स्वित्झ्रलंड-स्वप्नांच्या देशात भाग -१

जातीवंत भटका's picture
जातीवंत भटका in कलादालन
28 Mar 2011 - 6:47 pm

स्वित्झ्रलंड-स्वप्नांच्या देशात भाग -१

झर्मित-मॅटरहॉर्न : जगातील सर्वोच्च ग्लेशियर पॅलेस

जिनिव्हा मधे येऊन आठवडा होत आला होता तरी माझ्या कॅमेर्‍यामधे एक सुध्दा फोटो नव्हता. ऑफिसच्या कामामुळे स्टुडीओबाहेर पडायला पण वेळ मिळत नव्हता. शुक्रवारी सकाळी मी आणि माझ्याच बरोबर युनायटेड नेशन्स साठी काम करणारा कोल्हापूरचा प्रशांत सुर्यवंशी आम्ही दोघांनी शनिवारी झर्मितला जाण्याचा बेत आखला. सकाळी ६.१५ ची जिनिव्हा-ब्रिग रेल्वे पकडायची होती. पहाटे ४ ला उठून मी थोडे सॅन्डविच करून घेतले आणि सटर-फटर खाण्यासाठी खाकरे, सफरचंद बॅगेत कोंबले. ट्राम पकडून गिनिव्हा रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वेला यायला थोडा वेळ होता तोपर्यंत कॅमेर्‍याला थोडा वॉर्मअप दिला.

रेल्वे जिनिव्हा लेकच्या काठाकाठाने निघाली होती. सुर्यनारायणाने अजून आपलं डोकं ढगांच्या दुलईतून बाहेर काढले नव्हते. तळ्याच्या काठावरील आल्पसचे छोटे भाऊबंद आपले लोभस रुपडं त्या तळ्याच्या चंचल आरश्यात न्याहाळीत बसले होते. एखाद्या निसर्गवेडया चित्रकाराने रेखाटलेला कॅनव्हास समोर ठेवावा असा भास त्यावेळेस होत होता. तो लेक मला थोडा गूढ वाटत होता. कोणास ठावूक कित्येक रहस्यांना आपल्या उदरात घेऊन बसला होता.

नियॉन, मॉर्गेस अशी स्टेशनं मागे सोडत गाडी ल्युसेन ला आली. स्युसेन हे जिनिव्हा जवळचे महत्वाचे जंक्शन आहे. नंतर आहे मॉन्थ्रेक्स (ज्याचा उच्चार स्थानिक लोक "माँथेयू" असा करतात.) इथे चिलॉनचा प्रसिद्ध कॅसेल आहे. त्याबद्दल सविस्तर लिहीन (अर्थातच, भेट देणे जमले तर !!). वाटेत बरेचसे डोंगर आपापल्या डोक्यावर बर्फाचं पागोटं नेसून आमच्याकडे पहात पहुडले होते.

बरीच स्टेशन गेल्यावर व्हीस्प या जंक्शनवर उतरलो. ९.०० वाजले होते. थंडीचा कडाका कायम होता. उतरल्या उतरल्या मी हातमोजे आणि कानटोपी चढवली. इथूनच व्हिस्प-झर्मित ही आल्पसच्या डोंगररांगांमधून जाणारी ग्लेशियर एक्सप्रेस पकडता येते. स्वित्झ्रलंडमधल्या "मोस्ट सिनिक रुट्स" वर आता आम्ही प्रवास करणार होतो. थोडं वर येताच रात्री पडलेल्या शुभ्र बर्फाची चादर ओढलेल्या वस्त्या दिसू लागल्या. रस्ता वळणदार होता. वळताना मधेच ट्रेनचा पुढचा भाग दिसत होता. तासाभराच्या प्रेक्षणीय प्रवासानंतर आम्ही झर्मितमधे येऊन ठेपलो.

