भटकंती

फास्टरफेणे's picture
फास्टरफेणे in कलादालन
6 Feb 2011 - 3:59 am

२४ जानेवारीला बायको माहेरी गेली आणि गेलं १ वर्ष झोपी गेलेला माझ्यातला भटक्या जागा झाला. २६ जानेवारीची सुट्टी कुठे सत्कारणी लावावी हा प्रश्न नव्हताच, उत्तर तयार होतं - वीर धरण.
मागच्या वर्षी सकाळमधे "बार हेडेड गूज"ची बातमी वाचून एकदा वीर धरणाची वारी झाली होती. पण तेव्हा फक्त पाच-सहाच बदकं दिसली होती. तेव्हाच ठरवलं होतं, परत यायचं...
पहाटे ५ ला निघायचं ठरवून ८ वाजता निघालो. एकटाच. पाठीला सॅक, सॅकमधे पाण्याची बाटली आणि कॅमेरा (कॅनन SX 110). हडपसर ते सासवड अंतर जेमतेम ३०-४० मिनीटांत कापलं.
वाटेत बरेच पक्षी दिसत होते. बर्‍याच वेळा कॅमेर्‍याचं झूम कमी असल्यानं जवळून फोटो काढायला गेलो कि पक्षी उडून जायचे आणि माझा पोपट व्हायचा ! तरीही काही पक्षी मी टिपलेच -

काळ्या डोक्याची चिमणी - ही हवेत कसरत करत किडे पकडत होती.

एका जागी ५-६ मोठे दगड होते, आणि त्यावर बसला होता हा ससाणा. लांबून सहसा ओळखूही येणार नाही...

वीर धरणाजवळ भेटला वेडा राघू. बेट्याचं डोकं एका जागी स्थिर राहील तर शपथ. एक बरा फोटो यायला ४-५ मिनीटं गेली.

माझं हे नेहेमी असं होतं, मी निघतो एका कामासाठी आणि कुठेतरी दुसरीकडेच भरकटतो...यावरुन आठवते ती आमची फसलेली रायगडची ट्रीप...
आम्ही ४ मित्र २ शिवथरघळ आणि रायगड अशी १ दिवसाची ट्रीप ठरवली होती. सकाळी लवकर निघून संध्याकाळी परत्...पण जाताना इतक्या ठिकाणी थांबलो कि शिवथरघळला पोचायला ४ वाजले. तिथून घाईत निघालो आणि रायगडाकडे. ५-५:३० ला रायगडाच्या पायथ्यापाशी पोचल्यावर विचार केला, आपण वर जाणार कधी, गड पाहणार कधी (आणि किती). म्हणून हरीहरेश्वरला रात्री मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी रायगड बघायचं ठरवलं. दुसर्‍या दिवशी हरीहरेश्वरहून लवकर निघालो, ते वाटेत श्रीवर्धनची पाटी दिसली. अंतर जेमतेम १४-१५ किमी असावं. झालं गाड्या तिकडं वळल्या. श्रीवर्धनहून निघून महाट फाट्यापर्यंत पोचायला १ वाजला. म्हटलं, महाडमधे जेवून मग रायगडावर जावं. जेवण होईपर्यंत ३ वाजले. रायगडाकडे निघालो आणि मित्राच्या बाईकने दगा दिला. पंक्चर काढेपर्यंत आणखी १.३० तास गेला, आणि दुसर्‍या दिवशीही रायगडाच्या पायथ्याशी आम्ही ५ वाजताच होतो !

फारच विषयांतर झालं...असो...
मी निघालो होतो बार हेडेड गूज बघायला आणि ३ तास झाले तरी धरणावर पोचलो नव्हतो...वेड्या राघूला मागे सोडून धरणाच्या कडेच्या रस्त्यावरुन निघालो.
सुरुवातीला दिसला एक करकोचा

आणि समाधी लावून बसलेले "ओपन बिल्ड स्टॉर्क".

