प्यासा : एक निष्कर्मवाद

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
16 Feb 2011 - 10:37 am
गाभा: 

प्यासा चित्रपटाची चर्चा चालली आहे त्या निमित्ताने
प्यासा चित्रपटातील नायक विजय. एक कवी आहे. त्याच्या कविता तरल भावूक आहेत. त्याला सामाजीक वास्तवाची जाणीव आहे.
कॉलेजात असताना स्वत्/ल्सुद्धा किंचित कवी असल्याकारणाने प्यासा तील नायकाशी मनातल्या मनात स्वतःची तुलना व्हायची .
ये ताजो ये तख्तो ये महलो की दुनिया
जला दो जला दो जला दो ये दुनिया..
या ओळी भावायच्या. काहीशा स्वप्नालु कम्युनिस्ट विचारांचा तो कवी खूप आवडायचा. प्रचलीत व्यवस्थेविरुद्ध बंड करायला प्रवृत्त करायचा
प्यासा चित्रपटातील अगदी सुरवातीच्या प्रसंगापासूनच ( फुलावर भुंगा बसतो आणि मागे कवी कवितेची एक ओळ म्हणतो) चित्रपटाच्या प्रेमात होतो.
प्यासा ग्रेट चित्रपट आहे असे कोणीतरी म्हणाले होते म्हणून तो पहायच्या अगोदरच मी तो ग्रेट ठरवून टाकला होता.
थोड्याशा स्वप्नाळु विचारांचा कवी विजय ( गुरुदत्त ) नायीकेच्या प्रेमात असतो. अबोल असला तरी आपण कवी असल्याने "आम्ही कोण म्ह्नुणी काय पुसता दाताड वेंगाडूनी" अशा प्रकारचा एक अविर्भाव त्याच्यात सतत जागृत आहे.
स्वतः जगापेक्षा फार वेगळे असून जगाने आपली दखल घ्यावी असे त्या कवीला सतत वाटत आहे.
व्यवहारीक जगात जगण्यासाठी काही काम करावे लागते हे त्याच्या ध्यानीही नाही. प्रेमावरची उत्कट रचना करताना देखील तो प्रेयसीला धसमुसळेपणाने नव्हे तर मार्दवाने वश करू पहातो. तीने झिडकारले तरीही तिच्यावर प्रेमच करीत राहीन अशी ग्वाही देत रहातो. ( हम आपकी आखों मे इस दिल को बसा लेंगे) .
या विजयच्या कवितांच्या प्रेमात एक वेश्या गुलाबो आहे. तीचे त्याच्या कवितांवर असीम प्रेम आहे. त्याच्या कविता गाऊनच तीला गिर्‍हाईके मिळत असतात. ( जाने क्या तुने कही....जाने क्या मैने सुनी....बात कुछ बंधी हुयी)
ती विजयला एक गिर्‍हाईक समजते. जेंव्हा तिला कळते की तो गिर्‍हाईक नसून स्वतः कवी आहे... त्यावेळेस तीला त्याच्याबद्दल आपुलकी वाटु लागते.
विजय ला काहीही कामधन्दा नसतो. सतत नैराश्यात रहाणे आणि काहीच कामधन्दा न करता कविता करत रहाणे याला घरातले देखील वैतागलेले असतात.
विजयची प्रेयसी कोण्या व्यावसायीकाशी लग्न करते. विजय काही कामानिमित्त तीच्या घरी जातो . तिला जाब विचारण्याच्या अविर्भावात एक गाणे गातो ( जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्या मिला ) प्रेयसीच्या चेहेर्‍यावरचे सम्मिश्र भाव बरेच काही सांगून जातात. ( माझे चुकले...पण तू काही कामधामच करत नव्हतास्...माझा नाईलाज होता.वगैरे वगैरे.)
गुलाबोला विजयच्या कविता आवडत असतात. ती त्याच्या कविता प्रकाशीत व्हाव्यात म्हणून प्रयत्न करते. प्रेयसीचा पती "रेहमान " पैसे घेवून कविता संग्रह छापतो.
एका रात्रीत कविता संग्रह प्रसिद्ध होतो. लोकाना विजय बद्दल आता कुतुहल निर्मान झाले आहे. काव्यसंग्रहाला कसले तरी बक्षीस मिळालेले आहे. विजय ( कवी) कुठे आहे याबद्दल कोणालाच माहीत नसते. तो मेला आहे असेच सर्वजण समजत असतात. मिळणारी बक्षीसाची रक्कम , मानसन्मान घ्यायला घरचे लोक पुढे येतात.
त्या समारंभात विजय हजर होतो. विजयला ज्यानी ज्यानी धिक्कारले आहे तो लोक बिथरतात.
विजयला या सगळ्याची चीड येते. तो आपण स्वतः विजय नाही हे जाहीर करतो.
समारंभ उधळला जातो.
लोक विजयला /गुलाबो ला एक नगण्य मानून निघून जातात.
एक शून्य अवकाश शिल्लक रहातो.
गुलाबो नव्या उमेदीने विजयला स्वत्:सोबत घेवून जाते.

