अभिजात साहित्य म्हणजे काय? - इति इटालो कॅल्विनो

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
13 Feb 2011 - 2:34 am
गाभा: 

माझ्या आसपास असणाऱ्या पुष्कळ जणांना वाचनाची किंवा चित्रपट पाहण्याची आवड असते. काहीतरी सकस पहावं/वाचावं अशी इच्छाही असते. स्वत:ची अशी काहीएक आवडनिवडसुद्धा असते. पण विशिष्ट प्रकारच्या पुस्तक/चित्रपटांविषयी त्यांच्या मनात अढी म्हणा, संशय म्हणा असं काहीतरी असतं. ते का वाचावं/पहावं याविषयी त्यांच्या मनात संभ्रम किंवा कधी कधी सरळ नकारच असतो, पण त्याविषयी जाणून घेण्याची इच्छाही असते. किंवा ते कळायला कठीण जाईल असं वाटत असतं, पण कळून घ्यायचे कष्टदेखील घेण्याच्या लायकीचं ते आहे का याची खात्री नसते. मग ते उदा. असे काही प्रश्न विचारतात.

  • आधुनिकोत्तर कादंबरी का वाचावी?
  • पाश्चिमात्य साहित्य का वाचावं?
  • समांतर प्रवाहातले चित्रपट का पहावे?
  • हॉलिवूड सोडून इतर देशांचे सिनेमे का पहावे?
  • लोकप्रिय साहित्य चांगलं मानावं का? की वाईटच मानावं?
  • माझी आवड आणि चांगलं साहित्य याचा मेळ कसा घालावा?

या सर्व प्रश्नांना माझं साधं उत्तर असं असतं की जे जे उत्तम असू शकेल असं वाटतं ते ते वाचत/पहात जावं. पण मग अर्थात प्रश्न पडतो की उत्तम काय ते कसं ठरवावं? आणि ते व्यक्तिनिरपेक्ष किंवा कालातीत किंवा संस्कृतीनिरपेक्ष असतं का?

या सर्वाची आणि माझ्या एका आवडत्या लेखकाची आठवण 'लोकप्रिय आणि अभिजात साहित्य' या धाग्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा झाली. धाग्यावर प्रतिसाद देता देता तो फार लांब होऊ लागला. म्हणून एक स्वतंत्र धागा काढण्याचं ठरवलं.

इटालो कॅल्विनो या लेखकाचे काही पूर्वप्रकाशित निबंध ‘व्हाय रीड द क्लासिक्स?’ या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यात विविध जुन्या-नव्या, त्याच्या मते अभिजात अशा लेखकांविषयी विवेचन आहे. पण त्याशिवाय अभिजात साहित्याची व्यवच्छेदक लक्षणंसुद्धा सांगितली आहेत. ती समजून घेतली तर कदाचित वरच्या प्रश्नांची काहीतरी तड लावता येईल असं वाटतं. कारण जर एखादी गोष्ट (उदा. आधुनिकोत्तर कादंबरी किंवा रंजक न वाटणारा समांतर सिनेमा, वगैरे) अभिजात म्हणता येईल अशी (किमान काही) लक्षणं तीत असतील, तर ती उत्तम/चांगली असेल आणि उत्तम असेल तर मग त्याच्या आस्वादासाठी ते एक पुरेसं कारण ठरेल. म्हणून कॅल्विनोचं निरुपण इथे माझ्या शब्दांत देतो आहे.

(यापुढचं विवेचन पुस्तकाच्या अंगानं केलेलं आहे, पण ते उदा. चित्रपटालाही लागू व्हावं.)

एखादं पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं का? – एखादं पुस्तक तरुण वयात वाचलेलं असतं आणि तेव्हा ते तेव्हाच्या समजेनुसार समजलेलं असतं/नसतं; आवडलेलं असतं/नसतं. पण वय/अनुभव/समज वाढल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याकडे जावंसं वाटतं का? ते पुन्हा वाचल्यावर आवडेल असंही नाही. तरीही हे पुन्हा त्याकडे जावंसं वाटणं महत्त्वाचं आहे. कारण नव्यानं जाणवतील अशा पातळ्या, तपशील किंवा अर्थ त्या पुस्तकात असू शकतात याचं हे निर्देशक आहे. कधी कधी असंही होतं की एखादं पुस्तक पुन्हा वाचायला घेतोय असं कुणीतरी म्हणतं तेव्हा खरंतर ते पुस्तक त्यांनी पहिल्यांदाच वाचायला घेतलेलं असतं; पण इतकं वय होईपर्यंत आपण ते वाचलेलंच नाही हे सांगायलासुद्धा लाज वाटत असते. अशी लाज वाटणं हीदेखील त्या पुस्तकाच्या अभिजाततेची एक खूण मानता येईल.

कधीकधी एखाद्या पुस्तकाच्या पूर्वीच्या वाचनानं आपल्यावर नकळत ठसा उमटवलेला असतो. आपल्याला त्याची जाणीवही नसते. पण पुन्हा वाचण्यानं आपल्यावरचा हा परिणाम अधोरेखित होतो आणि लक्षात येतो. किंवा असंही होऊ शकतं की एखादी व्यक्ती, घटना किंवा संवेदना आपल्याला एखाद्या पुस्तकाची आठवण करून देते. तेव्हा आपल्याला त्या पुस्तकाचा आपल्यावर नकळत झालेला परिणाम जाणवतो. उदा: अजिंठ्याच्या एखाद्या गुंफेत आपल्याला जे वाटतं ते ‘कोसला’मध्ये नेमाड्यांनी आधीच नेमकेपणानं आणि द्रष्टेपणानं लिहून ठेवलेलं आहे असं एखाद्याला कोसला वाचल्यानंतर अनेक वर्षांनी जाणवू शकतं.

यामुळे अजून एक गोष्ट सांगता येते. त्या पुस्तकाच्या प्रत्येक वाचनातून काहीतरी नवीन शोध लागत असावा असं वाटतं का? म्हणजे प्रत्येक वाचन हे नव्यानं वाचन केल्यासारखंच होतं का?

