सर्व भटक्यांना नमस्कार,
पुणे आणि परिसरातील जवळ जवळ बहुतेक किल्ले बघून झाल्या मुळे २ दिवसात छोटा असा कुठला ट्रेक करता येईल असा विचार करत होतो, मध्यंतरी आनंद पाळंदे यांचे चढाई आणि उतराई हे पुस्तक वाचनात आले होते आणि त्यामुळे जुन्या घाट वाटांची पुस्तकी माहिती झाली होती, त्यातलाच एक घाट म्हणजे गोपे घाट.
गोपे घाट आणि शिवथर घळ असा ट्रेक करायचा असे ठरवले, २०१० च्या पावसाळ्यातच उपांडे घाट आणि शिवथर घळ असा ट्रेक एका खासगी संस्थे बरोबर केल्याने थोडी माहिती होती तरी पण गुगल च्या मदतीने नकाशा नजरे खालून घातला, आनंद पाळंदे यांचे चढाई आणि उतराई हे पुस्तक मदतीला होतेच पण पाळंदे यांनी हे प्रकरण बहुदा १९७५ ते १९८० या काळात केल्या असल्याचा अंदाज एकंदरीत माहिती वाचून आला, आणि आपल्या S.T. महामंडळाच्या कृपेने आमचा हा ट्रेक जरा कमी पाय पीटीचा होईल असा आराखडा केला.
पुण्याहून दुपारी २:३० ला निघाणाऱ्या S.T. ने कुंबळे या गावी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून गोपे घाट मार्गे शिवथर घळ दुपारी १ पर्यंत गाठणे आणि नवीनच सुरु झालेल्या शिवथर घळ ते स्वारगेट अश्या दुपारच्या २ च्या गाडीने पुण्याला परत असा मस्त प्लान आखला.
S.T. महामंडळाच्या वेळा पत्रका प्रमाणे २:३० गाडी पकडण्या साठी दु १:४५ ला स्वारगेट ला पोचलो, आणि लगेचच आपले महामंडळ सुद्धा नफा कमवण्या साठी Professional झाले आहे याचा अनुभव सारखा Speakar वरून होणाऱ्या आवाजा मुळे आला, Speakar वरून अखंड " आजचा लोकमत वाचला का ? " असा उद्धार सुरु होता, दुपारचे २;४५ झाले तरी गाडीचा पत्ता नव्हता आणि आल्या पासून सगळ्या गाड्यान वर पाळत ठेवली होती त्यामुळे गाडी गेली असा ? नव्हता, त्यामुळे एकदा मास्तरांना विचारून यावे का असा विचार आला, पण भीती वाटत होती कि तरी सुद्धा मास्तर कदाचित मास्तर म्हणतील गेली कि केंव्हाच, ( कुंबळे येथे जाणारी एकच S.T) तरी पण मास्तरांना एकदा विचारून आलो आणि मास्तर पण म्हणाले येईल आत्ताच, अखेरीस ३:१५ ला कुंबळे ला नेणारी आमची S.T आली आणि आमचा प्रवास ३:३० ला सुरु झाला.
गाडीमध्ये काही गावकरी आणि आम्ही ६ जण असे १५ ते २० प्रवासीच होतो, ticket काढताना मास्तरांना ६ कुंबळे असा सांगितल्या वर मास्तर चाट पडले आणि म्हणाले direct कुंबळे आणि पुन्हा का ?, असा हि जोड सवाल, त्यांना सर्व प्रयोजन सांगितल्या वर जरा खुश झाले आणि जास्तीची माहिती पण सांगितली (कसे जा वगेरे ). आमच्या गाडीचा चालक मात्र अफाट माणूस होता सातारा महामार्ग सुरु झाल्या वर त्याने मागे बसलेल्या गाववाल्या बरोबर पिक पाण्याच्या गप्पा सुरु केल्या आणि गाववाल्याने पण प्रतिसाद देत पिशवीतून नुकत्याच शेतातून काढलेल्या आंबेमोहोर तांदुळाचा नमुना पेश केला आता चालक साहेब चालू यंत्र सोडून मागे येतात कि काय अशी भीती सर्वाना वाटायला लागली पण मास्तरांनी मधेच तो नमुना हातात घेऊन त्याचा वास घेऊन चालकाच्या स्वाधीन केला, चालकाने सुद्धा मग चालू यंत्रा वरील हात बाजूला सारून वास घेऊन व्वा अशी दाद दिली, आणि तांदूळ परत केला आणि परत यंत्रा वर लक्ष केंद्रित केले ते पाहून आम्हाला पण जरा बरे वाटले.
