आयुष्याची दोरी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
15 Mar 2011 - 6:11 pm

आयुष्याची दोरी

हे सजीवसंख्येचे नियमन करणार्‍या मृत्यो,
कधीही, कुठेही आणि कसेही
आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे
तुझे अधिकार मान्य आहेत मला
पण सन्मानाने मरण्याचे अधिकार
मलाही असावेत की नाही?
हे “जीवन” तुझे असले तरी
“मी” तर “माझा” आहे ना?
तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी
मी मात्र उरणारच आहे. आणि म्हणून...
माझी तुझ्याबद्दल तक्रार नसली तरी
एक छोटीशी नाराजी आहे
आयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण...
पण असा देहाला का छाटतोस रे?
तुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे?
कधी चिंध्या, कधी लगदा,
कधी खाद्य मासोळ्यांचे
आणि कधीकधी तर आरपार
उमटतात छेद गोळ्यांचे
थांबायला नकोत काय हे
प्रताप तुझ्या सापळ्यांचे??
हे ऐकून
मृत्यू थोडा भांबावला
मग हळूच हसून म्हणाला
“ही तुझी तक्रार की कांगावा?
प्रथम विचार कर की
सल्ला कुणी कोणास सांगावा?
अरे! कृती तुम्ही करता
आणि विकृती माझी म्हणता?
“एक्सलेटर” दाबण्याआधी “ब्रेक” मारणे शिका
वेगासोबतची थांबवा फालतू अहमिका
ज्याचे हक्क त्याला द्यावे, लूट थांबायला हवी
नाहीतर अटळ आहे संघर्ष व यादवी
स्वावलंबी झाडावर बहरल्यात परावलंबी वेली
परावलंबीने स्वावलंबीची काय गत केली?
सभ्यतेची उत्क्रांती दिशाहीन गेली
म्हणूनच मी आता शस्त्रंपालट केली
अरे माणूस म्हणून जन्मलात
तर माणसावाणी वागा
जरा तरी फुलवून पाहा
सौजन्याच्या बागा......!! ”

गंगाधर मुटे
...........................................

कविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

15 Mar 2011 - 8:42 pm | प्रकाश१११

गंगाधर मुटेजी
आयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण...
पण असा देहाला का छाटतोस रे?
तुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे?
कधी चिंध्या, कधी लगदा,
कधी खाद्य मासोळ्यांचे
छान .आवडले

कविता खुपच आवडली .. पहिल्या काही ओळी वाचुन असे वाटले होते "मी मरण .. एक भीती" अशी कविता मरण बोलते आहे या आशयाने द्यावी का ?
तितक्यात तुम्हीच पुढे लिहिले तसे .. म्हणुन जास्त आवडली कविता ...

कवितेमागचे विचार खरेच विचार करण्यास लावणारे आहे ..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Mar 2011 - 12:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कवितेमागचे विचार खरेच विचार करण्यास लावणारे आहे

+१

स्वानन्द's picture

15 Mar 2011 - 10:58 pm | स्वानन्द

गंगाधर साहेब, मस्तच!!

ज्ञानराम's picture

16 Mar 2011 - 12:20 pm | ज्ञानराम

अप्रतिम कविता,,,
सत्य आहे हे.. आणी अचूक लिहिलत तुम्ही.