासच. इतुका छान विषय समोर आणल्या बद्दल!

- आ. निनाव.

चिरतारुण्याचे वरदान लाभलेला तुमचा तो भाग असाच स्वप्नवत चालत राहो ...
तुमचा जीवनक्रमात पिचलेला रोड जास्त आवडला ..
कविता छान आहे ....
पण तुलनात्मक फरक न सांगता प्रवासात्मक बदल आणखिन उठावदार झाला असता का ?

निनाव's picture

26 Apr 2011 - 1:16 am | निनाव

गणेशा ला अनुमोदन. गणेशा, नेहमी प्रमाणे - विचार जबरा आहे!

श्रावण मोडक's picture

26 Apr 2011 - 2:02 am | श्रावण मोडक

कल्पना उत्तम. अगदीच नवी नसली तरी तिच्यात शिळेपणा नक्की नाही. पण रचना? अवघडल्यासारखी वाटतेय. मला वाटतं, या विषयावर मुक्तछंदात अधिक चांगली रचना झाली असती. म्हणजे, इथं छंद आहे किंवा कसे हे मला ठाऊक नाही. पण काही चौकट पाळण्याचा प्रयत्न झालेला असावा असे वाटते आणि त्या चौकटीने अवघडलेपण आणले असावे.
वैयक्तिक विनंती - धनंजय, पुन्हा काही विचार करून पहा. उत्तम रचना होऊ शकते. अवघडलेपणातून मुक्त करता यावी. अवघडलेपण हे माझे मत आहे. ते मान्य नसण्याचा तुझा अधिकार मान्य!!!

मनिष's picture

26 Apr 2011 - 12:47 pm | मनिष

मलाही ही रचना थोडी अवघड्/अवजड वाटली. मुक्तछंदातही लिहणार का? मलाही प्रयत्न करायची इच्छा होतेय! :P

धनंजय's picture

26 Apr 2011 - 9:16 pm | धनंजय

ही कविता बोलांची कविता आहे, तशी मुक्तछंदाच्या वळणाने गेलेली आहे. कवितावाचन ऐकता आले का? माझ्याकरिता तरी अगदी सरळ-सरळ साधेपणाने ओळी वाचता येतात. "कविता" म्हणून वाचण्याचा जो प्रकार मराठीमध्ये आहे, तसे वाचण्याचा प्रयत्न न करता एखादा परिच्छेद वाचल्यासारखी कविता वाचून बघावी, अशी विनंती. लय-ठेका वगैरेंची आपोआप सोय लागेल.

ज्याला "मुक्तछंद" म्हणतात, तो मात्र अधिक अवघड असतो. आणि या कवितेच्या बाबतीत मला मुक्तछंदाची स्फूर्ती होत नाही.

श्रावण मोडक's picture

28 Apr 2011 - 12:28 pm | श्रावण मोडक

वाचन ऐकलं आणि कवितेनं, आधीच्या माझ्या मतांच्या विपरित, कवितेचाच अनुभव पहिल्या भागात दिला. पण (हा माझा पण काही सुटत नाही) शेवटच्या तीन ओळींचं वाचन मात्र अवघडलेलं वाटलं. 'चिरतरुण' आणि 'भाग' इथं गिअर बदलतो, तीच गोष्ट 'मी दळतो' आणि 'जड जाते' इथं घडतेय. म्हणजेच, तिथं सफाई कमी पडतेय का? हा माझा औत्सुक्यातून आलेला प्रश्न आहे. पुन्हा वाचन गद्याचं वाचन आहे, असंही मला वाटलं नाही. उलट, मुक्तछंदातील कविताच वाचत असल्यासारखं वाटत राहिलं. बोल कविता हे पटलं, पण एकूण बोल जे आहेत इथं तू दिलेले, ते पाहिलं तर मुक्तछंदात अधिक मोकळेपणाही येऊ शकेल हे वाटत राहिलंच!!!

गिअर बदलतो हे खरे आणि मुद्दामून. (आदल्या ओळी/उर्वरित कविता वाचून "पाहिजे असते तर मऊसूत लय साधणार्‍या ओळी रचता आल्या असत्या" असे म्हणण्यास जागा आहे. म्हणूनच "लयीत आडवळणी बदल केलेला आहे, तो मुद्दामून" असा निष्कर्ष काढता येतो.)

आता या गियर बदलण्याने, किंवा अशा कुठल्याही प्रकाराने काय साधते? एकतर शब्दार्थातून जे सांगायचे आहे ते बिगरशब्दार्थी माध्यमाने विशद केले जाते. किंवा शब्दार्थ आणि बिगरशब्दार्थ ध्वनींच्या माध्यमातून एकत्रित वेगळीच भावना सांगितली जाते... असे काही.

