रिगाचा जादुगार!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
14 May 2008 - 11:03 am

'मिखाइल नेखेमिअविच ताल', काय बोध झाला हे नाव वाचून?
तसं म्हणाल तर बुद्धिबळाशी संबंध नसलेल्यांसाठी हे एक सर्वसाधारण रशियन नाव आहे, अंतराळवीर किंवा एखादा शात्रज्ञ!
पण बुद्धिबळाशी ज्यांचा दूरान्वयाने का होईना संबंध आला आहे त्यांच्यासाठी हे नाव, म्हणजे शिवाजी महाराजांच्या अभ्यासकांसाठी बाबासाहेब पुरंदर्‍यांचं नाव जितक्या आदराने घेतले जाईल, तितकेच आदराचे आहे!

'दि मॅमथ बुक ऑफ वर्ल्डस ग्रेटेस्ट चेस गेम्स' (जगातल्या उत्कृष्ट बुद्धिबळ डावांचे प्रकांड पुस्तक) ह्या पुस्तकात समाविष्ट केलेले सर्वाधिक डाव ज्या खेळाडूचे आहेत असा हा एक अवलिया होता, एवढी एकच गोष्ट त्याची महती वर्णन करण्यास पुरावी!

पूर्वीच्या सोवियेत संघराज्यातल्या, लात्विया नामक प्रांतातल्या रिगा ह्या गावी, एका डॉक्टरपित्यापोटी जन्मलेल्या (१९३६) ह्या बालकाने वयाच्या आठव्या वर्षी पित्याच्याच देखरेखीखाली बुद्धिबळाचा ओनामा केला. तो वंशाने ज्यू होता.
सुरुवातीला खेळात फारशी चमक नसलेल्या तालने 'रिगा पायोनियर्स' ह्या चेस क्लबमधे अलेक्सांडर कोबलेंट्स च्या मार्गदर्शनाखाली सराव सुरु केला. १९५४ मधे तो 'सोवियेत मास्टर' झाला. १९५६ मधे तो सोवियेत चेस चँपियनशिप साठी पात्र ठरला. ह्या स्पर्धेतली त्याची कामगिरी एवढी चमकदार होती की त्याने पुरेसे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नसताना देखील आपल्या काटेकोर नियमांना बगल देऊन 'फिडे'ने (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) त्याला ग्रँडमास्टर किताब बहाल केला!

चेस ऑलिंपियाड, कँडिडेट मास्टर्स अशा एकेक स्पर्धा पादाक्रांत करत जाणार्‍या ह्या उमद्या खेळाडूची गाठ, जागतिक विजेतेपदासाठी पडली, ती थेट मिखाईल बोट्विनिक सारख्या असामान्य खेळाडूशी! भल्याभल्यांचे अंदाज धुळीला मिळवीत ह्या पठ्ठ्याने बॉट्विनिकसारख्या महारथीला सपशेल खडे चारले आणि सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. वय वर्षे २३! (त्यानंतर आजतागायत फक्त गॅरी कास्पारोव ने हा विक्रम मोडला तो वयाच्या २२ व्या वर्षी जगज्जेतेपद मिळवून!). त्याच्या ह्या असामान्य कामगिरीमुळे त्याचे टोपणनाव 'रिगाचा जादुगार' ठेवले गेले.
मद्यपान आणि धूम्रपान हे दोन्ही मात्र त्याचे सातत्याने शत्रू ठरले. तब्बेतीच्या सततच्या तक्रारींमुळे अनेक स्पर्धातून त्याला माघार घ्यावी लागली किंवा फारसे यश हाती लागले नाही. अखेर १९७० च्या सुमारास एक किडनी काढून टाकल्यावर त्याने त्याचा फॉर्म परत मिळवला!
१९८८ साली, वयाच्या ५१ व्या वर्षी 'ब्लिट्झ चेस' ह्या अतिवेगवान खेळात त्याने कास्पारोव आणि कारपॉव सारख्या तरण्या खेळाडूंना हरवून जेतेपदाचा मुकुट चढवला होता!
एकामागोमाग एक ९३ सामन्यात एकही सामना न हरता (एकतर जिंकणे किंवा बरोबरी) खेळण्याचा त्याचा विक्रम अबाधित आहे. ह्यावरुन त्याच्या असामान्य कर्तृत्त्वाची झलक दिसून येते.

