राख होऊन मेला : नागपुरी तडका
हप्ता थकला म्हूनशान, वसुलीले गेला
हप्ता गेला भाडमंधी, राख होऊन मेला ....॥१॥
पंचीस पेट्या महिनेवारी, सेटींग जमून व्हते
तारखेवार भेटेस्तोवर, काईबी प्राब्लेम नोते
कायच्यातबी काईबी मिसळा, देल्ली व्हती हमी
साधेसिधे समिकरन; अर्धे तुमी, अर्धे आमी
हप्त्यापायी जीव जाईन, माहित नोयतं त्येला ....॥२॥
महिना उलटून गेला बैन, हप्ता नाई आला
मंग जीव सायबाचा, कालवाकालव झाला
सायेब म्हने श्याम्या तुह्या, मनात बद्दी आली?
हप्ता नाय तं धंदा नाय, कायढीन तुह्या साली
हप्त्यासाठी सांग तुनं, उशीर काहून केला? ....॥३॥
श्याम्या म्हणे उशिर कारन, मेली माही बायकू
सायेब म्हने, तुह्या बाह्यना, मी कायले आयकू?
माय मेली, पोट्टं मेलं, उद्या मरन तुहा भाऊ
आमी किती दिवस मंग असे, हप्त्याबिना राहू?
एकटा मीच खात नाय, वर्तून आडर आला ....॥४॥
"पोट्टं मरन" म्हनल्यावर, झकापकी झाली
तळपायाची आग मंग, मस्तकात गेली
गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागला
अध्धर उचलून सायबाले, भट्टीमंधी फ़ेकला
कोनी अभय ह्यो देस, भलतीकडं नेला?
हप्ता गेला भाडमंधी, भट्टीमंधी मेला ....॥५॥
गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------
भाड = भट्टी, लोहाराचा भाता
पेट्या = दोन नंबरच्या आर्थिक व्यवहारात पेटी म्हणजे लक्ष व खोका म्हणजे कोटी
बाह्यना = बहाणा, खोटी सबब
अध्धर = हवेत अधांतरी
--------------------------------------------------------------------------
@ ही केवळ कविता आहे. या कल्पनाविलासाला कसलेच संदर्भ नाहीत.
--------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
31 Jan 2011 - 11:17 am | कच्ची कैरी
ताजा घडामोडींवर मस्त तडका मारला!
31 Jan 2011 - 12:44 pm | अमोल केळकर
:(
अमोल
31 Jan 2011 - 12:56 pm | नरेशकुमार
बेक्कार, खत्तरनाक,
पार सालीच काढल्या की तुम्ही, चिरफाडच करुन टाकली, काय शिल्लकच नाय ठेवलं.
31 Jan 2011 - 1:03 pm | ५० फक्त
श्री. गंगाधर,
अतिशय प्रखर कविता, नेहमीच्या विनोदी वळवापेक्षा वेगळी.
ही वॅयक्तिक जाळ्पोळ इजिप्तातल्या सामुहिक जाळपोळिची नांदि आहे की काय असं वाटायला लागलंय.आता.
हर्षद.
31 Jan 2011 - 9:39 pm | स्वानन्द
___/|\___
>>ही केवळ कविता आहे. या कल्पनाविलासाला कसलेच संदर्भ नाहीत.
कितीही म्हटलं तरी हा कल्पनाविलास वास्तवाशी मिळता जुळता वाटतो. आणि छोट्या पडद्यावर दिसणार्या बातमीमागील खरं नाट्य हे तर नसेल, असं वाटून अस्वस्थ वाटलं!
31 Jan 2011 - 10:21 pm | गंगाधर मुटे
धन्यवाद मित्रांनो.
आपल्या प्रतिसादाने आत्मिकबळ वाढले.
2 Feb 2011 - 2:25 am | अविनाश कदम
मेल्या माणसाविषयी वाईट बोलू नये म्हणून सगळे गुमानं चांगलंच बोलत होते. पण या प्रकाराने सुमारे १०/१२ लाख सरकारी कर्मचारी चांगलेच हादरलेत हे खरं ! आता हप्त्याचं काय करायचं ?
2 Feb 2011 - 2:34 am | पिवळा डांबिस
मस्त कविता!
आवडली!!
2 Feb 2011 - 2:58 am | उल्हास
जळ्जळीत वास्तव मांड्लय
3 Feb 2011 - 1:40 pm | गंगाधर मुटे
धन्यवाद मित्रांनो.