आता याच्या उलट जाऊन असं म्हणूया की अगदी पहिल्या वाचनातही काहीतरी ओळख पटल्यासारखं होतं का? एखादा अपरिचित माणूस पहिल्यांदा भेटतो तेव्हाच कधी कधी एखाद्या सुहृदाप्रमाणे गप्पा होतात, कारण काहीतरी नाळ जुळते; तसं काहीसं हे आहे.

अभिजात पुस्तकं ज्या भाषांत किंवा संस्कृतींत पोचतात तिथे ती आपल्यामागे काही पाऊलखुणा ठेवून जातात. उदा: ‘एक दूजे के लिए’ आणि ‘टायटॅनिक’पर्यंत अनेकांना ‘रोमिओ-ज्युलिएट’नं खाद्य पुरवलं. तुकारामानं मराठीला कितीतरी वाक्प्रचार दिले. हे केवळ जुन्या साहित्याला लागू होतं असं नाही. आपापल्या लिखाणात नव्यानं आलेल्या संवेदनांमुळे काफ्कानं ‘काफ्काएस्क’ आणि हॅरॉल्ड पिंटरनं ‘पिंटरेस्क’ अशी विशेषणं इंग्रजीला दिली. ही विसाव्या शतकाची देणगी आहे. भाऊ पाध्ये यांच्या ‘राडा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत (दुसरी आवृत्ती) भालचंद्र नेमाडे ‘राडा’च्या वैशिष्ट्यांविषयी लिहितात. श्याम मनोहर आणि राजन गवस या लेखकांच्या कथा-कादंबऱ्यांमधली पात्रं ‘राडा’विषयी काय बोलतात आणि त्यातून व्यक्तिचित्रण कसं केलं आहे हे त्या प्रस्तावनेत एका ठिकाणी नेमाडे सांगतात. ‘भाऊ पाध्ये वाचणारं किंवा त्यांच्याविषयी नाखुषी व्यक्त करणारं पात्र त्या कृतीतून कळत-नकळत स्वत:विषयी वाचकाला काहीतरी सांगत असणं’, या वाङ्मयीन रचनेत भाऊ पाध्ये यांच्या लिखाणामुळे मराठी साहित्यात आलेली क्रांती वाचकाला माहीत आहे, हे गृहित असतं. ते एक सांस्कृतिक संचित असतं.

अभिजात पुस्तकांचं अजून एक लक्षण म्हणजे ती आपल्या विविध अर्थबोधनांना (इंटरप्रिटेशन्स) मिरवत येतात. कधीकधी असंही होतं की वेगवेगळ्या लोकांनी वेळोवेळी काढलेले वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ, पुस्तकाच्या आसपासची माहिती (उदा. लेखकाची लफडी आणि त्यांचा पुस्तकावर असलेला परिणाम वगैरे), अशा पुष्कळ अंगांनी उपलब्ध असणाऱ्या पुस्तकाविषयीच्या गोष्टी जणू एखाद्या धुक्याप्रमाणे त्या पुस्तकाला वेढून बसलेल्या असतात.

इतरांनी केलेलं हे बाकीचं सर्व (अर्थबोधनं, रसग्रहण, नक्कल वगैरे) सोडून मूळ पुस्तक वाचायचा आग्रह लोक पुन्हा पुन्हा धरतात. म्हणजे इतकी अर्थबोधनं मिरवत असूनदेखील मूळ पुस्तक वाचण्याचा अनुभव हा त्याबद्दलचं कोणतंही अर्थबोधन किंवा रसग्रहण यांहून वेगळाच असा एक विलक्षण अनुभव असतो. म्हणजे सांगोवांगीवरून आपल्या मनात त्या पुस्तकाविषयी जी प्रतिमा किंवा जे मत असतं त्यापेक्षा ते प्रत्यक्ष वाचणं हा एक अनोखा आणि अनपेक्षित अनुभव असतो.

याचाच अर्थ असा होतो की कर्तव्य किंवा आदराच्या भावनेनं वाचण्यापेक्षा ते पुस्तक प्रेमापोटी वाचलं जातं. म्हणजेच त्या पुस्तकाचं आणि आपलं काहीतरी व्यक्तिगत संधान बनतं किंवा त्याच्याशी काहीतरी एकतानता निर्माण होते.

अभिजात पुस्तकातून एक अख्खं विश्व उभं केल्याचा भास होतो. ते तुमचंच आहे असं वाटेलच असं नाही. तुम्ही त्याच्याबद्दल उदासीन (न्यूट्रल) मात्र राहू शकत नाही. जणू त्याच्या बाजूनं किंवा विरोधात उभं राहण्यानं तुम्ही स्वत:ला सिद्ध करत असता किंवा आपण कोण आहोत आणि काय आहोत याची ओळख पटवून देत असता. (म्हणजे आधुनिकोत्तर कादंबरीच्या ठाम विरोधात राहूनसुद्धा कदाचित तुम्ही तिचं महत्त्वच अधोरेखित करत असू शकता! ;-))

अनेकदा असंही होतं की अनेक अभिजात पुस्तकं वाचलेले लोक एखाद्या पुस्तकाबद्दल बोलताना त्या इतर अभिजात पुस्तकांच्या संदर्भचौकटींत हे पुस्तक कुठे आहे हे दाखवू लागतात. म्हणजे त्या मांदियाळीत एखाद्या पुस्तकाचं स्थान चर्चिलं जाणं किंवा अधोरेखित होणं हीदेखील ते पुस्तक अभिजात असल्याची एक खूण असते.