बुद्धिबळ ही मुळात एक कला आहे अशी त्याची ठाम धारणा होती आणि इथूनच तो इतर समकालीन खेळाडूंपासून वेगळा होता. तालची शैली ही अतिशय आक्रमक होती. अतिशय शक्तिमान चढाया, कल्पक सापळे, बेधडक केलेली बलिदाने ह्या सार्‍यांनी त्याचा डाव दणाणून गेलेला असे. संयमित, पद्धतशीर खेळ्या, पुस्तकी डावपेच, बचावात्मक खेळणे असले प्रकार त्याला कधी मानवलेच नाहीत. वजिरासारख्या मातब्बर मोहोर्‍याचे बलिदान तो असा वेड्यासारखा देऊन टाकी की समोरचा खेळाडू चक्रावून वेडा होऊन जाई की नक्की आहे तरी काय ह्याच्या मनात? आणि त्यानंतर थोड्याच खेळ्यात त्या प्रतिस्पर्ध्याची अवस्था 'वजीर देखा लेकिन ताल नहीं देखा' अशी होऊन जाई!

तो स्वतः उत्तम समीक्षकही होता आणि बुद्धिबळासंबंधी त्याने केलेले लेखन हे एक दर्जेदार लेखन समजले जाते.
त्याची काही सुप्रसिद्ध वचने वाचलीत तर त्याचा ह्या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या ध्यानात येतो.
"सम सॅक्रिफायसेस आर साऊंड, अदर्स आर माइन." किंवा
"पांढरी मोहोरी घेऊन खेळणार्‍याने कोणत्याही कारणाने बरोबरी करण्यासाठी खेळणे हा एकप्रकारे गुन्हा आहे!"
बॉट्विनिक बरोबरच्या जागतिक जेतेपदाच्या सामन्यांचे त्याने एक पुस्तक लिहिले आहे ते आजही एक उत्कृष्ट पुस्तक म्हणून नावाजले जाते. ह्याचे कारण म्हणजे ताल केवळ खेळ्यांचे पृथक्करण आणि कारणमीमांसा करुन थांबत नाही तर तो त्या खेळ्यांमागची अंतःप्रेरणा काय असेल ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच आपण नतमस्तक होतो.

पटावरच्या परिस्थितीचे अचूक विश्लेषण करण्यात हातखंडा असलेल्या तालचे स्वतःबद्दलचे मत मात्र त्याने त्याच्या आत्मचरित्रात तो आणि एक पत्रकार ह्यांच्यामधल्या काल्पनिक संवादाने व्यक्त केले आहे.
ताल लिहितो -
पत्रकार :- आपल्या गंभीर चर्चेची लय कदाचित बिघडेल हे लक्षात येऊनही मला एक प्रश्न विचारण्याचा मोह आवरत नाहीये. गंभीर, शिस्तबद्ध खेळ सुरु असताना अचानक काही चक्रावून टाकणारे वेडेवाकडे विचार तुमच्या मनात येतात काय?
ताल :- हो कितीतरी वेळा. ग्रॅ.मास्टर वसियुकोव विरुध्द्चा डाव मी कधीही विसरणार नाही. डावाच्या मध्यात मी घोड्याचे बलिदान करण्याच्या विचारात होतो. खूपच गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे पटावर विचित्र अवस्था होती. मला सुचलेले कुठेलेच डावपेच पूर्णपणे यशाकडे नेणारे भासत नव्हते. खूप विचार करुन झाल्यावर अचानक माझ्या मनात एका लेखकाचे लिखाण आले त्यात चिखलात रुतलेल्या पाणघोड्याचे वर्णन होते. समोर डाव चालू असताना त्या पाणघोड्याला चिखलातून बाहेर काढण्याचे मी मनाने हर एक प्रयत्न केले. दोरखंड, तरफा, कप्प्या, हेलिकॉप्टर्स असे सगळे प्रकार मनातल्यामनात वापरुन झाल्यावर शेवटी मी नाद सोडून दिला आणि म्हणालो मरुदेत त्या पाणघोड्याला चिखलातच. त्यानंतर एक धाडसी डाव समोर येतोय असे दिसताच मी घोड्याचे बलिदान केले!!
पत्रकार :- हो, आणि दुसर्‍यादिवशी मी वृत्तपत्रात वाचले की अतिशय गुंतागुंतीच्या स्थितीवर तब्बल ४० मिनिटे सखोल विचार करुन शेवटी तालने घोड्याचे बलिदान देणारी अचूक खेळी केली!!

ह्या संवादातली मर्मभेदक वक्रोक्ती ध्यानात आली की आपण थक्क होतो आणि 'रिगाच्या जादुगाराला' मनोमन सलाम करतो!!
(अति मद्यपान आणि सतत धूम्रपानाची शिकार झालेल्या ह्या महान खेळाडूचे २८ जून १९९२ रोजी मॉस्को हॉस्पिटलमधे मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले.)

क्रीडाप्रतिभा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

14 May 2008 - 11:14 am | आनंदयात्री

रिगाचा जादुगाराची छान ओळख करुन दिलीत, धन्यवाद.