अर्थात वाचकाला पुढील सर्व आस्वादमूल्यमापनाचे पर्याय उपलब्ध राहातातच : (१) शब्दार्थ आणि बिगरशब्दार्थ रीतीने सांगितलेले अर्थ एकमेकांचा रसभंग करतात अशा निर्णयापाशी पोचणे; (२) शब्दार्थ आणि बिगरशब्दार्थ एकत्र येऊन निर्माण झालेली वेगळीच भावना ही आस्वाद्यतेच्या दृष्टीने कमकुवत आहे, अशा निर्णयापाशी पोचणे, वगैरे.

मात्र "गियर बदलला" हे तुमच्यापर्यंत पोचले, हे कवितेचे तांत्रिक यश मानले पाहिजे ;-)
(कविता ही तांत्रिक यशाकरिता नसते, तर उत्कट भावनास्पर्शाकरिता असते, याच्याकडे दुर्लक्ष करत नाही, हे दाखवण्यासाठी डोळा मिचकावलेला आहे.)

ऋषिकेश's picture

26 Apr 2011 - 1:37 pm | ऋषिकेश

छान विषय. स्वैर अनुवाद आवडला मात्र मुक्तछंदातही लिहुन बघावे शिवाय एखादा अल्पाक्षरी छंदही वापरून बघावा असेही सुचवतो.

अवांतरः असे छंदबद्ध काव्य बघितलं की स्वतःला छंदबद्ध लिहिता न आल्याची खंत पुन्हा मान वर काढते :(

बाकी ही मुळ कविता किती जूनी आहे? यासाठी विचारतोय की जर मुळ कविता प्रताधिकाराखाली येत असेल तर याचा विचार व्हावा असे वाटते.

हा अनुवाद नाही, शेवटच्या दोन ओळींवरुन स्फुरलेली स्वतंत्र कविता म्हणता येईल.

क्रान्ति's picture

26 Apr 2011 - 1:41 pm | क्रान्ति

आवडली.

तो माझा चिरतरुण भाग अजून धडाडीने,
उत्कंठेने, उत्साहाने मार्ग क्रमतो. मी दळतो
जड जाते, झोकून दुखरे चिवट खांदे चिकाटीने.

वा!

मुक्तछंदात कल्पना अधिक खुलली असती, असं मलाही वाटतं. अर्थात त्यामुळे या रचनेत काही बाधा येत नाही. लय चांगली साधलीय.

नगरीनिरंजन's picture

26 Apr 2011 - 2:49 pm | नगरीनिरंजन

आशय आवडला.
संदीप खरे यांचीही अशाच अर्थाची एक कविता आहे ना?

कविता छान झाली आहे. आवडली.
ही कविता या पूर्वी तुम्ही प्रसिद्ध केली आहे का? असे वाटले.

फ्रॉस्टच्या "रोद नॉट टेकन" कवितेचा अनुवाद मागे एकदा कुठेतरी दिला होता, असे वाटते. पण मिसळपावावर सापडत नाही :-( आणखी कुठे दिला असेल, ते सुचत नाही. माझ्या याहू-३६० ब्लॉगवर होती, पण याहू कंपनीने ती सेवाच बंद केली. अनुदिनीमधल्या नोंदी बुडाल्या.

पण या कवितेतला आशय फ्रॉस्टच्या "रोड नॉट टेकन"च्या आशयापेक्षा वेगळा आहे. ही कल्पना असलेली माझ्या मते मी या ठिकाणी पहिल्यांदाच रचलेली आहे. (ऐलपैल डॉट कॉमवरसुद्धा दिलेली आहे, पण गेल्या दोन दिवसांतच.)

फ्रॉस्टच्या "रोड नॉट टेकन"ची आठवण यावी अशी आणखी एक कविता मी लिहिलेली आहे - "घाटातली पायवाट" आणि समांतर इंग्रजी कविता "The path by the railtrack". इंग्रजी कविता सॉनेट आहे, पण मराठी कवितेची चौकट खूपच वेगळी आहे.

फ्रॉस्टच्या "रोद नॉट टेकन" कवितेचा अनुवाद मागे एकदा कुठेतरी दिला होता, असे वाटते. पण मिसळपावावर सापडत नाही आणखी कुठे दिला असेल, ते सुचत नाही.

बहुधा मला हेच आठवत आहे. :)
आताची कविता छानच.

विसोबा खेचर's picture

28 Apr 2011 - 9:08 am | विसोबा खेचर

लै भारी..!

प्राजु's picture

29 Apr 2011 - 2:27 am | प्राजु

कल्पना सुरेख!!
पण.. खरंच वाचताना अवघडल्यासारखं झालं. मुक्तछंदात एकदा लिहून बघावी असे वाटते.

धनंजय's picture

29 Apr 2011 - 4:05 am | धनंजय

मूळ कवितेलासुद्धा आधी "-१" असे गुणांकन होते. ते अर्थात ठीकच आहे. त्या प्रसंगी "कविता आवडली नाही" अशी टिचकी मारणारे लोक "कविता आवडली" अशी टिचकी मारणार्‍यांपेक्षा एक अधिक असे होते. कविता न-आवडणारे लोक आहेत हे कळणे ठीकच आहे. (आता गुणांकन +१ असे आहे, म्हणजे आता "कविता आवडली" अशी टिचकी मारणारे लोक "कविता आवडली नाही" अशी टिचकी मारणार्‍यांपेक्षा एक अधिक इतके आहेत.)

