नमस्कार मंडळी,
नुकतीच पार पडलेली ज्योतिबाची यात्रा आणि महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात स्त्रियांना मिळालेला प्रवेश..... या निमित्ताने काही फोटूरूपी आठवणी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.
३१ डिसेंबर ......
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण मुंबई नगरी पार्ट्या झोडण्यात आणि नविन वर्षाचे संकल्प करण्यात (की मोडण्यात) दंग होती आणि त्याच वेळेला कोणतीही पूर्वनियोजित तयारी नसताना कोल्हापूरला जाण्यासाठी आम्ही मुंबापुरीचा निरोप घेतला. हेतू इतकाच कि, येणारया नविन वर्षाची सुरुवात एखाद्या पवित्र आणि धार्मिक ठिकाणी जाऊन करावी जेणेकरून येणारे नविन वर्ष(तसे आम्ही आमचे नविन वर्ष गुढी पाडव्यालाच करतो) चांगले जावो. कोल्हापूरची महालक्ष्मी, जोतीबा आणि पन्हाळा गड हि मुख्य ठिकाणे पाहायचीच हे डोक्यात ठेऊन सकाळी ७:३० वाजता कोल्हापुरात उतरलो. इतर कोणत्याही प्रसिद्ध ठिकाणी गेल्यावर नविन आलेला प्रवासी सर्वात आधी पटकावण्याचा रिक्षावाल्यांचा लाळघोटेपणा मला इथेही दिसला. त्यातल्याच एका पायलट कम रिक्षा चालकाला निवडुन मी मंदिरापर्यंत सोडण्याची विनंती केली. होय विनंती हा शब्द यासाठी कि, आम्ही दिलेली आज्ञा त्यांनी शिरसावंद्या न पाळता सरळ सरळ देहूरोडच्या सोमाटणे फाट्यावर मारली. त्याच्याच अव-कृपेने आम्हाला एका हाटील कम वाड्यात आमच्या स्नान व तत्सम प्रातःविधी साठी जागा मिळाली. मंदिराचा रस्ता तेथून जवळ असल्या कारणाने सगळा कार्यभाग उरकून आम्ही पायीच निघालो.
हा आहे भवानी मंडप महालक्ष्मीच्या मंदिरात जाण्यासाठीचा मुख्य दरवाजा..
आत जाणारी रांग शोधेपर्यंत १५ मिनिटे गेली... आणि नंतर आम्हाला कळले आमच्यासारखेच नविन वर्षाची सुरुवात करण्यासाठी फ़क़्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटकातून सुद्धा बरीच मंडळी आली होती.
रांगेत असताना गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला बाप्पाचं दर्शन झालं.
मंदिरात देवीचा फोटो काढण्याची सुविधा नसल्यामुळे दर्शन घेऊन बाहेर आलो.
कळस १
कळस २
मुख्य सभामंडपाच्या दोन्ही बाजूस कोल्हापूरची वैशिष्ठ्ये असलेली चित्रे लावली होती.
दिपमाळ
कोल्हापुरी साज....
हा फोटू टाकण्याचे एकाच कारण कि, हे पाहूनच आमच्या सौभाग्यवतींना त्या दुकानात जायचा मोह आवरला नाही आणि विनाकारण आमच्या खिशाला १००० चा भुर्दंड पडला.
मुख्य रस्त्याला आल्यावर कुठल्याशा शाळेची वृक्षदिंडी चालली होती त्याचबरोबर एका लयीत लेझीम खेळत जाणाऱ्या या मुली पहिल्या आणि थोड्यावेळाकरता आमच्या शाळेतल्या लेझीम पथकाची आठवण झाली.
विठू माझा लेकुरवाळा, संगे संतांचा सोहळा...
याचा उपयोग बरेच मिपाकर एखाद्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी करतात.
तिथल्याच एका छोट्याश्या हातीलाटली कोल्हापुरी मिसळ चापून आम्ही जोतीबाला निघालो.
दख्खनचा राजा, जोतीबा माझा.