चित्रपटातील व्यक्तीरेखा कॉलेजात असताना भावल्या होत्या.
आज विचार करता काही गोष्ती प्रकर्षाने जाणवतात.
चित्रपटातील कवी विजय हा काहीच करीत नाही. निष्कर्म जगत असतो. तरीदेखील जगाने आपल्याला मानसन्मान द्यावा असे त्याला वाटत असते. ती व्यक्तीरेखा काहिशी मिर्झा गालीब च्या व्यक्तीरेखीशी जुळती.
गुरुदत्तने चित्रपटात छायाप्रकाशाची कमाल दाखवली आहे. सावल्यांचा वापर करून पात्रांचे मूड मस्त पकडले आहेत.
नेहरु युगातला काहीसा स्वप्नाळू आषावाद चित्रपटात सतत डोकावत रहातो. त्याच बरोबर त्या स्वप्नाळू आषावादातील फोलपणाची जाणीव होउन कवी निराश होतो. ( ये दुनिया अगर मिलो भी जाये तो क्या है?)
जग वाईट आहे स्वार्थी आहे याची त्याला चीड आहे. पण जग चांगले करण्यासाठी आपण काही करायचे असते याची जबाबदारी तो टाळत रहातो.

प्रेमात असफल झाल्यानन्तर कवी निराशेच्या टोकाला जातो तो एक निश्कर्म आयूष्य जगत रहातो.
आदर्श घेवू नये असा नायक बनत जातो.
चित्रपट संपल्यानन्तर त्याची मोहिनी बरेच दिवस उतरत नाही. त्यातील छायाप्रकाशाची जादू प्रत्येकवेळेस नव्याने उलगडत जाते

प्रतिक्रिया

रमताराम's picture

16 Feb 2011 - 11:35 am | रमताराम

काहीशा स्वप्नालु कम्युनिस्ट विचारांचा तो कवी खूप आवडायचा.
विजय कम्युनिस्ट???? असो.
आणि प्रत्येक तत्त्वज्ञान हे स्वप्नाळूच असते असे आम्हाला वाटते ब्वॉ. तसे नसेल तर कुणी त्याचा झेंडा खांद्यावर घेणारच नाही. त्यामुळे हे विशेषण लावण्याची वेगळी आवश्यकता नव्हती.

इन्द्र्राज पवार's picture

16 Feb 2011 - 12:28 pm | इन्द्र्राज पवार

"....विजय कम्युनिस्ट????...."

~ 'प्यासा' ची कथा खरे तर 'साहिर लुधियानवी' या कविचीच कथा असे म्हटले तर अतिशयोक्ती नाही. साहिर हे कम्युनिस्ट विचारसरणीनेच भारावलेले कवी होते आणि त्यांचा प्रकाशित झालेला पहिलावहिला "तलखियाँ" [कडवटपणा] आणि यातील कित्येक कविता त्या विचारांना पुष्टी देतो. साहिर यांच्या बालपणापासून ते मुंबईला येण्यापर्यंतचा रस्ता असा होता जो 'विजय' चा आहे 'प्यासा' मधील.

~ अमृता प्रीतमसमवतचे असफल प्रेम असो [या प्रेमापोटीच ते आजन्म अविवाहित राहिले होते] वा 'कम्युनिस्ट' असा शिक्का बसल्याने लाहोर, दिल्लीतून पलायन करून मुंबईला आपले मानण्यापर्यंतचा प्रवास असो....'साहिर' यांची काव्य प्रतिभा पुढे कितीही बहरली तरी त्यांच्यातील 'कॉम्रेड इलेमेन्ट' कधीच पुसले गेले नाही. राज कपूर अभिनित 'फिर सुबह होगी' या चित्रपटाचे शीर्षकच सहज सांगते की चित्रपटाची कथा काय असू शकेल (तो डोस्टोव्हस्कीच्याच एका कादंबरीबर आधारित होता.)

श्री.विजुभाऊंनी कवि 'विजय' चे वर्णन कम्युनिस्ट असे जे केले आहे ते अचूक आहे असेच म्हणावे लागेल.

इन्द्रा

रमताराम's picture

16 Feb 2011 - 12:51 pm | रमताराम

तुम्हाला तो कोणत्या अर्थाने कम्युनिस्ट वाटतो ते स्पष्ट केले तर बरे होईल. मला का वाटत नाही ते मी लिहितो.