आता बर्‍याचशा प्रतिसादांना "-१" असे गुणांकन दिसते आहे. यातील अनेक प्रतिसाद मी लिहिलेले आहेत. काही अन्य लोकांनी लिहिलेले आहेत. प्रतिसाद सुधारावेत म्हणून "-१" गुणांकन समजावे असा प्रयत्न करतो म्हणावे, तर काय ते नेमके कळत नाही.

श्रावण मोडक's picture

29 Apr 2011 - 9:54 am | श्रावण मोडक

वेल... माझ्या मते ही प्रणाली अद्याप अनेकांना नीट माहिती नसावी आणि त्यामुळे तिची स्थिती काही काळात 'मतांची पिंक' अशी होण्याचा धोका आहे. कारण अशा स्वरूपातील मानांकन दिले जाण्याची या संस्थळावरील ही काही पहिलीच वेळ नाही. दुसरी गोष्ट ही प्रणाली अशा संस्थळांच्या हिशेबात आत्ताच्या स्थितीत परिपक्व मानता येणार नाही. कारण ती फक्त बेरीज वजाबाकी करते. त्यातून माझ्या हाती फक्त गणिताचे उत्तरच राहते. मला हे कधीही कळत नाही की, किती सदस्यांना प्रतिसाद किंवा लेख आवडला आणि किती जणांना आवडला नाही. १३ जणांना आवडला आणि १४ जणांना नाही, याचा निकाल येथे (उणे) १ असा मिळेल. तीच गोष्ट ५० आणि ५१ या आकड्यांबाबतही होईल. म्हणजेच त्या उणे किंवा अधिक आकड्यांना बाकी अर्थ फारसा रहात नाही (अर्थातच, हे लोकशाही मतदान झाले). कारण किती जणांना आवडली किंवा किती जणांना नाही हे कळतच नाही. त्यासाठी मग प्रतिसादच महत्त्वाचे ठरतात. तसे असेल तर ही व्यवस्था बिनकामाची ठरते. कारण प्रतिसादांची व्यवस्था तर आहेच.
नीलकांत, या प्रणालीविषयीची कल्पना नेमकी काय आहे, तिचा वापर करताना सदस्यांकडून काय अपेक्षीत आहे याविषयी काही लिहिले पाहिजे.

चित्रा's picture

30 Apr 2011 - 12:04 am | चित्रा

आवडली.

मला कवितेतले काही कळत नाही हे झालेच. पण
जाता जाता पुढ्यात माझ्या होत्या मागे दोन वाटा,
त्यांत निवड केली, त्यातून पुढे सगळा फरक पडला.

त्यात निवड केली म्हणून पुढे सगळा फरक पडला असे म्हणता येईल काय?
त्यात निवड केली तेव्हा पुढे सगळा फरक पडला असेही होऊ शकेल का काय.

अर्थात यामुळे फारसे काही बिघडते असे नाही. कविता आवडली.

धनंजय's picture

30 Apr 2011 - 1:44 am | धनंजय

सुचवलेले पर्याय चालतील असे वाटते. अर्थच्छटांमध्ये सूक्ष्म (पण जाणवण्याइतपत) फरक आहे. पण तीन्ही सूक्ष्म फरकाचे अर्थ चालतात.

"अमुक घटना त्यातून तमुक घटना त्यातून फलाणा घटना घडत गेली" यात एकातून एक गोष्ट बाहेर पडत असल्याचे चित्र येते - मोठ्या गंजातून छोटा गंज काढल्यासारखे. किंवा साखळीच्या एका कडीतून दुसरी कडी ओवली, त्या दुसर्‍या कडीतून तिसरी कडी ओवली... थोडक्यात थोडेसे चित्रमय वर्णनात्मक.

"अमुक आदली घटना म्हणून तमुक नंतर घटना" यात "कार्यकारणभाव" असल्याची सूक्ष्म छटा येते.

"अमुक घटना तेव्हा तमुक फरक" या प्रयोगात पहिल्या प्रयोगासारखे वर्णनच आहे. पण एकात-एक ओवल्याचे (किंवा मोठ्या गंजातून छोटा गंज काढल्याचे) मानसिक चित्र न-उद्भवता थेट कालवाचक शब्द "तेव्हा" योजलेला आहे. "त्यातून फरक पडला"मध्ये फरक विकसित होत जातो, तर "तेव्हा फरक पडला" मध्ये फरकाचा क्षण "तेव्हा" म्हणून सांगितला जातो.

हे फरक असले, तरी तीन्ही पर्याय अर्थपूर्ण आहेतच.