तिथून पुढे जास्त वेळ न दवडता एका रिक्षाचालकास( जो स्वतः उत्तम गाइडही होता) आम्ही पूर्ण पन्हाळा फिरून नंतर रंकाळ्याला सोडण्यासाठी नक्की केले. मंडळी, तुम्हास सांगून सुद्धा खोतो वाटेल पण सुरवातीस अतिशय आगाऊ दिसणारा हा रिक्षाचालक नंतर मात्र भलताच प्रामाणिक निघाला.
तीन दरवाजा....
गाइडने सांगितलेल्या माहितीप्रमाणे पन्हाळा गडाच्या तीन दरवाजांपैकी हा एक दरवाजा ज्यातून फ़क़्त ५०/६० मावळ्यांनी शिरून हा गड काबीज केला.
मुख्य दरवाजावरील गणपतीचे चित्र....
गाइडने सांगितलेल्या माहितीप्रमाणे हा गड शिवाजी महाराजांच्याही खूप आधी म्हणजे इ.स ८०० मध्ये एका मुघल राजाने बांधलेला होता आणि सर्वात आश्च्यर्याची गोष्ट म्हणजे त्या तीन दरवाजांपैकी एका दरवाजावर गणपती कोरलेला होता
अंधारबाव....
दोन माजले सोडून खाली तळघरात असणारी ही विहीर त्याकाळी शत्रूंना माहित नसे.
त्याच्याहीमागे एक आख्यायिका आहे पण टंक लेखनाचा कंटाळा आल्यामुळे आता सांगत नाही.
टेहळणी बुरुज....
त्या काळी शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी...
आणि आता तेथील स्थानिक लैला-मजनूंच्या खरडवहीसाठी .
अंबरखाना...
युद्धाच्या वेळी आणि खासकरून पावसाळ्यात धांन्य साठवण्यासाठी...
(जुन्या बीस साल बाद आणि महेश खोटारडेच्या मासूमची शुटींग येथे झाली).
शूरवीर बाजीप्रभू देशपांडे...
*यला हा फोटो घतेवेळी एक येड** सरदारजी त्याच्या १० वर्श्याच्या कार्ट्याला बाजीप्रभूंच्या अगदी बाजूला उभे करुन फोटू काढत व्हत.
एक सणसणीत शिवी द्यावीशी वाटली त्याला...... त्याहीपुढे कहर म्हणून एक बावळट दिसणारी मुलगी बाजीप्रभूंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढत होती..
छत्रपती शिवरायांचे एकमेव मंदिर जे वर्षातून फ़क़्त एकदाच त्यांच्या जयंती दिवशी उघडतात.
नायकिणीचा सज्जा...
वीर शिवा काशीद...
जयसिंग राजा बरोबरच्या तहासाठी यांना प्रती शिवाजी बनून पाठवण्यात आले होते.
पटापट तिथून निघून रंकाळ्याला आलो आणि त्या रिक्षाचालकाचे आभार मानून निघालो.
रंकाळा कोल्हापूरची चौपाटी...
रंकाळा पाहून संध्याकाळी ८:३० वाजता मुंबईच्या परतीच्या वाटेसाठी कोल्हापूर सोडले.
जाता जाता महत्त्वाची गोष्ट नमूद करू इच्छितो कि, ज्या रिक्षाचालकाने पन्हाळ्याचा संपूर्ण इतिहास सांगितला ती एक मुस्लीम व्यक्ती होती आणि तिने पुरांदारेंचे राजा शिवछत्रपती २ वेळा वाचले होते.
श्री. गणपा यांचे विशेष आभार ज्यांच्या मदत पानातील फोटो कसा चढवावा या लेखामुळे खूप मदत झाली.
निरोप घेतो मंडळी....
प्रतिक्रिया
18 Apr 2011 - 6:58 pm | प्रभो
मस्त फोटू..
मिसळीचा फोटू न टाकल्याबद्दल निषेध!!
18 Apr 2011 - 7:07 pm | यशोधरा
मस्त फोटो! कोल्हापूरची सहल घडवल्याबद्दल धन्यवाद :)
18 Apr 2011 - 7:07 pm | गणपा
वारी आवडली.