गाडीने आता वेग घेतला आणि सातारा महामार्ग सोडून उजव्या हाताला चेलाडी (नसरापूर) फाट्या वर वळून पुढे निघाली आणि वाटेत चहा थांबा घेऊन थेट वेल्हे गाठले, मधल्या काळात छान डुलकी पण काढली, वेल्हे येथे मात्र गाडी पूर्ण पणे भरून गेली कारण दिवसातून एकच गाडी कुंबळे येथे जात असल्याने सर्व गावकरी आतुरतेने वाट पाहत होते, त्यातच माझ्या शेजारी ७० री ओलांडलेल्या १ आजी येऊन बसल्या माझ्या कडे पाहून म्हणाल्या कुठे जाणार मी सांगितले "शिवथर घळ" तश्या एकदम म्हणाल्या अरे म्हग हिकडून कुठून महाड मार्गे थेट गाडी जाते की, मग त्यांना सर्व प्रयोजन सांगितले आणि पण त्याच्या चेहरया वरून मात्र हा द्राविडी प्राणयाम काही पचनी पडला नवता.
आता गाडी तोरणा किल्याच्या मागच्या बाजूने पुढे जात होती, मावळतीचे सूर्य किरण तोरण्या वरती पडले होते आणि १ वेगळाच तोरणा नजरेस पडत होता आणि अधून मधून राजगड सुधा डोकावत होता, फोटो काढायचा मोह होत होता पण चालू गाडीतून फोटो काढणे खूपच अवघड होते त्यामुळे तो विषय बाजूला ठेवला आणि एवढ्यातच सूर्यास्त झाला आणि गाडीने केळद गाव मागे टाकले आता कुंबळे गाव ८ कि. मी अंतरावर राहिले होते, आता डांबरी रस्ता संपून कच्चा रस्ता सुरु झाला होता आणि अखेरीस कुंबळे गाव आले आणि आता गावात मुक्काम कुठे करायचा असा विचार करत निघालो आणि वाटेतच गावातील शाळा लागली आणि तिथेच मुक्काम करायचे ठरवले शाळेत दिवे होते आणि शाळेतील शिक्षकांच्या परवानगीने वर्गात मुक्काम सुधा करायला मिळाला त्यामुळे कुडकुडत्या थंडीत सुधा मस्त आसरा मिळाला होता याचे समाधान होते, रात्रीचे साधारण ७:४५ झाले असतील मस्त चंद्र प्रकाश, सुंदर चांदणे आणि स्वच्छ मोकळी हवा, थोडी night photography चा प्रयत्न केला आणि मग भुकेची आठवण झाली आणि आता थंडी पण वाजायला सुरवात झाली होती, वर्गातच डबे उघडले आणि आक्रमण ....................... सर्व डबे संपले.
९:१५ झाले होते, सकाळी लवकर उठायचे होते त्यामुळे लगेच Sleeping Bag मध्ये शिरलो आणि गप्पामारता डोळा कधी लागला ते समजले नाही, मधूनच जाग येत होती कारण वर्गाचा दरवाजा तुटलेला असल्याने मध्येच वारा येऊन थंडी वाजत होती, रात्री लवकर झोपल्याने पहाटे लवकर जाग आली, छान थंडी पडली होती चंद्र देखील मावळला होता आणि पूर्वे कडे रंगांची बरसात सुरु झाली होती, त्याचे काही फोटो टिपले.
मस्त चहा घेऊन ७:१५ ला समर्थांच्या घळी निघालो वाटेत रस्ता विचारून, पाण्याचा कोटा फुल करून वाटेतील वेळवंडी नदी ओलांडून गोपे घाटाच्या दिशेने निघालो, वाटेत छोटे छोटे पाडे लागत होते तिथे परत एकदा मार्गाची निश्चिंती केली आणि पुढे मार्गस्थ झालो.
साधारण १.३० तास पायपीट केल्या नंतर गोपे गावात पोचलो समोरच काही अंतरावर गोपे घाटाची खिंड दिसत होती
आता फक्त २० ते २५ मी, आणि खिंडीत पोचलो, समोर वरंध घाट आणि कावळ्या किल्ला दिसत होता आणि मागे राजगड दिसत होता घाट आणि कोकण एकाच ठिकाणाहून पाहायला मिळत होते,
खूपच सुंदर असे दृश्य समोर दिसत होते जवळच दगडात फोडलेले पाण्याचे एक टाके सुद्धा होते, याचा अर्थ इथे पूर्वी पासून लोक ये जा करत होते. पाण्याच्या टाक्या जवळच मांडी घालून मस्त न्याहरी केली, आणि घाट माथ्यावरून कोकणच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
वाट तशी चांगली रुळलेली होती पण दगड धोंड्यांची होती अवघ्या ४५ मी. मध्ये आम्ही २५०० feet वरून १२०० feet वर आलो होतो. (With the Help oफ GPS Tracker),
१०:१५ झाले होते पाठीवरचे ओझे दमल्या जाणीव करून देत होते आणि समोर २ वाटा आल्या, आणि कोणी मार्गदर्शक भेटेल अशी अशा नव्हती पण चढाई आणि उतराई पुस्तकाने वाट दाखवली आणि उजव्या वाटेने चालायला सुरवात केली आता जरा झाडीची वाट होती ती १५ मी संपली आणि सपाटीवर आलो आणि मागे वळून पहिले कि आपण कोणता कडा नक्की उतरून आलो, फोटो दाखवून नवख्या माणसाला खरं वाटणार नाही अश्या ठिकाणाहून आम्ही उतरून आलो.
