पुन्हा एकदा वर्जेश सोळंकी

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जे न देखे रवी...
23 Feb 2011 - 9:30 am

फार मागे वर्जेश सोळंकी या कवितेची थोडी ओळख करून द्यावी म्हणून एक धागा काढला होता : दुवा धाग्यात बर्‍याच टपला मिळाल्या. निर्व्याज विडंबनांपासून सव्याज उपहासापर्यंत सर्व दक्षिणा प्राप्त झाल्या. भरून पावलो :-)

परवा याच कवीचा नवा संग्रह वाचायला मिळाला. त्याही कविता अतिशय आवडल्या. नव्या कवितांची इथल्या वाचकाना ओळख व्हावी (आणि विरोधकाना उपहासाचे नवे रान मिळावे ;-) ) या सद्हेतूने या दोन कविता देत आहे. आपल्या भल्याबुर्‍या प्रतिक्रिया जमल्यास द्याव्या.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
चेचेन्यात जन्माला आलो असतो तर

चेचेन्यात जन्माला आलो असतो तर
मारला गेलोसतो
रशियन सैनिकांकडून

व्हिएतनाममध्ये
चुकवता आला नसता
अमेरिकन विमानांचा ससेमिरा

युगांडात
कुठल्यातरी भीषण रोगाच्या साथीत
पडलासतो बळी

पाकिस्तानमध्ये
कापला गेलासतो शिया-सुन्नींच्या
वाढत्या दंगलीत

जर्मनीमध्ये ज्यू म्हणून
आफ्रिकेत नागवला गेलासतो
वर्णद्वेषाच्या मुस्कटदाबीत

कंदहारमध्ये धडावेगळा झालासतो
फतव्याविरुद्ध सिनेमा पाहिला
मोठ्यांदा हसलो म्हणून

कोलंबोत किंवा हमासमध्ये
सतत वावरत राह्यलोसतो गर्दीच्या ठिकाणी
मानवी बाँबच्या भीतीनं

सौदीत
तोडून घेतलेसते हातपाय
चुकून बाईला धक्का लागला म्हणून

कुठे नं कुठे
मारलातुडवलाकापलाकिंवाउडवला गेलाच असतो
भारतात काय किंवा इतर ठिकाणी काय ?

--------------------------------------------------------------------------------------------------

आपलं सगळं कसं आलबेल असतं

आपलं सगळं कसं आलबेल असतं
मनासारखं सगळं चाललेलं असतं
मार्केट एकदम तेजीत असतं
कुठेच खूनखराबा नसतो

आपल्या चॅनलवर साफसुथर्‍या बातम्या असतात
आपले सगळेच सौदेकब्जेलफडी सेफ अँड शुअर असतात
आपल्या नुसत्या ओळखीवर कामं होत असतात
राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती असताना
आपण व्यवस्थित दोन टाईमचं जेवत असतो
पाणीटंचाई असताना बिसलेरीचं पाणी मिळत असतं
खूप दिवसांत आपण आजारी पडलेलो नसतो किंवा
आजारी न पडावं म्हणून खबरदारी घेली असते
तणावाशिवाय खुलाशाशिवाय समर्थनाशिवाय दिवस जात असतात
डोकं तापू नये म्हणून सोडून दिलेलं असतं
फार पूर्वीच आपण वर्तमानपत्रं वाचणं
आर्थिकसंकटंबिंकटं नसतात
कौटुंबिकसमस्याबिमस्या
किल्मिषंबिल्मिषं नसतात
आपल्याला घाम येत नसतो
तंगडतोड नसते आक्रोश नसतो
ऑफिसमध्ये कलीगबॉसक्लायंटशी चांगलं ट्युनिंग जमलेलं असतं
सगळं कसं मस्तमस्त धुंदफुंद असतं
आंघोळीला बाथरूममध्ये गरम पाणी असतं
घामाच्या दुर्गंधीला तडी देणारा सुगंधित डिओड्रंट असतो
चेहर्‍यावर पुटकुळ्यांचं साम्राज्य नसतं
डोळ्यांभवताली काळ्या वर्तुळाचा समुद्र नसतो
इतक्या वर्षांत झालेली नसते आपल्या शरीराची सर्जरी
निघालेलं नसतं साधं नख
मारलेली नसते कुणी मुस्कुटात
बोललेलं नसतं कुणी घालूनपाडून
सुरक्षित असतो आपण आपल्या मेणाच्या घरात
पादताना झालेल्या आवाजाइतकाच आवाज असतो
आपल्या आजवरच्या जगण्यात
चेहर्‍यावर आपल्या थंड प्रकाश असतो
लेप असतो रंग असतो
आपल्या इतिहासात भूतकाळात
मोर्चा नसतो चळवळ नसते
प्रेरणा नसते सामाजिक भान नसतं हल्लाबोल नसतो
आपल्या पुस्तकात समकालीन विचार नसतो संस्कृती नसते
समूहमनाशी नाळ जोडली गेलेली नसते
भाषा नसते वैचारिक भूमिका नसते
आपण कसे अफलातून असतो
आतूनबाहेरूनकपड्यांतूनचेहरेपट्टीतून
असतोआपणबोलबच्चनामिताभबच्चन
आपल्या मुठीतच असतात किंवा ठेवू पाहतो आपण
घटना दिनक्रम वर्तुळं कुटुंबसंस्था भवतालचा समाज
आपल्या मनासारखा कसा तयार करून घेतलेला असतो आपण
पुस्तकी इतिहास
बदलतो परिच्छेदच्या परिच्छेद
बांधतो जिवंतपणीच स्वतःच्या समाध्या चिणतो कोनशिला
भूगोलाचे बदलतो व्यास अक्षांशरेखांश
बदलतो ऋतूंचे परीघ सामाजिक समीकरणं
उतरवतो भल्याभल्यांच्या पगड्या
घालतो भल्याभल्याना टोप्या
होऊ पाहतो आपण सर्वेसर्वा किंगमेकर
मूठभर फायद्यासाठी आपण घालतो स्वत:च्या पायघड्या
पर्यावरण पाहून होतो पायउतार किंवा देतो छलांग
बोलता-बोलता आपण खपवून टाकलेला असतो माल
बोलता-बोलता समोरच्याला लावून झालेला असतो चुना
आपद्ग्रस्तांना पगारातून शेअर देऊन पावलेलो असतो
आपण अंतर्बाह्य समाधानी झालेलो असतो