फोटु ही छान.. टंकायचा कंटाळा कमी करा आणि ती आख्याईका संगा बरं. ;)
बाकी मिसळीचा फटु न टाकल्या बद्दल मंडळ अंमळ आभारी आहे. :)
18 Apr 2011 - 7:24 pm | किसन शिंदे
फोटू टाकणारच होतु, पण कॅमेरा हातात घेऊन फोटू काढण्यापेक्षा पोटपूजा महत्वाची वाटली.
18 Apr 2011 - 7:07 pm | गणेशा
छान व्रुत्तांत ..
पण पन्हाळा हा गड आणि शिवा काशीद यांच्या बद्दलचा इतिहास वेगळा वाटतोय ...
18 Apr 2011 - 7:17 pm | गणेशा
प्रत्येक गडावर गेले की त्याबद्दलचा इतिहास जाणुन घेवुन.. छोटासा आपलाच अनुभव लिहिण्याची सवय असल्याने हे मुद्दे लक्षात आले.. तरीही चुक असल्यास सांगावे ..
आणि फोटो येथे देता येत नसल्याने तेंव्हा असाच एक राहिलेला व्रुतांत येथे देत आहे..
त्यातील इतिहासाची शहानिशा करावी .. (आनि वरील फोटो मध्ये पन्हाळा पहावा)
पन्हाळा .
पन्हाळगडावर जाणारा सुखद हळुवार रस्ता गाडीने कधीच मागे टाकला होता .. हवेतील सुखद गारवा मनामध्ये रोमांच निर्माण करीत अलिंगण देत होता. जणु अनेक वर्षे तो, गडावर येणार्या प्रत्येक मराठी माणसाचे आदरतिथ्य असेच बिलगुन करतो असा भास झाला.
प्रत्येक पावलागणीक इतिहास जींवत करण्याची आपसुक ताकदच पन्हाळ्यावर अस्तित्वात असल्याची जाणीव होत होती .. इतिहासामध्ये कधीच न पाहिलेल्या घटनांच्या, व्यक्तीमत्वांच्या प्रतिमा डोळ्यांसमोर उभ्या राहत होत्या.
शिलाहार वंशीय भोजराज नृसिंह यांनी हा किल्ला ११७८-१२०९ या कालावधीत बांधला, आजही हिरवी लिपी पांघरुन.. गवताच्या हातात हात घेवुन बागडणारा पन्हाळा आपल्या मनात नवनिर्मितीचा उत्साह साठवत आहे असाच भास जाणवत होता.
संभाजी महराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोठी पाहिली की मन कित्येक वर्षे मागे जाते, आणि रुबाबदार .. तेजस्वी राजपुत्राची एक ओझरती प्रतिमा डोळ्यासमोर तरळून जाते.
आजही त्या रुबाबाच्या नशेत वावरणारा तेथील एकनएक कण मराठा साम्राज्याच्या सर्वात तेजस्वी आणि पराक्रमी राजपुत्राची आठवण करुन देताना मन अभिमानाने भरुन येते.
आभाळाच्या उंची ला भेदुन, पराक्रमाची गाथा मातीच्या सुंगंधासहीत पावन करणारे शुर सेनानी बाजीप्रभू यांचा पुर्णाकृतीत असलेल्या पुतळा पाहिला की त्यांचा आवेश म्हणजे स्वामीनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ असणार्या शुर शेनानीची आपल्या कर्तव्याप्रती असणारी भक्ती आणि जीवाची बाजी लावुन राजनिष्ठा म्हनजे काय याची स्वराज्यात कोरली जाणारी ओळख स्पष्ट दिसते.
चेहर्यावरील मर्दानी आवेश पाहुन मन १३ जुलै, इ.स. १६६० मध्ये गेल्या शिवाय राहत नाही ...
अफजलखान या आदिलशहाच्या मुख्य सरदाराचा वध केल्यानंतर २८ नोव्हेंबर १६५९ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला, त्याला प्रत्युत्तर म्हणुन आदिलशहाने, ५०-६० हजार सैन्यानिशी सिद्धी जोहर या आपल्या सरदाराच्या सहाय्याने पन्हाळा ला वेढा घातला. ४ महिने,१० दिवस अडकुन पडल्यानंतर आणि गडावरील अन्न धान्य साठा संपु लागल्या नंतर, राज्यांना तेथुन निसटण्याचे प्रयत्न करावे लागले ..