समकालीन वास्तव हे सतत आपल्यापर्यंत येऊन आदळत असतं. यात आपलं दैनंदिन आयुष्य, दहशतवादी हल्ले, जाहिराती किंवा वृत्तपत्रांसारख्या अनेक गोष्टी असतात. पण या सर्व गोष्टी दुरून येणाऱ्या रहदारीच्या आवाजासारख्या वाटाव्यात, असं अभिजात साहित्य वाचताना होतं. आणि तरीही आपल्या समकालीन वास्तवात आपण जे असतो त्या आपल्या अस्तित्वामुळेच अभिजात साहित्य आपल्यावर हा परिणाम करू शकतं. म्हणजे समकालीनतेला पर्यायही नाही आणि तरीही निव्वळ त्यात अडकून न राहता अभिजात साहित्य आपल्याला त्या पलीकडे नेतं.

आणि निव्वळ एवढंच नाही तर आपण आपलं (समकालीन) आयुष्य जगत असताना हे अभिजात साहित्य पार्श्वभूमीवर का होईना, पण आपल्यासोबत असतं.

असं सगळं सांगून कॅल्विनो म्हणतो की प्रत्येकानं आपापल्या पसंतीच्या अभिजात पुस्तकांच्या ग्रंथालयाचा शोध घेत राहिला पाहिजे. त्यातला अर्धा भाग आपण वाचलेली आणि आपल्याला अभिजात वाटलेली पुस्तकं यांच्यासाठी राखून ठेवायला हवा, पण कधीतरी आपण नक्की वाचून काढायची असं ठरवलेली, ज्यांचा आपल्याशी काही संबंध लागू शकेल असं ज्यांच्याविषयी वाटतं अशांसाठीही त्यातला अर्धा भाग ठेवला पाहिजे. आणि शिवाय अनपेक्षितरीत्या त्यात समाविष्ट होतील अशा काही पुस्तकांचा शोध लागेल, त्यांच्यासाठीही थोडी जागा शिल्लक ठेवली पाहिजे.

आपण कोण आहोत आणि आत्ता आपण कुठे आहोत हे आपल्याला आपल्या आसपासच्या (स्थानिक) अभिजात पुस्तकांमुळे समजतं तसंच त्याच्याशी तुलना करण्यासाठी आपल्याहून वेगळं काय आहे/होतं हे आपल्याला दूरच्या संस्कृतीतल्या पुस्तकांपासून समजतं त्यामुळे त्या दोहोंची (स्थानिक आणि परकीय अभिजात पुस्तकं) आपल्याला गरज आहे.

शेवटी कॅल्विनो म्हणतो की अभिजात पुस्तकांतून काही हेतू साध्य होतो का यावर भर देण्यापेक्षा मी असं म्हणेन की अभिजात साहित्य वाचणं हे ते न वाचण्यापेक्षा चांगलं असतं.

हे विवेचन वाचल्यावर आता एक गोष्ट स्पष्ट व्हावी की लोकप्रियतेपेक्षा दूरगामी आणि बहुपेडी परिणामांवर इथे भर आहे. उदा: आज शेक्सपिअर किंवा तुकाराम किती लोकप्रिय आहे यापेक्षा कळत-नकळत तो आपल्या रोजच्या भाषेत किंवा संस्कृतीत किती आहे याला इथे महत्त्व आहे. त्या बरोबरच वेगवेगळे अर्थ ज्यातून काढता येतील किंवा वेगवेगळ्या अंगांनी ज्याचा अभ्यास करता येईल अशा गोष्टींना इथे महत्त्व आहे.

या विवेचनातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे हे व्यक्तिसापेक्ष आहे. एका ठिकाणी कॅल्विनो असंही मान्य करतो की रसिकमान्यतेद्वारे एक प्रकारचं बाळकडू म्हणून आपल्याला अभिजात अशी जी काही यादी मिळते त्यातून (आणि त्या व्यतिरिक्तही) आपल्याजवळ जाणारं असं अभिजात साहित्य आपण धुंडाळायचं असतं.

विरोधाचा मुद्दाही मला रोचक वाटतो. म्हणजे रसिकमान्य अशा एखाद्या अभिजात पुस्तकाविषयी मला विशेष काही वाटत नाही हे मला पुन्हा पुन्हा अधोरेखित करायला लागणं हेदेखील एक अभिजाततेचं लक्षण असणं हे मला रोचक वाटलं. मात्र विरोधाच्या मुद्दयामुळे इथे हेदेखील लक्षात घ्यायला हवं की एखादा साहित्यप्रकारच मला आवडत नाही म्हणून ते अभिजात होऊच शकत नाही अशी आणि एवढी व्यापक सूट मात्र यात दिसत नाही. ‘लघुकथा हे काय साहित्य आहे का’ असं म्हणून नेमाडे त्याला झिडकारतात. तितकी व्यक्तिसापेक्षता इथे अभिप्रेत नसावी असं वाटतं.

हे विवेचन थोडं गोंधळात टाकणारं वाटू शकेल याची मला जाणीव आहे; पण साहित्य आणि त्याचं आकलन ही गोष्ट गणिताप्रमाणे काटेकोर, नियमबद्ध आणि सूत्रबद्ध करता येईल अशी अपेक्षा अवाजवी आहे, असंही वाटतं. मुळात मानवी जाणिवा आणि संवेदना यांचं थोडंफार विश्लेषण करता येईल, पण त्यांची काटेकोर प्रतवारी करता येणं (सध्या तरी) कठीण आहे. त्यामुळे त्या दृग्गोचर करणाऱ्या साहित्याबाबतीतदेखील असंच म्हणावं लागेल. अखेर एवढंच म्हणतो की यातून काही सुस्पष्टता आली असेल तर त्याचं श्रेय माझं नसून कॅल्विनोचं आहे.