मुळात कम्युनिजम बूर्ज्वा व्यवस्थेचा धिक्कार करते, नि विजयची आत्ममग्नता, रोमँटिक/भावुक वृत्ती ही १००% बूर्ज्वा आहे. संघटनात्मक विचार हा कम्युनिजमचा पाया आहे, नियमित त्या संदर्भात विचार करणे हे त्याचे वैशिष्टय. एक आत्ममग्न माणूस त्या अर्थाने कम्युनिस्ट असणे अवघड आहे. त्याची समाजाशी नाळ जोडली न गेल्याने तो खर्‍या अर्थाने कम्युनिस्ट होऊ शकतो असे मला वाटत नाही. चित्रपटात विजय ने 'जला दो जला दो' वगैरे गाणे सोडले (ते ही प्रेमात पडलेला माणूस जसे 'जगाची पर्वा करत नाही' तर प्रेमभंगी 'सार्‍या जगाला आग लावा; म्हणतो तितपतच घेतो मी. गाणे उत्तमआहे, अपीलिंग आहे हे निर्विवाद.) तर कोणताही सामाजिक विचार मांडलेला मला दिसला नाही. एका समाजगटाचा प्रतिनिधी म्हणून वा त्यासाठी त्याने काही प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कृती केलेली दिसत नाही.

आणखी एक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अर्थाने कम्युनिजम कुटुंबव्यवस्था नाकारतो (व्यवस्थेमधे होणारा वैयक्तिक हक्कांचा संकोच या न्यायाने) त्यामुळे केवळ प्रेयसीशी लग्न न झाल्याने भग्नहृदय झालेला माणूस निव्वळ रोमँटिक असतो. (अधिक लिहीत नाही. :) )

इन्द्र्राज पवार's picture

16 Feb 2011 - 8:45 pm | इन्द्र्राज पवार

तुमच्या या प्रतिसादाच्या अनुषंगाने माझे विचार खालीलप्रमाणे :

~ प्यासामधील विजय कवी आहे म्हणजे तो 'बाय डीफॉल्ट' रोमॅन्टिक/भावुक असणार हे मान्य करू या. तो कोणत्या "ईझम" चा फॉलोअर आहे हे ठरविण्याचा अधिकार फक्त तुम्हाआम्हा प्रेक्षकानाच आहे. विजयची व्यक्तिरेखा चितारताना तो 'समाजव्यवस्थेचा धिक्कार' करणारा आहे हे स्पष्ट झाले पाहिजे असे कथा/पटकथाकाराचे तसेच दिग्दर्शकाचे मत असले तरी तो 'मशाल' हाती घेऊन ती व्यवस्था नष्ट करण्यासाठी पुढे सरसावत नाही, किंबहुना तो त्याचा प्रांतही नव्हे. त्याचा उद्देश 'आर्थिक असमानते' मुळे जे मनोदौर्बल्य निर्माण होते तिथे दोघांपैकी एकाची प्रगती खुंटते थांबते आणि त्यामुळे वाढत जाणारी न्यूनगंडाची भावना घातक ठरू शकते, व्यक्तिगत पातळीवर. कम्युनिझमची प्रमुख कल्पनाच अशी आहे की, समाजरचनेचा पाया अर्थरचना हा (च) असतो; मग ती जर बदलता आली नाही तर एक देश आणि दोन वर्ग अशी दरी सातत्याने राहणार आणि त्यामुळे मग त्या व्यक्तीचे भवितव्यही घडवता येत नाही. या भेदामुळेच जरी प्रेम असले तरी मीनाचे प्रेम हे "व्यवहारी" आहे तर विजय अजून स्वप्नात. गुलाबोवर तो प्रेम करतो असे कुठेही सूचीत होत नाही (या चित्रपटाची डीव्हीडी आहे माझ्याकडे....त्यामुळे विजय आणि गुलाबो यांचे विश्व ही दोघांनी स्वीकारलेली फारतर अपरिहार्यतेमुळी निर्माण झालेली अ‍ॅडजस्टमेंट म्हणता येईल.....)

'आत्ममग्न माणूस' कम्युनिस्ट असणे वा नसणे हा विचार विजयच्या व्यक्तिरेखेच्या बाबतीत सापेक्ष आहे. तो कवितेतून ज्या समाजाचे चित्र उभे करतो ती जळजळीत वस्तुस्थिती आहे. "जिन्हे नाज है हिंदपर वो कहाँ है....|" हे अपील आणि त्यातील विचाराना कोणत्याही ईझमची गरज नाही इतके ते स्वयंस्पष्ट आहेत. आता जो कवी ती तळागाळीतील प्रखर स्थिती समाजापुढे आणत आहे, त्या कवीनेच तो समाज बदलला पाहिजे अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. विजय म्हणजे कुणी बाबा आमटे वा अभय बंग नव्हे की जो तिथलाच एक सदस्य बनून त्यांच्या उन्नतीसाठी कार्य करण्यासाठी कंबर कसेल....आणि तसे पाहिले तर फिल्डवर काम करणार्‍यानाच खर्‍या अर्थाने लेनिन आणि मार्क्स कळाला असेही काही नसते. त्याना मानणारी व्यक्तीही आपआपल्या मगदुराप्रमाणे अन्यप्रकारेही योगदान देत असतेच.