झर्मित- स्वित्झ्रलंडच्या पश्चिमेकडे, इटलीच्या सीमारेषेजवळ, जगप्रसिध्द आल्पस् पर्वतराजीमधील हिल-स्टेशन आहे. मॅटरहॉर्न शिखराच्या पायथ्याशी हे टुमदार गाव वसले आहे. या गावासभोवती आल्पस पर्वतरांगेतील ४००० मीटर उंचीपेक्षा जास्त असलेली एक तृतियांश शिखरे एकवटली आहेत. ४४७८ मीटर उंच असलेलया मॅटरहॉर्न शिखरावर सर्वात पहिली यशस्वी चढाई १४ जुलै १८६५ मधे एडवर्ड वॅम्पर याच्या नेतृत्वाखाली केली गेली. त्यानंतर लाखो पर्यटकांनी येथे हजेरी लावली आहे. त्या यादी आम्ही दोन भारतीय पामरांनी आपली नावे लावली. :) आल्पस पर्वतरांगांमधील सर्वोच्च स्की-रिसॉर्ट येथे आहे. नुसताच सर्वोच्च नाही तर ते सर्वात अत्याधुनिक आणि विकसित रिसॉर्ट आहे. वर्षांचे ३६५ दिवस सुरू असणार्‍या या रिसॉर्टवर ३०० दिवस स्वच्छ सुर्यप्रकाश असतो. स्वित्झ्रलंडमधे सगळ्यात कमी पाऊस इकडे पडतो. झर्मित मधे हवामान अतिशय थंड पण स्वच्छ, कोरडे आणि प्रदूषण मुक्त आहे कारण येथिल प्रशासनाने इथे १९४७ पासून फक्त विजेवर चालणार्‍या गाड्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे इथे बाहेरील जगासाठी रेल्वे हाच सोयीचा मार्ग होतो. प्रशासनाने शिखरासमोरील ३८७३ मीटर (१२,७४० फूट) उंचावरील ग्लेशियर पर्यंत केबल-कार (रोप-वे) केला आहे. याच ठिकाणी ग्लेशियरच्या आत खोदाई करून तिथे जगातील सर्वोच्च ग्लेशियर पॅलेस वसविला आहे.

झर्मितमधे पोहोचल्यावर लगेचच माऊंट मॅटरहॉर्नचे दर्शन होते. थोडी खाण्या-पिण्याच्या(अर्थातच पाणी) गोष्टींची खरेदी उरकली आणि साधारण १ किमी असलेल्या मॅटरहॉर्न केबलकार बेस स्टेशनकडे चालते झालो.

गावातून चालत जाताना बरीच लाकडी घरे लक्ष वेधून घेत होती. गावातील चर्च जवळ उंच घड्याळाचा टॉवर आहे. रस्त्यांत अनेक जागतीक दर्जाची हॉटेल आहेत. त्यांच्या आलीशान पण जुन्या धाटणीच्या इमारतींमधून पुढे जात बेस स्टेशनवर पोहोचलो. इथे न्याहारी करून टिकीटाच्या रांगेत जाऊन थांबलो.

इथे आमच्या सारख्या पर्यटकांपेक्षा स्कीइंगसाठी येणार्‍यांची संख्याच लक्षणीय होती. तिथे स्कीइंग साठी सज्ज असलेली ६-१० वयोगटातील लहान मुले पाहून तर मला स्वता:ची प्रचंड लाज वाटली. पण कंपनीच्या कामासाठी या देशात आलो आहे हे विसरून चालणार नव्हते. हात पाय मोडला असता तर फार महागात पडला असतं. (मला नाही, कंपनीला... ) स्किइंगचा मोह मोठ्या प्रयासाने टाळून टिकीट खिडकीकडे सरकलो. इथे स्कीइंगसाठी लागणारी सगळी साधनं भाडेतत्वावर मिळतात. तिकीट घेऊन आम्ही केबलकार मधे बसलो.