>>बुद्धिबळाचा ओनामा केला

म्हणजे श्रीगणेशा केला असे म्हणायचे आहे का ? ओनामा रशियन शब्द आहे का ?

विसुनाना's picture

14 May 2008 - 3:26 pm | विसुनाना

हा अस्सल मराठी शब्द आहे.
ॐनमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या... या ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या ओवीच्या 'ॐनमो' या शब्दावरून ओनामा हा शब्द आला आहे.
श्रीगणेशा आणि ओनामा एकच.
असो.

स्वाती दिनेश's picture

14 May 2008 - 11:52 am | स्वाती दिनेश

वा! 'रिगाचा जादूगार' नांवही आवडले आणि परिचयही,
स्वाती

प्राजु's picture

14 May 2008 - 2:53 pm | प्राजु

माहिती दिली आहे चतुरंग तुम्ही... खूपच छान.
रिगाच्या जादुगाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुमीत's picture

14 May 2008 - 2:59 pm | सुमीत

लेख फर्मास झाला आहे, आवडले बुद्धीबळा वर आणि ते पण ह्या खेळाच्या महान खिलाडी बद्द्ल वाचायला.

विसुनाना's picture

14 May 2008 - 3:33 pm | विसुनाना

बुद्धीबळ आणि चतुरंग हे सोंगट्यांचे खेळ. चतुरंग बुद्धीबळाचा बापच म्हटला पाहिजे.
रिगाच्या जादुगाराबद्दल वाचून एका महान बुद्धीबळपटूची ओळख झाली. धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2008 - 4:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बुद्धीबळातल्या जादुगाराची ओळख करुन दिल्याबद्दल आपले मनापासून आभार.
रिगाच्या जादूगाराला आमचाही सलाम !!!

'वजीर देखा लेकिन ताल नहीं देखा'अशी होऊन जाई! हे तर फारच सुरेख !!!

-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(वजीर गेल्यावर डाव सोडून देणारा बुद्धीबळपटू)

पिवळा डांबिस's picture

14 May 2008 - 7:34 pm | पिवळा डांबिस

आता,
'दि मॅमथ बुक ऑफ वर्ल्डस ग्रेटेस्ट चेस गेम्स'
मिळवून वाचले पाहिजे.
असे होमवर्क देणारे लेख विरळा...:)

विसोबा खेचर's picture

15 May 2008 - 8:00 am | विसोबा खेचर

असे होमवर्क देणारे लेख विरळा...

हेच म्हणतो...!

माझाही या जादुगाराला मनोमन सलाम...

रंगा, अतिशय सुंदर लेख! घटकाभर बुद्धिबळाच्या त्या अफाट मोहमयी दुनियेत नेऊन सोडलेस, मजा आली! :)

आपला,
(कास्पारावप्रेमी) तात्या.

धनंजय's picture

15 May 2008 - 4:07 am | धनंजय

आवडला.

पुस्तकातल्याच खेळी समजू न शकल्यामुळे मला बुद्धिबळाची भयंकर भीती आहे. त्यामुळे पुस्तकातल्या खेळ्या धुडकावून बेधडक चाल चालणार्‍या या तालास माझा मनापासून सलाम!

मुक्तसुनीत's picture

15 May 2008 - 5:22 am | मुक्तसुनीत

चतुरंग यांनी बुद्धिबळाबद्दल लिहीणे म्हणजे तात्यांनी संगीतावर , धोंडोपंतांनी ज्योतिषावर , संजोपरावांनी जी एंवर , अजानुकर्णाने तुकारामावर लिहिण्यासारखे आहे. हे तो ज्ञात्याचे लिहिणें !

असेच आणखी लेख येऊ द्यात !

मनस्वी's picture

15 May 2008 - 4:14 pm | मनस्वी

अतिशय गुंतागुंतीच्या स्थितीवर तब्बल ४० मिनिटे सखोल विचार करुन शेवटी तालने घोड्याचे बलिदान देणारी अचूक खेळी केली!!

रिगाच्या जादुगाराशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद चतुरंग.

पुस्तकातल्या खेळ्या धुडकावून बेधडक चाल चालणार्‍या या तालास माझा मनापासून सलाम!

लेख छान झाला आहे.

diggi12's picture

4 Oct 2024 - 12:45 am | diggi12

लेख मस्त आहे

नठ्यारा's picture

5 Oct 2024 - 1:55 am | नठ्यारा

लेख वर आणल्याबद्दल आभार! :-)

जादूगाराच्या कर्तृत्वाच्या मानाने लेख फारंच त्रोटक वाटला. की माबुदोस? बुद्धिबळात माझी गती राजासारखी आहे. एक ना धड भाराभार चिंध्या नुसत्या.

-नाठाळ नठ्या

मुक्त विहारि's picture

13 Oct 2024 - 12:13 pm | मुक्त विहारि

आवडला...