चित्रपटातील शेवटचे 'ये दुनिया अगर मिल भी जाय तो क्या है?" हा प्रश्न कुणा एका प्रेमवीराचा नसून मतलबी दुनियेत राहून जर ती बदलता येणे अशक्य आहे असे आता निश्चित झाल्याचे समजलेल्या एका भग्न व्यक्तीचा आहे. त्याच्याकडे प्रश्न आहे, पण उत्तर नाही....आणि जर उत्तरच सापडत नाही तर मग 'ही दुनिया घेऊन तरी मी काय करू....जाळून टाका..." ही हताशता त्याला आली आणि ती केवळ प्रेयसीने पैशापायी प्रेमाला दुय्यम समजले यातून आली नसून समाजातील सर्वच घटक आणि त्यांचे प्रेम हे पैशातच मोजले जात आहेत या झालेल्या जाणीवेतून आली आहे.

विजय आहे अशा एका गटाचा प्रतिनिधी....पण ती बदलण्यासाठी काही प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कृती केलेली दिसत नसली तरी त्यामुळे त्याच्या व्यथेची धार कमी होत नाही....."प्यासा" हे शीर्षकच सांगून जाते की प्रातिनिधिक विजय नेहमी तसाच राहणार आहे.

"आज सजन मोहे अंग लगालो, जनम जनम की मै प्यासी...." ही गुलाबोची प्रार्थना शब्दश: घेतली तर अर्थ वेगळा होतो...पण व्यवहारातील गुलाबोला पुरुष देहाची खरेतर किळस आलेली आहे, तिच्या व्यवसायामुळे....मग इथे तिची जी 'प्यास' आहे तिचा कोणता रंग? आणि मग तिला नव्याने सापडलेला हा 'सजन'...त्याच्याकडून तिला हवे आहे ते फक्त आत्मिक प्रेम....जे याने मीनाला अगोदरच दिले आहे.....म्हणजे जिला दिले ती लक्षाधिशाशी विवाह करूनही 'प्यासी'....जी मागते तीही 'प्यासी' आणि ज्याच्याकडे असूनही तो 'प्यासा'...पण अन्य कारणाने.....हे कारण रोमॅन्टिक नसून असहायतेचे लक्षण आहे.

....असे मला वाटते रमता जी.

इन्द्रा

रमताराम's picture

16 Feb 2011 - 10:41 pm | रमताराम

मला जेवढा कम्युनिजम समजला (फारच थोडा) तो मला चित्रपटात दिसला नाही तसेच तुमच्या विश्लेषणातही. सर्वस्वी वेगवेगळ्या व्याख्या घेऊन चर्चा चालवण्यात अर्थ नाही म्हणून थांबतो.

एका जुन्या चित्रपटाची कथा उलगडून दाखवल्याबद्दल आभार

सुंदर परीक्षण

चिंतातुर जंतू's picture

16 Feb 2011 - 11:50 am | चिंतातुर जंतू

चित्रपटातील कवी विजय हा काहीच करीत नाही. निष्कर्म जगत असतो.

ज्या व्यक्तीला मेंदूचा भुगा करून कविता सुचते त्याला 'तो काहीच करत नाही' असं म्हणणं हा माझ्या लेखी कवींचाच नाही तर अनेक लोकांचा (उदा: सैद्धांतिक गणिती - http://en.wikipedia.org/wiki/Pure_mathematics) अपमान आहे.

रमताराम's picture

16 Feb 2011 - 12:12 pm | रमताराम

अहो चिंतूशेट, विजुभाऊंची 'कर्म' करण्याची व्याख्या काहीशी 'कार्यप्रवण होणे'*याच्या समानार्थी असेल तर त्यांचे म्हणणे बरोबरच आहे की.
* याचा अर्थ कणेकरांच्या 'कणेकरी' च्या ध्वनिफीतीमधे शोधावा, कदाचित प्रस्तावना वा उपसंहारात सापडेल.

कर्म म्हणजे काय हे आधी जरासे सांगाहो विजुभाऊ !

कर्म म्हणजे काय हे आधी जरासे सांगाहो विजुभाऊ !