शिवा काशीद .. एक वीर मावळा, राज्यांच्या वेषात मुख्य दरवाजातुन आपल्या प्राणांची आहुती घेवुन सिद्धी जोहर कडे गेला आणि शिवाजी राजे पश्चीमेकडुन विशालगडाकडे निसटले.
फसगत लक्षात येताच महाराजांना पकडण्यास घोडदळ धावले .. आणि यास रोखुन धरताना प्राण पणाने .. आवेशाने लढुन .. स्वताचे भाउ फुलाजी आणि मराठा मावळे यांच्या वीर मरणानंतरही, राजे विशाळगडावर पोहचेपर्यंत वीर बाजीप्रभु यांनी शत्रु सैनिकांना घोडखिंडीत (पावनखिंड) अडवुन ठेवले. स्वताच्या शरीरातील रक्ताचा एक थेंब असे पर्यंत फक्त राजेंच्या सुखरुप पोहचण्याची वाट पाहताना आपले बलिदान दिलेल्या या शुरवीर योध्यास मनापासुन प्रणाम .
६-७ तास चाललेल्या युद्ध संग्राम, बाजीप्रभुंच्या पुतळ्यातील आवेश पाहुन डोळ्यासमोरुन हालतच नाही, रक्त गरम होत होते.. आता ही छाती अभिमानाने फुलत होती ... समोर दिसणार्या हिरव्यागार दृष्याकडे ही नजर जात नव्हती , नजरेमध्ये तोच आवेश जाणवत होता .. स्वराज्यनिष्ठेचा .
---- गणेशा
18 Apr 2011 - 7:19 pm | किसन शिंदे
क्षमा असावी दादुस,
टंकण्याचा कंटाळा आल्यामुळे सिद्धी जौहर च्या एवजी राजा जयसिंग असे टाकले.
18 Apr 2011 - 7:24 pm | गणेशा
भावा क्षमा कसली मागताय ...
चालायचेच ... बरेच से किल्ले हे शिलाहार राज्याच्या काळात बांधले गेले असावेत असा माझा अंदाज आहे ..
इतिहासाचा तसा माझा काही अभ्यास नाही .. पण वाचणावरुन नक्कीच हा किल्ला मुघलांनी नाही बांधलेला..
18 Apr 2011 - 7:14 pm | किसन शिंदे
दादुस,
वर सांगितल्या प्रमाणे हा सगळा इतिहास त्या गाइडने सांगितला जो तिथलाच स्थानिक होता.
18 Apr 2011 - 7:16 pm | यशोधरा
विहीरीची आख्यायिका सांगा की.
18 Apr 2011 - 7:14 pm | सुहास..
ज ह ब ह रा !!
18 Apr 2011 - 10:12 pm | प्रचेतस
किसनराव. पदार्पणातच मस्त लेख लिहिलात.
गणेशाची सहमत.
पन्हाळा शिलाहार भोज राजांच्या कारकिर्दीत साधारण १२०० वर्षांपूर्वी बांधण्यात आला. तेव्हाचे त्याचे नाव पन्नगालय, पर्णालदुर्ग असे होते. त्यामुळे गणपती कोरलाय यात काहीच आश्चर्य नाही.
भोजराजांनी याचबरोबर वाईजवळील पांडवगड, कमळगड, वैराटगड इत्यादी दुर्गांची निर्मितीही केली तसेच अनेकानेक उत्तमोत्तम शिवमंदिरेही बांधली.
रंकाळ्याचे स्वच्छ सुंदर रूप पाहून एकदम प्रसन्न वाटले.
18 Apr 2011 - 8:15 pm | प्राजु
झक्कास फोटू!
18 Apr 2011 - 10:04 pm | ५० फक्त
छान फोटो व माहिती, विशेषतः पन्हाळ्याची, मी पण फारसा फिरलेलो नाही गड किल्यांवर.