जगण्यात आपल्या कुठेच कुंथणं नसतं
फट नसते खोली नसते अवकाश नसते वस्तुमान नसते
घनता नसते मिती नसते प्रमाण नसतं पश्चात्ताप नसतो
कंटाळा नसतो लफडी नसतात संघर्ष नसतो छळ नसतो
मुस्कटदाबी नसते हस्तांदोलन नसतं संवाद नसतो
प्रश्न नसतात तळ्यात नसतो मळ्यातही नसतो

आपण एकट्याएकट्याने चालत असतो
स्वतःच्या गरजा हुंगतच चालत असतो
पुढेमागेवरखाली पाहात पाहातच चालत असतो
स्वतःचे लागेबांधे जपत जपतच चालत असतो

-------------------------------------------------------------------------------------------------
कवितासंग्रह :"ततपप"
कवी : वर्जेश सोलंकी
"अभिधानंतर" प्रकाशन
पहिली आवृत्ती - जुलै २००९

कविता

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

23 Feb 2011 - 10:18 am | विजुभाऊ

मुक्तसुनीतजी तुमच्य वाचनाबद्दल अतीव आदर आहे तरी सुद्धा म्हणावेसे वाटते या कविता अगदीच नवोदीत कविच्या सुमार कविता वाटतात. प्रत्येक कविता ही कविला त्यावेळेस काय वाटले याची प्रतीकृती असते हे मान्य पण वाटलेल्या भावना व्यक्त करण्याची रीत ही फारच अतीसामान्य वाटते. त्यात फारकाही वेगळेपण जाणवले नाही
दोन्ही कवितात काही वेगळे वाटले नाही. कॉलेजच्या भित्तीपत्रकांत देखील यापेक्षा चांगल्या दर्जाच्या कविता असतात.
तुम्ही म्हणता त्या कविता संग्रहातील सगल्याच कविता इतक्या सुमार आणि अतीसामान्य असतील तर कठीण आहे बुवा.
वर्जेशसोळंकीच्या कवितांची मागे कोणीतरी तुलनाअ ग्रेस आनि चित्र्यंशी केली होती.
ग्रेसची दुर्बोधततेमधून वास्तव उभे करण्याची ताकद किंवा खनोलकरांचे शब्द लालित्य या दोन्ही गोष्टी ची वानवा जाणवतेच पण मानवी भावनांना साद घालणे हे कवितेचे प्राथमीक काम देखील या कविताम्मधून होत नाही.
गेले उकररून घर
नाही भिंतीना ओलावा
तुझे चांदण्याचे हात
करु मातीचा गिलावा
ग्रेसच्या वरील ओळीत दुर्बोधता नाही पण चित्रमय वास्तव उभे करण्याची ताकद आहे. तशी ताकद वरील कोणत्याच कवितेत जाणवत नाही.
म्हणूनच खेदाने म्हणावेसे वाटते की अगदीच नवथर आणि सुमार कविता आहेत

मुक्तसुनीत's picture

23 Feb 2011 - 10:23 am | मुक्तसुनीत

विजुभाऊ , तुमच्याच प्रतिक्रियेची वाट पाहात होतो. लई नाही मागणे ! :-)

मुक्तसुनीतजी
मागच्या वेळेस टीका झाली होती ती त्या" माणसाने शेंबूड व्हावे....." वगैरे बीभत्स कवितेबद्दल.
ती तुम्ही दिलेल्या कवितेवर झालेली नव्हती.
कृपया हे वैयक्तीक घेऊ नये.