त्यासाठी वेगळा धागा काढतो आणि माझ्या अल्पमतीनुसार लिहुन बघतो. या धाग्याला फाटे नका फोडू.
अकर्मा अभोक्ता अकर्ता
विजय हा कमालीचा नर्सिसीस्ट दाखवलाय . कमालीचा आत्ममग्न आहे.
त्याच्या दृष्टीने जग हे फक्त काव्यात जगायला हवे.
चित्रपटातील व्यक्तीरेखा खूपच व्यवस्थीत मांडलेली आहे.
अवांतरः सु शींच्या दुनियादारी मधला एम के याच पठडीतला असावा

शरदिनी's picture

16 Feb 2011 - 2:37 pm | शरदिनी

हे असे भणंग जगणारे आणि स्वत:ला शहाणे समजणारे ओवररेटेड लोक हल्लेी बोकाळलेत फ़ार ..कोणेीहेी स्वत:ला काव्यकर्ता वगैरे समजायला लागलंकेी फ़ार प्र~ॉब्लेम होतात

कोणेीहेी स्वत:ला काव्यकर्ता वगैरे समजायला लागलंकेी फ़ार प्र~ॉब्लेम होतात
छे हो.. शरदिनी ताई,
तुमच्या समोर काय कोण पामर स्वत:ला काव्यकर्ता समजेल , काय कोणाची बिशाद असे स्वतःबध्द्लचे गैरसमजूत करुन घ्यायला ;-)

चिंतातुर जंतू's picture

16 Feb 2011 - 3:39 pm | चिंतातुर जंतू

विजय हा कमालीचा नर्सिसीस्ट दाखवलाय . कमालीचा आत्ममग्न आहे.
त्याच्या दृष्टीने जग हे फक्त काव्यात जगायला हवे.

अगदी बरोबर. पण माझ्या मते एखाद्या क्षेत्रात पुरेसं झोकून दिल्याखेरीज कोणतंच भरीव काम करता येत नाही. त्यासाठी आत्ममग्नता ही आवश्यक असते. कविता करणं हे कवीचं काम आहे असं जर मानलं तर त्यासाठी तो आत्ममग्न होणं स्वाभाविकच आहे. (जसं सैद्धांतिक गणितज्ज्ञाला आपल्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी आत्ममग्न व्हावं लागेल. म्हणूनच शास्त्रज्ञांच्या विक्षिप्त/कलंदरपणाचे किस्से सांगितले जातात.)

याउलट 'कविता करणं' हे काम असूच शकत नाही अशी भूमिका घेतली तर जगातले सगळेच कवी नालायक ठरतात.

सन्जोप राव's picture

16 Feb 2011 - 5:04 pm | सन्जोप राव

चर्चाप्रस्तावकाचा व्यासंग वाचून गु़ळाच्या संदर्भातली एक समर्पक म्हण आठवली.

विकास's picture

16 Feb 2011 - 5:11 pm | विकास

प्यासाबद्दलची निरिक्षणे आणि वर्णने आवडली. तो चित्रपट पहताना मला अक्षरशः एक काव्य बघत आहोत असे वाटत राहीले होते. यात केवळ त्या कथेचे श्रेय नसून तितकेच श्रेय दिग्दर्शनाचे आणि कलाकारांचे आहे.

वर रमताराम यांचे "विजय=कम्युनिस्ट" ह्या संदर्भातील मत जरी समजत असले तरी, मला तो काळ (जन्माला येण्याआधीचा असला तरी) ध्यानात घेता तो कम्युनिस्ट म्हणण्यात काही गैर वाटत नाही. विशेषतः "जर ऐन विशीत (तरूणाईत) तुम्ही कम्युनिस्ट नसलात तर तुम्हाला हृदय नाही" असे जेंव्हा म्हणले जाते तेंव्हा असे अनेक स्वप्नाळू कम्युनिस्ट आणि सोशालीस्ट त्या काळात तयार झाले होते असे वाटते.

बाकी निष्कर्म हा शब्द योग्य आहे का हे समजले नाही. मला त्याच्या स्वप्नाळू आणि कलाकाराच्या वृत्तीमुळे तो एकांगी (एक्सेंट्रीक) आहे असे वाटले. आणि अशा वृत्तीमुळेच जरी काही अंशी तो ओरीजिनल कवी झाला तरी व्यावहारीकता नसल्यावर काय होते हे त्याला शेवटी "ये दुनीया अगर मिल भी जाये तो क्या है" असे म्हणावे लागते... कुठेतरी "अशा जगास्तव काय कुढावे?" सारखे.

वर चिंजंनी म्हणल्याप्रमाणे "आत्ममग्नता" आवश्यक असते. जे कष्टाने तशी आत्ममग्नता जोपासत आपापल्या क्षेत्रात मनापासून काम करतात ते बर्‍याचदा यशस्वी होतात, मात्र ती ज्यांच्यात जन्मतःच असते ते बर्‍याचदा असामान्य होतात असा कुठेतरी भेद करावासा वाटतो.

अविनाशकुलकर्णी's picture

16 Feb 2011 - 6:28 pm | अविनाशकुलकर्णी

समाज वाद व समता या स्वप्नाळु विचारावर अनेक विचार वंतांनी मैदान मारले...
शेवटी प्रगतिजागतिकि करणाने झाली//

गणेशा's picture

16 Feb 2011 - 7:09 pm | गणेशा

परिक्षन छान .. प्यासा पाहिलेला नाहिये पण बरेच ऐकुन आहे..
बघेन कधीतरी .. पण असा काम धंदे न करणारा कवी ज्याचा घरुन ही तिरस्कार होतो म्हंटल्यावर
कवी नसणारा "देवदास" च डोळ्यासमोर येतो डायरेक्ट गुलाबो ऐवजी चंद्रमुखी आहेच ... पारो पण आहेच .. ती त्याला कधी मिळतच नाही..