जसजसे वर सरकत होतो तसतसे थंडी वाढत होती आणि बाहेरचं सौंदर्य अधिकाधिक खुलत होतं. बर्फाळ डोंगरांवरून आम्ही वरवर सरकत होतो. खाली त्या बर्फावर अनेक लोक आपापलं कौशल्य पणाला लावून स्कीइंग करत होते.

३-४ सब-स्टशन पार करून आम्ही एका ठराविक ठिकाणी पोहोचलो जिथे आम्हाला रोप-वे बदलावा लागणार होता इथेपर्यंत आम्ही ६ लोकं बसतील अशा रोप-वे मधून प्रवास केला होता ज्याचे सुमारे १०० स्वयंचलित डब्बे एकामागे एक अविरत सुरु होते. आताचा रोप-वेचा शेवटचा टप्पा होता. उंची प्रचंड होती आणि पाळणाही तितकाच मजबूत आणि मोठ्ठा होता. ४५ लोक आपापल्या स्की-स्नो-बोर्ड सोबत मावतील इतका मोठ्ठा !!

वाढत जाणार्‍या उंचीसोबत कानावर दाब पडत होता. हळू हळू वर सरकणार्‍या पाळण्यासोबत उत्कंठताही वाढत होती. अखेरीस एका तासात आम्ही गावातून १६२० मीटर उंचीवरून ३८८३ मीटर उंचीवर आलो होतो. वातावरणात प्रचंड गारवा होता तापमानाचा पारा शुन्याच्या खाली होता. बोलताना तोंडातून वाफा बाहेर पडत होत्या. मला थोडा श्वास घ्यायला अडचण वाटत होती. समोर एक बोगदा होता जो आपल्याला त्या ३८८३ मीटर उंचीवरील हॉटेल कडे आणि स्नो-पॅलेस कडे घेऊन जातो. बोगद्यातून बाहेर पडल्यावर समोर दिसला एकसंध बर्फ !!!

बाहेर मस्त ऊन पडलं होतं तिथे थोडं थांबून तिथलं निसर्गसौंदर्य बरंचसं कॅमेर्‍यात आणि थोडं डोळ्यात भरून लिफ्ट मधे शिरलो कारण बर्फावर परावर्तीत होणार्‍या प्रकाशाचा डोळ्यांस त्रास होत होता. लिफ्टने एक मजला खाली आलो इथूनच त्या ग्लेशियरच्या अंतर्गत भागात खोदलेल्या स्नो-पॅलेस कडे जायची वाट होती. त्या बर्फाच्या गुहेत शिरताना कसलीतरी अनामिक भीती मनात डोकाऊन गेली. आत शिरताच तापमान एकदम कमी झाले.

तळात पोहोचलो तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. पहिल्या बर्फाच्या खोलीत भगवान बुध्दाचा बर्फाचा पुतळा होता. त्याचे फोटो काढून पुढे सरकलो. नाना-प्रकारची शिल्पे तिथे बर्फात कोरलेली होती. त्या जागेची माहीती सांगणार्‍या पाटी जवळ बसून फोटो काढून परतीच्या मार्गाला लागलो.

तिथे जास्त वेळ थांबण्यात काही शहाणपणा नव्हता, कारण तापमान उणे २० अंशाच्या खाली होते. वर येऊन हॉटेलमधे मस्त गरमा गरम कपुचिनो ढोसली. आणि परत बाहेर जाऊन थोडे फोटो काढले. दुपारचे २ वाजत आले होते.काही फारच टुक्कार फोटो काढून आम्ही तिथून काढता पाय घेतला.

येताना मला रोप-वे मधून स्नो-बोर्डींग आणि स्कीइंग करणार्‍यांचे फोटो काढायचे होते म्हणून कॅमेर्‍यावर वाईड अ‍ॅगल काढून टेलीफोटो लेन्स चढवली. बरेचसे फोटो काढल्यावर २-३ मनासारखे फोटो मिळाले. खाली पोहोचता पोहोचता ३.०० वाजले होते. अजून घरी निघायला अवधी होता म्हणून आम्ही जवळच्याच पण तुलनेने कमी उंची असलेल्या सनेगा पॅरेडाईजला जायचे ठरवले.