तिथून पुढे निघालो बार हेडेड गूज शोधायला. थोडंच पुढे गेलो तो काठावर बरेच ठिपके दिसले. रस्ता ते धरण अंतर जवळ जवळ २०० - २५० फूट असल्याने गाडी कडेला लावून धरणाकडे जाणं भाग होतं. निम्मं अंतर कापल्यावर जे समोर बघितलं ते अविश्वसनीय होतं. धरणाच्या काठावर जवळजवळ ७०-८० बार हेडेड गूज गवतात चरत होती. हळूच सॅक खाली ठेवली आणि रांगत हळूहळू बदकांच्या जवळ गेलो. ५०-६० फूटांवरुन मनसोक्त फोटो काढले -

मी फोटो काढतंच होतो, तेवढ्यात एक बाई म्हशीला घेऊन आली आणि तिला नेमकी बदकांच्या जवळ नेऊन बांधली...सगळी बदकं उडून लांबवर जाऊन बसली...
मग जे समोर दिसले ते टिपले -

करकोचा, पाणकावळा आणि ब्राम्हणी बदकं

व्हाईट आयबीस

ब्लॅक आयबीस

तेवढ्यात समोर बदकं पाण्यात उतरताना दिसली, अर्थात तो काठ बराच दूर होता. पुन्हा माघारी वळालो. बाईक काढली आणि ज्या काठावर बदकं होती तिथं रस्त्याच्या कडेला उभी केली. पुन्हा बदकांच्या जवळ जायचं म्हणजे रांगणं आलं. लपायला काही जागाच नव्हती. एक झाड दिसलं तिथं टेकून बसलो आणि जमेल तेवढे फोटो काढले.

२ वाजता पोटात कावळे ओरडायला लागले तसा तिथून निघालो...वाटेत घाटात ससाण्याने दर्शन दिले -

या अर्ध्या दिवसाच्या भटकंतीने मन अगदी ताजेतवाने झाले. आता बघू बायको पुन्हा कधी माहेरी जाते आणि भटक्या जागा होतो ते...

छायाचित्रण

प्रतिक्रिया

फोटो मस्तच.
खासकरून राघू, व्हाईट आयबीस आणि त्या झाडाचा.
बेष्ट !

शुचि's picture

6 Feb 2011 - 5:50 am | शुचि

झाडावर "कोतवाल" पक्षी बसलेला दिसतो आहे. याला कोतवाल म्हणतात कारण हा फार आक्रमक असतो घार, ससाणा आदि पक्ष्यांनादेखील हुसकावून लावतो.
मस्त फोटो.

यशोधरा's picture

6 Feb 2011 - 5:57 am | यशोधरा

छान.

दादा बापट's picture

6 Feb 2011 - 8:11 am | दादा बापट

छान फोटू आले आहेत. पाणी एवढे जवळ असून पण तुम्हाला खंड्या कसा दिसला नाही?

फास्टरफेणे's picture

6 Feb 2011 - 6:44 pm | फास्टरफेणे

बरेच दिसले, पण कॅमेर्‍यात एकही सापडला नाही :(
वीर धरणावर आणखी २ जण SLR कॅमेरे, ट्रायपॉड घेऊन आले होते, आणि मी आपला Point n Shoot कॅमेरावाला...थोडी चिडचिड झाली माझी.
बायकोने तंबी दिलीय - आधी स्वतःचं घर, नंतर तुझे फालतू छंद वगैरे...काय करणार :(

रेवती's picture

6 Feb 2011 - 8:22 am | रेवती

सगळे फोटू छानच.
वर्णनही साजेसे.

सहज's picture

6 Feb 2011 - 8:42 am | सहज

बायको माहेरी / गावी गेली की लगेच बर्ड वॉचींग सुरु!!! आवडले!! :-)

फास्टरफेणे's picture

6 Feb 2011 - 6:32 pm | फास्टरफेणे

:) जबरी...तुमची कॉमेंट !

फास्टर फेणे, या पुढे भटकायला जाताना आम्हाला बोलवणार असाल तरच पुर्ण प्रतिक्रिया दिली जाईल.

तुमच्या पेशन्स्ची दाद द्यावी वाटते, माझा एक मित्र भिगवणला जायचं ठरवतो आहे, त्याला हा धागा पाठवतो आहे. त्याचा काय कार्यक्रम आहे ते व्यनिने कळवेन.

आणि मुख्य राहिलंच सगळे फोटोआतिशय सुंदर आहेत, माझ्या धाग्यावर काही मोराचे व शेतातल्या पक्ष्याचे फोटो आहेत, पाहा.

हर्षद.

नन्दादीप's picture

6 Feb 2011 - 12:24 pm | नन्दादीप

मस्त फोटो....जबरा.....
त्या झाडाचा फोटो सर्वात जास्त आवडला....