अवांतर मजेने :

कवी काहीच करत नसतात हे एकवेळ मान्य करु शकतो पण काहीच न करणारे कवी असतात हे कदापी मान्य होणार नाही..

प्रदीप's picture

16 Feb 2011 - 8:00 pm | प्रदीप

चर्चाप्रवत्रकाचा आक्षेप, मला समजतो तो असा की, 'प्यासा'चा प्रॉटॅगॉनिस्ट, विजय अत्यंत आत्ममग्न आहे, नुसत्या कविता करण्यात वेळ घालवत फिरतो, काही कामधाम करीत नाही. सबब ती सगळी स्टोरी तकलादू वाटते (सन्जोप रावांना जसे 'धोबीघाटा'तील चित्रकाराला 'तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे रे भाड्या?' असे विचारावेसे वाटले, तसेच काहीसे सदर लेखकाला ह्या विजयविषयी म्हणायचे आहे).

मतलबी दुनिया, स्वार्थी समाजव्यवस्था- जी भावाला भाऊ मानू देत नाही, अगदी जुन्या मैत्रीचीही कदर जिथे रहात नाही, प्रेमही स्वार्थासाठी विसरले सहजपणे जाते--हा 'प्यासा'चा प्रमुख विषय आहे. त्यामुळे सगळा चित्रपट ह्या विषयांभोवती केंद्रीत आहे. त्यामुळे विजयने कामधंदा कसा व किती शोधला, त्यात त्याला यश आले अथवा नाही, ह्यावर फार उघड टिपण्णी त्यात नाही. पण ह्यावरून त्याने काहीही कामधंदा शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही असा होतो काय? नाही म्हटले तरी दोन घटना आहेतच की -- एक, विजय चक्क हमालाचे काम करतो व एका शेटजीचे सामान त्याच्या गाडीत नेऊन ठेवतो, ती. दुसरी आहे, जेव्हा त्याच्या पूर्वीच्या प्रेयसीचा नवरा त्याला काम ऑफर करतो, तेव्हा तो त्याच्या पब्लिशींग हाऊसमधे काम करण्यास तयार होतो, ती. ( 'क्या करते हो?' ह्या रेहमानच्या प्रश्नाला 'नोकरी की तलाश करता हूं' असे उत्तर तेव्हा विजयने दिले आहे).

खूप विचारपूर्वक केलेले चित्रीकरण (नवनवे प्रयोग करणारी सिनेमॅटोग्राफी), अब्रार अल्वींचे चटपटीत, स्टॅकॅटो संवाद, अर्थपूरण गीते व संगीत व त्यांचे प्रवाही चित्रीकरण ह्यांसारख्या वैविध्यांबरोबरच गुरू दत्तच्या चित्रणाचे एक वैशिष्ट्य होते अत्यंत टाईट एडिटींग. त्या अगदी काँम्पॅक्ट एडिटींगच्या त्याच्या शैलीमुळे चित्रपटाचा जो गाभा त्याला दर्शवायचा आहे, त्यावर सर्व काही केंद्रीत झालेले आहे. त्यामुळे त्याने कसे अनेक ठिकाणी नोकरी मिळवण्याचे प्रयत्न केले (असावेत), त्यात आलेले अपयश, इ. विषयी तो फक्त अप्रत्यक्षरित्या टिपण्णी करतो. हेही गुरू दत्तचे खास वैषिष्ट्य-- सगळे अगदी उघड, ठळठळीत करून मांडायचे, म्हणजे प्रेक्षक (तेव्हा)वेफर्स/(आता) पॉप्कॉर्न्स खात सुस्कारे सोडत रहाणार, हा त्याचा मार्ग अजिबात नव्हता. त्यामुळे केवळ काही दृष्यांतून त्याने विजयची कंगाली उभी केलेली आहे.

चर्चालेखकाने बर्‍याच औपरोधिक सुरात चित्रपटाच्या पहिल्याच सिक्वेन्सचा (टायटल्स येतात तो) उल्लेख केलेला आहे. त्यात ('ये हंसते हुवे फूल') नुसती कविची गोडगोड बडबड नाही, तर डोळ्यादेखत चिरडलेल्या गेलेल्या फूलपांखराची दु:खद दखलही आहे ('मै दूं भी तो क्या दूं तुम्हे ऐ शौख नजारों, ले दे के मेरे पास, कुछ आंसू है, कुछ आहें'), त्यातून झालेली हताश तगमग आहे , तेव्हा हा नुसता क्लॉयिंग कविता करणारा कवि नाही, तर त्यात एक आजूबाजूच्या जगाविषयी एंपथी दडलेली आहे हे एस्टॅब्लिश होते-- आणी ते टायट्ल्स सुरू असतांना!.