प्रतिक्रिया

पुस्तक आवडण्याची मला आवडलेली कारणमीमांसा माझ्या आवडत्या लेखिकेने खूप सुंदर शब्दात मांडली आहे -

A passionate woman I like my men and books to knock my socks off. It's got to be love at first sight. I need to be bowled over by an author's insight to wonder how I lived before the book explained it all to me, or how the author knew me so well. - Sarah Ban Breathnach

ही लेखिका माझी अवडती आहेच पण ज्या इन्टेन्सिटीने तिने पुस्तकांबद्दलचा हा सुंदर विचार मांडला आहे की मी तिची पंखाच झाले आहे.
_________________________________________

>> अभिजात पुस्तकांचं अजून एक लक्षण म्हणजे ती आपल्या विविध अर्थबोधनांना (इंटरप्रिटेशन्स) मिरवत येतात. >>
खरं आहे. असे एक पुस्तक मला सांगता येईल - "अ‍ॅलीस इन वंडरलँड" (जाईची नवलकहाणी). याचे स्पष्टीकरण मी जालावर वाचलेले २ प्रकारचे - (१) या पुस्तकात अध्यात्मिक , गूढ दुनिया लेखकाने साकार केली आहे (२) ड्रग्ज घेऊन सायकेडेलिक असे अनुभव या गोष्टीमध्ये मांडले आहेत.

मुक्तसुनीत's picture

13 Feb 2011 - 5:09 am | मुक्तसुनीत

उत्तम लेख. सविस्तर प्रतिसाद जेव्हा जमेल तेव्हा आणि झेपेल तितपत देता यावा म्हणून ही जागा राखून ठेवत आहे. माझा प्रस्तुत प्रतिसाद अत्यंत संकीर्ण आहे. प्रस्तुत धाग्यातल्या प्रस्तावाच्या अभ्यासपूर्ण विवेचनाशी सांधा राखणारा नाही.

वाचन किंवा कुठल्याही आस्वाद्यमान कृतीस सामोरे जाताना विंदा करंदीकरांची दोन वचने नेहमी मनात रुंजी घालत असतात :

१. "कविता कशी भोगावी ? कपडे काढून भोगावी !" बस्स. पूर्वग्रहांचे , पूर्वसंस्कारांचे चष्मे जमतील तसे बाजूला ठेवून सामोरे जाणे. हे नेहमी जमत नाही. परंतु "काशीस जावें नित्य वदावें".

२. "रक्तामधल्या प्रश्नांकरता पृथ्वीकडून होकार घ्यावे". ज्या कृती/अनुभवामधे उकळते रक्त असेल - मग ती अभिजात असो, आधुनिक असो, (समजणार्‍या भाषांपैकी ) कुठल्याही भाषेतली असो, कुठल्याही सांस्कृतिक पार्श्वभूमीतली असो - तिच्यातून काही नवे उमजणार असेल तिला सामोरे जावे.

नंदन's picture

13 Feb 2011 - 5:13 am | नंदन

लेख आवडला. अनुवादित केलेला भाग वाचताना पटत गेला. एकंदरीत कितीही नाही म्हटलं, तरी प्रत्येकाच्याच मनात पूर्वग्रह असतात. वेळोवेळी ते तपासून, प्रसंगी त्यांना आव्हान देत परिचित वाटांचा सुखद, ओळखीचा आसरा सोडून नवीन काही वाचण्याचा/पाहण्याचा प्रयत्न (ज्याला इच्छा असेल त्याने) केल्यास बर्‍याचदा अकल्पित, वेगळ्या गोष्टी कळतात.

अर्थात यातही अनेक गट आहेत. आपल्यालाच नवीन गोष्टीचा शोध लागला आहे असा दरवेळी दावा करणारे, राजाने कपडे घातलेले नाहीत हे सांगण्यास कचरणारे नि त्याउलट दरवेळी आपण दुसर्‍यांचं दंभ उपहासाने उघडकीला आणतो असा दावा करून त्याच धुंदीत मश्गुल असणारे, 'आम्ही काय बॉ सामान्य माणसं' असा खोट्या विनयाचा मुखवटा चढवणारे असे अनेक प्रकार. असो.

अभिजात पुस्तकांतून काही हेतू साध्य होतो का यावर भर देण्यापेक्षा मी असं म्हणेन की अभिजात साहित्य वाचणं हे ते न वाचण्यापेक्षा चांगलं असतं.

हे वाचून सॉमरसेट मॉमच्या 'बुक बॅग'मधलं आवडीचं वाक्य आठवलं (....ऑफ दॅट लॅमेन्टेबल कंपनी अ‍ॅम आय)

श्रावण मोडक's picture

13 Feb 2011 - 11:43 am | श्रावण मोडक

अंबरिश मिश्र यांच्याकडून थोडं उधार घेत - धूसर काही जीवघेणे!
हे लेखन या प्रकारातले आहे. म्हटलं तर बरंच काही कळल्यासारखं वाटलं. जे कळलंय असं वाटतंय ते तितक्यातच हातून निसटलं आहे हेही लगेचच कळतं आणि तेच फक्त टिकतं.
उदाहरणार्थ -

हे विवेचन वाचल्यावर आता एक गोष्ट स्पष्ट व्हावी की लोकप्रियतेपेक्षा दूरगामी आणि बहुपेडी परिणामांवर इथे भर आहे. उदा: आज शेक्सपिअर किंवा तुकाराम किती लोकप्रिय आहे यापेक्षा कळत-नकळत तो आपल्या रोजच्या भाषेत किंवा संस्कृतीत किती आहे याला इथे महत्त्व आहे. त्या बरोबरच वेगवेगळे अर्थ ज्यातून काढता येतील किंवा वेगवेगळ्या अंगांनी ज्याचा अभ्यास करता येईल अशा गोष्टींना इथे महत्त्व आहे.