फक्त एक दुरुस्ती सुचवु इच्छितो, श्री श्री शिवरायांचे हे एकमेव मंदिर नसावे, कारण सिंधुदुर्ग किल्यात श्री. राजाराम महाराजांनी एक मंदिर बांधलेले आहे, जे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. त्या मंदिरात एक प्रचंड तलवार आहे. जिथं जाउन अंगात काहीतरी संचारावं अशी माझ्या साठीची दोनच ठिकाणं एक तुळजाभवानीचं मंदिर आणि दुसरं हे सिंधुदुर्गावरचं श्री श्री शिवरायांचं मंदिर.
बाकी लेख उत्तमच.
19 Apr 2011 - 10:05 am | किसन शिंदे
हर्षद राव,
शिवरायांची मंदिरे अजूनही असावीत पण वर्षातून फ़क़्त एकदाच त्यांच्या जयंतीला उघडणारे हे एकमेव मंदिर असावे.
19 Apr 2011 - 2:13 am | शिल्पा ब
फोटो अन लेख दोन्ही छान.
बाजीप्रभूंचा पुतळा भन्नाट आहे.
राजांचे मंदिर उभारण्याचे कारण समजले नाही...काहीही झाले तरी त्यांचे नाव पुसले जाणे शक्य नाही. त्यांचे मंदिर असणे खुद्द राजांनाही मान्य झाले नसते असे वाटते.
अवांतरः कोल्हापूरला मी फक्त काही तासच होते...मंदिर पहिले, चपला घेतल्या अन छानसे अस्सल कोल्हापुरी जेवण कुठे मिळेल म्हणून चप्पलवाल्यालाच विचारले तर त्याने एका गेस्ट हावुस बद्दल सांगितले आणि तिथे गेलो...मसालेदार, तिखट वगैरे काही नसून साधेच पण छान जेवण होते. असो, आता पुढच्या वेळी मिपाकरांचा सल्ला घेईन. :)
19 Apr 2011 - 3:50 am | अन्या दातार
फोटू मस्तच आहेत सगळे. विशेषतः रंकाळ्याचे तर अतिप्रिय! (अजुनही जेंव्हा मी कोल्हापुरला जातो तेंव्हा रंकाळा हा माझ्यासाठी गविंच्या लेखातला पटवर्धन पूल असतो!)
>>रांगेत असताना गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला बाप्पाचं दर्शन झालं.
त्याला साक्षी गणपती असे म्हणतात.
मिसळीचा फोटू टाकला नाहित यासाठी मीही गणपाशेठप्रमाणे आभारी आहे. (मिसळ कुठे खाल्लीत?? हाटेलाचे नाव सांगा)
गिर्हाईक मिळवण्यासाठी रिक्षावाल्यांचा लोचटपणा प्रत्येक शहरात्/गावात दिसून येतो; पण कोल्हापुरातील समस्त रिक्षावाले हे अत्यंत प्रामाणिक आहेत असे दिसून आले आहे.
कोल्हापुरी बाबूमोशाय,
अन्या
19 Apr 2011 - 10:12 am | किसन शिंदे
बाबूमोशाय,
तसे कोल्हापुरात कोणत्याही लहानशा टपरीतली व हाटिलातली मिसळ हि चागलीच असते. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोल्हापूरला मुख्य स्थानकावर सह्याद्री नावाचे हॉटेल आहे तिथली मिसळ मला पेश्शल वाटली.
19 Apr 2011 - 1:56 pm | अन्या दातार
चवीसाठी महालक्ष्मी मंदिराजवळच बुचडे यांचे खासबाग हॉटेल आहे. तिथली मिसळ मस्त झणझणीत तिखट असते.
थोडी कमी तिखट मिसळ हवी असल्यास चोरगे यांची मिसळ तसेच हॉटेल करवीर येथील मिसळ; अशी काही बेंचमार्क ठिकाणे आहेत.
पुढच्या वेळेस यातील काही ठिकाणे ट्राय करा. सगळ्यात भारी मिसळ खायची असेल तर थोडा जास्त वेळ बाजूला काढा आणि फडतरेची मिसळ खा.