आता ११:०० वाजून गेले होते उन पण कडक झाले होते, पाण्याचा stock पण संपला होता कधी एकदा शिवथर घळी मध्ये जातोय असा झाले होते आता झाडीची वाट संपून डांबरी सडक सुरु झाली होती.
११.४५ आणि शेवटी पोचलो आणि लगेचच S.T. महामंडळाने हिसका दिला, शिवथर घळ ते पुणे अशी S.T. सुरु झाली अशी पाटी स्वारगेट थाटात लावणाऱ्या महामंडळाने, फक्त पाटीच लावली होती गाडी काही सोडली नव्हती हे तिथल्या लोकांकडून समजले; परंतु पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्याला विठ्ठलाचे दर्शन घेतल्या वर जे समाधान मिळत असेल तसेच काही समाधान समर्थांचे दर्शन घेतल्या वर मिळाले आणि खिचडी आणि शिरा असा प्रसादाचा आस्वाद घेतला आणि मग ६ सीटर आणि मग भाजीच्या गाडीतून भोर आणि भोर वरून S.T. ने पुणे असा प्रवास करून वारी रात्री ७:३० ला घरी परत, अशी हि सुंदर वारी मजेत पूर्ण झाली.
!! जय जय रघुवीर समर्थ!! !! जय जय रघुवीर समर्थ!! !! जय जय रघुवीर समर्थ!!
प्रतिक्रिया
4 Mar 2011 - 9:02 am | योगेश२४
नविन घाटाची माहिती मिळाली. :-)
पण मला फोटो दिसत नाहित. :(
4 Mar 2011 - 9:16 am | प्रचेतस
सुरेख वर्णन. फोटो दिसले असते तर अजून मजा आली असती.
4 Mar 2011 - 9:33 am | सुत्रधार
जाणकार मार्गदर्शन करतीलच.
4 Mar 2011 - 9:36 am | नरेशकुमार
फटू नीट टाका, त्याशिवाय प्रतीसाद नाय
4 Mar 2011 - 1:13 pm | गणेशा
फोटो दिसत नाहियेत ..
लिखान छान केले आहे
4 Mar 2011 - 2:06 pm | वारकरि रशियात
असेच म्हणतो.
लिखाण चान चान.
फोटु दिसत नाहीत. कोणीतरी मदत करावी / लेखकाने पूर्वीच्या धाग्यांचा संदर्भ पहावा असे सुचवतो.
4 Mar 2011 - 4:13 pm | कच्ची कैरी
मला पण फोटो दिसत नाहीये :(
कदाचित फक्त जास्त पुण्यवान लोकांनाच दिसत असावेत.
4 Mar 2011 - 6:27 pm | परिकथेतील राजकुमार
4 Mar 2011 - 6:56 pm | धमाल मुलगा
मस्त ट्रेक आहे हा. :)
आमचा गेल्या टैमाला हुकला होता राव. जिप्सी अन विलासराव जाऊन आले होते. आता पुन्हा मंडळी गोळा करुन एक चक्कर टाकायला हवी ब्वॉ :)
5 Mar 2011 - 6:53 am | समीर पुणे
लिखाण चांगले आहे पण फोटो दिसत नाहीत ...
!!पुणे तिथे काय ऊणे !!
5 Mar 2011 - 7:29 am | ५० फक्त
केदार, फोटो आणि लिखाण दोन्ही छान आहे.
मी आता सुरुवात करत आहे फिरायला. तुझी मदत घेईनच.
5 Mar 2011 - 11:02 am | हरिप्रिया_
मस्त लिहिलय...
नवीन ट्रेकची ओळख पण झाली...
अजून एका ठिकाणाची (वेगळ्या मार्गाने) भर आता फिरायच्या लिस्ट मध्ये..
5 Mar 2011 - 1:19 pm | प्रास
भटकंतीच्या नव्या वाटा शोधत भटके सदैव भटकतच असतात याचा प्रत्यय आला आणि अशा भटकंतीत सापडलेल्या नव्या वाटांची माहिती सगळ्यांबरोबर वाटून घेण्याचा उपक्रम तर फारच स्तुत्य!
छान लिखाण आहे.... फोटोंना कॅप्शन्स असत्या तर आणखी मजा आली असती.....
पु. ले. प्र.
5 Mar 2011 - 11:39 pm | निनाद मुक्काम प...
मन प्रफुल्लीत करणारे तजेलदार लिखाण
मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा .. .
पु ले शु
7 Mar 2011 - 7:10 pm | गणेशा
मस्त .. परा ने फोटो पुन्हा दिल्याने धन्यवाद त्याचे ही
8 Mar 2011 - 3:06 am | नंदा
एस. टी. महामंडळाला खूपच शिव्या घातल्यात राव! पण तुमचे लक्झरी-व्हाल्वोवाले या मार्गांवर फिरकणार पण नाहीत.
3 May 2011 - 10:11 pm | किरण शेलार
फारच सुन्दर माहिति !!!