दूरगामी आणि बहुपेडित्वावरचा भर समजू शकतो. पण लोकप्रियतेत असा दूरगामी परिणाम साध्य होत नसतो, असे काही आहे का? हां, आता बहुपेडी आणि दूरगामी असते ते अभिजात हे एकदा मान्य केलं की बाकी सारे प्रश्न झूट ठरतात. पण मग पुढे, यातली भाषा आणि संस्कृती कोणी आणि कशी ठरवायची. "'नव्हतं' चालतं तर 'व्हतं' का चालत नाही," या प्रश्नापाशी हा अभिजाततेचा मुद्दा काटेकोरपणे किमान दोन भागांत विभागला जाऊ शकतो. "'नव्हतं' हेच उचित, 'व्हतं' हे अनुचित" असं म्हणणारा अभिजातता वगैरेंची जी अभ्यासपूर्ण चौकट मांडण्याचा प्रयत्न करू शकतो, तशी मांडणी "'व्हतं' हेही उचितच, कारण ती आमची भाषा आहे" असं म्हणणारा करू शकत नसावा. अशावेळी ही अभिजातता इतकी व्यामिश्र होत जाते की, त्यातून एक वेगळाच 'वर्ग'संघर्ष उभा राहतो. मग "तुमचं ते भारीच, आम्ही काय..." वगैरे प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होत जातं. वेगवेगळे अर्थ आणि वेगवेगळ्या अंगानी अभ्यास या दोन्ही गोष्टी करणाऱ्याच्याच हाती असतात. त्याने ते करायचे नाकारलेच तर तिथं त्याच्या एकारलेपणामुळे अभिजातता नाही, असा निष्कर्ष निघण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी काय करायचे?

या विवेचनातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे हे व्यक्तिसापेक्ष आहे. एका ठिकाणी कॅल्विनो असंही मान्य करतो की रसिकमान्यतेद्वारे एक प्रकारचं बाळकडू म्हणून आपल्याला अभिजात अशी जी काही यादी मिळते त्यातून (आणि त्या व्यतिरिक्तही) आपल्याजवळ जाणारं असं अभिजात साहित्य आपण धुंडाळायचं असतं.

हे सर्वात खरं. बाकी सारा व्याप म्हणजे चौकटी मांडण्याचा, व्याख्यांचा आणि त्यातून काही साध्य करण्याच्या खटाटोपांचा सोस. एकदा का व्यक्तिसापेक्षता मान्य केली की मग पुन्हा चौकट मांडण्याचा खटाटोप का करावा? एकाने तयार करून मांडलेली चौकट दुसऱ्याला मंजूर होणारच असे काही नाहीच. कारण व्यक्तिसापेक्षता. उद्या एखादा "सुशिंची दुनियादारी अभिजातच आहे, कारण त्यात माझं त्या वयाच्या कालखंडातलं बहुपेडी जगणं दिसतं, ते अधिक खोलवर कळतं, त्यातूनच मला पुढं जगण्यासंदर्भातील माझेच काही संदर्भ अधिक नीट करून घेता आले," असं काही म्हणेल. ते म्हणणे दुसऱ्या एखाद्याला (इथं मलाच) मान्य होणार नाही. पण म्हणून त्याची आ/निवड ही कमअस्सल (इथं 'अभिजात ते भारी आणि लोकप्रिय ते कमअस्सल' असा अनेकदा या क्षेत्रातील मंडळींचा जो पवित्रा असतो, तो मुळाशी गृहीत धरला आहे) ठरते का?
एवढे सगळे लिहिल्यानंतर पुन्हा हे सांगावेच लागेल की, या लेखनातून काही हाती गवसले आणि निसटले अशी भावना झाली आहे. कारण मी स्वतः अनेकदा अनेक प्रकारचे लोकप्रिय असणारे साहित्य दुय्यम मानतो. ते वाचणाऱ्याला दुय्यम किंवा कमअस्सल मानत नाही. पण ते साहित्य दुय्यम मानतोच. म्हणजे, मला 'आऊटसायडर' भिडते. तेच 'दुनियादारी'चे होईल असे नाही. पण मीच कॉलेजलाईफ ज्याला म्हणतात ते अनुभवलेले नाही, त्यामुळं असं होत असेलही. आता हे ध्यानी घेतले तर व्यक्तिसापेक्षतेचा मुद्दाच महत्त्वाचा ठरत जातो. मग प्रश्न येतो, एखादी गोष्ट अभिजात असे नुसतेच मानता येणार नाही का? ते मानल्यानंतर जे अभिजात नाही ते कमअस्सल असा सूर लावण्याची गरज असतेच का?
(हाच प्रतिसाद तिकडेही दिला आहे).

रमताराम's picture

13 Feb 2011 - 11:55 am | रमताराम

अरे आणखी एक कॅल्विनोप्रेमी! या लेखाचे भाषांतर करायचे असे बरेच दिवस म्हणत होतो, आता फुकटात मिळाले. मंडळ आभारी आहे आपले.

आम्ही कॅल्विनोच्या 'द ब्लॅक शीप' चा अनुवाद केला होता तो इथे वाचता येईल.

चिंतातुर जंतू's picture

13 Feb 2011 - 3:41 pm | चिंतातुर जंतू

दूरगामी आणि बहुपेडित्वावरचा भर समजू शकतो. पण लोकप्रियतेत असा दूरगामी परिणाम साध्य होत नसतो, असे काही आहे का?

माझ्या मते 'लोकप्रियता' या संकल्पनेमध्ये दोन गोष्टींचा विचार होतो.
१. आज मराठीवर थोडंबहुत प्रभुत्व असणार्‍या कुणाच्याही तोंडी कळत-नकळत तुकारामानं घडवलेले किंवा पानिपताच्या बखरीतले वाक्प्रचार येतात. ही लोकप्रियता अभिजाततेच्या वरच्या विवेचनात समाविष्ट आहे.
२. विश्वास पाटलांच्या 'पानिपता'च्या कितीतरी आवृत्त्या निघाल्या ही दुसर्‍या प्रकारची (आणि मला वाटतं अशा वादात लोकांना अभिप्रेत असणारी) लोकप्रियता आहे. कॅल्विनोचं विवेचन याबद्दल बोलत नाही. पण याचा अर्थ असा नाही की अभिजाततेला लोकप्रियतेचं वावडं आहे. अशी लोकप्रियता ही अभिजाततेसाठी आवश्यक नाही आणि पुरेशीही नाही एवढाच निष्कर्ष कॅल्विनोच्या विवेचनावरून काढता येईल असं मला वाटतं. पण याचा अर्थ एखादी कलाकृती लोकप्रिय असली तर ती अभिजात नसेलच असा होत नाही.