कुणीतरी प्यासाची भलावण केल्याने चर्चालेखकाप्रमाणे मीही माझ्या अगदी टीनेजमधे तो पहिल्यांदा पाहिला. तेव्हा तो आवडला. त्यानंतर तो अनेकदा पाहिला, आणि प्रत्येक वेळा तो तितकाच आवडत आलेला आहे. नंतर आयुष्ञामधे अनेक देशो विदेशी चित्रपट पहाण्याचा योग आला, आजूबाजूच्या मित्रमंडळींमुळे व थोडीफार माझ्या कार्यक्षेत्रामुळे त्या माध्यमाची जाण येत गेली. इतके सर्व असूनही मला गुरू दत्तचे 'प्यासा' व 'कागज के फूल' अत्यंत उच्च दर्जाचे अजूनही वाटत आलेले आहेत.

अलख निरंजन's picture

16 Feb 2011 - 9:26 pm | अलख निरंजन

(सन्जोप रावांना जसे 'धोबीघाटा'तील चित्रकाराला 'तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे रे भाड्या?' असे विचारावेसे वाटले, तसेच काहीसे सदर लेखकाला ह्या विजयविषयी म्हणायचे आहे).

आणि गंमतीचा भाग म्हणजे तेच संजोप राव इथे गुळाशी संबधीत म्हण देत आहेत.

चित्रा's picture

17 Feb 2011 - 4:02 am | चित्रा

उत्तम प्रतिसाद आणि रसग्रहण.

तिमा's picture

18 Feb 2011 - 7:26 pm | तिमा

सर्व प्रकारच्या उत्कट कवितांचे विरजण लावून दही करण्यात येईल. त्या दह्याचा चक्का न करता त्यात आळ्या पडेपर्यंत तसेच ठेवण्यात येईल. त्यानंतर त्या आळ्या जन्माला घातल्याबद्दल सर्व कविंना जबाबदार ठरवण्यात येईल.

काल पुन्हा एकदा प्यासा पाहिला.
या वेळेला कथेपेक्षा कॅमेरा चे अँगल्स , आणि उजेडाच्या छटांमधे जास्त गुंतलो.
प्यासा जितक्यांदा पहाल तितक्यांदा तो वेगळ्याच प्रकारासाठी आवडायला लागतो

विजुभाऊ's picture

16 Feb 2011 - 10:06 pm | विजुभाऊ

प्यासा मी बरेच वेळा वेगवेगळ्या मनस्थितीत पाहिला आहे. कॉलेजच्या स्वप्नाळू वयात , नोकरी शोधतानाच्या वयात , प्रेमात पडण्याच्या वयात , प्रेमभंगानन्तर , लग्नानन्तर पत्नीसोबत , आणि आता थोड्याशा या सर्व भागडीतून बाहेर येवून त्रयस्थपने सुद्धा पाहिला आहे.
प्रत्येकवेळेस तो वेगवेगळ्या कारणाम्मुळे भावला आहे. अजूनही भावतो. वरच्या लेखात मी फक्त त्यातील एका व्यक्तीरेखेच्या कॅरॅक्टरडेव्हलपमेन्ट बद्दल लिहिले आहे.
प्यासा एकट्या विजयचा नाही. तो नीट दान पडत नसतानादेखील आयूष्य मजेत जगणार्‍या तेलमालीशवाल्याचा आहे. तो गुलाबोचा आहे. तो मालासिन्हाचा आहे, तितकाच व्यवहारी रहमानचा आहे

चिंतातुर जंतू's picture

18 Feb 2011 - 11:36 am | चिंतातुर जंतू

प्यासा एकट्या विजयचा नाही. तो नीट दान पडत नसतानादेखील आयूष्य मजेत जगणार्‍या तेलमालीशवाल्याचा आहे. तो गुलाबोचा आहे. तो मालासिन्हाचा आहे, तितकाच व्यवहारी रहमानचा आहे

कोणत्याही चित्रपटात अनेक पात्रं असतात हे मान्य करूनही एक प्रश्न विचारावा लागतो: प्रेक्षकानं अखेर कुणाच्या बाजूनं आपली सहानुभूती दाखवावी असं दिग्दर्शकाला अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? असा प्रश्न विचारल्यावर कवी हा चित्रपटाचा नायक अभिप्रेत आहे (जॉनी वॉकर किंवा रेहमानची पात्रं नव्हे) हे मान्य करावं लागेल. जर कवी हा नायक मानला, तर मग जी त्याला खरी समजून घेते आणि त्याची साथ सोडत नाही ती गुलाबो ही नायिका ठरते. आता या परिप्रेक्ष्यात माला सिन्हा आणि रेहमानची पात्रं कुठे बसतात त्यावरून त्यांचं चित्रपटातलं स्थान ठरतं.