19 Apr 2011 - 10:25 am | अमोल केळकर
सुंदर फोटो, कोल्हापूर वारी घडवल्याबद्दल धन्यवाद
अमोल केळकर
19 Apr 2011 - 11:30 am | विसुनाना
लेख आवडला. बर्याच वर्षात जोतिबा-पन्हाळ्याला गेलो नाही. आता पुन्हा जावे लागणार.
पण पहिलाच फोटो महाद्वाराऐवजी भवानी मंडप म्हणून टाकलात.
शिंदेसाहेब, भवानी मंडप ही वेगळी वास्तू आहे. तिचा महालक्ष्मी मंदिराशी दोनतीनशे मिटर अंतराचा संबंध आहे.
या फोटोत महाद्वार आहे - (ज्याच्यावरून लै फेमस महाद्वार रोड या जगतास लाभला.)
(भारताचे प्रथम ऑलिंपिक कांस्यपदक विजेते कुस्तीगीर) खाशाबा जाधवांचा पुतळा पाहिला नाहीत काय?
बाकी पन्हाळा मोंगलांनी किंवा शाह्यांनी बांधलेला नाही. शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत तो बांधला गेला असे विकीपेडियावरून दिसते. त्यामुळे 'तीन दरवाजांपैकी एका दरवाजावर गणपती कोरलेला होता' यावर आश्चर्य नको.
19 Apr 2011 - 11:38 am | किसन शिंदे
नाना,
कोणतीही पूर्व नियोजित तयारी आणि माहिती नसताना पहिल्यांदाच कोल्हापूरला गेलो होतो त्यामुळे भवानी मंडप कि महाद्वार याचा गोंधळ उडाला.
19 Apr 2011 - 1:45 pm | किसन शिंदे
मला वाटते जाणकार मिपाकारंची मदत घ्यायला हवी होती. :(
19 Apr 2011 - 1:49 pm | पक्का इडियट
जबरा !!!
19 Apr 2011 - 3:50 pm | नरेशकुमार
काय बोलनार, निशब्द केले भावा !
इतिहास डोळ्यासमोरुन तरळुन गेला.
धन्य ती लोकं, धन्य ते दिवस.
भाग्यवान आहात अश्या लोकांच्या ठिकानी आपन जाउन आलात.
जय भवानी, जय शिवाजी.
जय दुर्गे माते, जय लक्ष्मी माता. हर हर महादेव.
19 Apr 2011 - 5:06 pm | पाषाणभेद
लय भारी हाय बग रं फटू किस्ना तुझ्यावाले.
20 Apr 2011 - 9:30 am | स्पंदना
बरीच माहिती विस्कळीत आहे भावा.
वाईट नको वाटुन घेउ पण कोल्हापुरकरीन आहे मी.
नायकिणीचा सज्जा इतका पडझड झाला? वाईट वाटल.
जोतिबाच दर्शन दिल्याबद्दल धन्स.
पन्हाळा बघायचा तर तुम्हाला कोल्हापुरात चांगले गाईड मिळतील. तुम्ही इंन्द्राज वा विनायक पाचलग यांना विचारुन जायच ना, काय आहे तुम्ही उतरल्यावर तुमचा बकरा कापायला कोणीही तयार असत, पण पुर्व नियोजन खुप माहिती अन समाधन कारक असत. तुम्ही बघितलात ते १/१० ही कोल्हापुर नव्हे भावा. अन किल्ल्याबद्दल जी माहिती रिक्षा चालकान दिली आहे ती पुर्णतः खोटी आहे. आता अश्या वेळी तो कोण होता हे जर मी उद्धृत केल तर ....नकोच ते. तुम्ही चुकिच्या माणसाच्या हातात पडलात.
ज्या बुरुजा वरुन संभाजी राजे उडी मारुन पळाले ती जागा, तबक उद्यान, या जागा राहुन्च गेल्या.
20 Apr 2011 - 9:39 am | किसन शिंदे
होय अपर्णा तै,
वर सांगितल्याप्रमाणे जाणकार मिपाकारंची मदत घ्यायला हवी होती. :(