स्पंदना's picture

23 Feb 2011 - 10:39 am | स्पंदना

सुमार काही म्हणवत नाही मला. प्रत्येक कवीची व्यक्त होण्याची एक पद्धती असते.

दोन्ही कवितेतला सुर काहीसा सामाजिक आहे. पण अगदी जे लिहिलय तेच असण यात काव्य काय उरल? अगदी साध्यातली साधी, संभाषणात्मक वसंत बापटांची ' सावंत' वाचा. वर वर जणु दोन माणसांचा संवाद पण गाभ्यात दडलेल एक स्थित्यंतर , सामाजिक , मानसीक !!

तुम्हाला आवडतात त्याअर्थी नक्कीच या कविता तुमच्याशी संवाद साधत असाव्यात,मला बर्‍याचश्या पटल्या,पण भिडण जे म्हणतात , तस नाही वाटल. पण या ओळी आवडल्या.

>>आपण एकट्याएकट्याने चालत असतो
स्वतःच्या गरजा हुंगतच चालत असतो
पुढेमागेवरखाली पाहात पाहातच चालत असतो
स्वतःचे लागेबांधे जपत जपतच चालत असतो>>>

सहज's picture

23 Feb 2011 - 10:49 am | सहज

सर्वप्रथम दोन्ही कविता उत्तम निवडल्या आहेत. सुखवस्तु / सामान्य माणूस 'कधी मी असा असतो कधी मी तसा असतो' अवस्था दर्शवणार्‍या. पहीली कविता अर्थात सारकॅस्टीक आहे. सामान्य माणुस कायम मरत आला आहे व मरणार आहे. दुसरे महायुद्ध संपून ६० वर्षे झाली तरी जर्मनीत ज्यु नागवला जातो हे वाक्य आपण काहीही ब्र न काढता स्वीकारतो. कारण एकदा इतिहास अभ्यासला आहे, एक सत्य घेतले आहे भले ते ६०-७० वर्षापुर्वीचे असो. तसेच व्हिएतनाम, अफ्रिकेत वंशवाद संपून दशकाहून काळ गेला व द. अफ्रिके व्यतीरिक्त अन्य अफ्रिकन देशही आहेत तिथे अफ्रिकन मनुष्य स्वतंत्र असेल व आपला भारताप्रमाणे विकास करुन घेत असेल ह्याचा विचार करायला विचारवंत आहेत आपण कशाला करायचा.

लगेच दुसरी कविता हो हो जगात इतक्या समस्या आहेत पण आपले सर्वकाही खासमखास आहे. परवा बँकेने अडवले तर त्याला काय झोडले लगेच माफी मागीतली त्या मॅनेजराने. अरे माफी न मागुन जाईल कुठे, सरळ सांगीतले आमदार आमच्या कंपनीचे संचालक आहेत...

असो पण खरे सांगायचे तर दुसर्‍या कवितेत वर्णन केल्यानुसार आयुष्य जगायची संधी बहुसंख्य जनतेला मिळणे याच करता सगळा अट्टहास असतो की नाही?

पंगा's picture

23 Feb 2011 - 10:13 pm | पंगा

दुसरे महायुद्ध संपून ६० वर्षे झाली तरी जर्मनीत ज्यु नागवला जातो हे वाक्य आपण काहीही ब्र न काढता स्वीकारतो. कारण एकदा इतिहास अभ्यासला आहे, एक सत्य घेतले आहे भले ते ६०-७० वर्षापुर्वीचे असो. तसेच व्हिएतनाम, अफ्रिकेत वंशवाद संपून दशकाहून काळ गेला व द. अफ्रिके व्यतीरिक्त अन्य अफ्रिकन देशही आहेत तिथे अफ्रिकन मनुष्य स्वतंत्र असेल व आपला भारताप्रमाणे विकास करुन घेत असेल ह्याचा विचार करायला विचारवंत आहेत आपण कशाला करायचा.

या दृष्टिकोनातून पाहिल्यावर (अगोदर सुमार वाटलेली) पहिली कविता आवडली. ('पर्स्पेक्टिव' सुधारल्याबद्दल आभार.)