प्रदीप's picture

18 Feb 2011 - 8:16 pm | प्रदीप

चित्रपटाचे जे पात्र मध्यवर्ती आहे (आणि ते तसे आहे हे अगदी उघड आहे) त्याच्या मर्माविषयी, त्याच्या दु:खांविषयी चर्चालेखक अगदी तटस्थ आहे, किंबहुना त्याच्या जीवनप्रेरणांची त्याने मूळ लेखात खिल्लीच उडवली आहे.अर्थात लेखकाच्या प्रामाणिक मतांचा मला आदर आहे. त्यामुळे इथे प्यासाचा दिग्दर्शक लेखकापर्यंत पोहोचण्यात अयशस्वी झाला आहे असे म्हणावे लागेल. पण इतके सगळे असूनही पुन्हापुन्हा तो चित्रपट पहावासा वाटला हे अजब आहे. हे सगळे म्हणजे" 'अनपढ' मधील सगळी गाणी अत्यंत आवडली हो, फक्त त्यातील लता मात्र आवडली नाही" असे म्हणण्यासारखे आहे.

राजेश घासकडवी's picture

18 Feb 2011 - 9:50 am | राजेश घासकडवी

मला तो चित्रपट कलाकृती म्हणजे काय वा बाजारू यश म्हणजे काय या विषयाचा ऊहापोह करणारा वाटला. जिच्यावर प्रेम केलं ती यशाच्या मागे गेली, आणि तथाकथित 'बाजारी' बाई प्रेमात पडली. जेव्हा मनापासून कविता लिहिली तेव्हा लोकांनी त्याच्याकडे मुडदा असल्याप्रमाणे दुर्लक्ष केलं, आणि मेला आहे असं वाटल्यावर डोक्यावर घेऊन नाचले. जिवंत होऊन आल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या. अशा जगात काय अर्थ आहे? जगून नक्की काय साधायचं? असा प्रश्न आहे.

विजुभाऊ's picture

18 Feb 2011 - 10:12 pm | विजुभाऊ

प्रदीपजी प्यासा मला प्रत्येकवेळेस भावलाच आहे. मी यातील व्यक्तीरेखेबद्दल लिहीले आहे.
ती व्यक्तीरेखा मला आवडली नाही असे नाही. पण त्याबद्दल वेगवेगळ्या वयात काय वाटले ते लिहीले आहे.
कॉलेजात असताना तो कवी म्हणून खूप जवळचा वाटला होता. ट्रॅजेडी वर प्रेम करण्याचे वय होते. अमिताभ बच्चन चा अँग्री मॅन जवळ॑चा वातायचा पण कुठेतरे तो आपल्या मातीतला वाटायचा नाही . त्याच्या चित्रपटातील समस्या कुठेतरी दूरवरच्या वाटायच्या . मागे पडलेल्या राजेशखन्नाचा आजारी हीरो नकोसा वाटायचा. देव आनन्दचा हीरो खूपसा जवळचा आवडायचा.
प्यासा पाहीला तेंव्हा त्या अवस्थेतले काही मित्र माहीत होते. स्वतःच्या पायावर उभे रहाण्यात आलेल्या अडचणी माहीत होत होत्या. त्या वेळेस प्यासातील विजय खूप जवळचा वाटला.
आता मध्यमवयात पैशाचे महत्व कळल्या नन्तर प्यासातील विजय बद्दल वाईट वाटते पण त्याचवेळेस जमान्यावर जय मिळवण्यासाठी विजय नैराश्यावर मात करू शकला नाही याचे वैशम्य वाटते.
आपण त्या अवस्थेतून लवकर बाहेर आलो. अन्यथा आपली अवस्था काय असती असाही विचार असतो.
प्यासा तील त्या व्यक्तीरेखेवर इतक्या वर्षांनन्तर देखील आपल्याला चर्चा कराविशी वाटते यातच बरेच काही आले.
अभिनेत्याच्या अभिनयापेक्षा चित्रपटातील व्यक्तीरेखेवर चर्चा कराविशी वाटणे हे त्या लेखाचे यश असते

चिंतामणी's picture

9 Dec 2015 - 1:35 pm | चिंतामणी

म्हणून तो पहायच्या अगोदरच मी तो ग्रेट ठरवून टाकला होता.

बरोबर?????

विजुभाऊ's picture

4 Jan 2021 - 9:49 am | विजुभाऊ

काल परत एकदा प्यासा पाहिला
आणि मुद्दाम हा लेख आठवला.
चित्रपट आवडतो मात्र पात्राबद्दल प्रथम ममत्व, कणव येते नंतर मात्र त्या पात्राचे वागणे न आवडणारे असे वाटू लागते
मात्र पात्र डोक्यात घर करून रहाते हे चित्रपटाचे यश. लेखकाचे यश
इतक्या वर्षांनंतरही समजाची , लोकांची विचार करायची पद्धत बदललेली नाहिय्ये