सनेगा पॅरेडाईज झर्मित (१६२० मीटर) पासून साधारण ६५० मीटरवर (२२८८ मीटर) आहे. इथून मॅटरहॉर्नचे मनोहारी दर्शन होते. सनेगा पॅरेडाईजला जाण्यासाठी एक भुयारी ट्राम आहे आणि ही ट्राम जमीनीपासून ७० अंशाच्या कोनात सरळ वर सनेगा पॅरेडाईजला जाते. ते पाहून सुरुवातीलाच पोटात गोळा आला होता.

सनेगा पॅरेडाईजला हौशी व नवशिक्या स्की-धारकांसाठी खास सोय आहे. अगदी कमी उताराची बर्फाचं मैदान आहे. थोडंसं खाली उतरलं की एक मानवनिर्मित तलाव आहे. तो सगळा गोठला होता. उन्हाळ्यात या तलावात मॅटरहॉर्नचे प्रतिबिंब फारच छान दिसते. ही मोलाची माहीती तिथल्या एकमेव सेल्फ्-सर्व्हिस बार मधून बियर घेताना मि़ळाली. तिथे बर्फात थोडे फोटो काढून परतीची वाट धरली. ५.१३ ची झर्मित-व्हिस्प एक्सप्रेस आणि व्हिस्प वरुन ६.३६ ची जिनिव्हा ट्रेन पकडून घरी.

स्वित्झ्रलंड मधली पहिलीच ट्रीप मनोसोक्त आनंद देऊन गेली होती... आता वाट पहातो आहे पुढच्या विकेंडची ....

--
जातीवंत भटका ...

प्रवास

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Mar 2011 - 6:52 pm | बिपिन कार्यकर्ते

वाटच बघत होतो. :)

फोटो आवडले. आता पुढच्या विकेंडची नाही पण सोमवारची वाट आम्ही पण बघतो आहोत. :)

पैसा's picture

28 Mar 2011 - 7:36 pm | पैसा

फोटो आणि वर्णन झक्कास!

लंबूटांग's picture

28 Mar 2011 - 7:46 pm | लंबूटांग

मस्त फोटू आणि वर्णन.

बाकी skiing इतकेही धोकादायक नाहीये. नवशिक्यांच्या trail वर तर फारच कमी शक्यता असते मोडण्याची. मी देखील ह्या हिवाळ्यात प्रथमच skiing करायला गेलो होतो. बर्‍यापैकी धडपडलो पण प्रचंड धमाल आली. आणि कुठेही मोडलो नाही. (नंतर पार्श्वभाग दुखत असल्याने पूर्ण विकेंड झोपून काढला तो भाग अलाहिदा).

-(धडपड्या) लंबूटांग

२००९ चा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आठवला.त्यावेळेस मीही कंपनी कामानिमित्त स्विस ला होतो पण काही कारणास्तव आल्प्स वर नाही जावू शकलो. फक्त डोमेस्टिक फ्लाइट मधून जेवढे दर्शन झाले तितके समाधान मानले.
आज तुम्ही दिलेले फोटो पाहून कसर भरून निघाली.

प्राजु's picture

28 Mar 2011 - 8:30 pm | प्राजु

तुफ्फान फोटो!!! तोडातून एकदम.. हाईल्ल्ल्ला!! असच आलं. :)

जातीवंत भटका's picture

28 Mar 2011 - 8:44 pm | जातीवंत भटका

झक्कास आले आहेत रे फोटो .... मी नेमका रात्री उडालो तिकडे त्यामुळे पहाता नाही आले.. पाहू आता एखादी डोमेस्टीक ट्रीप मारतो दिवसा.... मला असे वरून पहायचे आहेत आल्पस...