(दुसरी कविता वाचण्याचा तूर्तास कंटाळा केला.)

नगरीनिरंजन's picture

23 Feb 2011 - 10:59 am | नगरीनिरंजन

मला तर दोन्ही आवडल्या. नक्कीच छान कविता आहेत.

अवांतरः नवथर सुमार आणि अनुभवी दर्जेदार यातल्या फरकावर जाण्कारांकडून आणखी विवेचन झाल्यास आमच्या ही साहित्य विषयक जाणीवा प्रगल्भ होतील असे वाटते.

अडगळ's picture

23 Feb 2011 - 11:09 am | अडगळ

हा कवी आधीच आवडला होता. नवीन संग्रह वाचायला ज्याम उत्सुक आहे.
प्रत्येक कवी हा काही प्रत्येक किंवा किमान काव्यतंत्रांचा वापर करेलच असे नाही. यमक , प्रासादिकता , प्रतिमा -प्रतीकांची रचना हे पाळून- टाळूनही कविता सिद्ध होतच असते. वास्तवाची कलात्मक पुनर्बांधणी ही काही काव्याच्या सफलतेची एकमेव कसोटी नसावी.
ग्रेसच्या शब्दात सांगायचं झालं तर हे मृग़जळाचं बांधकाम आहे. निर्मितीद्रव्यच इतकं तरल आहे की कलाकृतीच्या अंतिम रुपाची कल्पना करणे पण अवघड आहे.
मर्ढेकर म्हणायचे की जर कविता तुम्हाला सुधरली नाही तर ती तुमच्यासाठी नाही असे समजा.

मुक्तसुनीत, संग्रहाची सुंदर ओळख करून दिल्याबद्द्ल परत धन्यवाद.

निवांत पोपट's picture

23 Feb 2011 - 11:45 am | निवांत पोपट

नीत्शेनं तुम्ही कसे जगत आहात हे सांगताना एका ठिकाणी म्हटलंय
“कल्पना करा की दोन लांब अंतरावरच्या इमारतींच्यामध्ये एक उंच अंतरावर एक दोरी ताणलेली आहे आणि तुम्ही त्या दोरीवर मध्यभागी उभे आहात.आता तुम्ही काय करणार? तुम्ही पुढे जाल तर धोका आहे.मागे जाल तरी धोका आहे.उजव्या,डाव्या कॊणत्याही बाजूला वळलात,कललात तरी धोका आहे.आणि शांत स्थब्ध उभे राहिलात तरी धोका आहे.”
चेचेन्यात जन्माला आलो असतो तर...... वाचताना असं वाटलं की खरी सुरक्षितता जन्माला न येण्यातच आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Feb 2011 - 2:28 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. अवलिया,

धन्यवाद!

चिंतातुर जंतू's picture

23 Feb 2011 - 3:18 pm | चिंतातुर जंतू

वर्जेश सोळंकींच्या पुनरागमनाच्या या निमित्तानं इथं ते पूर्वी येऊन गेल्याचीही माहिती मिळाली अन काही जुन्या सदस्यांची जुनीच ओळख अधोरेखित झाली ;-) म्हणून असं म्हणावंसं वाटतं -

मिपावर झोडला गेलो असतो
नव्वदोत्तरी कविता वाचली आणि
तिला सुमार म्हणणार्‍यांना मोठ्यांदा हसलो म्हणून

उपक्रमावर झोडला गेलो असतो
नव्वदोत्तरी कवितेची तर्कशुद्ध समीकरणं मांडता आली नाहीत आणि
तीतल्या संवेदनांचं अधिभौतिक अस्तित्व सिद्ध करता आलं नाही म्हणून

'लागेबांधे' जपत 'आलबेल' अवांतरः तरीपण मानवी बाँबपेक्षा हे शाब्दिक बाँब बरेच म्हणायचे!
(प्रतिसाद उडतात खरे, पण) संपादकांकडे त्रागा/विनवण्या करूनकरून खातं तरी वाचतं ;-)

सन्जोप राव's picture

24 Feb 2011 - 5:41 am | सन्जोप राव

या कविता आवडल्या म्हणाव्या तर कंपूबाजीचा (आधीच झालेला ) आरोप अधोरेखित होणार, नाही म्हणाव्या तर प्रामाणिकपणाशी तडजोड करण्याचा स्वतःवरच आरोप होणार. इतरांच्या आरोपांना फाट्यावर मारुन म्हणतो की सुरेख कविता आहेत.
अवांतरः दंभकुठार, बकुळफुले हे लोक सध्या कोणत्या आयडीने वावरतात?
अतिअवांतरःहे
अक्षरशत्रू बनुनी जेंव्हा काव्यगुरु नाचले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
हे समजायला सोपे आहे का?