"'नव्हतं' हेच उचित, 'व्हतं' हे अनुचित" असं म्हणणारा अभिजातता वगैरेंची जी अभ्यासपूर्ण चौकट मांडण्याचा प्रयत्न करू शकतो, तशी मांडणी "'व्हतं' हेही उचितच, कारण ती आमची भाषा आहे" असं म्हणणारा करू शकत नसावा. अशावेळी ही अभिजातता इतकी व्यामिश्र होत जाते की, त्यातून एक वेगळाच 'वर्ग'संघर्ष उभा राहतो. मग "तुमचं ते भारीच, आम्ही काय..." वगैरे प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होत जातं. वेगवेगळे अर्थ आणि वेगवेगळ्या अंगानी अभ्यास या दोन्ही गोष्टी करणाऱ्याच्याच हाती असतात. त्याने ते करायचे नाकारलेच तर तिथं त्याच्या एकारलेपणामुळे अभिजातता नाही, असा निष्कर्ष निघण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी काय करायचे?

हा प्रश्न वेळोवेळी येत रहाणार. यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती ही की प्रस्थापितांविरोधात बंडखोरी ही अभिजाततेला वर्ज्य नाही. म्हणून मी मुद्दामच उदाहरणं देताना 'तुकाराम', 'कोसला' आणि 'राडा'ची दिली. हे तिन्ही लेखक आपापल्या काळच्या अभिजाततेच्या कल्पनेला छेदून लिहीत होते. त्या काळच्या प्रस्थापितांनी त्यांना त्रासही दिला. इथे मुद्दा उरतो तो बुद्धिवाद्यांच्या जबाबदारीचा. नेमाड्यांना आणि भाऊ पाध्यांना पु.लं., अशोक शहाणे, दिलीप चित्रे अशा अनेकांनी तेव्हा उचलून धरलं आणि त्यांचं लिखाण महत्त्वाचं आणि पथदर्शी का आणि कसं आहे हे सांगून आपल्यावरची ही जबाबदारी सांभाळली. ज्या समाजात असे लोक नसतील त्या समाजात कदाचित अभिजात होण्याच्या आधीच कलाकृती दडपली किंवा दुर्लक्षिली जाईल. त्यांचे परिणाम तो समाज भोगेल. किंबहुना त्यातच त्या समाजाच्या बौद्धिक र्‍हासाची मुळंसुद्धा असू शकतील. म्हणूनच असा उहापोह वेळोवेळी होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी खुलं वातावरण निर्माण करणं आणि ते टिकवून ठेवणं हीदेखील त्या बुद्धिवाद्यांची (आणि ते ज्या समाजाचा भाग असतात त्या समाजाचीसुद्धा) जबाबदारी असते. म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा कळीचा ठरतो. अत्र्यांच्या दमदाटीपुढे भाऊ पाध्यांची तळी उचलून धरता यावी; यासाठीचा अवकाश समाजात हवा.

व्यक्तिसापेक्षता: या बाबतीत हे लक्षात घ्यायला हवं की वरच्या विवेचनात अभिप्रेत असणारी व्यक्तिसापेक्षता ही इतर मुद्द्यांच्या अनुषंगानं आहे. ते सर्व मुद्दे दुर्लक्षून 'मला आवडतं म्हणून ते चांगलं' इतकीच व्यक्तिसापेक्षता त्यात अभिप्रेत नाही. अशी व्यक्तिसापेक्षता ही काहीशी स्वमग्न (आणि म्हणून आंधळी) ठरेल. अर्थात, त्याउलट 'अभिजन म्हणतात म्हणून ते अभिजात' इतकंही ते व्यक्तिनिरपेक्ष नसावं आणि स्वानंदाशी त्याची कुठेतरी नाळ जुळावी एवढीच त्यात अपेक्षा आहे असं मला वाटतं.

श्रावण मोडक's picture

13 Feb 2011 - 5:16 pm | श्रावण मोडक

चर्चा करूया. प्रत्यक्ष भेटीत. काही गोष्टी कळताहेत, काही नाही.

चिंतातुर जंतू's picture

14 Feb 2011 - 6:23 pm | चिंतातुर जंतू

चर्चा करूया. प्रत्यक्ष भेटीत. काही गोष्टी कळताहेत, काही नाही.

नक्कीच. कॅल्विनोच्या विवेचनाने काही संकल्पना सुस्पष्ट होतील असं मला वाटलं होतं, पण बहुधा माझा प्रयत्न अयशस्वी ठरला असावा असं मला एकंदरीत वाटू लागलं आहे. असो. प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.

श्रावण मोडक's picture

14 Feb 2011 - 8:26 pm | श्रावण मोडक
बहुधा माझा प्रयत्न अयशस्वी ठरला असावा असं मला एकंदरीत वाटू लागलं आहे.

असे नका वाटून घेऊ. बऱ्याच गोष्टी ग्राहकाच्या बाजूलाही असतात ना राव... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Feb 2011 - 8:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत. रेडीओ दुर्बिणीतून साधे तारे बघायला गेलं की काहीही दिसत नाही.

आळश्यांचा राजा's picture

14 Feb 2011 - 9:45 pm | आळश्यांचा राजा

ज्याला आवडेल तो रेडिओ दुर्बिणीतून बघेल. तारे हे तारेच. ते बघताना आश्वर्य आणि आनंद वाटण्यासाठी सगळ्यांनाच रेडिओ दुर्बिणीची काय गरज आहे? जंतूंनी कॅल्विनोच्या रेडिओ दुर्बिणीतून तारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो अयशस्वी झालाय असं वाटत नाही. अभिजात अभिजात म्हणजे काय हे आमच्यासारख्या साहित्यातल्या अर्धसाक्षर लोकांना डोक्यात प्रश्न निर्माण करण्याइतकं जरी शिरलं तरी हा लेख पोचला म्हणायचा!

पुनि पुनि कितनी ही सुनी सुनाय
दिलकी प्यास बुझत ना बुझाय

एवढीच आमची अभिजाततेची व्याख्या! (डोळ्यांनी दिसणारे साधे तारे!)

