मन माझे जणू एक फुलपाखरूच होते..,
असंख्य फुलांमधुनी..ते आपला मार्ग काढीतं होते ।
इतक्यात त्यातले एकच फ़ूल का.. त्यास इतके आवडिले,
की त्या फुलावरी जाउनी मग ते.. विराजमान झाले ।
घेता गंध चाखता मध.. त्यास ते अपुलेसे वाटिले,
आता विसावे इथेच आपण.. हे स्वप्न त्याने पाहिले ।
इतक्यात कुणीतरी येउनी फ़ूल ते.. तोडूनिया नेले,
विसाविले पाखरू क्षणी त्या.. धरतीवर पडले ।
खाली पडता असे अचानक.. स्वप्न सारेते मोडूनी गेले,
भान येता मग कळले त्यास.. फ़ूल आपुलेते कधीच नव्हते ।
हे सारे कळल्या वर मगते.. सैरा-वैरा उडू लागले,
फुटल्या वाटी जाउनी तेथे.. त्याच फुलास ते शोधू लागले ।
वणवण फिरले शोधूनी थकले.. हताश होवोनी माघारी फिरले,
फिरता मागे सोबत अपुल्या ते.. आठवणींना घेउनी आले ।
आठवणी त्या सुखद क्षणांच्या.. जिवापाड ते जपू लागले,
देउनी बगल मग वास्तवास ते.. गेल्या क्षणांतच जगू लागले ।
ह्या साऱ्यातुनी हेच उमगले.. फुलावरी लाउनी जीव ते चुकले,
जाता-जाता अखेर फ़ूल ते.. पाखराचा... जीवच घेउनी गेले... ।
हर्षद अ प्रभुदेसाई....
प्रतिक्रिया
27 Mar 2011 - 9:44 pm | pramanik
घेता गंध चाखता मध
वा वा हे जाम कालजाला लागले.
27 Mar 2011 - 9:58 pm | काव्यवेडी
व्वा !!! सुन्दर कविता !!
फूल आपुले कधीच नव्हते .................वेळीच कळले म्हणायचे !!!!!!!!!!!!!!!
28 Mar 2011 - 1:10 pm | कच्ची कैरी
साध्या सोप्या भाषेत आणि तरीही इतक्या सुंदरतेने कविता मांडली व्वा मस्तच !
28 Mar 2011 - 4:43 pm | गणेशा
फुलपाखरातुन प्रियकराची विरह व्यक्तीरेखा खुपच भिडणारा वाटला
29 Mar 2011 - 7:01 am | मदनबाण
छान...