नंदन's picture

6 Feb 2011 - 12:34 pm | नंदन

सगळे फोटो मस्त आलेत.

sneharani's picture

6 Feb 2011 - 12:43 pm | sneharani

सगळे फोटो मस्तच!
:)

स्वाती दिनेश's picture

6 Feb 2011 - 12:47 pm | स्वाती दिनेश

फोटो मस्तच..
स्वाती

निवेदिता-ताई's picture

6 Feb 2011 - 1:47 pm | निवेदिता-ताई

सगळे फोटो अतिशय सुंदर...आवडले.

गणपा's picture

6 Feb 2011 - 2:07 pm | गणपा

सुरेख फोटो. :)

दीविरा's picture

6 Feb 2011 - 4:37 pm | दीविरा

सगळे फोटो छान, झाडाचा फारच छान :)

चिगो's picture

6 Feb 2011 - 6:23 pm | चिगो

जबरा फोटोज... पक्ष्यांचे फोटो काठणं खरंच खुप संयमाचं आणि कठीण काम आहे ब्वॉ...
बढीया...

फास्टरफेणे's picture

6 Feb 2011 - 6:50 pm | फास्टरफेणे

खरंय...एका मित्राला घेऊन कवडेपाटला गेलो होतो. ५ मिनीटांत त्याचं तुणतुणं सुरु - चला परत म्हणून...

मनराव's picture

7 Feb 2011 - 3:26 pm | मनराव

झक्कास......... दिवस घालवण्यासाठी भटकंती पेक्षा बेहतर काही असूच शकत नाही..... फक्त बरोबर वर लिहिल्या प्रमाणेच "चला परत च कोणी तुणतुणं नसावं"

परिकथेतील राजकुमार's picture

7 Feb 2011 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर फोटू मालक.
तुमचा पक्षांचा अभ्यास देखील चांगला आहे हे जाणवतय माहितीवरुन.

फास्टरफेणे's picture

7 Feb 2011 - 8:16 pm | फास्टरफेणे

अभ्यास वगैरे काही नाही, दिसलेल्या पक्षांची नावं शोधायचा छंद म्हणू हवं तर...कितीतरी पक्षांची मराठी नावं शोधतोय (व्हाईट आयबीस, ओपन बील्ड स्टॉर्क वगैरे). कोणी मदत करु शकेल काय?

अमोल केळकर's picture

7 Feb 2011 - 4:44 pm | अमोल केळकर

सुंदर फोटो

अमोल केळकर

ज्ञानराम's picture

7 Feb 2011 - 5:39 pm | ज्ञानराम

अप्रतिम...

कानडाऊ योगेशु's picture

7 Feb 2011 - 6:53 pm | कानडाऊ योगेशु

फाफेसाहेब.वर्णन आणि फोटो दोन्हीही सुंदर.

अवांतर : करकोचा शब्द बर्याच दिवसांनी कानावर पडला.

फास्टरफेणे's picture

7 Feb 2011 - 8:17 pm | फास्टरफेणे

धन्यवाद मंडळी !

सखी's picture

7 Feb 2011 - 11:48 pm | सखी

छानच फोटो आणि वृत्तांत. यासाठी खरचं खूप चिकाटी आणि वाट पाहण्याची तयारी पाहीजे. अजुन बघायला आवडतील.

नि३सोलपुरकर's picture

8 Feb 2011 - 12:58 pm | नि३सोलपुरकर

सुरेख फोटो.
मन प्रसन्न झाले........

मृत्युन्जय's picture

9 Feb 2011 - 11:00 am | मृत्युन्जय

सुंदर फोटो. मला ससाण्याचा फोटो आवडला. बायकोची एक एसएलआर घेण्यासाठी मनधरणी करा आता. कॅनन SX 110 ने एवढे सुंदर काढले आहेत फोटो तर एसएलआर ने तर धमालच कराल :)

स्पंदना's picture

9 Feb 2011 - 11:54 am | स्पंदना

सगळ्यांनाच झाडाचा फोटो का आवडावा?

एकुन एक फोटो अप्रतीम, पण झाडाचा त्याहुन सुन्दर.. सलाम तुमच्या पेशन्सना, आमचे एक जयपाल होते कुठे गायब झाले कोणास ठाउक, ते मुला बाळासक्ट जाउन असे एक से एक फोटो काढायचे.