प्रवास छान व्हावा
छान असते कल्पना बाबाची
टू -टायर ए.सी. ची तिकिटे
[मन श्रीमंत करण्यासाठी कधीतरी खर्च करावारे ..
उद्याची काळजी त्या गजाननाला ]
मस्त थंड डबा
सोबतआई नि बाबा
त्यांच्यां मनात दाटून येत असतो भक्तीचा उमाळा
रात्री छान झोप
पहाटे पहाटे आलेली जाग
दिसत असतात मला शेताचे हिरवे गार तुकडे
झाडाला लोंबत असतात शिंपी पक्षाची घरटी
पाखरांचे आवाज
मी आपल्यातच मस्त
मी विसरून जात असतो
त्या महानगरातले जगणे
किडामुंगी होऊन ...!!
कोठ्ल्याशा गावात देवळाच्या कळसावरती लाऊड स्पीकरचा भोंगा
नि गळत असते भीमसेन जोशीची अभंग वाणी
बाबा असतात सोबत खूप वर्षांनी
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद
त्याच्या डोळ्यातून ओघळत असतो
आम्ही सायकल रिक्षाने जातो
भाडे न मागता बाबा टिकवतात पन्नास रुपयाची नोट
रिक्षावाल्याच्या हातावर.....
त्याच्या डोळ्यात
सकाळी सकाळी आनंदाश्रू ...!!
*******
मग असाच अचानक गेलो
तोच डबा तसेच वातावरण
तेच शिम्पिपक्ष्याची
लोंबकळणारी घरटी
शेताचे चौकोनी तुकडे
तेच आभाळ
सायकल रिक्षावाला कोण कुणास ठाऊक .?
मीपण काढून देतोय त्याला पन्नास रुपयाची नोट
त्याच्या हातावर
पण देणारा मी होतो
[बाबाच्या आठवणीसाठी ...!!]
बाबा मागच्या प्रवासा नंतर हरवून गेले होते
परतीचा प्रवास
संपून गेला होता ...!!
मी मुका ..!
विषन्न ...!!
केविलवाणा ....!!!
हरवलेले बाबा नि मी असा
मी न शोधता त्यांचा चेहरा समोर येतोय सारखा
शिंपी पक्ष्यांची लोंबकळणारी घरटी
टांगून फांदीला
वटवाघळासारखी
मी तसाच लोंबत आठवणींना ...!!
प्रतिक्रिया
16 Feb 2011 - 9:15 am | मदनबाण
:(
16 Feb 2011 - 11:32 am | कच्ची कैरी
बर्याच दिवसांनी तुमची कविता वाचली छान वाटले .
16 Feb 2011 - 1:30 pm | गणेशा
खुपच टची कविता ..
शब्दांपेक्षा ही जास्त बोलकी ....
भावना आणि निसर्ग यांच सुंदर मिश्रण नेहमीच तुमच्या कवितेत आढळते..
मला भावनात्मक आणि निसर्ग कविता आवडतात ... त्या दोन्हींची इतकी छान गुंफन तुम्ही करता ते पाहुन आनखिनच छान वाटते..
28 Feb 2011 - 3:28 pm | टारझन
प्रतिक्रीया आवडली गणेशा :)
17 Feb 2011 - 11:37 am | फ्रॅक्चर बंड्या
अप्रतिम..
एकदम काळजाला भिडली..
23 Feb 2011 - 2:45 pm | पियुशा
चान जमलिय कि !
23 Feb 2011 - 3:01 pm | नगरीनिरंजन
छान आहे कविता. जवळचं कोणी परतीचा प्रवास करून गेल्यावर आणि नकळत आपणही त्याच रस्त्यावर चालत असताना त्यांच्या पाऊलखुणा शेवटपर्यंत दिसत राहतात.
28 Feb 2011 - 3:16 pm | अशोक७०७
ग्रेट. प्रवास चालू राहू द्या.