दोन्ही वेळेस दिवसा प्रवास केल्याने मनसोक्त अल्प्स्चे दर्शन घेतले. झुरिक ते लुगानो आणि जाताना लुगानो ते झुरिक.अजून बरेच फोटो काढलेत जमल्यास नंतर चढवीन इथे.
पण तुम्ही काढलेले फोटो खूपच सुरेख.
जर शनी रवी सुट्टी असेल तर प्यारीस सफर हि करू शकता. शुक्र रात्री प्रवास करून शनी सकाळी प्यारीस मग रवी रात्री परत स्विस.

प्रास's picture

29 Mar 2011 - 10:51 am | प्रास

इरसालराव,

फोटो एकदम सॉलिड....!

इरसाल's picture

29 Mar 2011 - 2:41 pm | इरसाल

@ प्रास धन्यवाद

प्राजु's picture

28 Mar 2011 - 8:28 pm | प्राजु

सॉल्लिड आहेत सगळेच फोटो. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Mar 2011 - 8:30 pm | निनाद मुक्काम प...

भन्नाट फोटो .
सुंदर लेखन
अवांतर - एप्रिल महिन्यात ४ दिवस सुट्टी आहे ..तेव्हा आमच्या शहराच्या काही अंतरावरून असलेल्या ह्या रम्य देशी जाण्याचा बेत आहे .
( येथे सचित्र अप्रतिम प्रवास वर्णन मिपाकरांना झाल्याने माझा ह्या देशावरील आख्यानाचे काही भाग लिहीण्याचे परिश्रम वाचले .)
काही मिपाकर सुटकेचा निश्वास टाकतील .
पु ले शु .
२२ एप्रिलच्या प्रतीक्षेत मुक्काम पोस्ट .

जातीवंत भटका's picture

28 Mar 2011 - 8:41 pm | जातीवंत भटका

कुठे असता आपण ??
इस्टर ची सुट्टी असेल ना ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Mar 2011 - 8:51 pm | निनाद मुक्काम प...

होय शुक्रवार ते सोमवार
मी म्युनिक ला असतो .
विमानतळापासून अर्ध्या तासावर राहतो .
तुम्हाला जमल्यास भेटू

वपाडाव's picture

29 Mar 2011 - 11:48 am | वपाडाव

कुठे असता आपण ??
ते ही मु.पो. ना

जा. भ. हा प्रश्न विचारण्याची हिम्मत कशी -काय झाली तुमची?
काय हो असता कुठे तुम्ही (जा. भ.)? (जगात कुठेही असा फरक पडत नाही. जरा मिपावर आणी भानावर या.)
फुल्ल ह. घ्या.

-(मिपावरच उंडारत हिंडणारा )
सध्या इनो/जेलुसिल हवंय

गणपा's picture

28 Mar 2011 - 8:53 pm | गणपा

घर बसल्या मेजवानी. :)

प्राजक्ता पवार's picture

28 Mar 2011 - 9:57 pm | प्राजक्ता पवार

मस्तं वर्णन व अप्रतिम फोटो :)

५० फक्त's picture

28 Mar 2011 - 10:44 pm | ५० फक्त

लई भारी फोटो, वाईड अँगल लेन्सने काढलेले अजुन काही फोटो टाका जमल्यास.

प्रचेतस's picture

28 Mar 2011 - 10:58 pm | प्रचेतस

तुमचा हेवा वाटतोय.
आम्ही आल्पस काय आमचा साधा हिमालयही पाहिला नाही अजून.
सध्यातरी सह्याद्रीतच रमतोय.