( कुणीतरी (बहुदा पं भीमसेन) म्हणून गेलेच आहेत - जे आवडण्यासाठी कोणतेही शास्त्र समजण्याची आवश्यकता नाही, ते शास्त्रीय संगीत!)

आमच्या आवडीचं रामायण आणि महाभारत कॅल्विनोच्या कसोट्यांवर उतरतं एवढं समजलं. बाकी साहित्यातलं काही कळत नाही!

सहज's picture

15 Feb 2011 - 10:33 am | सहज

>पण बहुधा माझा प्रयत्न अयशस्वी ठरला असावा असं मला एकंदरीत वाटू लागलं आहे.

केवळ प्रतिसाद न आल्याने लेख अयशस्वी ठरला असे वाटू नये म्हणुन हा प्रतिसाद. आकलन करुन घेत आहे असेच म्हणतो.

लेख चांगला आहे पण नेमके लिहायला शब्द सापडत नाहीत. अपोलो यान चंद्रावर उतरले. आर्मस्ट्राँग म्हणाला "That's one small step for man; one giant leap for mankind" आता हे वाक्य कोण्या मोठ्या लेखकाचे नाही की ठरवून लिहले गेले नसावे. पण मानवी इतिहासात इंग्रजी भाषेत मोठा ठसा उमटवून गेले आहे. अन्य भाषेतही रुपांतरीत होउन गाजले असेल. वर लिहल्याप्रमाणे तुकारामांनी लिहले अभंग, वाक्प्रचार आजही टिकून आहेत.

स्वातंत्र्याची प्रतिमा ठरणारे राष्ट्रगीत हे त्या कवीच्या इतर कवितांच्या तुलनेत वर खाली असेलही पण कालौघात हेच गीत अजरामर होते. प्यासा, मेरा नाम जोकर असे चित्रपट त्या त्या दिग्दर्शकाकरता त्यांच्या स्वताच्या मते सर्वोकृष्ट काम असु शकते पण इतिहासात त्याची नोंद फारसे नावाजले न गेलेली त्याच कलाकाराची निर्मीती असु शकते.

काही काही कलाकृतींना त्या कलाकृतीच्या जन्माच्या काळात जितके मोल येत नाही तितके मोल त्या कलाकाराच्या मृत्युनंतर, काही कालावधीनंतर येते. वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या संदर्भाच्या दृष्टीने काही कलाकृती इतिहासात नावाजल्या, नोंदल्या जातात. माईल स्टोन बनत असाव्यात. हे सगळे समजुन आस्वाद घेणे बहुतेक अभिजात संस्कृतीचे लक्षण असावे. त्याचे महत्व ओळखणे, त्याची जोपासना करणे प्रगल्भ असणे मानले जात असावे. खात्रीने इतकेच म्हणावेसे वाटते की हे सगळे मानवाने स्वताला, आपल्या इतिहासाला समजुन घेण्याचा प्रयत्न असणार.

कधी काय कुठले अभिजात कसे कोणाला भावेल वाटेल कुठल्या काळात त्या त्या कलेला भाव येईल हे किचकट गुंतागुंतीचे आहे. शब्दात / व्याखेत बसवणे मला तरी कठीण आहे.

श्री चिंतातूर जंतू यांनी असेच वरचेवर लेखन करत आम्हाला प्रगल्भ करत रहावे (होउ का नाही माहीत नाही पण प्रयत्न करत रहावा ) हि विनंती विशेष.

अडगळ's picture

14 Feb 2011 - 10:09 pm | अडगळ

नेहमीप्रमाणेच विचाराला चालना देणारे लेखन.

अवांतरः
आज चारीबाजूनी इतक्या अभिव्यक्ती (रोजचे जगणे + साहित्य , चित्र-फोटो-सिनेमा-गाणी-खे़ळ)येऊन आदळत असतात की त्यांची संगतवार आठवण ठेवणे हेच मुळी जिकीरीचे झाले आहे. जुने जे अभिजात म्हणून ओळखले जाते त्यातले मला रुचणारे तितके आपलेसे करणे आवश्यक असले तरी हा बॅकलॉग पण बराच मोठा आहे . तेव्हा जुन्या अभिजाततेचा आनंद घेणे आणि आजूबाजूच्या ताज्या निर्मिती मधून अभिजाततेचे अंश शोधणे यात वेळेच्या हिशोबात डेंजर कुतरओढ होते. शिवाय कलाकृतीचं 'आयुष्य 'कमी कमी होतंय की काय अशी पण शंका वाटते. म्हणजे मॅक्बेथ टिकून आहे , मक्बूल ची आठवण किती वर्षे राहील ? सार्वजनिक स्मृतीमध्ये टिकून राहणे हे अभिजाततेचे लक्षण असावे का ?

चिंतातुर जंतू's picture

15 Feb 2011 - 1:04 am | चिंतातुर जंतू

जुन्या अभिजाततेचा आनंद घेणे आणि आजूबाजूच्या ताज्या निर्मिती मधून अभिजाततेचे अंश शोधणे यात वेळेच्या हिशोबात डेंजर कुतरओढ होते.

ते अपरिहार्य आहे. जुनी अभिजात कलाकृती कालबाह्य होते का हेही पहावं लागतं. ताज्या निर्मितीला अभिजातता सहसा लगेच चिकटत नाही. थोडा काळ तरी जाऊ द्यावा लागतो. म्हणूनच मौजेचे श्री.पु. भागवत एकदा म्हणाले होते की 'कोसला' प्रकाशनासाठी त्यांच्याकडे आली असता ती नाकारणं ही त्यांची घोडचूक होती. स्वतःच्या अभिरुचीचा तोरा न मिरवता हे कबूल करणं हा त्यांचा मोठेपणा झालाच, पण 'कोसला' ताजी असताना तिचं महत्त्व त्यांनाही कळलं नव्हतं ही अंतर्मुख करणारी गोष्ट वाटते.