जातीवंत भटका's picture

29 Mar 2011 - 1:13 am | जातीवंत भटका

अरे मित्रा सह्याद्रीच खरा ... आणि सह्याद्रीच बरा ... मायबाप आहे रे आपला ....
मी पण सह्याद्रीतच जास्त रमतो ... आता इथंपर्यंत आलोच आहे तर पाहून येऊ या हिशोबाने पाहुन घेतो आहे सगळं
आपल्या काय पायाला साली भिंगरी आहे बघ. विकेंड आला की घरी बसणं म्हणजे सजा असते आपल्याला....:)

शिल्पा ब's picture

29 Mar 2011 - 12:36 am | शिल्पा ब

लेख आणि फोटो दोन्ही छान.

अभिज्ञ's picture

29 Mar 2011 - 5:48 am | अभिज्ञ

फोटो पाहून शब्दच संपले...

मस्तच.

अजून येउ द्यात.

अभि़ज्ञ.

भडकमकर मास्तर's picture

30 Mar 2011 - 2:22 am | भडकमकर मास्तर

सहमत...
शब्द संपले...
असेच अजून लेख फोटो येउद्या...

sneharani's picture

29 Mar 2011 - 10:30 am | sneharani

सुंदर फोटो! मस्तच!!

वर्णन अन फोटो सारच सुन्दर.

वर इरसाल यांनी टाकलेले विमानातुन काढलेले फोटो बघुन कोल्हापुरी जीभ नक्को ते म्हणायला वळवळली इतके सुन्दर आहेत ते फोटोज ही.

इरसाल's picture

29 Mar 2011 - 2:42 pm | इरसाल

@ अपर्णा धन्यवाद

प्रास's picture

29 Mar 2011 - 10:49 am | प्रास

या जातीवंत भटक्याच्या भ्रमंतीने पार वेडं केलं बुवा!

वर हर्षदरावांनी म्हण्टल्याप्रमाणे आम्हाला आता पुढच्या सोमवारची वाट बघणं आवश्यक आहे.

उतम छायाचित्रे + व्यवस्थित लिखाण = जातीवंत भटक्याचे वृत्तांत.

हरिप्रिया_'s picture

29 Mar 2011 - 12:15 pm | हरिप्रिया_

सहि....

अप्रतिम फोटो .. अप्रतिम सफर ..

इरसाल यांचे फोटो पण आवडले ..

---

असेच फिरत रहा .. लिहित रहा..कधीतरी त्या वाटेवर आमची पाउले उमटतेल अशी आशा !

क्रान्ति's picture

29 Mar 2011 - 11:13 pm | क्रान्ति

अवर्णनीय!

मस्त फोटू आणि वर्णन!
इरसाल यांनी चढवलेले फोटूही छान आहेत.
आपली वर्णनशैली पाहून स्वातीताईच्या लेखांची आठवण झाली.
अगदी साध्या शब्दात गोष्टीसारखं..... छानच वाटलं.

दीविरा's picture

30 Mar 2011 - 6:55 pm | दीविरा

फोटो आणि माहिती दोन्ही छान :)

मजा आली

विलासराव's picture

31 Mar 2011 - 11:29 pm | विलासराव

फोटो आनी बहारदार लेखन.
आयुष्यात एकदा तरी जायचा विचार आहे स्वीस ला.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Apr 2011 - 2:29 pm | परिकथेतील राजकुमार

आ हा हा हा !

जावईबाप्पु लै भारी हो ;)

<सदाशिवपेठ मोड> आता बरा वेळ मिळाला हे सगळे लिहायला ? < / सदाशिवपेठ मोड > ;)

सुंदर फटू आणि तेवढेच सुंदर वर्णन. मजा आला.

अवांतर - एप्रिल महिन्यात ४ दिवस सुट्टी आहे ..तेव्हा आमच्या घराच्या काही अंतरावरून असलेल्या प्यासा ह्या रम्य देशी बार मध्ये जाण्याचा बेत आहे .

मराठमोळा's picture

1 Apr 2011 - 2:38 pm | मराठमोळा

एवढेच म्हणेन की फार नशिबवान आहात. :)
फोटो फारच सुंदर...