शिवाय कलाकृतीचं 'आयुष्य 'कमी कमी होतंय की काय अशी पण शंका वाटते. म्हणजे मॅक्बेथ टिकून आहे , मक्बूल ची आठवण किती वर्षे राहील ? सार्वजनिक स्मृतीमध्ये टिकून राहणे हे अभिजाततेचे लक्षण असावे का ?

मूळ विवेचनात सार्वजनिक स्मृतीत टिकून रहाणं याला व्यापक अर्थ आहे. कदाचित उदाहरणं देताना माझ्याकडून ते फसलं असेल. 'बॉबी', 'एक दूजे के लिए' किंवा 'कयामत से कयामत तक' पाहणार्‍या बहुसंख्य भारतीयांना 'रोमिओ-ज्युलिएट' माहीत नसेल, पण त्यांना बांधून ठेवणारं काहीतरी त्या गोष्टीत ४०० वर्षांनंतर शिल्लक असणं ही गमतीशीर बाब आहे. त्यांच्या स्मृतीत शेक्सपिअर नसतानाही त्यांची त्याच्याशी अशी अप्रत्यक्ष आणि नकळत नाळ जुळते. त्याचे स्टार-क्रॉस्ड लव्हर्स अभिजात आहेत हे त्यामागचं कारण आहे. मकबूल कदाचित शेक्सपिअरची अभिजातता दाखवतो, पण खुद्द मकबूल अभिजात म्हणता येणार नाही असं वाटतं. त्यामुळे मकबूलची आठवण टिकणार नाही हे सुसंगत आहे. (अर्थात, कलाकृतीचं आयुष्य कमी होत आहे हा मुद्दा कदाचित बरोबर असेलही.)

अडगळ's picture

15 Feb 2011 - 7:19 am | अडगळ

स्वतःच्या अभिरुचीचा तोरा न मिरवता हे कबूल करणं हा त्यांचा मोठेपणा झालाच, पण 'कोसला' ताजी असताना तिचं महत्त्व त्यांनाही कळलं नव्हतं ही अंतर्मुख करणारी गोष्ट वाटते >>
नक्कीच , पण त्यापेक्षा नेमाडेंच्या काही समकालीन लिहित्या लोकांना तिचे थोरपण कळले होते हे मला जास्त धीर देणारे वाटते. धीर देणारे या अर्थाने की अभिजातता ही माझ्या आजूबा़जूलाही असू शकते. ती जर का टिकली तर तिचा यादीत समावेश होतो इतकेच.

त्यांना बांधून ठेवणारं काहीतरी त्या गोष्टीत ४०० वर्षांनंतर शिल्लक असणं ही गमतीशीर बाब आहे>> समाजमनात रुतुन बसलेले जे काही आदिबंध असतात त्यांचा यात काही हात असावा. कलेक्टिव अनकॉन्शस याबाबत वाचले होते पण अभ्यास नसल्याने फक्त एक फुटकळ अंदाज.

मकबूल कदाचित शेक्सपिअरची अभिजातता दाखवतो, पण खुद्द मकबूल अभिजात म्हणता येणार नाही असं वाटतं>> ह्म्म.

इतालो काल्विनोचे विश्लेषण सांगितल्याबद्दल धन्यवाद.

अनेक कलाकृतींचा आस्वाद घेणारे, आणि त्याच कलाकृतीचा पुन्हापुन्हा आस्वाद घेणारे कधी ना कधी या "अभिजात ते कुठले" या प्रश्नापाशी धडकतातच.

त्यांची विश्लेषणे मननीय असतात.

निशदे's picture

15 Feb 2011 - 2:15 am | निशदे

उत्तम विश्लेषण.
अभिजात साहित्यनिवड निश्चितच कमालीची व्यक्तीसापेक्ष होऊ शकते पण त्याचबरोबर एक मुद्दा विचारात घ्यायला हवा की अशी साहित्यनिर्मिती ही तत्कालीन सामाजिक व्यवस्थेवरदेखील अवलंबून असते. किंबहुना केवळ साहित्यच नव्हे तर इतरही कलाप्रकार सामाजिक परिस्थितीनुसार ठरतात.
<<हे विवेचन वाचल्यावर आता एक गोष्ट स्पष्ट व्हावी की लोकप्रियतेपेक्षा दूरगामी आणि बहुपेडी परिणामांवर इथे भर आहे.>>
हे पटले. अभिजात साहित्य ठरवण्याची जबाबदारी ही चालू पिढीवर नसून पुढच्या २ पिढ्यांवर असते. कारण केवळ साहित्यप्रेम अथवा केवळ उत्तम कलानिर्मिती यापलीकडे जाउन पुढच्या पिढीतील लोक कोणत्याही साहित्याचा सखोल विचार करू शकतात.
<<म्हणजे रसिकमान्य अशा एखाद्या अभिजात पुस्तकाविषयी मला विशेष काही वाटत नाही हे मला पुन्हा पुन्हा अधोरेखित करायला लागणं हेदेखील एक अभिजाततेचं लक्षण असणं हे मला रोचक वाटलं.>>
रसिकमान्य अशा पुस्तकाबद्दल मला काही वाटत नाही हे मत सदर लेखन आपल्या वाचनक्षमतेच्या आणि समजुतीच्या कक्षात बसवायच्या अपयशी प्रयत्नानंतर येते असे मला वाटते. पुन्हा एकदा हा नियम सर्वच कलाप्रकारांना लागू असतो. असंख्य पुस्तकांची नावे या ठिकाणी देता येतील. पण या ठिकाणी हेदेखील नमूद करावेसे वाटते की एखाद्या रसिकप्रिय लेखकाच्या भावी लेखनाला बऱ्याचदा अभिजातता आपोआपच मिळते आणि त्यातूनही वरील मत तयार होऊ शकते.

मारवा's picture

31 Oct 2015 - 8:33 am | मारवा

मिपा क्लासिक -५

मारवा's picture

31 Oct 2015 - 8:33 am | मारवा

मिपा क्लासिक -५